Sunday, February 26, 2023

मराठी देश

 



❤️🚩 *मराठी देश*🚩♥️


माझ्या मराठी देशाची

 किती वर्णावी किर्ती

 सोन्या रुप्याच्या घागरींनी 

 पंचगंगा समृध्दी भरती


लेवूनी मराठमोळा साज

 मोहक सुंदर लावण्यवती

 माझ्या मराठीचा बाज

 चंद्रकोरीतून कपाळी कोरीती


माझ्या मराठी बोलीत

 आहे मायेचा गोडवा

 मराठी नुतन वर्षाचा

 स्वागत करीतो गुढीपाडवा


माझ्या मराठी मातीत

 कर्तृत्वाचे हिरेमोती चमकती 

त्यांचा ठेवून आदर्श

 मानवी पिढी घडविती


इथल्या कणाकणात

 माय मराठी पाझरते

 लेकरांना सुख द्याया

 कष्ट अपार झेलते


माझ्या सह्याद्रिचा कणखरपणा 

नसानसात भिनतो

शत्रूलाही शह देण्या

 दिल्लीच्या तख्ताला भिडतो


विविध असल्या बोली तरी 

 जन्मदात्री मराठी आहे

 महाराष्ट्रातल्या मनामनात फक्त

 मराठीची भूमी आहे


चहू दिशांनी येवोत वादळे 

मागे आम्ही हटणार नाही

 मराठी आहोत मराठीच राहणार 

जाती पंथ, धर्म, भेद मानणार नाही


शाहू, फुले, आंबेडकरांचा  

वारसा पुढे नेणार

शिवविचारांचा नवा

 महाराष्ट्र घडणार


मराठीचा प्रत्येक शिलेदार 

अन्यायाविरुध्द लढणार

 मराठीसाठीच जगणार

 मराठीसाठीच मरणार


©️✒️📚🌹💫

 *सौ . अंजली शशिकांत गोडसे* 

 *मर्ढे सातारा*

Thursday, February 23, 2023

पुस्तक परीक्षण तिच्या मनातलं


 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.


२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे


३} पुस्तक क्रमांक   :-११


४} पुस्तकाचे नाव      :- तिच्या मनातलं


५)एकूण पृष्ठ संख्या :-  १८०


मूल्य        १५०    :- ₹  फक्त


पुस्तक परीक्षण 


 ‘तिच्या मनातलं’ 


कवितासंग्रहातील स्त्रीवादी विचार मराठी साहित्यात कविता हा माझ्या सर्वात आवडता साहित्यप्रकार आहे. पदवी आणि पदवीनंतरचे शिक्षण घेताना तसेच अध्यापन करत असताना मराठी कविता अभ्यासायला मिळाली. मराठी कवितेमध्ये झालेल्या बदलाचा अभ्यास करता आला. कविता या साहित्य प्रकारात महिलांनी लिहिलेल्या कविता तांविषयी विशेष उत्सुकता होती. अनेक कवयित्रींच्या कविता मी वाचून काढल्या. प्रत्येक स्त्री विषयी मनात खूप प्रेम, आदर आहे. एखादी स्त्री आपल्या  आत्मविष्कारासाठी कविता हाच प्रकार प्रामुख्याने निवडते. यात मौखिक आणि लिखित काव्यातून तिची अभिव्यक्ती दिसून येते. हे दोन प्रकार वेगळे असले तरी त्यातून व्यक्त होणारे स्त्री मन एकच असते. स्त्रियांच्या कवितेमधून अनेक पदर समोर येत असतात. सुखदुःखामध्ये ती जास्त व्यक्त होते .कवितेमधूनच तिला आपलं अस्तित्व टिकवण्याची प्रेरणा मिळते. आपल्या मनाच्या व्यथा ती कवितेतून सांगत असते.

