Friday, May 31, 2024

बाळकृष्ण भगवंत बोरकर पुस्तक क्रमांक 30

 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-३०

पुस्तकाचे नांव-   बाळकृष्ण भगवंत बोरकर

कवयित्री     -  प्रभा गणोरकर

प्रकाशन  व आवृत्ती- साहित्य अकादमी आवृत्ती पहिली

पृष्ठे संख्या– ११२

किंमत /स्वागत मूल्य-- ४०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

३०||पुस्तक परिचय

        

 बाळकृष्ण भगवंत बोरकर


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


देखणे ते हात ज्यांना,

 निर्मितीचे डोहळे ।

 मंगलाने गंधलेले,

 सुंदराचे सोहळे ॥

 देखणी ती पाऊले, 

जी ध्यासपंथे चालती । वाळवंटातूनसुद्धा, 

स्वस्तिपद्म रेखिती ॥

बा . भ . बोरकरांची नितांत सुंदर मला आवडणारी हि कविता . कवितेचे नावच खूप सुंदर आहे 'असे देखणे होऊया'.

बोरकरांचे लेखन आणि त्यांच्या कविता यावर माझ अपार प्रेम . खूपच सुंदर असं त्यांचे लेखन . त्यांचा चांदणवेल हा संपादित काव्यसंग्रह मला खूपच आवडतो.

अशीच पुस्तके वाचत असताना शाळेच्या लायब्ररीत साहित्य अकादमीचे हे पुस्तक माझ्या हाती लागले .आणि भरभर ते वाचून काढले .आदरणीय प्रभा गणोरकर मॅडम यांनी अतिशय सुंदर असा परिचय आणि बोरकरांचा जीवन वृत्तांत या पुस्तकात मांडलेला आहे .

कविवर्य बा. भ. बोरकर यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1910 रोजी गोव्यातील कुडचडे या गावी त्यांच्या आजोळी झाला. गोवा हा अत्यंत निसर्गरम्य प्रदेश.बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर, " या गोव्याच्या भूमीत मघाचे नारळ असतात,कड्याकपारींतून दुधाचे घट फुटतात, आंब्याफणसांची रास असते, इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या धारा खेळतात..." इथे बोरकरांचे बालपण गेले. त्यातही बोरकरांचे गाव बोरी. या गावाच्या सृष्टीचे वर्णन वि. स.खांडेकर यांनी. "स्वर्गीय अप्सरा" या शब्दांत केले आहे. हिरव्यागार पाचूसारख्या झळझळणाऱ्या वनश्रीने नटलेल्या या गावात बोरकरांचे लहानपण गेले ते पावसात

भिजण्यात, वडिलधाऱ्यांचा डोळा चुकवून घरामागचा डोंगर पालथा घालण्यात, काजूच्या हिरव्या ढापळया मोडून खाण्यात आणि काळ्याभोर जांभळांचा किंवा पिवळ्याधमक आंब्यांचा स्वाद चाखण्यात. निळ्या खाडीच्या काठाला असलेल्या या आपल्या हिरव्या गावाचा बोरकरांना मोठा लळा होता. त्याचे नाव त्यांनी स्वतःच्या

नावाबरोबर बिरुदासारखे मिरवले बोरकर. या लहानशा गावात त्याकाळी शाळा नव्हती. कोकणातून पोटासाठी येणारे शिक्षक बोरकरांच्या घरी मुलांना शिकविण्या-साठी नेमले जायचे. पण ते फारसे टिकत नसत. त्यामुळे बोरकरांच्या मराठी शिक्षणाची परवडच झाली. जेमतेम दोन इयत्तांएवढे मराठी शिक्षण त्यांना घेता आले, व पुढील शिक्षणासाठी पोर्तुगीज शाळेत प्रवेश घ्यावा लागला. बोरकरांचे कुटुंब अनेक लहान-मोठ्या विविध नात्यांच्या माणसांनी गजबजलेले एकत्र कुटुंब होते. या घराचा डोलारा त्यांचे वकील चुलते सांभाळीत. बोरकरांचे बालपण तसे संपन्न स्थितीत गेले. शिक्षणासाठी आपले गाव, मोठा वाडा सोडून वेगवेगळ्या गावी ते राहिले.

मॅट्रिकच्या परीक्षेसाठी ते धारवाडला गेले. ज्या शाळेत आधुनिक मराठी कवितेचे प्रणेते केशवसुत शिकवीत होते, तेथेच आपण शिकतो आहोत या जाणिवेने ते नेहमी भारावलेले असत. मॅट्रिकनंतर कर्नाटक कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला, परंतु खर्च झेपणार नाही म्हणून त्यांना कॉलेज सोडणे भाग पडले. म्हणजेच 1928 सालीच

त्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळाला.

तिथून पुढे ते मुंबईला आले .

