Sunday, August 31, 2025

पुस्तक क्र ११६ व्यक्तिमत्व विकास


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ११६

पुस्तकाचे नाव - व्यक्तिमत्व विकास

लेखकाचे नाव - स्वामी विवेकानंद

प्रकाशन व आवृत्ती- स्वामी ब्रम्हस्थानंद नागपूर

पृष्ठे संख्या– ६५

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १५

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

११६||पुस्तक परिचय

✨ ‘व्यक्तिमत्व विकास’ – एक प्रज्वलित मशाल

स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे नवयुवकांच्या अंतर्मनात सुप्त असलेल्या तेजोमय शक्तीला जागं करणारी एक ज्योती.


जसं सूर्य अंधाराचा नाश करतो, तसं हे पुस्तक आळस, न्यूनगंड व न्यून आत्मविश्वास यांचा नाश करून मनामध्ये धैर्य, आत्मबल व विवेक निर्माण करतं.


या ग्रंथात विवेकानंद आपल्याला सांगतात –


"स्वतःवर विश्वास ठेवा, कारण देव तुमच्याच अंतःकरणात आहे."


त्यांच्या शब्दांना एक प्रबोधनाची तलवार आहे, जी आळशीपणा व भीतीचे बंधन तोडते.

प्रत्येक पान हे शौर्य, श्रद्धा आणि सेवा या मूल्यांनी सजलेलं आहे.


हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहे.

त्यातील विचार म्हणजे धगधगता अग्नी, जो नवसंजीवनी देतो.

ते सांगतात –


"उठा, जागे व्हा आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका!"


या ग्रंथात व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बाह्य आकर्षण नसून, ते आहे चरित्र, विचारसंपन्नता आणि आत्मविश्वासाची झळाळी, हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिलं आहे.

🔷 व्यक्तिमत्व विकास : विवेकानंदांचे विचार

१. आत्मविश्वास आणि श्रद्धा

"तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा; जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हाच देवावरही विश्वास ठेवू शकता."


स्वामी विवेकानंद आत्मबल आणि आत्मश्रद्धेला व्यक्तिमत्वाचा पाया मानतात. आत्मविश्वास नसल्यास मनुष्य कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही.


२. शारीरिक आणि मानसिक विकास

"Strong body makes a strong mind."


ते नेहमी सांगत – तरुणांनी शारीरिक स्वास्थ्य, सकारात्मक विचार आणि ध्येयनिष्ठा जोपासावी. यासाठी त्यांनी व्यायाम, ध्यान आणि सतत वाचन यावर भर दिला.


३. चरित्र आणि नैतिक मूल्ये

"We want that education by which character is formed."


चरित्र ही व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे. प्रामाणिकपणा, संयम, करुणा आणि शिस्त ही चारित्र्याची तत्त्वे त्यांनी महत्त्वाची मानली.


४. ध्येयवेड आणि कार्यनिष्ठा

"उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका."


ध्येयनिष्ठ व्यक्तीच जीवनात यशस्वी होतो. आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करणे, हे व्यक्तिमत्व घडवण्याचे मूलभूत सूत्र आहे.


५. सेवा आणि परोपकार

"The best way to serve God is to serve mankind."


व्यक्तिमत्व म्हणजे केवळ स्वतःसाठी जगणे नव्हे, तर समाजासाठी उपयुक्त ठरणे. परोपकार, सहकार्य आणि समाजहित हे स्वामींच्या विचारांतील महत्त्वाचे अंग आहे.

‘व्यक्तिमत्व विकास’ हे पुस्तक म्हणजे एका साधकाला महामानव होण्यासाठीचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.

हे वाचताना जणू स्वामी विवेकानंद तुमच्याशी संवाद साधत आहेत, तुमच्या पाठीवर विश्वासाने हात ठेवून म्हणत आहेत –


"तू महान आहेस... फक्त स्वतःला ओळख!"

स्वामी विवेकानंद यांचा व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग म्हणजे –

👉 आत्मविश्वासाने प्रेरित मन,

👉 नैतिकतेने सजलेले जीवन,

👉 ध्येयवेड्याने भारलेली वृत्ती,

👉 आणि सेवाभावाने ओतप्रोत अंत:करण.


अशा प्रकारे, विवेकानंदांचे विचार आजच्या तरुण पिढीने आत्मसात केले, तर ते निश्चितच सक्षम, सुसंस्कृत आणि समाजासाठी उपयुक्त व्यक्तिमत्व घडवू शकतात.

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १२६ हृदयातील तुफान


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १२६

पुस्तकाचे नाव - हृदयातील तुफान

लेखकाचे नाव - भगवान विशे

प्रकाशन  व आवृत्ती- प्रभात प्रकाशन मुगांव ठाणे

पृष्ठे संख्या–  १८०

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १००

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२ ६||पुस्तक परिचय

हृदयातील तुफान

भगवान विशे


कविता म्हणजे मानवी मनाच्या गाभ्यात दडलेले भावविश्व. त्या भावविश्वाला शब्दांचे कोंदण चढवून जेव्हा कवी आपले मनोगत व्यक्त करतो, तेव्हा वाचकांच्या अंतःकरणालाही नवा स्पर्श मिळतो. भगवान विशे यांचा हृदयातील तुफान हा कवितासंग्रह याच भावनांचा साक्षीदार आहे.

विषयवैविध्य व सामाजिक भान

या संग्रहात हृदयातील तुफान, जीवन, गुन्हेगार माणूस, आई, मी एकटा, चिमणी, पाखरांनो, धर्म, मैत्री, भारतीय जीवन, अस्तित्व, संघर्ष अशा विविध विषयांवरील कविता वाचकांसमोर येतात.

दुःख संपेल या जगातलं, पण संघर्ष संपणार नाही 

माणूस संपेल जगण्यातला, पण जीवन संपणार नाही.

असे ते आपल्या कवितेतून जीवनाचे मर्म सांगतात .

"जीवन" आणि "अस्तित्व" या कवितांमधून मानवी प्रवासातील कडू-गोड अनुभवांचा आढावा मिळतो.

"आई" या कवितेतून मातृमूल्यांची ओंजळ भरून कवीने हृदय पाझरवले आहे.

आई ! चरणस्पर्श करुनी

 आर्पितो तुला हे 'हृदयातील तुफान' फुलवून टाकून मनातील कविता 

आई दे मला! तुझाच आशीर्वाद !

आई विषयी अपार प्रेम यातून व्यक्त होते .

"मी एकटा" या कवितेत व्यक्तीच्या एकटेपणाचा, तुटलेपणाचा वेध घेतला आहे.

"धर्म" आणि "मैत्री" या कवितांतून सामाजिक ऐक्य, मानवी नात्यांची खरी उब जाणवते.

सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब

संग्रहातील माझ्या देशात, कथा एका मुलाची, हुंडाबळी, प्राणी प्रश्न, जवान या कविता थेट वास्तवाशी निगडित आहेत.

"हुंडाबळी" या कवितेत समाजातील क्रूर प्रथा आणि त्यातून होणाऱ्या शोकांतिकेचे दर्शन घडते.

"जवान" या कवितेत सीमारेषेवर उभा असलेला सैनिक आणि त्याच्या बलिदानाची जाणीव मनाला भिडते.

"कथा एका मुलाची" आणि "प्राणी प्रश्न" या कवितांतून समाजातील असमानता, अन्याय आणि संवेदनशीलतेचा वेध घेतला आहे.

निसर्ग व संवेदनशीलता

चिमणी, पाखरांनो, वृक्षाचे मनोगत या कवितांमधून कवीने निसर्गाशी संवाद साधला आहे. वृक्षाचे आत्मकथन, चिमणीच्या उडाणीत दडलेले स्वातंत्र्य, पाखरांच्या गजरातील आनंद या सर्वांतून निसर्गाचे जिवंत चित्रण जाणवते.

व्यक्ती व समाज यांचे अंतरंग

भारतीय श्रीमंत, चार सुपुत्र, प्राथमिक शिक्षक अशा कवितांमधून कवीने समाजातील विविध घटकांचा अभ्यास साकारला आहे.

