Thursday, November 23, 2023

गुवाहाटी एक समृध्द करणारा प्रवास🌿🌹

 



गुवाहाटी एक समृद्ध करणारा प्रवास 🌿🎼✒️📚


मला नेहमीच बा.भ. बोरकर यांची 'असे देखणे होऊया', ही कविता खूप आवडते. या कवितेत ते म्हणतात,

 "देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे,

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे,

  देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती,

 वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ॥"

   या शब्दाप्रमाणेच गुवाहाटी (आसाम) येथील सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित कार्यशाळेत अजूनच देखणे होण्याचा योग आम्हाला लाभला. "रोल ऑफ पपेट्री इन एज्युकेशन इन लाईन विथ एन इ पी 2020" या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून माझी निवड करण्यात आली. याद्वारे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची एक सुवर्णसंधीच माझ्या आयुष्यात चालून आली. 5 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत पंधरा दिवस ही कार्यशाळा सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र यांच्या गुवाहाटी (आसाम) येथील विभागीय केंद्रावर मी पूर्ण केली. सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्राचे भारतात चार ठिकाणी अशी विभागीय केंद्रे आहेत. या केंद्रांना शिक्षकांचे चारधाम असेही म्हटले जाते. दिल्ली, उदयपूर, हैदराबाद आणि गुवाहाटी या ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयातर्फे शिक्षकांसाठी अशा कार्यशाळा घेण्यात येतात. माझ्यासमवेत महाराष्ट्रातील अजून आठ प्राथमिक शिक्षक यासाठी निवडले गेले होते. त्यात मुंबईच्या वैशाली काकडे, पुण्याच्या शुभांगी पलांगे,  आमच्या सातारच्या मी स्वतः अंजली गोडसे, वृषाली घोरपडे, परभणीचे संतोष सकनूर आणि नंदूरबारचे देवेंद्र बोरसे, पंकज भदाणे, हेमकांत मोरे, हमीद खाटीक यांचा समावेश होता. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रशिक्षण फक्त प्राथमिक शिक्षकांसाठीच होते. मी गुवाहाटीमध्ये घेतलेल्या कार्यशाळेत 12 राज्यातील 62 प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते. हे प्रशिक्षणच राष्ट्रीय एकात्मतेच प्रतिकच आहे  . पहिला विमान प्रवास सगळी अनोळखी ठिकाण आणि या सगळ्या अनुभवांना माझ्या वतीने मी दिलेलंआपलेपण खरोखर हा एक समृद्ध ठेवाच म्हणावा लागेल . फक्त महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात नावाजलेलं आसाम राज्य आणि त्यातील हे गुवाहाटी शहर यामध्ये माझं होणार प्रशिक्षण म्हणजे सुवर्ण मुकुटात रत्नजडीत हिराच जडवण्यासारख आहे . याच जडवलेले हिऱ्याची विविध पैलू आज माझ्या या शैक्षणिक प्रवासात मला ज्ञानाचे अंधारलेले कोपरे आणखी लख्ख करण्यासाठी सूर्यासारखे तेजस्वी करतील. खरंच या प्रशिक्षणाने माझ्या ज्ञानामध्ये कलेविषयी असलेली मृत्युंजय भरभरून दान देऊन गेले हेच दान मी माझ्या लेकरांच्या ओंजळीत भरणार आहे तुम्हा सर्वांना माहीत असावं हे प्रशिक्षण नक्की होतं तरी काय त्यामुळे या प्रशिक्षणाची तुम्हा सर्वांना माहिती देणे माझे परम कर्तव्य आहे.

  आताही तुम्ही म्हणत असाल कठपुतली म्हणजे काय ? याचा आणि शिक्षणाचा काय संबंध? तर या प्रशिक्षणाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते. छत्री बाहुल्यांचा खेळ नेहमीच खेळला जातो अशाच या ज्ञानाच्या कळसुत्री बाहुल्या आता शिक्षणाच्या प्रांगणात आम्हाला आणायांच्या आहेत. म्हणूनच

NEP-2020 च्या अनुषंगाने "शिक्षणातील कठपुतळीची भूमिका" या विषयावर कार्यशाळा

आयोजित करण्यात आली.

कठपुतळीने जगाच्या बहुतांश भागात ज्ञानाचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कठपुतळी साहित्य, चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाटक यासारख्या सर्व कला प्रकारांचे घटक आत्मसात करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमता विकसित करण्यास सक्षम करते. भारतीय दंतकथा आणि दंतकथांबद्दलचे ज्ञान प्रसारित करण्यासाठी कठपुतळीचा वापर पारंपारिकपणे भारतात लोकप्रिय आणि स्वस्त माध्यम म्हणून केला जातो.


कठपुतळी हा सर्व वयोगटांना आकर्षित करणारा एक गतिमान कला प्रकार असल्याने, संवादाचे हे माध्यम शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी मदत म्हणून निवडले गेले आहे. CCRT अशा कठपुतळी कार्यक्रमांची तयारी, हाताळणी आणि उत्पादन यासाठी सर्वसमावेशक आणि एकात्मिक प्रशिक्षण प्रदान करते जे विविध औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण परिस्थितींमध्ये वापरले जाऊ शकते. "शिक्षणातील कठपुतळीची भूमिका" या विषयावरील कार्यशाळा वर्षभर देशाच्या सर्व भागातील सेवारत प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित केली जाते. हा 15 दिवसांचा कालावधी आहे.