मुंबईतूनच पुढे त्यांच्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात झाली.

बोरकरांचा पहिला संग्रह "प्रतिमा" 1930 साली प्रसिद्ध झाला. या संग्रहात 1926 पासून लिहिलेल्या कविता समाविष्ट आहेत. शेवटचा संग्रह "चिन्मयी" 1984 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या संग्रहातली शेवटची कविता 24-4-84 ची आहे. म्हणजेच 1926 ते 1984 अशी सरळ 58 वर्षे बोरकर काव्य लिहीत होते. कवी म्हणून बोरकरांना पहिल्याच संग्रहाने मान्यता मिळवून दिली आणि "जीवनसंगीत" या दुसन्याच संग्रहाने त्यांना कीर्ती, सन्मान व गौरव यांचा लाभ करून दिला. तरी बोरकर तेथेच थांबले नाहीत. कोणत्याही सर्जनशील प्रतिभावंतांप्रमाणे ते पुढे जात राहिले. त्यांनी सतत वेगवेगळया भावनुभूतींची क्षेत्रे धुंडाळलो. आविष्काराचे प्रयोग केले. स्वतःच्या जीवनातून, इतरांच्या जीवनातून भोवतीच्या स्थितीतून, बदलत्या वाङमयीन वातावरणातून त्यांचे लवचिक आणि संस्कारक्षम मन वेगवेगळे संस्कार टिपीत गेले आणि त्यानुसार त्यांची कविताही बदलत गेली. जीवनाच्या गतिमान प्रवाहानुसार तिने वेगवेगळे रंग धारण केले. अधिकाधिक सखोलपणे ती स्वतःचा शोध घेत गेली. अधिकाधिक परिपक्व, स्विर, प्रगाढ होत गेली. आणि तरीही स्वतःचे मूलधर्म ती टिकवून राहिली. बोरकरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो कविता लिहिल्या. तरीही बोरकरांच्या स्वतःच्या शैलीची, शब्दकळेची, वेगळेपणाची स्पष्ट अशी नाममुद्रा त्यांच्या सर्व संग्रहांवर आढळते. याचे कारण हेच आहे.

अशा या बोरकरांना नेहमीच वाचलं पाहिजे त्यांना जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही हे पुस्तक वाचाव अशी माझी तीव्र इच्छा आहे. त्यामुळे पुस्तकाविषयी तुमचे उत्कंठा अजून वाढली पाहिजे .बोरकरांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर 

" यज्ञी ज्यांनी देऊनी निज शिर घडिले मानवतेचे मंदिर परी जयांच्या दहनभूमीवर नाहि चिरा नाही पणती - तेथे कर माझे जुळती "

 


सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

Wednesday, May 29, 2024

किलबिलणारे विश्व पुस्तक क्र २९




 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-२९

पुस्तकाचे नांव-   किलबिलणारे विश्व

कवयित्री     -  सौ . शुभांगी तरडे

प्रकाशन  व आवृत्ती- शब्द शिवार प्रकाशन आवृत्ती पहिली

पृष्ठे संख्या– ९२

किंमत /स्वागत मूल्य-- १५०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

२९||पुस्तक परिचय

        

 *किलबिलणारे विश्व* 


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾



किलबिलणारे विश्व माझे

 खुणावते मज नित्य नवे

 आनंदाच्या क्षितिजावरती

 चैतन्याचे उडती थवे 

 हास्य नवे भाव नवे

 ओथंबते प्रेम सवे

 ध्यासाच्या वाटेवरती

 कर्तृत्वाचे पंख नवे


 किलबिल हा शब्दच मोठा लेकुरवाळा आहे. पक्षांची किलबिल असो नाहीतर लहान चिमुकल्यांची किलबिल असो प्रेम आपुलकी देऊन जाते.

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे . समाजापासून तो दूर राहू शकत नाही .माणसाला दुसऱ्या माणसाची गरज ही लागते पूर्वांपार चालत आलेली ही कुटुंब पद्धती आपण पाहिले असेल .कुटुंबात लहान मुलं असली की कुटुंब चैतन्याने भरलेले असते .असं मनुष्याचे तसंच इतर प्राण्यांचे आपल्या आज आवाजाने किलबिलाट करणार ही पाखर जेव्हा निसर्गात विहार  त असतात .तेव्हा त्यांची देखील किलबिल आपल्याला परमानंद देते .अशीच आपल्या शब्दांची किलबिल माझी मैत्रीण सौ शुभांगी तरडे यांनी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आपल्या काव्यसंग्रहाच्या रूपातून सादर केले .नक्कीच ही किलबिल तुम्हा सर्वांच्या कानावर, मनावर , हृदयावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही .शुभांगी चा लेखनाचा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलेला आहे अतिशय मार्मिक वास्तववादी असं तिचं लिखाण मनाला नेहमीच भुलवत असत . आम्ही दोघींनी कॉलेज आयुष्यात एकमेकींच्या सोबतीने बऱ्याच कविता केलेल्या आहेत .तिच्या कवितेला कोणताही विषय लागत नाही . तिला भावलं पटलं की तिने ते लिहिलं असा तिचा व्यासंग .स्वतः एक अध्यापक असल्यामुळे तिची आणि लहान लेकरांची नाळ कायमच जोडलेली .त्यामुळे किलबिलणारे विश्व तिने तिच्या लेखणीतून आपल्यासमोर प्रकट केले आहे .


