Monday, July 10, 2023

नानकटाई

 


*नानकटाई  !!* 


दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले वाई हे शहर कृष्णानदीच्या काठावर वसलेलं आहे.अतिशय नयनरम्य घाट ,मंदिरे वाई शहराच्या लौकिकात भर घालतात. वाई हे सातारा जिल्ह्यातील एका तालुक्याचे ठिकाण. सर्व सरकारी कामं  या तालुक्याच्या ठिकाणच्या वेगवेगळ्या कार्यालयात होत असतात.वाईपासून जवळच पांचगणी ,महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे असल्यामुळें परदेशी पाहुणे तसेच भारतातील अनेक पर्यटकांची वर्दळ सुरू असते. 


वाईचा आठवडी बाजार हा दर सोमवारी भरतो. या आठवडी बाजारात अगदी भाजीपाल्यापासून ते घरातील किडुक मिडुक साहित्यापर्यंत सर्व काही मिळत असतं.आजूबाजूच्या गावातील बायाबापडी दर सोमवारी वाईला मिळल त्या वाहनानं येत असतात आणि सोमवारचा बाजार करण्याबरोबर बँक,सरकारी कार्यालयातील कामं  करून घेत असतात. अजूनही सोमवारच्या दिवशी बँक,पोस्टऑफिस,तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन,दवाखाने यामध्ये भरपूर गर्दी झालेली आपणाला दिसते .एकाच दिवशी बाजारपण होतो आणि कामंपण उरकतात.एकाच हेलपाट्यात दोन्ही कामं  ही आपल्या माणसांची भाषा.

    लहानपणी आपण रविवारपेक्षा या सोमवारची खूप आतुरतेने वाट पाहायचो.आमच्या घरात तर दर सोमवारी आमचे आजोबांचं बाजाराला जायचे.कधी कोणत्या सणाचं सामान आणायचं असेल तर आमची आई बाजाराला जायची त्यावेळेस आत्ताच्या सारख कुठे वरचं खायला असायचं.घरात असलेलं गूळ शेंगदाणे नाहीतर मिठात शिजवून वाळवलेल्या शिजक्या शेंगा.पण सोमवारी मात्र आवर्जून पोरांना खायला घरात यायचे.आम्ही आपले शाळेत जायचो .शाळेतून घरी आले की घराच्या वसरीवर ठेवलेल्या बाजाराच्या पिशव्या दप्तर बाजूला ठेवून चापासल्या जायच्या .सगळा बाजार भुईवर  मांडला जायचा आणि आणलेला खाऊ गडप केला जायचा. किती छान होतं  ते आयुष्य आणि ते बालपण.


आत्ताच्या पोरांना डबे भरून घरात खायला आहे केवढा हा विरोधाभास.सोमवारच्या बाजारात खाण्याची मुख्य वस्तू चुरमुऱ्याचा पुडा आणि त्यावर थोडासा फरसाण टाकलेला असायचा.स्वस्तात मस्त असा खाऊ.दुसरा खाऊ म्हणजे   *नानकटाई  !!* 


     सगळा बाजार घेऊन झाल्यावर माणसांची पावलं वाईच्या एस्.टी. स्टॅन्डकडे लाल डब्यात बसण्यासाठी वळायची .वाईच्या जुन्या एस्.टी. स्टॅन्ड शेजारीच आता नवीन एस् .टी . स्टॅन्ड झालेलं आहे . त्याच्या समोरच एक बेकरी आहे . अगदी एस् .ट्या बाहेर पडतात तिथेच समोर .


 *केरला बेकरी  !!*


   बेकरीवाली केरळची असावीत त्यामुळे त्यांनी केरला नाव दिलेलं असावं . त्या बेकरीतील नानकटाई आणि टोस्ट खूप प्रसिद्ध आहेत . सोमवारी बाजारातून आणलेली नानकटाई आठवडाभर पुरवून पुरवून खायची . त्या नानकटाईमध्ये वेगवेगळे आकार आहेत.चंद्रकोर,सूर्यसारखा ,पूर्ण गोल,चौकोन असे बरेच.आम्हा भावंडांची त्या चंद्रकोरीवरून खूप भांडणे व्हायची.धमाल मजा यायची.केरला बेकरीमध्ये तीन पायल्याच्या पत्र्याच्या डब्यात नानकटाई भरून ठेवलेली असायची अजूनही काळ बदलला तरी नानकटाई ठेवण्याचे डबे आणि त्या खाकी रंगाच्या कागदी पिशव्या अजूनही वापरल्या जातात . महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी तुम्ही त्या बेकरीवर गेलात तर तुम्हाला नानकटाई टोस्ट  मिळणार नाही कारण ते कधीच संपलेलं असतं .गिऱ्हाईक जास्त आहे म्हणून उत्पादन जास्त घेतलं जात नाही हे वैशिष्टय . अजूनही चाकरमानी कामानिमित्त बाहेर जाताना बेकरीवाल्याला आधीच पैसे देऊन आपल्या पिशव्या नावे लावून भरून ठेवतात कारण संध्याकाळपर्यंत ती शिल्लक राहत नाही . बऱ्याचवेळा मलाही हा अनुभव आलेला आहे . वाईवरून कोण येणार असेल तर मी नानकटाई आणि टोस्ट आवर्जुन आणायला सांगते आणि ती खाता खाता पून्हा लहानपणात हरवून जाते .