"भारतीय श्रीमंत" या कवितेत संपत्तीच्या विषमतेवर रोखठोक भाष्य केले आहे.

"प्राथमिक शिक्षक" या कवितेत शिक्षकाचे कर्तृत्व, संघर्ष आणि समाजातील स्थान अधोरेखित केले आहे.

"चार सुपुत्र" या कवितेत कौटुंबिक आयुष्याच्या जडणघडणीतील वास्तव प्रतिबिंबित होते.

चारोळ्यांचा खास ठेवा

संग्रहाच्या शेवटी दिलेल्या चारोळ्या कवीच्या सहज भावनांचे प्रकटीकरण आहेत. लहानशा ओळींतून मोठा संदेश पोहोचवण्याचे सामर्थ्य या चारोळ्यांमध्ये आहे.

कृतज्ञतेची भावना

ज्यांनी या कवितासंग्रह निर्मितीत, प्रकाशनात आणि प्रेरणेत विशेष सहकार्य केले, त्यांचे कवीने शेवटच्या काही पानांवर मनःपूर्वक आभार मानले आहेत. हे त्यांच्या नम्रतेचे व मनःस्वच्छतेचे द्योतक आहे.

एकूणच

हृदयातील तुफान हा संग्रह केवळ कवितांचा नव्हे तर विचारांचा, भावना-आवेगांचा आणि समाजाशी जोडलेल्या संवेदनांचा संगम आहे. कवीच्या अंतःकरणातून उमटणाऱ्या भावलहरी वाचकाच्या हृदयापर्यंत पोहोचतात आणि त्यालाही विचारप्रवृत्त करतात. हा संग्रह म्हणजे मनाला भिडणारा, अंतर्मुख करणारा आणि समाजाला आरसा दाखवणारा ठेवा आहे.

 आदरणीय भगवान विशे यांच्या लेखणीला उत्तरोत्तर बळ येवो ! त्यांच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा ..

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾         

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १२५ कथा 'ती 'च्या उमेदीच्या


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १२५

पुस्तकाचे नाव - कथा 'ती ' च्या उमेदीच्या

लेखकाचे नाव - डॉ शुभांगी कुंभार

प्रकाशन  व आवृत्ती- अथर्व कुणाल प्रकाशन सातारा

पृष्ठे संख्या–  ९६

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १६०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२५||पुस्तक परिचय

 कथा

   'ती ' च्या उमेदीच्या

साहित्यविश्वात स्त्रीमनाच्या संवेदनशील आणि संघर्षमय वाटचालीला समर्पित असा डॉ. शुभांगी कुंभार यांचा  कथा 'ती' च्या उमेदीच्या हा कथासंग्रह वाचकांसमोर येतो. स्त्रीच्या आयुष्याची विविध रूपं, तिचे भावविश्व, तिची स्वप्नं, संघर्ष, आकांक्षा, अपमान व अभिमान यांचा अचूक शब्दबद्ध पट या संग्रहात खुलतो.

डॉ. कुंभार यांची लेखनशैली साधी, सरळ पण हृदयाला भिडणारी आहे.


वास्तवाचे अस्सल चित्रण करताना त्या अलंकारिक भाषेचा अतिरेक न करता, नेमक्या शब्दांनी मनाचा ठाव घेतात.


कथानकांमध्ये ग्रामीण व शहरी पार्श्वभूमी, स्त्रीपुरुष नात्यांची गुंतागुंत, समाजातील विसंगती यांचे दर्शन घडते.

या संग्रहातील कथा प्रामुख्याने “ती” – म्हणजेच स्त्रीभोवती फिरतात. ती एक मुलगी असते, कधी पत्नी, कधी आई, कधी समाजातील उपेक्षित स्त्री, तर कधी स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणारी योद्धा. प्रत्येक कथेतून तिच्या जिवनाचे वेगवेगळे पैलू उमटतात.

स्त्रीच्या स्वाभिमानाचा शोध

समाजाच्या रूढींशी झुंज

शिक्षण, विवाह, आर्थिक स्वावलंबनाची गरज

प्रेम, आसक्ती आणि त्याग

कथेचा गाभा साधा असूनही डॉ. शुभांगी यांच्या संवेदनशील लेखणीमुळे त्या कथा वाचकांच्या मनात खोलवर रुततात. जिथे भावनांना शब्द सापडत नाहीत, तिथे त्यांचा लेखनस्पर्श नवा उलगडा घडवतो.

कथा 'ती' च्या उमेदीच्या” हा संग्रह केवळ मनोरंजन घडवणारा नसून विचारप्रवर्तक आहे. वाचकांना आपल्या आजूबाजूच्या स्त्रिया नव्या दृष्टीकोनातून पाहायला लावतो. पिढ्यानपिढ्यांनी चालत आलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद या कथांमध्ये आहे.कथासंग्रहात एकूण १५ कथांचा समावेश आहे . या पुस्तकाला आदरणीय श्री . रवींद्र खंदारे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा यांची प्रस्तावना लाभलेली आहे .या पुस्तकात प्रत्येक कथेतून एक नाव व कथानक समोर येतं आणि एक नवीन नायक आणि नायिका आपल्यासमोर येते .प्रत्येक कथा ही विचार करायला लावणारी आहे .समाजाचे भान राखणाऱ्या कथा या पुस्तकात आहेत .शेवंता असेल रमाला भेटणारी आजी असेल शिक्षिका असेल कलेक्टर झालेला मुलगा असेल डॉक्टर असेल श्याम असेल शालन असेल अशा कितीतरी नायक आणि नायक आपल्याला या आता कथासंग्रहात भेटत आहेत .प्रत्येक कथा ही कसे प्रसंगाला तोंड द्यायचे आणि जीवन कसे जगायचे याचे उत्तम उदाहरण आहे .अतिशय हळव्या आणि संवेदनशील मन असलेल्या माझ्या मैत्रिण डॉ.शुभांगी कुंभार यांनी त्यांच्या खास शैलीत या कथा रेखाटल्या आहेत .

एकंदरीत, कथा 'ती'च्या उमेदीच्या हा स्त्रीमनाच्या भावनिक प्रवाहाला आणि सामाजिक वास्तवाला भिडणारा असा महत्त्वाचा कथासंग्रह आहे, जो साहित्यरसिकांना केवळ वाचनाचा आनंदच नव्हे तर विचारांची नवीन दिशा देतो.

डॉ .शुभांगी कुंभार यांच्या लेखणीला उत्तरोत्तर बळ येवो ! त्यांच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा ..

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १२४ स्वयंसिद्धा



 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १२ ४ 

पुस्तकाचे नाव - स्वयंसिद्धा

लेखकाचे नाव - अनिता दाणे - जुंबाड

प्रकाशन  व आवृत्ती- परिस पब्लिकेशन

पृष्ठे संख्या–  १०४

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २२५

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२४||पुस्तक परिचय

   स्वयंसिद्धा

अनिता दाणे - जुंबाड


काव्य म्हणजे मनाचे नाजूक तरंग शब्दांत उतरलेले भावविश्व. स्वयंसिद्धा हा अनिता दाणे-जुंबाड यांचा काव्यसंग्रह हे याच भावविश्वाचे सजीव चित्रण आहे. स्त्रीमनातील कोमलता, संघर्ष, आत्मविश्वास, स्वप्नांच्या जिद्दीचा प्रवास आणि जीवनातील विविध रंग या कवितांमधून उलगडताना दिसतात.

स्वयंसिद्धा" या नावातच काव्यसंग्रहाचे सार सामावले आहे. स्वयंसिद्धा म्हणजे स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या जिद्दीवर उभं राहिलेलं व्यक्तिमत्त्व. स्त्रीच्या आत्मविश्वासाचा, आत्मभानाचा, संघर्षातून उमलणाऱ्या तिच्या तेजाचा हा गौरवगीत आहे. शीर्षक वाचतानाच वाचकाला या कवितांमधून स्त्रीजीवनाचा विविधांगी प्रवास अनुभवायला मिळेल, याची जाणीव होते.