उद्दिष्टे:


शिक्षणासाठी मदत म्हणून कठपुतळीची ओळख करून देणे, हातमोजे, सावली, रॉड, स्ट्रिंग आणि इतर कठपुतळी तयार करणे आणि हाताळणे शिकवणे, कमी किमतीच्या सामग्रीतून आणि वर्गात वापरण्यास सुलभ,कठपुतळीच्या माध्यमातून अभ्यासक्रमाचे विषय शिकवण्यासाठी शैक्षणिक स्क्रिप्ट आणि कार्यक्रम तयार करणे आणि मूल्यमापनासाठी प्रशिक्षणाच्या प्रभावाचा अभ्यास करणे, शिक्षकांना भारतातील पारंपारिक कठपुतळी नाट्यप्रकारांबद्दल ज्ञान प्राप्त करण्यास सक्षम करणे आणि त्यांना पारंपारिक कठपुतळ्यांशी संवाद साधण्याची संधी प्रदान करणे,

शिक्षकांना स्वस्त अध्यापन सहाय्य सुधारण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील क्रियाकलाप वर्गातील अध्यापनाचा अविभाज्य भाग बनवणे.

  वर नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, प्रशिक्षण कार्यक्रम चार भागांमध्ये विभागलेला आहे:-


: विविध प्रकारच्या कठपुतळ्या आणि त्यांच्या हाताळणीचे तंत्र तयार करणे, शैक्षणिक लिपी तयार करणे,


संवादात्मक सत्राद्वारे व्यावहारिक अनुभव असलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी कथा-कथन, भूमिका बजावणे, व्हॉईस मॉड्युलेशन/स्पीच, माइम आणि मूव्हमेंट, संगीत आणि त्याची सुधारणा, उत्पादन आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे सादरीकरण यासारख्या संबंधित कलांचे व्यावहारिक प्रशिक्षण.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी "कठपुतळ्यांची संकल्पना आणि स्क्रिप्ट रायटिंग" या विषयावर प्रास्ताविक व्याख्यान सत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. एक चांगला शैक्षणिक संदेश हा कठपुतळी खेळाचा गाभा आहे. कठपुतळी नाटकांसाठी पटकथा लिहिण्यावर मोठा भर दिला जातो. कठपुतळी नाटकांसाठी योग्य थीम लक्षित प्रेक्षकांनुसार सुचवल्या जातात आणि सहभागींनी विकसित केलेल्या कथांवर चर्चा सत्रानंतर काही चांगल्या कथा निवडल्या जातात.


शिक्षकांना कठपुतळीच्या प्रादेशिक पारंपरिक प्रकारांची ओळख करून देण्यासाठी देशाच्या विविध भागांतील पारंपारिक कलाकारांना वेळोवेळी आमंत्रित केले जाते. सहभागींना देशातील कठपुतळी थिएटरच्या विविध शैलींचा परिचय करून देण्यासाठी भारताच्या पारंपारिक पपेट थिएटरवर व्याख्यान-प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. सहभागींना फिंगर पपेट्स, मास्क आणि पेपर रॉड पपेट्स सारख्या साध्या कागदाच्या बाहुल्या बनवण्यास आणि हाताळण्यास शिकवले जाते.

 तसेच सहभागींना माहिती देण्यात आली आहे की कार्यशाळेचे उद्दिष्ट सहज उपलब्ध असलेल्या आणि टाकाऊ साहित्यातून साध्या कठपुतळ्या तयार करणे आणि शैक्षणिक संकल्पना पोहोचवणे आणि वर्गात सामाजिक समस्यांची जाणीव निर्माण करणे हा आहे. प्रत्येक प्रात्यक्षिक सत्रानंतर या सर्व कठपुतळ्यांची हाताळणी शिकवली जाते. शिक्षक शैक्षणिक कठपुतळी तयार करायला शिकतात.

 या विविध प्रकारच्या कठपुतळ्यांच्या मदतीने कार्यक्रम घेतले जातात.सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना शैक्षणिक भेटी आणि संग्रहालये आयोजित केली जातात.

रंगभूमीसाठी लोकसंगीत/संगीताची सत्रेही आयोजित केली जातात.

 केंद्राने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कठपुतळीवरील साधनसामग्रीचाही वेळोवेळी वापर केला जातो.

ऑडिओ-सीडीसह काही CCRT शैक्षणिक प्रकाशने आणि एक 'पपेट्री किट' शाळेला भेट म्हणून देते.

सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सहभागी शिक्षक त्यांना एक किट मोफत दिले गेले .पुढील सुंदर आणि व्यापक शैक्षणिक प्रवासात सोबती होण्यासाठी याचा वापर होईल.

