Friday, May 26, 2023

पुस्तक परीक्षण १४ साताऱ्याच्या सहवासात

 




१)वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.


२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे(शिर्के)


३} पुस्तक क्रमांक   :-१४


४} पुस्तकाचे नाव      :- साताऱ्याच्या सहवासात


५)लेखक :- श्री.सुनील शेडगे सर


६)एकूण पृष्ठ संख्या :-  १४४


 ७) मूल्य   :- २५०


पुस्तक परीक्षण


साताऱ्याच्या सहवासात


मे महिना म्हटले की उन्हाळ्याची चाहूल.  पर्यटनाची पर्वणीच. मुलांच्या शाळांना सुट्टी असल्यामुळे सहसा मे महिन्याच्या सुट्टीत सर्वजण नक्कीच बाहेर फिरायला पडतात. प्रत्येक वेळेस आम्हाला विचारलं जातं की तुमच्या साताऱ्यात काय असं पाहण्यासारख आहे? आम्हाला वेगळ असं काही सांगताच येत नव्हतं इतके दिवस .पण साताऱ्याच्या सहवासात हे पुस्तक हातात पडलं आणि आमच्या साताऱ्यात काय काय आहे हे आम्ही अभिमानाने सांगू शकलो. साताऱ्याच्या सहवासात आल्यानंतर तुम्हाला नक्कीच आपली सातारी माणसं आणि इतर कुठेही पाहिला न मिळणारी अशी ठिकाणे पाहायला मिळतील. आदरणीय सुनील शेडगे सर आप्पा यांनी लिहिलेलं त्यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून हे पुस्तक नक्कीच आमचा सातारा कसा आहे हे तुम्हा सर्वांना समजल्याशिवाय राहणार नाही .पुस्तकाचे मुखपृष्ठच सुंदर अशा आमच्या धबधब्याचं दिलेले आहे.

  जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये दरवर्षी यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेमध्ये भरपूर बक्षीसांचा वर्षाव विद्यार्थ्यांवर होत असतो. अशाच या स्पर्धेमध्ये हस्तलिखित स्पर्धाही घेतली जाते . या हस्तलिखित स्पर्धेसाठी नेहमीच सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे ,पर्यटन स्थळे असे विषय दिले जातात .याच पुस्तकाचा फायदा माझ्या शाळेतील बालचमू यांना झाला.  आमच्या शाळेने बनवलेल्या अजिंक्य सातारा या हस्तलिखिताचा सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. म्हणजे हे पुस्तक जे जे होतकरू, उपक्रमशील शिक्षक, पर्यटक, सातारा जिल्ह्यावर प्रेम करणारे नागरिक असतील त्यांच्यासाठी तर परिसच आहे. हे पुस्तक ज्याच्या हाती लागेल त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. असा सुवर्ण फायदा आम्हा मुलांना आणि मला माझ्या आयुष्यात नक्कीच एक वेगळी वाट निर्माण करून गेला.

आपले आई वडील आपल्या प्रगतीत एक दीपस्तंभासारखे मार्ग दाखवत असतात. अशाच आई-वडिलांच्या चरणी हे पुस्तक शेडगे सरांनी अर्पण केलेले आहे. या पुस्तकासाठी साक्षात डॉ. यशवंत पाटणे यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. त्यांचे आशीर्वाद म्हणजे नक्कीच सरस्वतीच्या मंदिरातील देवाने दिलेला आशीर्वाद म्हणायला काही हरकत नाही. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनीही या पुस्तकासाठी आपल्या अमोघ  शब्दातून शुभेच्छा दिलेल्या आहेत. मनातलं या भागात सुनील शेडगे सरांनी या पुस्तकाविषयी स्वतःचं मनोगत व्यक्त केलेल आहे.

साताऱ्यात आल्यानंतर तुम्हाला नक्की काय पाहायला मिळतं हे पुस्तकाच्या अंतरंगावरून तुम्हाला समजून येईल.जसं पुस्तकाचं अंतरंग विलोभनीय ,सुंदर ,मोहक आहे तसाच आमचा सातारा जिल्हा ही अतिशय सुंदर, ऐतिहासिक वारसा जतन केलेला राजधानी असलेला हा सातारा जिल्हा आहे.