अनिता दाणे-जुंबाड यांना आयुष्याच्या अनुभवातून कवितांची प्रेरणा लाभली आहे. त्यांनी अनुभवलेले आयुष्य, पाहिलेला समाज, स्त्रीच्या आयुष्यावरील बंधने, तिच्या अंतरीचे अपार सामर्थ्य, तसेच आत्मभानातून मिळणारी ओळख – हे सर्व त्यांनी अत्यंत सहजपणे कवितेत गुंफले आहे.

संग्रहातील वैशिष्ट्ये

या कवितांमध्ये नारीशक्तीचा आत्मविश्वास ठळकपणे जाणवतो.

ग्रामीण व शहरी दोन्ही आयुष्याचे वास्तववादी दर्शन या कवितांत आहे.

शब्दरचना साधी, सरळ असली तरी भावस्पर्शी आणि प्रभावी आहे.

काव्यसंग्रह वाचताना वाचकाला स्वतःच्या भावनांचे प्रतिबिंब उमटल्यासारखे वाटते.

स्वयंसिद्धा हा शब्दच कवयित्रीच्या भूमिकेचे द्योतक आहे – स्वतःच्या सामर्थ्यावर उभे राहण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे, हा संदेश यातून अधोरेखित होतो.

स्त्री सामर्थ्याची अनंत रूपे

 हीच आमची असीम श्रद्धा 

स्वकर्तृत्व सिद्ध करूनी 

होईन मी स्वयंसिद्धा .

आजच्या बदलत्या सामाजिक वास्तवात स्त्रीच्या आत्मसिद्धतेचा प्रवास उलगडून दाखवणारा हा संग्रह केवळ स्त्रीपुरता मर्यादित नाही; तर प्रत्येक संवेदनशील माणसाला विचार करायला लावणारा आहे. भावनांना स्पर्श करणाऱ्या या कवितांमुळे वाचकाला आयुष्याकडे नवा दृष्टिकोन मिळतो.

मत्सराचा , द्वेषाचा अन् रागाचा

रंग असतोच माणसाला

फिके होऊन सारेच रंग

माणुसकी येईल का रंगाला ?

हा काव्यसंग्रह वाचकाला स्त्रीच्या भावविश्वाशी जोडतो. वाचकाला स्वतःच्या आयुष्याचे प्रतिबिंब कवितांमध्ये दिसते. स्त्री-पुरुष दोघांनाही या कवितांतून नवे विचार मिळतात, जिद्द मिळते आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते.

इच्छाशक्तीचा कोंभ

सतत तेवत ठेवावा

सरणातल्या लाकडालाही

नवा अंकुर फुटावा

स्त्री वाचकांसाठी – प्रेरणा, सामर्थ्य आणि आत्मभानाचा प्रवास.

पुरुष वाचकांसाठी – स्त्रीच्या अंतर्मनाचे अधिक सखोल आकलन.

तरुण पिढीसाठी – संघर्षाला सामोरे जाण्याची उर्मी.

समाजासाठी – समानतेचा आणि संवेदनशीलतेचा संदेश.

आजच्या बदलत्या काळात स्त्री स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडते आहे. समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची धडपड ती सतत करते आहे. स्वयंसिद्धा हा त्या प्रत्येक स्त्रीचा आवाज आहे जी जीवनाच्या कठीण प्रसंगातही न खचता उभी राहते. हा संग्रह केवळ कवितांचा नाही, तर एक आत्मशोधाचा प्रवास आहे.

थोडक्यात, स्वयंसिद्धा हा काव्यसंग्रह म्हणजे स्त्रीमनाचा प्रवास, आत्मविश्वासाचे प्रतिबिंब आणि जीवनाला नवा अर्थ देणारा काव्यपंढरीचा अमूल्य ठेवा आहे.

अनमोल आहे मानवी जीवन 

मन भरून जगायचे 

आयुष्य सोनं करून

नित्य कर्म नवीन करायचे

प्रत्येकाने याचा आस्वाद घेतला पाहिजे . नक्की वाचा . अनिताताईंच्या लेखन प्रवासास लक्ष लक्ष शुभेच्छा .

धन्यवाद .

 

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १२३पुरुषोत्तम शिवराम रेगे


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १२३

पुस्तकाचे नाव - पुरुषोत्तम शिवराम रेगे

लेखकाचे नाव - सुलभा हेर्लेकर

प्रकाशन व आवृत्ती- साहित्य अकादमी

पृष्ठे संख्या– ९७

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ४०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२३||पुस्तक परिचय

पुरुषोत्तम शिवराम रेगे

सुलभा हेर्लेकर


पुरुषोत्तम शिवराम रेगे (सामान्यतः पु. शि. रेगे किंवा पुरु. शिव. रेगे म्हणून ओळखले गेले) हे एक अद्वितीय प्रतिभाशाली मराठी साहित्यिक होते.

हे एक प्रतिष्ठित मराठी कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संपादक होते. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब (मिठबाव) या गावात झाला आणि देहांत १७ फेब्रुवारी १९७८ रोजी मुंबईत झाला.

सुलभा हेर्लेकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, समतोल आणि सूक्ष्म दृष्टिकोनातून पु.शि. रेगे यांच्या संपूर्ण साहित्यिक प्रवासाचा अभ्यास केला आहे. पुस्तकात रेगे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास, साहित्यिक प्रवाहातील स्थान, आणि त्यांच्या विविध साहित्यप्रकारांतील योगदानाचे मूल्यमापन करण्यात आले आहे.

पु. शि. रेगे यांचे बालपण, शिक्षण, कोकणातील पार्श्वभूमी, संस्कारी वातावरण, आणि त्यांची अध्यापनातील कारकीर्द यांचे विवेचन केले आहे. त्यांची तत्त्वनिष्ठ जीवनशैली, शिस्तप्रिय वृत्ती आणि आत्मअनुशासन यामुळे ते केवळ साहित्यिकच नव्हे तर एक आदर्श प्राध्यापक म्हणूनही उभे राहतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि साहित्याच्या प्रवासाचा प्रारंभ सुरुवातील दिलेला स्पष्ट होतो .

या पुस्तकात एकूण पाच प्रकरणात रेगे यांचा विस्तृत परिचय दिलेला आहे .

रेगे यांची काव्यसंपदा मोठी आहे. त्यांचा पहिला काव्यसंग्रह साधना आणि इतर कविता ( १९३१) मध्ये प्रसिद्ध झाला. नंतरचे फुलोरा ( १९३७), हिमसेक ( १९४५), दोला ( १९५०- १९५७), गंधरेखा ( १९५४- ७४) पुष्कळा ( १९६०), दुसरा पक्षी ( १९६६), स्वानंदबोध ( १९७६), प्रियाळ ( १९७८), सुहृदगाथा ( १९७५) आणि त्यांच्या मृत्यूनंतर १९८४ मध्ये अनीह हा संग्रह प्रसिद्ध झाला.


रेग्यांची पहिली मराठी कविता साधना अणि फुलोरा या संग्रहातून आली. ही सुरुवातीची कविता एका व्यक्तिभोवती घुटमळत होती. या कवितेला जशी संस्कृत वाचनाची जोड होती तशीच इंग्रजी कवितेची जवळीकही लाभलेली होती. रेग्यांच्या मते तरुणपणी ज्या चाफेकळीची ते मुक्याने साधना करीत होते तिच्यासाठी भ्रमरापेक्षा काहीतरी वेगळे तिला साजेसे होण्यासाठी या कवितेतून धडपड करीत होते. ही कविता शब्दांचा ध्यास असलेली, शृंगारिक व काव्यमय होती.

पु. शि. रेगे यांनी कवितेव्यतिरिक्त कथा, कादंबऱ्या, नाटके, स्तोत्रे, समीक्षा या अंगाने विपुल लिखाण केले आहे. साहित्याकडे बघण्याची त्यांची स्वतःची अशी खास जीवनदृष्टी होती. त्यामुळे त्यांच्या इतरही लिखाणात अनुभवाची उत्कटता आढळते. प्रतिमा व भाषाविषयक प्रयोग आढळतात. रेग्यांच्या जाणिवेला ज्यावेळी बाह्यविश्वाचे संदर्भ मिळाले तेव्हा तिने कथारूप घेतले. साहित्य प्रकारातून रेग्यांनी जीवनातील वास्तवाचे तरीही वास्तवापलीकडचे वाटणारे, मनोज्ञ रूप पकडलेले आहे.