सर्वांनाच समृद्ध करणारा असा हा गुवाहाटीचा प्रवास कलेच्या नगरी घेऊन गेला. जणू काही कलेचा अक्षय पात्रच आमच्या हाती या प्रशिक्षणाने दिल. खरोखर काय घ्यायचं आणि काय द्यायचं हे ज्याचं त्याने ठरवावं. मी तर पूर्णतः समृद्ध होऊन गेले .या प्रशिक्षणात प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक ठेवा मी माझ्यासोबत घेऊन आले माझ्या लेकरांना अधिक समृद्ध करण्यासाठी ! हाच एक प्रशिक्षणाचा खरा उद्देश असेल. एक भारत श्रेष्ठ भारत हा उद्देश सूफळ संपूर्ण झाला असेच वाटत आहे. बारा राज्यातील आलेल्या प्रशिक्षकांनी आपल्या राज्यातील सांस्कृतिक ठेव्याची देवाण-घेवाण केली. भाषिक संवाद करताना होणारी फसगत, हिंदी आणि इंग्रजी यांचा प्रभावी वापर; यांचं संचित या प्रशिक्षणात दिसून आले. म्हणजेच एकोपा  कसा टिकवावा या प्रशिक्षणाने आम्हाला दाखवून दिले आणि जणू काही या प्रशिक्षणात आमचा मिनी इंडिया त्या ठिकाणी बहरला होता. प्रत्येक जण एकमेकांना मदत करणं, काळजी घेण यातूनच राष्ट्रीय एकात्मतेच अनोख दर्शनच त्या ठिकाणी घडत होतं. "मेरी माटी मेरा देश" या उपक्रमांतर्गत गुवाहाटीमधून संपूर्ण राज्यातील सर्व शिक्षकांनी त्या त्या राज्याच्या वेशभूषित काढलेली रॅली आम्ही सर्व एक आहोत, हाच संदेश देऊन गेली. प्रत्येक राज्याने आपल्या सांस्कृतिक ठेव्याची व्यासपीठावर केलेली मांडणी यातून प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक कला आणि  संस्कृती  यांचे दर्शन आम्हा सर्वांनाच झालं .त्याची विस्तृत माहितीही कळली. प्रत्येक राज्याच्या या अनोख्या प्रदर्शनानंतर एकत्र येऊन केलेला जल्लोष हा खरोखरच राष्ट्र प्रेरणेने अंगावर रोमांच उभा करणारच होता. राष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्याचे नेतृत्व करणं हे भाग्य आम्हा सर्वांना मिळालं याचा खूप अभिमान वाटतो. या कार्यशाळेमध्ये बरंच काही शिकायला मिळालं प्रेम, आपुलकी, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव हा तर या प्रशिक्षणात ओतप्रोत भरला होता. शोधूनही सापडणार नाहीत अशी लाख मोलाची माणसं या प्रशिक्षणात दैवयोगाने जुळली गेली. कोणत्याही ज्ञान आपण कोणत्याही माध्यमातून सहज प्राप्त करू शकतो पण मनात प्रेम भरलेली आणि आपुलकीने काळजी घेणारी माणसं भेटायला मात्र नशीबच लागतं. या ठिकाणच्या लोकांचे प्रेम पाहून तर खूपच छान वाटलं .  गुवाहाटी आसाम मध्ये महिलांना खूपच मान आणि प्रतिष्ठा दिली जाते. याची प्रचिती त्याठिकाणी ठाई ठाई येत होती.नवरात्रीचे दिवस असल्यामुळे नवदुर्गा उत्सव मोठ्या जल्लोषात त्या ठिकाणी साजरा होत होता. गुवाहाटी एक अस शहर आहे ज्या ठिकाणी आसामचे सांस्कृतिक कलाकेंद्र मोठ्या आवडीने ते सांभाळत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची संग्रहालय पाहण्यासारखी आहेत. स्त्री शक्तीचे शक्तीपीठ असलेलं माता कामाख्या देवीचे मंदिर हे पाहण्यासारख आहे. जिथून एक नवीन ऊर्जा आणि उर्मी तुमच्या मनाला एक नवी उभारी देऊन जाते .याशिवाय प्रत्येकाने गुवाहाटीला एकदा जरूर भेट द्यावी आणि तेथील सांस्कृतिक कलेचा वारसा आहे तोही जोपासावा. तोच वारसा आपापल्या राज्यात घेऊन यावा 

आपल्या शाळेतील लेकरांना आपल्या भारतीय संस्कृती विषयी सजग करण्यासाठी तसेच आपल्या राज्यातील जनतेलाही आपल्या संस्कृतीविषयी प्रेम जागृत करण्यासाठी ! हेच या प्रशिक्षणाचे खरे सारं असेल . काळ आहे तो जात राहिलंच पण काळजात घर करून राहिलेली माणसं आणि कला चिरंतन प्रेरीत करत राहतील हे नक्की.