साताऱ्याच्या सहवासात आणि माझी भटकंती या दोन विभागांमध्ये आदरणीय सुनील शेडगे सरांनी या साताऱ्यातील विविध ठिकाणांची माहिती विस्तृत स्वरूपात आपल्याला दिलेली आहे .याशिवाय त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते ,कोणती स्थळ कोणत्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहेत याची सखोल माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे या सर्व स्थळांना आदरणीय शेडगे सरांनी स्वतः भेटी देऊन ही माहिती घेतलेली आहे .अतिशय सुंदर असं हे पुस्तक नक्कीच सगळ्यांनी वाचाव असं हे पुस्तक विलोभनीय आहे .आता या पुस्तकात काय काय आहे याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते.

या पुस्तकामध्ये

साताऱ्याच्या सहवासात या विभागात


• प्राचीन पाटेश्वर


• पुरातन यवनश्वर


• प्रेक्षणीय पेटश्वर


• परळीतील शिवमंदिर


• मोरबागची मोरघळ


• वजराईची नवलाई


• केळवलीची किमया


• एकीवचे उजकिंद्र


• जगमीनची जादू


• धुक्याच्या पठारावर


• धारेश्वरचा धाराभिषेक


• तोंडोशीची रामघळ


• लडा वाघापूरचा 'रिव्हर्स पॉईंट'


• ऐतिहासिक कुबडीतीर्थ • ओझर्डेची भुरळ


• देवराईतील येडोबा मंदिर • उलचे शिवमंदिर


• स्वयंभू क्षेत्र रुद्रेश्वर


• हेमाडपंथी बहुलेश्वर मंदिर • निसर्गरम्य मरुलिंग मंदिर


• नितांतसुंदर जरंडेश्वर • सोळशीचे शनिमंदिर


• च्यवणऋषींचे चवणेश्वर • मेणेश्वर मंदिर


• लिंबचे कोटश्वर मंदिर


• धोमचे नृसिंह मंदिर


• चंदन-वंदनगडची शिवमंदिर


• कणखर कल्याणगड


• निसर्गरम्य नागेश्वर


• विराट परपरेचा वैराटगड


• किकलीचा अमूल्य ठेवा


• इब्राहिमपुर / धावडशी


• सुंदर (दाते) गड


• निसर्गरम्य जळव


• फुलपाखराचं भोसगाव


• उरमोडी राजणखळगे / भूषणगड


• मांढरदेव / भाबवली


• माहुली / शिंगणापूर


• महिमानगड / वारुगड / वसंतगड


• वाचनसंस्कृती जपणार भिलार


• लष्करी परपरेच अपशिंगे (मिलिटरी)


• कडवेतील प्राचीन शिवमंदिर


• सुळकफणीची सुंदरता


• रेणोशी-कोट्रोशीचा निसर्गसेतू


• रंगनाथस्वामींची निगडी


• ऐतिहासिक राजाचे कुर्ले • तापोळ्याचे तरंग


• अनवट वाटेवरचं आंबावडे 


• गुरसाळेतील शिल्पवैभव


माझी भटकंती या सदरात


 • देवदरी एक रिपोर्टाज • चिंब करणारा सातारा,

अरण्ययात्रा,शिवसागरापलीकडं,

•दुर्गवाटा

• स्मारकवाटा

•रघुवीर घाटाची सफर


या सर्व ठिकाणांची माहिती दिलेली आहे. पुस्तकाच्या शेवटी एका दिवसात आपण सातारा शहरातील सहल कशाप्रकारे करू शकतो याची विस्तृत माहिती दिलेली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रमुख घाट मार्ग, ऐतिहासिक घळी , पठार , धरणे ,मंदिरे, गड किल्ले ,धार्मिक स्थळे, धबधबे यांचीही ठिकाण निहाय माहिती  दिलेली आहे .याशिवाय सातारा शहरांपासून या प्रमुख पर्यटन स्थळांचे अंतर किती किलोमीटर आहे याचीही सविस्तर माहिती शेवटच्या पानांमध्ये दिलेली आहे .याशिवाय शेवटच्या पानांवर आदरणीय सुनील शेडगे सर यांनी स्वतःचा परिचय दिलेला आहे. उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या अशा या शेडगेसरांना लिखाणा बरोबरच पर्यटनाचाही छंद आहे .याची सगळी माहिती त्यांनी शेवटच्या पानावर दिलेली आहे. त्यामुळे साताऱ्यात  पर्यटन क्षेत्र म्हणून भेट देणाऱ्या सर्वांनी वाचावं आणि संग्रह ठेवाव असं पुस्तक ! नक्कीच आपल्या वाचनालयात एक वाचनीय दागिना म्हणून विराजमान होईल यात शंका नाही. तेव्हा नक्की हे पुस्तक घ्या आणि वाचा धन्यवाद.🙏📚


©️✒️


सौ.अंजली शशिकांत गोडसे (शिर्के) मर्ढे तालुका सातारा