   किलबिलणारे विश्व हे ९२ पानांचे असून यात एकूण ७५ कविता आहेत .शब्द शिवार प्रकाशन यांनी अतिशय सुंदर असे हे पुस्तक निर्माण केलेले आहे .या पुस्तकाचे मुखपृष्ठ संजय लोखंडे यांनी तयार केलेले आहे .तर या काव्यसंग्रहातील आतील चित्रे व रेखाटने गणेश पुंडेकर यांनी केलेले आहेत .

  शुभांगी मॅडमनी हे पुस्तक आपल्या आईला समर्पित केलेले आहे . त्या म्हणतात ,

जिने मला आयुष्य सकारात्मकतेने  जगायला शिकवलं त्या माझ्या प्रिय आईस . . . .

त्यांच्या आईचं नाव मंदाकिनी किसन शेलार असे आहे . या कविता लेखनाच्या प्रवासात त्यांना ज्यांनी ज्यांनी मुलाचे सहकार्य केले प्रेरणा दिली त्यांचेही नाव घ्यायला त्या अजिबात विसरल्या नाहीत .त्यांच्या या कवितासंग्रहाच्या प्रकाशाला जाण्याचा योग मला आला होता त्यावेळेस मनोगतात मी त्यांच्याविषयी भरभरून बोलले होते .त्यांचे पती जयवंत यांचाही त्यांच्या या काव्यसंग्रहाच्या निर्मितीत विशेष सहकार्य नव्हे तर भक्कम पाठिंबा आहे .निसर्ग , सूर्योदय, सावली, सांज ,आभाळछाया ,नक्षत्रांची लेणे, श्रावणसरींनो ,नदी माय , रानवाटा , सकाळ अशा कितीतरी कवितेतून त्यांच्या निसर्ग डोकावताना आपल्याला दिसतो .

या निसर्ग स्मृती या कवितेत त्या म्हणतात,

 झाकाळल्या सावल्या 

झुळकाही मंद झाल्या

तरीही अजून वाऱ्याचा

 स्पर्श तसाच आहे

निसर्गाशी त्यांची जवळीकता किती आहे हे दिसून येते .प्रत्येकालाच आपल्या जन्मभूमीचा आपल्या मायभूमीचा गर्व असतोच . म्हणूनच काय त्या आपल्या कवितेतून सफर साताऱ्याची आपल्याला घडवतात . आपल्या तालुक्याविषयी ही त्यांनी कविता केलेली आहे .पुण्यभूमी भारत या कवितेतून आपल्या भारतभूचे गुणगान गायलाही त्या विसरल्या नाहीत .आई आणि बाप यांच्याशिवाय आपण सारेच अनाथ . त्यांना या कवितेत प्रत्येकजण ओवत असतो .माझी मैत्रीण शुभांगी ही तर संवेदनशील .म्हणूनच तिच्या कवितेतून बाप आणि आई ही आपल्या सर्वांसमोर शब्दातून उभी राहते .याशिवाय प्रासंगिक समाज प्रबोधन पर असं अनेक लेखन त्यांनी केलेल  आहे .मुलांच्या मनाला भावतील अशा कविताही त्यांनी आपल्या शब्दातून रेखाटल्या आहेत .त्यांच्या लेखणीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे .स्वतः हाडाचे शिक्षक असल्यामुळे मुलांच्या भावविश्वातील ,शाळेतील काही कविता त्यांनी आपल्या शब्दात रेखाटलेल्या आहेत .

माझ्या या मैत्रिणीचे लेखणी सलाम अशीच नवनवीन काव्य फुले तुझ्या लेखणीतून फुलावीत या मनोमन शुभेच्छा .

शेवटी त्यांच्याच कवितेत एक प्रेरणादायी ,आशावादी विचार त्या घेऊन येतात .आपल्या प्रार्थना या कवितेत खूपच छान देवाला मागणी घातलेली आहे . त्या म्हणतात,

 स्वप्नांचे आभाळ खुलू दे जीवनी प्रयत्नांचा पिसारा फुलू दे अंगणी 

देवा तुझ्या चरणी इतुकीच मागणी 

देवा तुझी या चरणी इतुकीच मागणी .

धन्यवाद 

सौ .अंजली शशिकांत गोडसे (शिर्के ) मर्ढे सातारा .