पु. शि. रेगे यांनी मराठी साहित्यसमीक्षणात स्वतंत्र स्थान निर्माण केले. या विभागात त्यांच्या समीक्षणलेखनाची वैशिष्ट्ये, शैली, आणि सौंदर्यशास्त्रीय दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. त्यांनी साहित्याची केवळ कथा-कवितांपुरती मर्यादा न ठेवता त्यामागील तात्त्विक विचारसरणीकडेही लक्ष वेधले. त्यांच्या समीक्षणात भावना आणि बुद्धी यांचा समतोल जाणवतो.

रेगे यांची तत्त्वदृष्टी, उपनिषदांवरील आस्था, वेदांतविचार, आणि सौंदर्यशास्त्रीय भूमिकेचे विश्लेषण आहे. साहित्य हे फक्त करमणुकीचे साधन नसून जीवनाचे सार उलगडणारे माध्यम आहे, ही त्यांची ठाम धारणा होती. त्यांनी सौंदर्य आणि आत्म्याच्या नात्याचा सखोल विचार करून जीवनदृष्टीची नवी मांडणी केली .

अंतिम भागात हेर्लेकर मॅडम यांनी रेगे यांच्या एकूण साहित्यिक योगदानाचा समग्र आढावा घेतला आहे. त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये, मराठी साहित्यातील त्यांचे स्थान, आणि त्यांच्या विचारांचा आजच्या काळातील उपयोग यावर चिंतन केले आहे. लेखिकेच्या मते, रेगे हे आधुनिक मराठी साहित्यातील एक तेजस्वी विचारवंत आणि कवी होते.

थोडक्यात, हे पुस्तक केवळ चरित्र नाही, तर एक साहित्यिक अभ्यासाचा आरसा आहे. सुलभा हेर्लेकर यांनी वस्तुनिष्ठ, संशोधनपूर्ण आणि समजूतदार शैलीत रेगे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि साहित्यविश्व उलगडून दाखवले आहे.

धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १२२ महाराष्ट्र भूषण


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १२२

पुस्तकाचे नाव -महाराष्ट्र भूषण

लेखकाचे नाव - बालाजी बिभीषण नाईकवाडी

प्रकाशन व आवृत्ती- गुरुमाऊली प्रकाशन लातूर

पृष्ठे संख्या– ९२

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १२०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२२||पुस्तक परिचय

महाराष्ट्र भूषण

The Spirit of Maharashtra 


महाराष्ट्र शासनाने दिला जाणारा "महाराष्ट्र भूषण" हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. या पुरस्काराची सुरुवात १९९६ साली झाली. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. साहित्य, संगीत, कला, विज्ञान, क्रीडा, सामाजिक सेवा, आरोग्य आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांतील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. पुरस्कारप्राप्त व्यक्तीस ₹२५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एक स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र दिले जाते. पु. ल. देशपांडे हे या पुरस्काराचे पहिले मानकरी होते. त्यानंतर लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, बाबा आमटे, रतन टाटा यांसारख्या थोर व्यक्तींना हा गौरव प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्याकडून दिला जाणारा मान-सन्मान असून, त्यातून त्या व्यक्तीच्या कार्याची आणि योगदानाची कदर व्यक्त केली जाते.

अशा या महाराष्ट्र भूषण प्राप्त झालेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचा परिचय या पुस्तकात लेखक बालाजी नाईकवाडी यांनी आपल्या खास शैलीत दिलेला आहे .विशेष म्हणजे हे पाठ्यपुस्तक मला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला प्राप्त झाले त्यामुळे आजच्या वाढदिवसा दिवशी या पुस्तकाच्या परिचय टाकावा असे मनोमन वाटले .या पुस्तकाचे वाचन करून नक्कीच काहीतरी आदर्शवत करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते .काही करता आलं नाही तरी आपल्यापासून आपल्या देशाला समाजाला आपला त्रास होऊ नये हे नक्की करावे . बालाजी नाईकवाडी हे चांगले लेखक आणि कवी आहेत .या पुस्तकात त्यांनी एकूण 19 दिग्गजांचा परिचय दिलेला आहे .सर्वजणच आपापल्या क्षेत्रात दिग्गज आहेत आणि महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना सन्मानाने बहाल केलेला आहे . 

खालील सर्वांना हा पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे .


पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे


भारताची स्वर कोकिळा - लता मंगेशकर


विजय पांडुरंग भटकर


सचिन रमेश तेंडुलकर


जोशी, भीमसेन


अभय बंग


मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे


रघुनाथ अनंत माशेलकर


रतन नवल टाटा


रामराव कृष्णराव पाटील


नारायण विष्णू धर्माधिकारी


मंगेश केशव पाडगांवकर


सुलोचना लाटकर


जयंत नारळीकर


अनिल काकोडकर


बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे


आशा भोसले


डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी


अशोक सराफ


प्रत्येक क्षेत्रातील हे सर्वजण दिग्गज आहेत . यांच्या कार्याची माहिती घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे . बालाजी नाईकवडी यांनी या सर्वांचाच आपल्या खास अशा शैलीत सुंदर असा परिचय या पुस्तकात करून दिला आहे .


"महाराष्ट्र भूषण" हे पुस्तक वाचल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात, स्पर्धा परीक्षेच्या तयारीत व प्रकल्प लेखनात मदत होते; शिक्षकांना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उदाहरणे देण्यासाठी उपयोगी ठरते; तसेच पालक, सामान्य वाचक, लेखक, निवेदक यांना महाराष्ट्रातील थोर व्यक्तींच्या कार्याची माहिती मिळते. या पुस्तकामुळे समाजसेवा, साहित्य, कला, विज्ञान आदी विविध क्षेत्रांतील महान व्यक्तिमत्त्वांचा परिचय होतो आणि राज्याच्या वैभवाची जाणीव होते. त्यामुळे हे पुस्तक वाचल्याने ज्ञान, प्रेरणा आणि अभिमान या तिन्ही दृष्टीने सर्वांनाच फायदा होतो.या पुस्तकाला आदरणीय योगेश सोनवणे साहेब IT विभाग प्रमुख चे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी प्रस्तावना दिलेली आहे .माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हे पुस्तक मला प्राप्त झाले आणि या पुस्तकाचे परीक्षण मला माझ्याच वाढदिवसा दिवशी करता आले .धन्यवाद बालाजी सर खूप छान अक्षर ठेवा आज माझ्या तुम्ही मला भेट दिला . त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार .सर्वांनी नक्की वाचावं असं हे सर्वांग सुंदर पुस्तक .

धन्यवाद .


 

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १२१ विठ्ठल रामजी शिंदे

 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १२१

पुस्तकाचे नाव -भारतीय साहित्याचे निर्माते विठ्ठल रामजी शिंदे

लेखकाचे नाव - गो. मा पवार

प्रकाशन व आवृत्ती- साहित्य अकादमी

पृष्ठे संख्या– ७५

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ४०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२१||पुस्तक परिचय

भारतीय साहित्याचे निर्माते 

विठ्ठल रामजी शिंदे

गो . मा. पवार


गो. मा. पवार यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांचे बालपण, शिक्षण, ब्राह्मो समाजाशी संबंध, आणि समाजसुधारणेसाठी केलेले कार्य याचे तपशीलवार वर्णन केले आहे.

गो.मा. पवार लिखित "भारतीय साहित्याचे निर्माते: विठ्ठल रामजी शिंदे" हे पुस्तक एक वैचारिक आणि ऐतिहासिक दस्तऐवज आहे. या पुस्तकात विठ्ठल रामजी शिंदे यांचे समाजसुधारक कार्य, त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनाची उकल, व त्यांचे भारतीय साहित्य व समाजप्रबोधनातील योगदान विश्लेषणात्मक पद्धतीने मांडले आहे.

शिंदे यांचे धर्म, समाज, जातिव्यवस्था याविषयीचे विचार मांडताना लेखकाने त्यांचे ग्रंथ, व्याख्याने आणि आंदोलनांचा संदर्भ दिला आहे.