शेवटी एवढंच म्हणेन

हम  प्राथमिक शिक्षक है

शिक्षा की नई तसवीर बदल देंगे

भारत के नन्हे मुन्नों की 

हम तकदीर बदल देंगे I




"जय हिंद"

"एक भारत, श्रेष्ठ भारत"


✒️📚©️🌿

सौ.अंजली शशिकांत गोडसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा महाराष्ट्र






Monday, November 6, 2023

झाडांवर जीवापाड प्रेम करणारा निसर्गप्रेमी* 🌴🌳








 

*झाडांवर जीवापाड प्रेम करणारा निसर्गप्रेमी* 🌴🌳🌲🎄

संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात झाडांविषयी प्रेम  व्यक्त करताना खूप छान म्हणतात ,

*वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती* 🍃🌿


या अभंगात झाडांचे महत्त्व खूप सुंदररीत्या तुकाराम महाराजांनी अधोरेखित केलेलं आहे.  वृक्षवल्ली सोयरी वाटली ती या कारणाने. या वृक्षवल्लींच्या ठायी माणसाचे दुर्गुण नसतात. ती ईश्वराची रूपे होत. त्यांच्या सहवासातच ईश्वरभक्ती फुलते. वृक्षवल्ली, सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्या वाटेवर आणून सोडतात. तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवल्लींच्या सान्निध्यात गेले. वृक्षवल्लींना सोयरी' मानले.
आपण सर्वांनी पाहिलं आहेच.
काही झाडं... रोपटी तुटली की वाढतच नाहीच...
काही झाडं पानगळ झाली की परत बहरतच नाहीत.
तर काही रोपटी पहा, इमारतीच्या भेगेत, कौलांच्या
फटीत, अंधाऱ्या विहिरीतल्या दगडी खबदाडीत
आपले हिरवे हिरवे हात हलवत वाढतच राहतात...
माणसांच्या आयुष्यासारखी.
काही कळय़ा फुलण्याआधीच खुडल्या जातात, तर काही झाडांना फळं-फुलं नसण्याचा शाप घेऊनच ती तगून राहतात. पिंपळ, वड, आंबा यांचं भाग्य मोठंच. एखाद्या मोठय़ा संपन्न घरात भाऊबंद, नातवंडं, येणारे- जाणारे यांचा राबता असावा, तशी ही झाडं... सळसळतं हिरवंगार हसू. हसत हसत येणाऱ्या- जाणाऱ्यांना  सावली देणारी, त्यांच्या अंगाखांद्यावर घरटी चिवचिवतात. वडाच्या लांबलचक केसांना-पारंब्यांना धरून पोरंपोरी झोके घेतात. बायाबापडय़ा दोरे बांधून पूजाबिजा पण करतात. संध्याकाळी त्याच्या पारावर बसून म्हातऱ्या गप्पा रंगतात... गजाली होतात. गावातली वर्तमानपत्रंच त्या पारावर छापली न् वाचली जातात! खूप प्रसंगांची साक्षीदार ही झाडे. फळं-फुलं, सावली देताना वढून गेल्यावरपण चुलीसाठी स्वतःची लाकडं सरपण म्हणून देताना त्यांना धन्यच वाटत असावं... घराच्या वाशापासून चुलीतल्या सरपणापर्यंत, पाळण्याच्या लाकडापासून चितेच्या लाकडापर्यंतची त्यांची सोबत...! ही झाडे आपल्याला सर्वस्व देऊन टाकतात आणि स्वतः मात्र मुकी बिचारी आपल्या देण्याची वाट बघत बसतात.
किती अबोल आणि निस्वार्थ प्रेम.
असंच झाडांवर अबोल आणि निस्वार्थ प्रेम करणार कोण आहे का ? हो असाच अवलिया आम्हाला सीसीआरटी गुवाहाटीच्या कार्यशाळेमध्ये भेटला. त्यांचे नाव आहे सुखमोय साहा. ते पश्चिम बंगालचे आहेत.
एखादी व्यक्ती झाडांवर किती निस्वार्थ प्रेम करू शकते ? याच मूर्तीमंत  उदाहरण म्हणजे हे सर.
वृक्षप्रेमी झाडांवर जीवापाड प्रेम करणारे. आपल्या कामावर नितांत निष्ठा असणारे, असे हे व्यक्तिमत्व आम्हाला गुवाहाटीच्या कार्यशाळेमध्ये दिसलं. त्यांचं झाडांवरचं प्रेम पाहून आम्ही ही आवाक झालो आणि तुम्हीही अवाक व्हाल. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, ते जिथे जातील तिथे ते  आपल्या सोबत चार पाच झाडे घेऊन जातात आणि त्या झाडांची तिथे लागवड करतात. किती आगळ वेगळं प्रेम हे झाडांवरचं ! मला तर त्यांचं खूपच कौतुक वाटलं. पश्चिम बंगालवरून आसामला येताना त्यांनी आपल्या सोबत चार पाच झाडे आणली होती आणि झाडे ज्या दिवशी लावली त्यावेळेस आम्हाला कळलं की, साहा सरांनी ही झाडे सीसीआरटीमध्ये लावण्यासाठी आणलेली आहेत. आमचे सी सी आर टी चे सर्व मेंबर्स तेथील सर्व पाहुणे यांच्या साक्षीने त्या झाडांचे वृक्षारोपण गुवाहाटीच्या सीसीआरटीच्या प्रांगणात  झालं. सर्वांना खूपच आनंद झाला. साहा सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर ओसंडून वाहत होता. खरच किती आगळीवेगळी माणसं आपल्यालाही भेटत असतात. प्रत्येकाकडून निश्चितच काहीतरी घेण्यासारख आहे. आणखी एक त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पश्चिम बंगालला जाताना आसाम मधून काही झाडे नेली बरं का.
आपण आपल्या घरच्यांसाठी भरपूर खरेदी करतो, पण निसर्गासाठी आपल्या  धरणीमायसाठी झाडांची लागवड करणारा हा अवलिया काही निराळाच. आदरणीय साहा सरांच्या या वृक्ष संवर्धन उपक्रमास आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा🌹🌿यातून एक बोध घेऊया एक तरी झाड एका वर्षाला आपणही लावूया आणि त्याचं रक्षण करूया धन्यवाद🙏🏻😊