          कविता ही कवीच्या खूप आतल्या आवाजाची गोष्ट असते. तो त्याचा खरा आणि जिवंत असा आत्मस्वर असतो. 'तो अस्सल असतो. खूप आतलं, अत्यंत तरल आणि प्रवाही असं काहीतरी सांगायचं असतं. नेमकं सांगायचं असतं, बव्हंशी आपलं आपल्यालाच सांगायचं असतं. त्यावेळी सामान्यतः कविता लिहिली जाते. साहित्याच्या इतर प्रकारात तुम्ही जे बोलत/म्हणत असता, त्यापासून तुम्हाला वेगळं होता येतं, सुटता/निसटता येतं. कवितेत तुम्ही जे सांगता, त्यातून निसटणं मुश्कील. तुमचा मनातल्या गाभ्याचा स्वर तिथे प्रकट होत असतो' (स्वत्वाची भाषा),' हे रंगनाथ पठारे यांचे म्हणणे कवितेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे आहे.  1

         जसा समाज बदलत गेला त्याचा परिणाम साहित्यावरही झाला. सर्व क्षेत्रात होणाऱ्या क्रांतीचा संबंध थेट समाज जीवनावर झाला. आपण पाहिलं तर काही दशकात संपूर्ण जगभरात माहिती तंत्रज्ञानाने खूप बदल करून आणले .१९७५ हे साल युनोने आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष म्हणून घोषित केले. यामुळे स्त्रियांचे जे प्रश्न होते त्यांचा विचार गंभीरपणे होऊ लागला. कारण जगात सर्वच स्त्रियांच्या विविध प्रश्नांचा विचार होऊ लागला. स्त्री मुक्ती ,स्त्रिचे स्वातंत्र्य हे शब्द समोर आले.१९७५ च्या स्त्री वर्षानंतर स्त्रीवादी विचारांची एक चळवळ सर्वत्र उभी राहिली. स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्यांचे आत्मभान जागृत झाले. स्त्री संघर्ष करायलाही तयार झाली.     

          डॉ . वंदना महाजन म्हणतात , "१९७५ नंतर समाजव्यवस्थेत अनेक नवे प्रश्न निर्माण झाले. भांडवलशाही व्यवस्थेचा अपरिहार्य परिणाम म्हणून वर्गीय व्यवस्था दृढमूल झाली. १९९० नंतर गतिशील झालेले जागतिकीकरण आणि खाजगीकरण यामुळे लघुउद्योगांवर संक्रांत आली. विस्थापितांचे प्रश्न निर्माण झाले. दूरदर्शनाच्या माध्यमातून सादरीकरणाला अवाजवी महत्त्व प्राप्त झाले. जीवघेण्या स्पर्धेच्या या कालखंडात एकीकडे स्त्री चळवळ गतिशील झाली तर दुसरीकडे स्त्रिया अधिक खालच्या दर्जाकडे फेकल्या गेल्या. स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनात वाढ झाली. स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार, हिंसा यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण प्रचंड वाढले. एकीकडे नोकरी व्यवसायात स्त्रिया प्रविष्ट झाल्या. सातत्य, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले; पण प्रत्येक ठिकाणी स्त्री म्हणून त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत गेली."    2


               याचाच परिणाम म्हणून स्त्री आणि पुरुष कवी आपल्या कवितेमधून स्त्रियांचे प्रश्न यावर लेखन करू लागले .स्त्रीवादी साहित्य निर्माण होऊ लागले. म्हणूनच 'तिच्या मनातलं 'या कवितासंग्रहातील स्त्रीवादी विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.' तिच्या मनातलं' या कवितासंग्रहाच्या कवयित्री सौ. संगीता रमेश गुरव या आहेत. एखाद्या स्त्रिच्या जीवनाचे किती विविध पदर असतात हे या कवितासंग्रहातून त्यांनी मांडले आहेत .कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ कवितांच्या आशयाला समर्पक आहे .चित्रांमध्ये तीन महिला गुजगोष्टी करताना दाखवल्या आहेत .जणूकाही आपल्या मनातील यातना इतरांना सांगून मन हलकं करत आहेत. असे चित्र हे मुखपृष्ठावर दिसत आहे. या कवितासंग्रहात एकूण १४१ कविता दिलेल्या आहेत. या सर्वच कवितांमधून एका स्त्रिचं जीवन रेखाटलेले आहे.' तिच्याशिवाय' या पहिल्याच कवितेत संगीता गुरव म्हणतात,

                                                            'कोण तिला काय देणार पूर्ण?