त्यांची "माय लाइफ अ‍ॅंड मिशन" ही आत्मकथा विश्लेषित केली आहे.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये असलेला सामाजिक आशय, विचारप्रवृत्त भाषाशैली यांचे रसग्रहण.

त्यांच्या लेखनातून उभ्या राहिलेल्या विचारधारेचा सखोल अभ्यास.

तत्कालीन भारतातील समाजव्यवस्था, अस्पृश्यतेचे वास्तव, व सामाजिक संघर्ष यावर शिंदे यांनी दिलेल्या प्रतिसादांचे अभ्यासपूर्ण विवेचन.

महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीच्या तुलनेत शिंदे यांची वैचारिक भूमिका अधोरेखित केली आहे.

विठ्ठल रामजी शिंदे (जन्म: 23 एप्रिल 1873 – मृत्यू: 2 जानेवारी 1944) हे भारतातील एक थोर समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे प्रणेते, ब्राह्मो समाजाचे कार्यकर्ते, आणि सामाजिक न्यायाचे झुंजार सेनानी होते. त्यांनी ब्रिटिश काळात अस्पृश्य म्हणून वागवले जाणाऱ्या समाजघटकांसाठी व्यापक कार्य केले.

1906 साली त्यांनी अस्पृश्यता निवारण मंडळ स्थापन केले.

दलितांना शिक्षण, पाणी, देवदर्शन, आणि समाजात सन्मानाने वावरण्याचा अधिकार मिळावा यासाठी कार्य केले.


"सार्वजनिक wells (पाणवठे), रस्ते, मंदिरे हे सर्वांना खुले असावेत" असा आग्रह त्यांनी धरला.

दलित आणि मागासवर्गीय मुलांसाठी अनेक रात्रशाळा व वसतिगृहे सुरू केली.


पुणे, सोलापूर, मुंबई येथे सामाजिक कार्याचा व्यापक विस्तार केला.

ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून सामाजिक समता, सत्य आणि श्रद्धेवर आधारित धर्मभावना रुजवण्याचा प्रयत्न.


अंधश्रद्धा, जातिव्यवस्था, कर्मकांड याविरुद्ध प्रचार.

विठ्ठल रामजी शिंदे हे एक आदर्श समाजसुधारक, विचारवंत आणि साहित्यिक होते. त्यांनी समता, बंधुता आणि मानवता या मूल्यांसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या कार्यामुळे सामाजिक बदलाची पायाभरणी झाली आणि भारतीय समाज अधिक समावेशक होण्याच्या दिशेने पुढे गेला.

या पुस्तकातील उपसंहार मध्ये त्यांच्याविषयी अगदी थोडक्यात पण खूप छान माहिती दिली आहे.

विठ्ठल रामजी शिंदे हे मराठी साहित्यसृष्टीत अपवादात्मक ठरावेत एवढे वैशिष्ट्यपूर्ण लेखक होत असे म्हणता येते. त्याचे कारण असे, की ते कृतिवीर असून लेखक होते. वृत्तीने ते धर्मनिष्ठ पुरुष होते. त्यांनी आपले आयुष्य उदार धर्मप्रचाराच्या कार्यासाठी वाहून घेतले. त्यांच्या धर्मकल्पनेतूनच उद्भूत होणारे अस्पृश्यतानिवारणाचे व अन्य सामाजिक सुधारणेचे कार्य ते प्रत्यक्षात सातत्याने करीत राहिले. म्हणून ते मूलतः कृतिवीर होते. महाराष्ट्रीय लोक त्यांना कर्मवीर, महर्षी या नावांनी संबोधून त्यांचा यथार्थपणाने गौरवही करीत होते. अशा कर्मवीराने केलेली ही साहित्यनिर्मिती हा एक प्रकारे त्यांच्या कार्याचा भाग आहे, अथवा त्यांच्या कार्याचे ते फलित आहे असेही म्हणता येईल. त्यांची वैचारिक भूमिका अथवा जीवनदृष्टी, त्यांनी केलेले कार्य आणि त्यांची साहित्यनिर्मिती यामध्ये कमालीची एकरूपता आहे, सुसंवाद आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या धर्मनिष्ठ कर्मवीराने केलेली साहित्यनिर्मिती ही मराठी साहित्यसृष्टीतील अपवादात्मक घटना म्हणावी लागेल. स्वाभाविकपणेच त्यांच्या कार्यातून त्यांच्या वृत्तीचे जे विशेष प्रकट होतात, तेच त्यांच्या साहित्यनिर्मितीतून प्रकट होतात असे आपणांस दिसून येते.

हे पुस्तक केवळ चरित्र नाही, तर एका युगद्रष्ट्या विचारवंताचे कार्य आणि विचार यांचा दस्तऐवज आहे.


शालेय, महाविद्यालयीन व संशोधन पातळीवर हे पुस्तक अभ्यासकांना उपयोगी ठरते.


अस्पृश्यता निवारण आणि भारतीय सामाजिक सुधारणांच्या इतिहासात रस असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत मौल्यवान आहे.

विठ्ठल रामजी शिंदे हे एक कर्मयोगी आणि सामाजिक उदारतावादी होते, ज्यांनी अस्पृश्यता निवारण, शिक्षण प्रसार, मानवता-सम्मान या मूलभूत तत्त्वांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांची वैचारिक धरोहर आजही मानवतावादी चळवळींना प्रेरणा देते .

त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी नक्कीच हे पुस्तक आपल्याला उपयोगी पडते पुस्तक वाचल्याने अशा महान व्यक्तींच्या कार्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर नकळतपणे परिणाम होतो चांगले विचार आपल्या डोक्यात येतात त्यासाठी चांगलीच पुस्तके वाचली पाहिजेत तेव्हा नक्की वाचा हे पुस्तक . धन्यवाद .

 

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र . १२० व्यसनमुक्तीच्या वाटेवर


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १२०

पुस्तकाचे नाव - व्यसनमुक्तीच्या वाटेवर

लेखकाचे नाव - सौ. छाया तुकारामसिंह बैस चंदेल

प्रकाशन व आवृत्ती- समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर

पृष्ठे संख्या– ४८

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १००

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२०||पुस्तक परिचय


व्यसनमुक्तीच्या वाटेवर

लेखिका : सौ. छाया तुकाराम सिंह चंदेल मॅडम


व्यसनमुक्तीच्या वाटेवर" हे सौ. छाया तुकाराम सिंह चंदेल मॅडम यांचे चिंतनशील, संशोधनाधिष्ठित व समाजमन जागवणारे पुस्तक आहे. समाजातील वाढती व्यसनाधीनता आणि त्याचे गंभीर परिणाम या पार्श्वभूमीवर हे पुस्तक लिहिले गेले असून, समाज परिवर्तनासाठी एक वैचारिक दस्तऐवज ठरतो.

छाया मॅडम आणि माझे मित्रत्व खूप दिवसापासून आहे .


या पुस्तकात तंबाखू व्यसनमुक्ती आणि शिक्षणाची सांगड घालून बालवयातच या सवयींवर प्रतिबंध करणं किती आवश्यक आहे, हे प्रभावीपणे मांडले आहे. व्यसनमुक्ती ही काळाची गरज कशी बनली आहे, हे लेखकाने तर्कसंगत उदाहरणे देत स्पष्ट केले आहे.

व्यसनमुक्तीच्या वाटेवर’ हे पुस्तक सौ. छाया तुकाराम सिंह चंदेल मॅडम यांनी समाजासमोर आरोग्यदृष्टीने आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत ज्वलंत असा व्यसनमुक्तीचा प्रश्न प्रभावी पद्धतीने मांडण्यासाठी लिहिले आहे. हे पुस्तक केवळ एक माहितीपर दस्तऐवज नसून, प्रत्येक वाचकाच्या मनात परिवर्तनाची ठिणगी पेटवणारा विचारांचा दीपस्तंभ आहे.

या पुस्तकात खालील महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल विवेचन केलेले आहे :


🔹 तंबाखू व्यसनमुक्ती आणि शिक्षण – शालेय वयातच या सवयींना थारा न देण्याचे मार्ग.