सौ.अंजली शशिकांत गोडसे
सातारा महाराष्ट्र

Sunday, November 5, 2023

दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला अवलिया


 








 *अंतरीचा दिवा पेटवून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर उभा राहिलेला अवलिया* 🤘🏻🥇


'असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,

नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर....

 नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्याची, आयुष्यालाभिडतानाही चैन करावी स्वप्नांची....

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर......

 पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, 

हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर, 

नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर......

विंदा करंदीकर यांची ही कविता मला नेहमीच आठवत राहते. 

अशीच प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या आणि मला गुवाहाटीच्या कार्यशाळेत भेटलेल्या एका लढवय्या माणसाची हकीकत आहे. तुम्हीही काळजीत पडला असाल, की ही व्यक्ती कोण आहे ? असा माणूस की जो प्रचंड इच्छाशक्ती घेऊन जन्माला आलेला आहे.अनपेक्षितपणे एखादा अपघात व्हावा आणि सगळे नियोजन कोलमडून जावे, परिस्थिती बिकट बनावी, अगदी युद्धाचा प्रसंग निर्माण व्हावा, असा एखादा तरी प्रसंग आपल्या आयुष्यात हा येतच असतो. पण त्या प्रसंगांना सामोरे जाऊन इच्छाशक्तीच्या बळावर उभा राहतो, तोच या जगात आपला अस्तित्व निर्माण करू शकतो.      

ऐका तर मग  

दिनांक 6 मार्च 2023 रोजी पहाटे 1 वाजता अपघात होऊन ते मोठ्या कालावधीसाठी बेडवर जायबंदी झाले. त्यांच्या अपघाताची वेळ, स्थळ आणि कारण तेच सांगू शकतात, कारण त्यावेळी ते एकटेच होते, ही बाब यात अत्यंत महत्वाची आहे.  त्यांनीच सांगितलेल्या हकीकतीनुसार, ते काम आटोपून घरी निघत असतांना कार्यालयाच्या जिन्यावरून पाय घसरून पडले आणि पायऱ्यांच्या कोपऱ्यांनी त्यांना कमरेला, पाठिला आणि मानेला गंभीर दुखापत झाली.  यात कमरेचे माकड हाड, छातीच्या तीन बरगड्या आणि मानेचे दोन मणके मोडले. तब्बल सात तास ते तिथेच पडून होते . मोबाईल समोर पडलेला असूनही कॉल करता येत नव्हता. किती बिकट प्रसंग होता तो! सकाळी त्यांना सुरुवातीला जवळच्या accident हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र मानेची दुखापत गंभीर असल्यामुळे व त्यावर उपचार करणारे डॉक्टर तिथे उपलब्ध नसल्याने लगेच दुपारी सुरत येथे असूतोष हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. येथे चक्क गळा कापून मानेच्या मणक्यांमध्ये क्लिप टाकली. छातीला आणि कमरेला पट्टा लावला .

 डॉक्टरांनी जास्त वेळ बसणे तसेच चालणे यावर बंदी घातली, तसेच 24 तास मानेला फिलाडेल्फिया कॉलर  लाऊन बेडवर पडून राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तसेच दर 10 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी बोलावल गेल. 

एवढ्या मोठ्या आजारपणातून बाहेर पडणं, म्हणजे एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. त्यांच्या पाठीशी असलेले त्यांचे पुण्य, त्यांनी केलेले कर्म, हेच दैव म्हणून उभे राहिले असेल; यात काही शंका नाही. अजूनही मी तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव सांगितलेले नाही. एवढा मोठा अपघात झालेली व्यक्ती अवघ्या सहा महिन्यात महाराष्ट्रातून आसाम येथील गुवाहाटी मध्ये पंधरा दिवसाची कार्यशाळा करण्यासाठी येते. संपूर्ण कार्यशाळेत आनंदाने सहभागी होते. कोणाला जरा सुद्धा थांगपत्ता नसेल; की या माणसाचं यापूर्वी एवढं मोठ ऑपरेशन झालेलं असेल. एवढा मोठा अपघात या माणसाच्या आयुष्यात आलेला असेल. तरीही हा माणूस हसतमुखाने सगळीकडे वावरत असतो. तुम्ही आमच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम बघितला असेल. किती आनंदाने त्यात ते सहभागी झाले. वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य केले. आपले सीसीआरटीचे सर्व स्टेजच त्यांनी सांभाळले. खरंच मानलं बाबा तुम्हाला. ओळखलं ना कोण होते ते? आपल्या सर्वांचे लाडके *नंदुरबार डाएट मध्ये विषय सहायक* म्हणून कार्यरत असलेले *आदरणीय श्री देवेंद्र बोरसे म्हणजेच आपले बापू.* 