                                                                    प्रत्येक जण अपूर्ण

                                                                         तिच्याशिवाय 

                                                                          तिच्याविना' 

                                                                                             3

                  या कवितेतून एखाद्या स्त्रीला पूर्णत्व कोणीच येऊ शकत नाही असे कवयित्रीला वाटत आहे. तिच्याशिवाय सगळे अपूर्णच आहेत .स्त्री नसेल तर कोणालाच पूर्णत्व प्राप्त होत नाही असे कवयित्रीला वाटत आहे . स्त्री मनाचे भावविश्व उलघडणारी ही कविता आहे. पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीमधील पुरुषाला तो स्वतः स्वयंपूर्ण आहे असं वाटत असते पण कवयित्री या साऱ्याला झुगारून पुरुषांना ठणकावून सांगते .हे सारं जग स्त्रिशिवाय अपूर्ण आहे. स्त्रीला कमी समजू नका तिला तुमच्याबरोबरचा दर्जा द्यावा असे कवयित्रीला सुचवायचे आहे.

                  डॉ. रवींद्र ठाकूर म्हणतात," स्त्रीपुरुष समानतेचा विचार प्रबोधनयुगात पुढे आला. त्यानंतर युरोपातील मताधिकार चळवळीमुळे त्यास अधिक चालना मिळाली. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर म. फुले, सावित्राबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्रियांच्या गुलामीचे दरवाजे किलकिले झाले. परंतु स्त्रीस्वातंत्र्याची पहाट अजून उजाडायचीच होती. अलीकडेच राजकीय विचारप्रणालीची जोड मिळाल्याने हा विचार स्त्रीवाद म्हणून पुढे आला.पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीकडे पाहण्याची पारंपरिक मनोवृत्ती बदलावी आणि स्त्रियांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत हाच विचार स्त्रीवादाच्या मुळाशी आहे. तत्त्वतः हा विचार कितीही न्याय्य असला तरी भारतासारख्या विषमताधिष्ठित समाजात तो व्यवहारात उतरणे किती अवघड आहे हे वेगळे सांगायला नकोच.आपल्या देशातच काय पण जगात इतरत्रही पुरुषप्रधानता इतकी प्रभावशाली आहे की, स्त्रियांचा आवाज आजही चिरडलाच जात आहे. सिमोन द बोव्हुआर या फ्रेंच विदुषीने सेकंड सेक्स या ग्रंथात म्हटलेच आहे की, स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही तर ती स्त्री म्हणून घडवली जाते. त्यातही विरोध असा की, ती स्त्रीकडूनच घडवली जाते." 

4


                 स्त्री हीच स्त्रिची शत्रू असते. तिचं एकमेकांवर जाचक अटी लादत असते . आपल्या 'घरातलं मशीन ' या कवितेमध्ये संगीता गुरव म्हणतात,

                                                                 " बटन एक दाबता

                                                                 काय पाहिजे हवे ?

                                                                  आज लाभले मला

                                                                   मशीन एक असे नवे" 

5


                      खरोखरच या कवितेमधून असं जाणवते की स्त्रीला घरातच किती कामे असतात. ती घरातील विविध काम करणार मशीनच असते. तिला भावना नसतातच. कोणीही यावं काम सांगावं ती लगेच कामासाठी तयार होते. प्रत्येकाच्या घरातील चालतं बोलतं मशीनच जणू ! 'तुम्ही हो सिद्ध कधी होणार?' या कवितेत कवयित्री म्हणतात,

" डोंगराएवढे ऋण सावित्रीचे

 सांगा कसे फिटणार 

सिद्ध कधी होणार 

तुम्ही हो सिद्ध कधी होणार ?मुलींनो युद्ध कधी करणार ?"

6

या कवितेमध्ये सावित्री, झाशी, अहिल्या अशा दुर्गांची माहिती देऊन यांचं ऋण फेडण्यासाठी तुम्ही मुलींनो कधी सिद्ध होणार? असे कवियित्री विचारते आहे. तुम्हा समस्त स्त्रीवर्गासाठी यांनी हाल अपेष्टा सोसल्या .त्याचे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला सिद्ध व्हावे लागेल .पुरुषी सत्तेविरुद्ध झुंज द्यावी लागेल. तुमच्यावरचा अन्याय वाढला आहे. तुम्हाला युद्ध करावेच लागेल .भ्रूणहत्येच्या प्रश्नही या कवितेत मांडलेला आहे.  स्त्रीवर्गाला प्रेरणा घ्यायला लावणारी ही कविता आहे.

