Tuesday, May 3, 2022

गुण्या गोविंदाने नांदणं मानवतेचं पडलं चांदणं




 

गुण्या गोविंदाने नांदणं
मानवतेचं पडलं चांदणं

गुण्या गोविंदाने नांदणारी आपली ग्रामीण संस्कृती .येथे सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. इथे आजानाचा भोंगा आणि मंदिरातील घंटानाद यांचे ध्वनी एकत्र येऊन साऱ्या आसमंतात एक होतात आणि विविधतेतून एकतेचा नवा सूर निर्माण होतो . असाच काहीसा सप्तस्वर माझ्या मर्ढे गावी नेहमीच निर्माण होतो .
कृष्णा काठी वसलेलं मर्ढे हे माझे निसर्गरम्य टुमदार गाव .गावाला लाभलेला भलामोठा कृष्णाघाट. घाटावरील छोटी-छोटी मंदिर. वड पिंपळ यांची झाडे आनंदाने डोलत असतात. याच गावात आमचा पंचरंगी वाडा आहे.जुनी वाडासंस्कृती आपल्याला गावाकडेच पहायला मिळते. पंचरंगी वाडा नाव ठेवायचे कारण इथे पाच आडनावाची लोक आणि त्यांची पाच घर मिळून झालेला हा वाडा. माणसांची स्थलांतर झाल्याने आमच्या घराशेजारी एक मुस्लीम कुटुंब राहायला आले .एकाच वाड्यात शेजारी हिंदू-मुस्लिम यांच ऐक्य , सणसमारंभ एकत्र साजरे केले जातात . बऱ्याच वेळा हिंदूचे सणआणि रमजान ईद एकत्र येत असतात. तसाच आजचा अक्षय तृतीया आणि रमजान ईद सण एकत्र आला आहे. आमच्या वाड्यात प्रत्येकाच्या चुली बाहेर आहेत .आम्ही आमच्या चुलीवर पुरणपोळीचा घाट घातला होता आणि त्यांनी त्यांच्या चुलीवर शिरखुर्मा बनवण्याचा घाट घातलेला होता. दोन्हीचा गोड वास साऱ्या वाड्यात पसरला होता. आमची छोटी मंडळी माझा अंश आणि तिचा आयान व अमन नावातंही साध्यर्म एका वाटीत शीरखुर्मा आणि एका वाटीत गुळवणी पोळी मस्त मजेत खात होती. इथे कोणीच उच्च नीच नव्हता .कोणी भगवा हिरवा नव्हता .इथे फक्त मानवता होती प्रत्येक हृदयात जपलेली !
  शेजारणीचा शीरखुर्मा झाला की माझी शेजारीन नमाज पडायला गेली . जाताना आम्हाला म्हणाली माझ्या पातेल्यावर (शीरखुर्मा )लक्ष ठेवा. मी लगेच हो म्हणाले .आमच्या पुरणपोळ्या करत करत तिच्या शीरखुर्मा असलेल्या पातेल्याचे संरक्षण आम्ही केलं .हाच खरा शेजार धर्म आणि मानवता धर्म ! जातपात ,धर्मभेद मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी बनवलं .जन्माला आलेला मानव कोणत्याच धर्माचा नव्हता फक्त मानव होता. कोणत्याच जाती-धर्माचे वस्त्र परिधान न केलेला  !        
     मग प्रश्न पडतो आजच अस आपण का वागतो ?  फेकून द्यावी वाटतात ही सारी भगवी हिरवी वस्त्र आणि पांघराव वाटतं मानवतेने नटलेलं इंद्रधनु सारखं सप्तरंगी वस्त्र ! सगळे रंग असूनही एक रंग झालेलं !

                  शब्दांकन
       सौ .अंजली शशिकांत गोडसे 
                   मर्ढे सातारा.