सर्वांनाच अचंबित करणारा असा त्यांचा प्रवास. आश्चर्य वाटलं ना ऐकून तुम्हा सर्वांना. आमच्या महाराष्ट्र टीमचे तर ते लीडर होते. सर्वांची आपुलकीने काळजी घेतली. फक्त महाराष्ट्र टीमवरच नव्हे तर सीसीआरटी कार्यशाळेमध्ये आलेल्या प्रत्येक भारतीयाबरोबर त्यांनी प्रेमाचे संबंध ठेवले. प्रत्येक खोलीमध्ये विज, पंखा, पाणी येते का? याबरोबरच डासांपासून बचावासाठी प्रे आणि कॉईल देखील उपलब्ध करून देत सर्वांची काळजी घेतली आणि सर्वांच्या कागदपत्रांची पूर्ततादेखील केली. बापासारखी विचारपूस करणारे आमचे बापू.असा ग्रेट माणूस भेटणे, खरंच या जीवनात अशक्य आहे.वास्तविक जीवन क्षणभंगूर असले तरी ते सुंदर आहे. स्वार्थाच्या कुंपणातून बाहेर येऊन जेव्हा आपण आपले जीवन दुसऱ्यांच्या सेवेत समर्पित करतो, दुःखीतांचे अश्रू पुसतो, आपल्या धनाचा वाटा इतरांनाही देतो, निसर्गाचे संवर्धन करतो, तेव्हा आपल्या जीवनाला व जगण्याला अर्थ प्राप्त होतो. इतकेच नाही तर आपण आपल्याबरोबर इतरांचंही जीवन सुंदर करतो. जीवनाला सौंदर्याचे तोरण लागते. म्हणूनच आपण *सुंदरतेचे प्रवासी होऊ या, आनंदाचे यात्रिक बनूया* आणि सत्य, सुंदर व मंगलाची आराधना करूया; मानवी संस्कृतीची मंदिरे उभारू या. बापूंचे भावी आयुष्य आरोग्यदायी, सुखसंपन्न, निरामय, आनंदाचे , प्रेमाचे जाऊ दे याच माता कामाख्या देवीचरणी प्रार्थना. त्यांच्यावर कोणतेच दुःखाचे संकट यापुढे येऊ नये, हीच मनोमन इच्छा.

आयुष्य खरोखरच खूप सुंदर आहे. फक्त आपण त्याकडं कसं बघतो हे महत्त्वाचं. सारं काही आपण ठरवू तसंच होईल, असंही नाही. पण मनासारखं झालं तरी किंवा नाही झालं तरी आपण आपले प्रामाणिक प्रयत्न सोडायचे नाहीत. संधी मिळाली की तिचं सोनं करणं, हे खरं कसब आहे. हेच कसब बापूंनी आम्हा सर्वांना दाखवून दिलं. खरंच तुमची ही प्रेरणा आमच्या जीवनात सदैव अशीच तेवत राहील.

💐💐💐💐💐💐

सौ. अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)

 मर्ढे सातारा




Saturday, November 4, 2023

पत्रातील भावना






पत्र नव्हे या आहेत भावना या भावनांना फक्त रंगरूप देतात शब्द रेषा आणि टिंब आणि त्यातूनच प्रकट होतात मनातल्या अंतरिक भावना फक्त त्या समजून घेणार मन पाहिजे🥰✉️✒️🌿

पत्रलेखन ही एक कला आहे ज्यात आपण आपल्या मनाची भावना शब्दांद्वारे व्यक्त करतो. कधीकधी असे होते जेव्हा आपण व्यक्तीस आपल्या मनात उद्भवलेल्या विचारांचे आणि भावना व्यक्त करू शकत नाही, तर आम्ही त्या भावना आणि विचारांना पत्राने सहजपणे व्यक्त करू शकतो.शब्दांद्वारे व्यक्त केलेले भाव नेहमी आपल्यासोबत असतात. हृदयाशी जोडण्यासाठी, माहितीचे देवाणघेवाण करणे, समाजात जागरुकता पसरविणे आणि प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

      आपण जितके वारंवार आपल्याला हवे तितके अक्षरे वाचू आणि जितक्या वेळा शक्य तितके आनंद घेऊ.