          ‘ काचेत’ या कवितेत संगिता गुरव स्त्रिला काचेची उपमा देतात.काचेच्या बाटलीत बंद करून ठेवलेल्या स्त्रिची मनोव्यथा इथे मांडली आहे.त्या म्हणतात,

‘कुणी मला या बाटलीतून बाहेर काढाल का

 मी आतून केव्हाच फुटली आहे.

तुटली आहे कोसळली आहे.

हि स्त्रीत्वाची, चारित्र्याची 

काच सांभाळता -सांभाळता.’

               स्त्रिला असणारी बंधने त्यांनी या कवितेमधून मांडली आहेत.तिला मनसोक्त, मनासारखं जगायचं असत पण तिला सतत मर्यादेच्या काचेत ठेवलं जात.या मार्यादेमुळेच ती आतल्या आत काचेसारखी फुटते, तुटते, कोसळते. तिला या काचेचे बंधनच नकोसे होते.पण तिला समजून कोण घेणार ? हे ही तितकेच खरं. सखी, माझी गौर मंगळाई , श्रावणा रे , पहाटेच अमृत या मधून ती स्वत:चं व्यक्तिमत्व खुलवत निसार्गाचं सुंदर वर्णनही करत असते. कवयित्रीला गृहिणी होणं ही मोठं मानाचं पद वा वाटतं. आपल्या कविते मधून ती देवाला जाब विचारते, मलाच का त्रास ? मीच का सर्वांचं  करायचं ? असे तीनं विचारल्यावर देव तिला म्हणतो, अगं तुलाच बुद्धी, तुलाच धाडस आहे.तुझ्याशिवाय दुसरं कुणीच या लायकीचं नाही. हे ऐकून ती म्हणते हे जरी खरं असलं तरी तीचं कौतुक मात्र कोणालाच नसतं. स्वत:ची  व्यथाच कवितेतून मांडते. घरातील छोट्या छोट्या गोष्टीमधून तिचे शोषण कसे होते ? ते आपल्या कवितेमधून काही काही ठिकाणी विनोदी शैलीतून लिहिते. पाश्चात्य संस्कृतीवर टीकाही करते. आपल्या भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीने आक्रमण केले आहे.याची काळजी तिला वाटते. पुढची पिढी कशी असेल याचीही चिंता तिला वाटते. कतृत्ववान महिलांचा गौरवही संगिता गुरव आपल्या कवितेमधून करत आहेत.

       ‘  सांगा कसं जमायचं’ या कवितेमधून ती पतीवर टीका करताना दिसून येते. दोघांचे स्वभाव मिळते जुळते नसल्यामुळे आमचं कसं जामायचं असा प्रश्न कवयित्री कवितेमधून विचारत आहे.कितीही झाले तरी स्त्रिला कसं जमवून घ्यावं लागतं हे शेवटच्या कडव्यात त्या सांगतात. तसेच ‘हा ही एक रंग’ या कवितेत त्या म्हणतात, 

                                                                ‘  झाकून ठेवा 

                                                                  डालून ठेवा 

                                                             मी घालणार आहे अंडं  

                                                           पिल्लातील झाशी, दुर्गा 

                                                                 करणार आहे बंड’

              कितीही आमच्यावर अन्याय केले तरी आम्ही आता बंड करणार आहोत. आमच्यामधील झाशी, दुर्गा आता जागृत होणार आहे.कितीही छाटलं , आम्हांला मारलं, त्रास दिला तरी ती पुन्हा फुटणार आहे.तिचे चिवट पंख पुन्हा पुन्हा भरारी घेणार आहेत. स्त्रियांचे होणारे शोषण आणि तिची त्या शोषनाविरूद्ध  पेटून उठण्याची जिद्द कवितेतून दाखविली आहे. महिला दिन ,बाईपणाचा  डाग, बाई गं बाई , लंकेची पार्वती, तू जर , कल्लोळ ,सावित्रीचा वड, फुंकर , पुन्हा कधी ना अशा कवितांमधून ती अन्यायाला वाचा फोडते. सर्व स्त्रियांना पेटून उठायला सांगते आहे.पतीच्या व्यसनामुळे संसाराची होणारी बरबादी ती तेवढी करावी दारूबंदी या कवितेमधून सांगते आहे.सामुहिक बलात्कार, स्त्रि भ्रृणहत्या या विषयांनाही   संगिता गुरव आपल्या काव्यामधून हात घालतात. अतिशय परखडपणे या विषयावर लिहताना त्या दिसतात.