✍🏻✍🏻

 *सौ.अंजली शशिकांत गोडसे* *(शिर्के)* 

                 *मर्ढे* 

               *सातारा*






Saturday, July 1, 2023

आजोळची मैत्री

 #मैत्री 

#आजोळ 

#जेजुरी 

#खंडोबा 


*आजोळची मैत्री* 

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा

 खरचं लहानपण किती छान असतं ना आणि याच लहानपणी आपल्याला आपला मामाचा गाव  खूप छान वाटतो .हो की नाही😊  आपल्याला शाळांना सुट्टी लागते. उन्हाळ्याची म्हणजे मे महिन्याची सुट्टी आपल्याला लागते. तस आपल्याला मामाचा गाव आठवतो . मग आपली ही झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढत मामाच्या गावात कधी पोहोचते आपल्याला कळतच नाही .असंच माझंही बालपण मामाच्या गावात मे महिन्याच्या सुट्टीत गेलेलं. माझं माहेर पसरणी .जवळच असणार एकसर हे छोटसं गाव माझ आजोळ. त्यावेळेस वाहनांची सोय नसल्यामुळे पसरणी ते एकसर हा प्रवास पायी चालतच व्हायचा. मे महिन्याची सुट्टी लागली की आपली बॅग भरायची आणि मामाचा गाव आईबरोबर गाठायचा. हा दर मे महिन्यातल्या सुट्टीचा नियमच होता. आमच्या मैत्रिणी भरपूर गोळ्या व्हायच्या. एकत्र खेळायला सुरूवात व्हायची. मग अजून घरातली छोटी छोटी काम करायला ही खूप मजा यायची. अशीच माझ्या घराशेजारी राहणारी वैशाली ही माझी जवळची मैत्रीण. तसेच तिच्या बहिणी, भाऊ हेही .आम्ही सर्वजण एकत्र खेळायचो  . एक  वैशिष्ट्य म्हणजे आमचं घर अगदी रस्त्यावर होतं त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या भरपूर पाहायला मिळायच्या .  त्या कॅनॉलच्या पाण्यात कपडे धुवायला जाण्याची मजा काही वेगळीच होती .अशी ही आमची आजची मैत्री आजही भेटली की पुन्हा पुन्हा ते लहानपण आठवतं.ती आणि मी माझे बालपण आठवतो. अशीच ही आजोळची माझी मैत्रीण आज मला जेजुरी गडावर भेटली. जेजुरी या ठिकाणीच ती स्थायिक झालेली आहे. मी माझ्या कामानिमित्त नगरला जाताना जेजुरी मध्ये थांबले तर तिने केलेला पाहुणचार माझं मन सुखावून गेला. खरोखरच मैत्रीण असावी तर अशी. काहीतरी पूर्वजन्मीचे संचित असेल त्यामुळेच मला अशा मैत्रिणी माझ्या आयुष्यात येत राहतात आणि भेटत राहतात. तिच्यामुळेच मला मल्हारी मार्तंड खंडोबाचं खूप छान दर्शन  झालं. तिच्या हातचे रुचकर जेवण जेवताना खूपच आनंद झाला. तिने केलेला पाहुणचार मन भरून टाकणार होता. पुन्हा एकदा तिला थँक्स वैशू म्हणायला नक्कीच आवडेल. घरातील सर्वांचा तिच्या स्वभाव खूप छान आहे.दाजी,सासुसासरे,गोड लेकी छान आहेत. तिच्यामुळेच जेजुरीचा हा प्रवास खूपच छान झाला.नणंदेच्या हॉटेल मधून आणलेले खास जेवण भारी होतं.असं म्हणावं वाटतं मी पुन्हा येईन. अशी ही  मैत्रीण वैशाली घाडगे प्रत्येकालाच हवीहवीशी वाटणारी .मैत्री चा एक अलगद धागा जपणारी. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद वैशू अँड फॅमिली लव यू❤️🍫