🔹 बाल व्यसनमुक्ती – लहानग्यांना या सापळ्यातून वाचवण्यासाठी सजगतेचे महत्त्व.


🔹 व्यसनमुक्ती – काळाची गरज – बदलत्या जीवनशैलीत आरोग्याचा मूलमंत्र.


🔹 तंबाखूमुक्त शाळा आणि समाज – शिक्षणाच्या माध्यमातून समाजघडणीचा दृष्टिकोन.


🔹 तंबाखूमुक्त कुटुंब – घरातूनच व्यसनमुक्तीची सुरुवात.


🔹 तरुणाईतील वाढती व्यसनाधीनता – आकर्षण की आत्मविनाश?

🔹 तंबाखू आणि कोविड-१९ यातील संबंध – रोगप्रतिकारशक्ती आणि आरोग्याचा समतोल.


🔹 कर्करोगाशी तंबाखूचा थेट संबंध – वैज्ञानिक माहिती आणि सजगतेची गरज.


🔹 स्त्रियांमधील व्यसनाधीनता – एक वाढता सामाजिक प्रश्न.


🔹 विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनता – अभ्यास, करिअर आणि आरोग्यावर परिणाम.


🔹 ग्रामीण समाजातील व्यसनाधीनता – जागरूकतेचा अभाव की उपलब्धतेची समस्या?

🔹 मानसिक आरोग्य आणि व्यसन – मनाचे बळ आणि व्यसनमुक्त जीवनशैली.


🔹 दारिद्र्यरेषेखालील घटकांमधील व्यसन – गरिबी, अवकाश आणि नशा.

तंबाखूमुक्त शाळा ही संकल्पना शिक्षण संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडवण्याचे एक प्रभावी साधन ठरू शकते, हे मत प्रस्तुत ग्रंथात ठामपणे मांडले आहे. तसेच तंबाखूमुक्त कुटुंब ही संकल्पना केवळ आरोग्याचे नव्हे, तर सामाजिक विकासाचेही प्रतिबिंब आहे.


तरुण पिढीतील वाढती व्यसनाधीनता, विद्यार्थ्यांमधील मानसिकतेवर होणारा परिणाम, स्त्रियांमधील व्यसनाधीनता, ग्रामीण भागातील व्यसनाचे वास्तव, दारिद्र्य रेषेखालील लोकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण, आणि मानसिक आरोग्य या सगळ्या पैलूंवर सखोल अभ्यासपूर्ण मते मांडण्यात आलेली आहेत.

विशेषतः तंबाखू आणि कोविड-१९ यामधील परस्परसंबंध उलगडून दाखवताना, लेखिकेने अत्यंत मुद्देसूदपणे आरोग्याच्या संकटांची जाणीव करून दिली आहे.


कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांमध्ये तंबाखूची भूमिका लक्षात घेता, हे पुस्तक समाजाला व्यसनमुक्तीकडे वळवणारा एक आरसा ठरतो.

"व्यसनमुक्तीच्या वाटेवर" हे पुस्तक केवळ माहितीपर नसून, ते विचारांना चालना देणारे, कृतीची प्रेरणा देणारे आणि समाजपरिवर्तनाच्या दिशेने झेप घेणारे एक मार्गदर्शक ठरते. हे पुस्तक प्रत्येक पालक, शिक्षक, आरोग्यसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अवश्य वाचावे.

पालक, शिक्षक, आरोग्यसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण संस्था आणि तरुण पिढी – सर्वांनीच हे पुस्तक वाचून, स्वतःमध्ये व समाजात व्यसनमुक्तीचा संदेश रुजवावा.

‘व्यसनमुक्तीच्या वाटेवर’ हे पुस्तक म्हणजे समाजपरिवर्तनाचा एक आरसाच आहे. हे वाचून प्रत्येकाने “मी व्यसनमुक्त समाजासाठी काय करू शकतो?” या प्रश्नाचे उत्तर शोधावे.

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र ११९ रानवसा एक मुक्त चिंतन

 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ११९

पुस्तकाचे नाव - रानवसा एक मुक्त चिंतन

लेखकाचे नाव - डॉ. अश्विनी प्रवीण देहाडराय

प्रकाशन व आवृत्ती- ATM पब्लिकेशन 

पृष्ठे संख्या– ६९

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ७५

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

११९||पुस्तक परिचय

रानवसा

एक मुक्त चिंतन

डॉ.अश्विनी प्रवीण देहाडराय


"रानवसा – एक मुक्त चिंतन" हे डॉ. अश्विनी प्रवीण देहाडराय यांचे चिंतनशील आणि अनुभवसिद्ध लेखसंग्रह आहे. या पुस्तकाच्या शीर्षकातच ‘रान’ आणि ‘वसा’ हे शब्द ग्रामीणतेचा, मातीचा, निसर्गाच्या जवळच्या वास्तवाचा संदर्भ देतात, तर 'मुक्त चिंतन' ही लेखिकेची सर्जनशील विचारांची मांडणी सूचित करते.


हे पुस्तक म्हणजे नुसतेच अनुभवांचे शब्दचित्र नव्हे, तर लेखिकेच्या मनात घडणाऱ्या जीवनविषयक विचारप्रक्रियेचा एक प्रगल्भ दस्तऐवज आहे. ग्रामीण आणि नागर जीवनाचे अनुभव, निसर्गाच्या सान्निध्यातील मनस्वीपणा, स्त्री म्हणून वाटचाल करताना आलेले टप्पे, सामाजिक समज-गैरसमज यांचा समतोल विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून वेध घेतलेला आहे.

साधी, सरळ आणि संवेदनशील भाषा – वाचकाच्या मनापर्यंत पोहोचणारी शैली.


वास्तविक अनुभव आणि चिंतन यांचा मेळ – लेखिका शिक्षिका, ग्रामीण भागात काम करणारी असल्यामुळे अनुभवप्रामाणिकता ठिकठिकाणी जाणवते.


स्त्रीचे अंतर्मन – एक स्त्री म्हणून लेखिकेच्या वाट्याला आलेले अनुभव ती बिनधास्तपणे मांडते.


निसर्ग, माती, रान, लोकजीवन – या गोष्टींशी लेखन घट्ट जोडलेले आहे.


मनाचा ठाव घेणाऱ्या विषयांना लेखिकेने स्पर्श केला आहे.

डॉ. अश्विनी देहाडराय यांची लेखनशैली आत्मीय आहे. त्या तात्त्विक नाहीत, पण गाभ्याशी भिडतात. त्या आत्मचरित्रात्मक शैलीने लेखन करत असल्या तरी त्यातून सामान्य वाचक स्वतःला शोधू लागतो. 'रान' म्हणजे मोकळं, स्वाभाविक जग, आणि 'वसा' म्हणजे विसावा, स्थैर्य – हे दोन्ही या पुस्तकात अनुभवल्यासारखं वाटतं.

"रानवसा" हे पुस्तक म्हणजे एक अशा लेखिकेचे आत्मिक बोलके प्रतिबिंब आहे, जिच्या मनातले विचार मोकळेपणाने, रानातल्या वाऱ्यागत मोकळे होत गेले आहेत. हे केवळ वाचायचं नसतं – ते अनुभवायचं असतं, मनात घेत राहायचं असतं.

नागपूरच्या भेटीत मिळालेला हा रानवसा .जेव्हा आठवण होईल त्यावेळेस हा वसा मी उघडते आणि वाचत राहते .वाचताना कधी त्याच्याशी एकरूप होते कळतच नाही .माझी मैत्रीण मावशी डॉक्टर अश्विनी मॅडम यांनी हा वसा माझ्या ओट्यात घातला .त्यांचे अक्षर माझे शब्द कधी झाले कळालेच नाहीत .खूप छान पुस्तक आहे त्यांचे लेखणीवर मारुती चितमपल्ली यांचा विशेष प्रभाव आहे .या पुस्तकातील सर्व लेख खूप छान आहेत .परमात्म्याचे चैतन्य निसर्ग विषयी भरभरून लिहिताना आमच्या मॅडम दिसतात खूप छान निसर्गाची माहिती त्यांनी दिलेली आहे .