                  ‘ तिच्या मनातलं’ या कवित संग्रहाच्या कविता शिर्षकामधून त्या म्हणतात की, स्त्रिच्या मनातलं कधीच कोणाला कळत नाही.तिच्या साऱ्या अपेक्षांची उपेक्षाच होत राहते.इथे पुरुष हि कविता म्हणत आहे आणि त्याला तिच्या मनातले काही कळत नाही असे कवयित्रीने रेखाटले आहे.

               ‘ माझ्यातला प्राजक्त’ या कवितेमध्ये त्या म्हणतात, 

                                                                ‘ कितीही छाटला 

                                                                 तरी निर्लज्जपणे  

                                                                 आपल्या लेंकरासाठी

                                                                 संसारासाठी 

                                                                 पुन्हा पुन्हा फुटत असतो

                                                                 माझ्यातला प्राजक्त !, 

         स्वत:ला प्राजक्ताची उपमा त्या देतात.कितीही वेळा प्राजक्ताच्या झाडाला तोडले तरी ते पुन्हा पुन्हा फुटून येते.प्राजक्त फुलतो आणि त्याचा सडाही छान पडतो. पण या कवितेतील स्त्री पात्र स्वतः प्राजक्त झालंय आणि म्हणत आहे मला कितीही त्रास दिला तरी मी फुटणार आहे.यातला स्त्री प्राजक्त आपल्या संसारासाठी लेकरांसाठी पुन्हा पुन्हा फुटणार आहे.स्त्रीचं अन्याय सोसण , आपल्या संसारासाठी सारं सहन करण या कवितेमधून सुंदर वर्णिले आहे. घटस्फोटीत महिलेचं जीवन, काही कवितेमधून रेखाटल आहे.मोठी झाल्यावर मुले आई वडिलांना विसरतात यावरही त्यांनी लिहलं आहे.

                     ‘बाईवर  पी.एच, डी .’ या कवितेत विडंबनात्मक लिहताना संगिता गुरव म्हणतात, 

                                               ‘ बाईनेच सोसायचं 

                                                बाकीच्यांनी ढोसायचं 

                                               बाईलाच मंगळसूत्र, कुंकू   

                                              बाकी नवे कोरे, न ओळखू’ 

10 


                अतिशय परखडपणे लिहताना कवयित्री म्हणतात, स्त्री पुरुष समानता असली तरी बाईनेच सारे सोसायचे  आणि पुरुषांनी  मात्र व्यसनी व्हायचं. लग्नानंतर मंगळसूत्र, कुंकू   लावायचं , पुरुषांनी मात्र तसेच फिरायचं.पुरुषांनी लग्न केले आहे याची एक खूणही त्यांच्या अंगावर नाही.असं का होत आहे ? असे कायीत्रीला समस्त समाजाला विचारायचं आहे.  बाईवर  पी.एच.डी. म्हणजे पारा , हातोडा , दगड याने तिला ठेचायचं असं कवयित्रीला सूचित करायचं आहे.अतिशय सुंदर उपमा देऊन स्त्रिचं जीवन त्यांनी रेखाटल आहे . बाई गं , बहरणारच या कवितेतून स्त्रिची जिद्द रेखाटली आहे.कविता संग्रहातील शेवटच्या कवितेत कवयित्री देवाचे आभार मानत आहे .देवाला म्हणत आहे कि बर झालं मला तू स्त्री केलंस त्यामुळे मी एका दगडाची छान मूर्ती झाले.कितीही पडले धडपडले तरी घडत गेले.