पण सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात आणि मोबाईलच्या युगात पत्राचे महत्त्व हळूहळू कमी होत गेलं. मुलांना पत्र लेखन म्हणजे काहीही माहित नाही .घरी येणारे पत्र एका तारेतून अडकवून ठेवण हे तर मुलांच्या आता भूतकाळातच आहे .क्षणात जाणारे एसएमएस, क्षणात जाणारे फोन कॉल, क्षणात होणारे व्हिडिओ कॉल यामुळे पत्र लेखन हा एक भूतकाळाचाच भाग होत गेला आहे. हेच पत्र लेखन म्हणजे काय हे माझ्या शाळेतील मुलांना समजावं म्हणून मी दरवर्षी दिवाळीत पत्र लेखनाचा उपक्रम घेत असते गेल्यावर्षी सहजासहजी मला पोस्ट कार्ड मिळाली पण यावर्षी दोन-तीन मोठ्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊनही मला पत्र काही मिळाले नाहीत.पत्र ठेवणं बंद केलंय कोण घेत नाही बोलले. शेवटी मी बंद पाकीट घेतली आणि एका कागदावर मुलांकडून पत्र लेखनाचा उपक्रम करून घेतला पण जिद्द काही सोडली नाही. सगळ्या मुलांनी आकाश कंदील ,पणत्यांची रंगरंगोटी केली पण मी हे उपक्रम मुलांना घरीच करायला सांगितले आणि पत्र लेखनाचा उपक्रम शाळेत घेतला .दिवाळीला शुभेच्छा संदेश देणारी ही पत्र नक्कीच तुमच्या घरी येतील तेव्हा वाचून त्याला रिप्लाय द्यायला विसरू नका आणि आमच्या मुलांना तुमच्या शब्दांची प्रेरणा नक्की मिळू द्या. धन्यवाद🙏🏻🥰✒️📚✉️

सौ.अंजली शशिकांत गोडसे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा

 

Friday, November 3, 2023

आजीन 🌿🌷

 आजीन🌿🤝

आज आम्हाला आजीन भेटला !विचारात पडला ना? हा “आजीन” शब्द म्हणजे नक्की काय आणि तुम्हाला अजीन भेटला, म्हणजे नक्की कोण भेटलं? आपल्या महाराष्ट्रात आपण वडिलांच्या आईला किंवा आईच्या आईला आजी असं म्हणतो. आजीच आपल्या नातवंडावर अपार प्रेम असतं. नातवंड म्हणजे तिला नुसती दुधावरची साय वाटते आणि हे खरही आहे. आपल्या लेखी सुनांवर प्रेम न करणारी आजी नातवंडावर मात्र जिवापाड प्रेम करत असते आणि याची प्रचिती ठाई ठाई नेहमीच येत असते. पण गुवाहाटी येथील कार्यशाळेत आम्हाला भेटलेला “आजीन” मात्र वेगळा आहे.

 नुकतीच गुवाहाटी येथे 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत आमची कटपुतलीच्या शैक्षणिक क्षेत्रात वापर करून विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक मनोरंजन कसं करटा येईल ? याविषयीची कार्यशाळा राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. ही कार्यशाळा अतिशय आनंददाई झाली. या कार्यशाळेमध्ये येणारा प्रत्येक रविवार प्रशिक्षकांना सुट्टी असायची. अशीच सुट्टी त्या कार्यशाळेदरम्यान एक रविवारी आम्हाला मिळाली. आसामपासून जवळच असलेलं मेघालय हे राज्य निसर्ग सौंदर्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे माझ्या पति राजांचा जन्म मेघालय राज्यातील शिलॉंग या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे माझं तर डबल भाग्य ! त्याठिकाणी जाण्याचं आणि ते ठिकाण पाहण्याचं. पहाटे आमच्या गाड्या शिलॉंग ला जायला निघाल्या. सगळेच प्रशिक्षणार्थी आज मेघालय आणि शिलॉंगला निघाले होते. खूप मौजमजा मस्ती करत आम्ही डोंगरवाटेच्या कडेकडेने मेघालय आणि शिलाँग या पर्वत टेकड्यांवर कधी जाऊन पोहोचलो ते कळालेच नाही. अतिशय सुंदर असे निसर्ग सौंदर्य लाभलेल्या मेघालयचा सगळा निसर्ग क्षणोक्षणी डोळ्यात साठवून घेत होतो. मैत्रीची अनोखी व्याख्या त्या ठिकाणी आम्ही मांडत होतो.अतिशय सुंदर असणारा हा निसर्ग मनाला भुलवून टाकत होता. सुरुवातीला एक सुंदर असा सरोवर आहे. सगळ्यांनी तिथे मनसोक्त छायाचित्रणाची मजा लुटली. वेगवेगळ्या राज्यातील असले तरी सर्वांशी आपुलकीने; प्रेमाने कसं वागावं, हे मात्र या कार्यशाळेन आम्हाला शिकवून दिल. सगळेजण एकमेकांची काळजी घेत होते. छान छायाचित्रणही सुरू होतं. आमचा प्रवास पुढे पुढे होत होता. मेघालयच्या त्या पर्वत शिखरांवरून जाताना आम्ही आनंदाच्या  उच्च  पातळीवर गेलो होतो. सर्वात जास्त पावसाचे ठिकाण असणारे चेरापुंजी हेही आम्ही पाहिलं. यानंतर तेथील प्रसिद्ध असणारे धबधबेही आम्ही पाहिले. त्या धबधब्यांना सेवन सिस्टर म्हणतात. अतिशय विलोभनीय असे ते धबधबे त्या ठिकाणी होते. यानंतर आमचा प्रवास एका सुंदर अश्या वॉटर फॉलला गेला. त्या वॉटरफॉलचे नाव होते “एलिफंट वॉटर फॉल”. अतिशय सुंदर असा हा वॉटर फॉल आम्ही पाहत होतो. पण प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी काही ठराविक रक्कम एन्ट्री फी द्यावी लागते. आमची गाडी एन्ट्री भरण्यासाठी थांबली. आम्ही एन्ट्री भरलीही. आमच्या एकूण तीन गाड्या होत्या. दोन मोठ्या बस आणि एक कार होती. त्या कारमध्ये आमचे सहकारी अरुणाचल प्रदेशचे अखिया ताना आणि त्यांचा मित्रपरिवार होता. त्यांची कार असल्यामुळे आमच्या आधीच ते तो वॉटर फॉल बघून गेले होते. त्यांनी तिथेही फी पेड केली होती. एका व्यक्तीसाठी शंभर रुपये होते.