 वसंत तेथ वने

 वने तेथे सुमने

 सुमनी पालिंगने

 सारंगाची ॥


वसंत ऋतू आला की नवी पालवी असायची अशीच पालवी प्रत्येकाच्या मनाला लेखणीला फुटली पाहिजे आणि त्यातून सुंदर सुंदर अक्षर मोती तयार झाले पाहिजेत .खूप छान वर्णन निसर्गाचं त्यांनी याच्यात केलेला आहे .असेच त्यांच्या लेखणीतील वेगवेगळ्या अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडलेले आहेत प्रत्येक लेखकाला प्रत्येक प्रसंग अनुभव कसा वाटला त्याची सुंदर माहिती आपल्याला या पुस्तकात मिळते . नक्की वाचले पाहिजे हे पुस्तक .मी वाचलं तुम्हीही वाचा . धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Wednesday, August 27, 2025

पुस्तक क्र . ११८ आमी आगरी बोलीचे कवी

 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ११८

पुस्तकाचे नाव - आमी आगरी बोलीच कवी

लेखकाचे नाव - संपादक श्री एन . जे . पाटील पेण

प्रकाशन व आवृत्ती- ओजस प्रकाशक पेण

पृष्ठे संख्या– ११०

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ अमूल्य

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

११८||पुस्तक परिचय

आगरी भाषा ही महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी भागात बोलली जाणारी एक प्रादेशिक बोलीभाषा आहे. हिला "आगरी बोली" किंवा "आगरी मराठी" असेही म्हणतात. ही भाषा मुख्यतः मराठी भाषेच्या कोकणी उपभाषेच्या छायेत येते.

आगरी भाषा खालील जिल्ह्यांमध्ये विशेषतः आढळते:

ठाणे

पालघरला

रायगड

मुंबई व उपनगर

काही प्रमाणात नाशिक, अहमदनगर, पुणे इत्यादी भागांमध्ये स्थलांतर झालेल्या आगरी समाजामध्ये बोलली जाते .

आगरी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर संपूर्ण समाजाच्या संस्कृतीची ओळख आहे.


लोकगीतं: आगरी कोळी गीतं, लग्नगीतं, नाच-गाणं


प्रसिद्ध नाटके व चित्रपट: काही मराठी चित्रपटांतून आगरी भाषेचा वापर – उदा. आग्याबाई अरेच्चा, टाइमपास २

सण-उत्सव: नवरात्र, होळी, गोकुळाष्टमी आदी सणांमध्ये आगरी भाषेतील लोकपरंपरा

आगरी भाषा ही मराठीचीच एक बोली असून, तिचा मूळ पाया मराठीच आहे. परंतु तिच्या स्वरूपात स्थानिकता, सहजता आणि ग्रामीण वैशिष्ट्यं अधिक प्रखरपणे जाणवतात.

आगरी भाषेच्या संबोधनात संबोधनात "रे", "ग", "हो" यांचा वापर जास्त होतो.

आगरी भाषा ही केवळ शब्दांची मालिका नाही, ती एक भावना, संस्कृती आणि ओळख आहे. ही भाषा माणसांच्या संवादातली सहजता, जिव्हाळा आणि पारंपरिकता दाखवते. तिचं संवर्धन म्हणजे आपल्या मूळाची जपणूक होय.

अशाच आगरी भाषा बोलणाऱ्या कवींच्या कवितांचा आ मी आगरी बोलीचं पुजारी हा कवितासंग्रह तुमच्या हातात पडला.यातील बरेचसे शब्द काळजाला भिडले .

मुलूख मातीचा, तोंडात मोलाचा शब्द, आणि अंतःकरणात माणुसकीचा देव...

अशी ही आमची आगरी बोली – खरी, साधी आणि सजीव!

"आगरी बोलीचं पुजारी" हा कवितासंग्रह म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नसून, ही बोली जपणाऱ्या आणि तिच्या प्रत्येक अक्षरात भक्तिभावाने प्रार्थना करणाऱ्या आगरी कवींनी रचलेली एक सामूहिक आरती आहे.

या संग्रहात समाविष्ट सर्व कविता म्हणजे गावच्या पारावर बसलेल्या आजोबांची आठवण, आईच्या लडिवाळ शब्दांची ओळख, आणि देवळातल्या घंटानादासारखी शुद्ध भावना – या प्रत्येक कवितेतून व्यक्त होते.


आगरी बोलीला नमन करत, या संग्रहात विविध आगरी कवींनी आपली प्रतिभा आणि आस्था व्यक्त केली आहे. या कविता केवळ वाचल्या जात नाहीत, त्या अनुभवाव्या लागतात – कारण त्या आपल्याला आपल्या मातीत पुन्हा एकदा रुजवतात.

शब्द हेच येथे देव, आणि बोली हीच येथे भजनाची गाणी आहेत.

ही केवळ कविता नाहीत – या आमच्या मातीची, माणसांची, आणि त्यांच्या श्रद्धेची गाथा आहे.

भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती संस्कृतीची, श्रद्धेची आणि अस्मितेची वाहक असते. आगरी बोली ही समुद्राच्या लाटा, शेतातली माती, आणि कोळीवाड्यातल्या गाथा यांची साक्ष देते. ती बोली जपण्याचं आणि तिच्यातून ईश्वराला साकडं घालण्याचं काम या संग्रहातून घडतं आहे.

प्रत्येक कविता आगरी बोलीतील भक्तिभावाने ओथंबलेली आहे.


विविध आगरी कवींनी आपापल्या हृदयातून उमटलेली प्रार्थना येथे गुंफली आहे.


या संग्रहात देव, धर्म, श्रद्धा, आई, मातृभूमी, निसर्ग आणि बोली यांना वंदन करणारे अनेक भावस्पर्शी शब्द आहेत.


काही कविता पारंपरिक स्तोत्रांच्या छायेत, तर काही आधुनिक शैलीत – पण सर्वांचा उद्देश एकच: बोलीची भक्ती आणि बोलीची सेवा.

या पुस्तकाचे प्रस्तावना देणारे  

पाटील सर या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना म्हणतात,

 आम्ही आगरी बोलीचे पुजारी या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहीताना मला आनंद होत आहे. सदर काव्य संग्रहात सत्तावन्न आगरी कवींनी सहभाग घेतला असून एकशे दहा कवितांचा समावेश आहे. आगरी संस्कृती, जुन्या चालीरीती, नष्ट होत चाललेली शेती-भाती, औद्योगिकीकरण, बदलणारी पिढी, बदलणारी नातीगोती, सण उत्सव, वाढत जाणारे प्रदुषण इ. विषयांवर केलेले लेखन आपल्या लेखनीतून सर्वच कवींनी आपल्या भाषेवर प्रेम करत जिवंतपणे उभे केले आहे. त्या सर्वच सहभागी कवींचे मी कौतुक करतो. सर्वांना धन्यवाद देतो.


२८ ऑगस्ट २०२२ रोजी सार्वजनिक विद्यामंदिर पेण येथे पेण तालुक्यातील ४२ कवींनी 'काव्यमोती' काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले. पेण तालुक्यातील सर्वच आगरी कींना एकत्र करुन लिखाणासाठी प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न होता. त्या यशानंतर श्री एन. जे. पाटील आणि मी जिल्ह्यातील कवींना प्रोत्साहन देऊन आगरी कविता संग्रह प्रकाशित व्हावा ही इच्छा होती.


या बाबत प्रा. एल.बी. पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली आणि जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर कोकण विभागातून सत्तावन्न आगरी कवींनी सहभाग घेऊन 'आमी आगरी बोलीचं पुजारी' हा काव्यसंग्रह आपल्या हातात देताना आम्हां सर्वच आगरी भाषेच्या पुजाऱ्यांना अभिमान वाटत आहे.

या पुस्तकात एकूण 110 कवी आणि त्यांच्या सुंदर कविता यांचा समावेश आहे .

आईची मैत्रीण हे आपल्या बोली भाषेत सांगताना कवी म्हात्रे खूप छान वर्णन करतात,

आयची मइतरीन


माजे आयची मयतरिन

 दोन ववलांची चूल 

सकालूच उठताना 

आठवते तिला मातीची चूल


सकालीच उठून तिलाआय सारवित बसते शेनान 

जसं काही बालाचे गाल 

गोंजरी कोमल हातानं

किती सुंदर वर्णन केले आईची मैत्रीण आणि चुलीचे .