              ‘ तिच्या मनातलं’ हा संगिता गुरव यांचा पहिलाच कविता संग्रह आहे. स्त्रिचं मन त्यांनी आपल्या शब्दात काही ठिकाणी परखडपणे, मिश्कीलपणे मांडलेले आहेत. संगिता गुरव या स्वतः उच्च विद्याविभूषित आहेत.स्त्रियांच्या विविध प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण आहे .१९७५ नंतर स्त्रियांचे प्रश्न सामाजासमोर  आले असले तरी दुसरीकडे स्त्रियांना दर्जा खूपच कमी दिला गेला.  स्त्रिकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून बघितलं जाऊ लागलं.स्त्रीयावरील अत्याचार, बलात्कार, हिंसा यामध्ये वाढ झाली. स्त्रि भ्रृणहत्याचे प्रमाण खूप वाढले. नोकरी व्यवसायात स्त्रिया असल्या तरी तिला प्रत्येक ठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली.हे सगळे प्रश्न झालेला अन्याय संगिता गुरव यांनी आपल्या कवितेतून मांडला आहे.


    सौ.अंजली शशिकांत गोडसे

               मर्ढे ,सातारा

Wednesday, February 15, 2023

2021-22 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

2021-22 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
बदललेली दिनांक



 

22-23 स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धा


स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व स्पर्धा संपूर्ण स्पर्धेचा निकाल आणि स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ याचे ठिकाण आणि वेळ 



 

Sunday, February 12, 2023

असाही असतो वाढदिवस!

 *असाही असतो वाढदिवस* 🎂🍫💫🌹

 मनात आलं तर सर्व काही शक्य आहे. ही उक्ती खरी करून दाखवणारी आपली ही भारतीय सुकन्या.  सौ.तृप्ती रुपेश सरोदे (लोखंडे)बी. टेक., एम टेक.अशी यशाची शिखरं पादाक्रांत करत  मे 2022 ला तर तू मिशीगन युनिव्हर्सिटीतून(USA) हायेस्ट स्कोर घेऊन एम. एस. झाली.


अमेरिकेत राहूनही भारतातील मुलींशी तिची नाळ अजूनही जुळली आहे. आपल्या मुलींविषयी आपल्या भारतातील खेडोपाड्यात राहणाऱ्या मुलांविषयी आस्था असणारी ही सुकन्या. आज एवढ्या आधुनिक देशात राहूनही आपल्या भारतातील मुलांसाठी आपल्या वाढदिवसानिमित्त तिने आज आम्हा बिरामणेवाडी शाळेतील दुर्गम असणाऱ्या शाळेत वाचन मेवा पाठवला .खरंतर हा वाचनमेवा 11 फेब्रुवारीला पोहोचला होता .पण पिन कोड मधील चुकीमुळे तो वाचनमेवा चाफळला गेला आणि साक्षात श्रीरामाचे दर्शन घेऊनच आमच्या गावी तो पोहोचला असावा. कदाचित त्या पुस्तकांनाही वाटलं असावं एखाद तीर्थक्षेत्र फिरून यावं आणि नंतर या बालचिमुकल्यांच्या हातात आपण आशीर्वाद रुपी हा वाचनमेवा पडावा .खरच आमची मुलं खूपच तृप्त झाली. आणि त्या तृप्ती नावाचं सार्थक झालं .अशी जर कळवळ प्रत्येक भारतीयाला आपल्या मुलांविषयी असली तर नक्कीच आपला भारत देश एक उज्वल क्रांती घडेल यात शंका नाही. राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त आदरणीय प्रतिभा लोखंडे मॅडम नागपूर यांची ही सुकन्या आणि माझी छोटी बहीण. पुन्हा एकदा ही पुस्तकं  नागपुर टू सातारा, सातारा टू चाफळ, चाफळ टू मर्ढे आणि मर्ढे टू बिरामणेवाडी अशी मुलांच्या हातात पोहोच झाली. पुन्हा एकदा तृप्ती दीदीला आम्हा सर्व बालचमूच्‍यातर्फे खूप खूप  वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुझा  पाठवलेला वाचनमेवा नक्कीच आमची वाचन संस्कृती समृद्ध करेल यात शंका नाही. पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडीतील सर्व बालचमू, शिक्षक, ग्रामस्थ या सर्वांतर्फे पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असंच सहकार्य राहू दे धन्यवाद

🙏🏻🥰🍫🎂

 *तुझीच छोटी भावंडे* 

 *शाळा बिरामणेवाडी*