 



सर्वांनी तीन स्टेजमध्ये असलेल्या त्या वॉटर फॉल चा आनंद लुटला. पुन्हा पावले गाडीकडे वळाली. पुढे आम्ही आणखीन निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी तेथून गाडी घेऊन वळालो. त्या ठिकाणाहून निघालेली गाडी एका लेणीच्या दिशेने गेली. अतिशय सुंदर असलेल्या त्या लेणीमध्ये वाकून चालताना खूप मजा आली. पूर्ण पाण्यातून होणारा हा प्रवास अतिशय थरारक असा अनुभव होता. यामध्ये मधून अंगावर झऱ्याचे थेंबही पडत होते. छोटे छोटे धबधबे त्या गुहेमध्ये होते. त्या गुहेतून बाहेर पडलो आणि आमच्या महाराष्ट्र टीम मधील हमीद सरांना त्या अखिया तानाजी यांचा फोन आला. तुम्ही कुठे आहात? त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या पाठीमागेच आहोत. तोपर्यंत अखियाजींची गाडी मात्र गुवाहाटीला पोहचली होती. त्यांची एक चूक झाली होती त्या एलिफंट वॉटर फॉल ला जाताना त्यांनी जी फी पेड केली होती त्याच ट्रांजेक्शन वर पुन्हा त्यांच्याकडून चुकून अडीच हजाराची रक्कम गेली होती. त्यांना वाटलं आता हे पैसे मिळतात की नाही ? आम्ही तिथून बरेच लांब होतो. हमीद सरांना ही सगळी हकीकत कळाली आणि आम्ही सगळेजण म्हणलो परत जाताना आपल्या रस्त्यावर तो वॉटर फॉल आहे. आपण जाऊन पाहूया तर. मिळाले तर मिळाले पैसे आणि आमच्या हमीद सरांची आणि सगळ्यांची धडपड सुरू झाली. आमच्या महाराष्ट्र टीममधील बापूंच्या मदतीने आम्ही सर्वांनी ते ठिकाण गाठलं. त्या ठिकाणी जाईपर्यंत बराच अंधार झाला होता. आम्हाला तर वाटलं आता सगळं बंद झालं. आता अखियाला काय पैसे मिळत नाहीत. पण तिथे गेलो तर तिथे शेवटचा एक माणूस शिल्लक राहिला होता. त्याच्याशी बरीच बातचीत झाली. कॉन्टॅक्ट झाले, फोन झाले आणि शेवटी खूप कष्ट करून अखेर अखियाच्या फोनवर ते पुन्हा पैसे जमा झाले.


या कार्यशाळेतून प्रेम, आपुलकी, बंधूभाव हे निश्चितच शिकायला मिळाले. अखिया ताना यांचे अडीच हजार त्यांच्या खात्यात जमा झाले आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आणि आमच्याही. त्यावेळेस अखिया ताना यांनी काढलेले शब्द म्हणजे "आजीन". ते म्हणाले आजसे आप हमारे "आजीन" हो गये... हिंदी भाषिक नसतानाही सुंदर अशा हिंदी भाषेत ते बोलले. म्हणजेच या अरुणाचल प्रदेशच्या भाषेत “आजीन” म्हणजे "जिवलग मित्र". म्हणजे आजपासून आम्ही त्यांचे मित्र झालो. असा हा “आजीन”... अखियाताना अरुणाचल प्रदेश मधील एका खेडेगावात शिक्षक म्हणून काम करतात. त्याच गावात त्यांची बायको सरपंच म्हणून गावचे मुख्य म्हणून काम करते .राजकारणात आणि शैक्षणिक अशा दोन्ही क्षेत्रात त्यांचे नाव तिथे आवर्जून घेतले जाते. उंचीने जरी कमी असले तरीही या माणसाची ख्याती मात्र भरपूर आहे. असे कितीतरी आजीन आपल्या आयुष्यात भेटत असतात. मला असं वाटतं नक्कीच आपणही अनेकांच्या आयुष्यात असेच आजीन बनून गेलं पाहिजे. कायमस्वरूपी लक्षात राहणारा हा शब्द  "आजीन".. "आजीन"... "आजीन"..