अशीच सुंदर आणखी एक कविता ज्यामध्ये आगरी बोलीच महत्व सविता पाटील मॅडम यांनी सांगितला आहे .

आगरी बोलीचं वारू

सुसाट सुटलन गो

आगरी बोलीचं वारू

बगवाला निंघलन गो

समिंदरान तारू

आगरी लोखाई

तारू भरलन गो

तारू परदेशी तिराला

लागलान गो

आनंदी मनाना आला उदानू


आगरी बोली ही साथ समुद्रा पार चालली . याविषयी आपल्या कवितेतून मॅडम खूप छान संकल्पना मांडतात .

या संग्रहात स्थानिक, नवोदित व ज्येष्ठ आगरी कवींनी आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. हे एक वैशिष्ट्य म्हणजे या संग्रहामागे कुठलाही एकट्याचा दृष्टिकोन नाही, तर संपूर्ण आगरी समाजाच्या श्रद्धेचा आवाज आहे.

आपल्याला या आगरीबोलीचा गोडवा आणि साधेपणा पाहायचा असेल तर हा कवितासंग्रह नक्की वाचावा या कवितासंग्रहाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र ११७ दिवेलागणीची वेळ

 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ११७

पुस्तकाचे नाव - दिवेलागणीची वेळ

लेखकाचे नाव - ना . धों . महानोर

प्रकाशन व आवृत्ती-साकेत प्रकाशन पुणे

पृष्ठे संख्या– ११२

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ८०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१ १७||पुस्तक परिचय


"दिवेलागणीची वेळ" हा ना.धों. महानोर यांचा एक हृदयस्पर्शी, अनुभवाधिष्ठित आणि विचारांना झणझणीत स्पर्श करणारा शेती व पाणी विषयक लेखसंग्रह आहे.


या संग्रहातील प्रत्येक लेख म्हणजे शेतकऱ्याच्या जगण्याची एक जिवंत हाक. मातीशी नाते जपणाऱ्या माणसाच्या व्यथा, आशा, संघर्ष आणि शाश्वततेच्या शोधाचा हा प्रवास आहे.


ना.धों. यांची शैली ही कवीहृदयाची, तरी वास्तववादी. त्यांनी शब्दांनी केवळ परिस्थितीचे वर्णन केले नाही, तर पाण्याच्या टंचाईच्या वेदना, शेतीच्या नजाकती, धोरणांतील विसंगती आणि ग्रामीण जीवनाचे धूसर भविष्य यांची वेगळीच जाणीव करून दिली आहे.


दिवेलागणी म्हणजे दिवा लागायची वेळ नाही, तर शेतीच्या भविष्याचे अंधुक होत चाललेले दृष्य, अशीच ही वेळ त्यांनी लेखनातून दाखवली आहे.

या पुस्तकातील काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आपल्याला दिसून येतील. 

शेतीचे अर्थकारण आणि राजकारण यांची सडेतोड चर्चा


पाणीप्रश्न, सिंचनधोरणे, जलव्यवस्थापन यावर प्रभावी भाष्य


मराठी ग्रामीण जीवनाचे मनोवेधक चित्रण


समर्पक उपमांची शैली आणि संवेदनशील दृष्टिकोन

ना.धों. महानोर यांचे "दिवेलागणीची वेळ" हे पुस्तक हे केवळ लेखांचे संकलन नाही, तर शेतकऱ्याच्या अंतःकरणाची वाणी आहे. हे लेखसंग्रह शेती, पाणी, पर्यावरण, ग्रामीण संस्कृती आणि राजकीय धोरणांमधील विसंगती यांचा अत्यंत हृदयस्पर्शी आणि सडेतोड आढावा घेतो.

दिवेलागणीची वेळ" हे पुस्तक म्हणजे पाणी, शेती आणि शेतकऱ्याच्या दुःखाची दिवेलागण आहे.

ना.धों. महानोर यांनी स्वतः शेती अनुभवलेली आहे, म्हणून त्यांच्या लेखनात मातीचा गंध आणि अनुभवाची प्रामाणिकता आहे.

या पुस्तकातील त्यांचा पहिलाच लेख आहे पाणी पाणी आणि पाणी पाण्याविषयी बरेचसे लेख त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहेत. पहिले अखिल भारतीय जल साहित्य संमेलन नागपूर येथे झाले होते त्यामधील हे अध्यक्षीय भाषण आहे. यात पाण्याविषयी त्यांनी विस्तृत माहिती देऊन शेवटच्या परिच्छेदात आपल्या मनातली खंत व्यक्त केली आहे. ते म्हणतात,पाण्याचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या नुसत्या पाण्याचा प्रश्न नूसन महाराष्ट्राच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या सौभाग्याचा प्रश्न आहे. पाण्यासंबंधी, पाण्याच्या प्रश्नासंबंधी कितीही लिहिलं, बोललं तरी अपूर्ण वाटावं इतकं ते जगन्द्व्याळ विस्तारलेलं आहे. मी एक साधा कोरड्या जमिनीतला शेतकरी. एक साधारण कवी. मला जेवढं समजलं, सुचलं तेवढं अनेकांचं ऐकून वाचून मी माझ्यापरीनं इथे लिहिलं. बोललो. हे चुकीचं असेल, नीट नसेलही, त्यात माझ्या मर्यादा हेच कारण आहे. एवढ्या मोठ्या जाणत्या पाणीतज्ज्ञांसमोर, साहित्यिकांसमोर, रसिकांसमोर मला हे अध्यक्षपद देऊन गौरविलं, त्यासाठी पुन्हा एकदा नम्रतापूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

त्यांच्या लिहिण्या वागण्यात किती नम्रता आहे हे आपल्याला यावरून समजते.

त्यांना ज्या ज्या विषयावर लिहावसं वाटलं जे त्यांच्या काळजाला भिडलं ते त्यांनी या पुस्तकात लिहिलेला आहे.

संपूर्ण सत्य कथेवर हे लेखसंग्रह आहेत .शेती आणि पाणी विषयक लेखसंग्रह वाचले की शेतकरी किती हाल अपेष्टा सोसत आपलं शेतकऱ्याचे जीवन जगतो हे आपल्या लक्षात येईल .

तो पुन्हा ऋतुबंध देऊया भुईला या लेखात दिवे लागण कशी झाली याविषयी सुंदर माहिती देतात .कष्टाची भाकर या घराची निर्मिती कशी झाली ते शेवटी सांगताना ते म्हणतात,

तेलंगवाडीच्या त्यांच्या 'कष्टाची भाकर' या ठिकाणी नवं घर बांधलं. प्रशस्त. अतिशय सुंदर. स्वतःसाठी, मित्रांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी. चार फुलं ठेवून या घराचा दरवाजा उघडायचा यासाठी श्री. शरदराव पवार पाहिजेतच. काहीही कार्यक्रम नाही. उत्सव नाही. भाषणं नाही. मला गळ घातली. मी श्री. शरदराव पवारांना विनंती केली. त्यांनी मान्य केलं. सकाळी दहा ते दुपारी तीन 'कष्टाची भाकर' या ठिकाणी आले. थांबले. उंबऱ्यावर चार फुलांच्या पाकळ्या टाकून दिवा लावला. दिव्याच्या मंद प्रकाशानं घर उजळलं. न बोलवताही दुपारपर्यंत हजार प्रगतिशील शेतकरी जमा झाले होते. त्यांच्याशी शेतीच्या गप्पा झाल्या. प्रत्येकाच्या मनात नवी दिवेलागण.

"दिवेलागणीची वेळ" हे पुस्तक मातीशी नातं असणाऱ्याच्या काळजात वीज चमकवतो.

ना. धों. महानोर हे शब्दांचे शेतकरी आहेत – त्यांच्या लेखनातून पाणी सांडत नाही, तर डोळे भरून वाहतात.

असे हे सुंदर पुस्तक प्रत्येकानेच वाचायला हवं .

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा