वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ११८
पुस्तकाचे नाव - आमी आगरी बोलीच कवी
लेखकाचे नाव - संपादक श्री एन . जे . पाटील पेण
प्रकाशन व आवृत्ती- ओजस प्रकाशक पेण
पृष्ठे संख्या– ११०
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ अमूल्य
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
११८||पुस्तक परिचय
आगरी भाषा ही महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी भागात बोलली जाणारी एक प्रादेशिक बोलीभाषा आहे. हिला "आगरी बोली" किंवा "आगरी मराठी" असेही म्हणतात. ही भाषा मुख्यतः मराठी भाषेच्या कोकणी उपभाषेच्या छायेत येते.
आगरी भाषा खालील जिल्ह्यांमध्ये विशेषतः आढळते:
ठाणे
पालघरला
रायगड
मुंबई व उपनगर
काही प्रमाणात नाशिक, अहमदनगर, पुणे इत्यादी भागांमध्ये स्थलांतर झालेल्या आगरी समाजामध्ये बोलली जाते .
आगरी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर संपूर्ण समाजाच्या संस्कृतीची ओळख आहे.
लोकगीतं: आगरी कोळी गीतं, लग्नगीतं, नाच-गाणं
प्रसिद्ध नाटके व चित्रपट: काही मराठी चित्रपटांतून आगरी भाषेचा वापर – उदा. आग्याबाई अरेच्चा, टाइमपास २
सण-उत्सव: नवरात्र, होळी, गोकुळाष्टमी आदी सणांमध्ये आगरी भाषेतील लोकपरंपरा
आगरी भाषा ही मराठीचीच एक बोली असून, तिचा मूळ पाया मराठीच आहे. परंतु तिच्या स्वरूपात स्थानिकता, सहजता आणि ग्रामीण वैशिष्ट्यं अधिक प्रखरपणे जाणवतात.
आगरी भाषेच्या संबोधनात संबोधनात "रे", "ग", "हो" यांचा वापर जास्त होतो.
आगरी भाषा ही केवळ शब्दांची मालिका नाही, ती एक भावना, संस्कृती आणि ओळख आहे. ही भाषा माणसांच्या संवादातली सहजता, जिव्हाळा आणि पारंपरिकता दाखवते. तिचं संवर्धन म्हणजे आपल्या मूळाची जपणूक होय.
अशाच आगरी भाषा बोलणाऱ्या कवींच्या कवितांचा आ मी आगरी बोलीचं पुजारी हा कवितासंग्रह तुमच्या हातात पडला.यातील बरेचसे शब्द काळजाला भिडले .
मुलूख मातीचा, तोंडात मोलाचा शब्द, आणि अंतःकरणात माणुसकीचा देव...
अशी ही आमची आगरी बोली – खरी, साधी आणि सजीव!
"आगरी बोलीचं पुजारी" हा कवितासंग्रह म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नसून, ही बोली जपणाऱ्या आणि तिच्या प्रत्येक अक्षरात भक्तिभावाने प्रार्थना करणाऱ्या आगरी कवींनी रचलेली एक सामूहिक आरती आहे.
या संग्रहात समाविष्ट सर्व कविता म्हणजे गावच्या पारावर बसलेल्या आजोबांची आठवण, आईच्या लडिवाळ शब्दांची ओळख, आणि देवळातल्या घंटानादासारखी शुद्ध भावना – या प्रत्येक कवितेतून व्यक्त होते.
आगरी बोलीला नमन करत, या संग्रहात विविध आगरी कवींनी आपली प्रतिभा आणि आस्था व्यक्त केली आहे. या कविता केवळ वाचल्या जात नाहीत, त्या अनुभवाव्या लागतात – कारण त्या आपल्याला आपल्या मातीत पुन्हा एकदा रुजवतात.
शब्द हेच येथे देव, आणि बोली हीच येथे भजनाची गाणी आहेत.
ही केवळ कविता नाहीत – या आमच्या मातीची, माणसांची, आणि त्यांच्या श्रद्धेची गाथा आहे.
भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती संस्कृतीची, श्रद्धेची आणि अस्मितेची वाहक असते. आगरी बोली ही समुद्राच्या लाटा, शेतातली माती, आणि कोळीवाड्यातल्या गाथा यांची साक्ष देते. ती बोली जपण्याचं आणि तिच्यातून ईश्वराला साकडं घालण्याचं काम या संग्रहातून घडतं आहे.
प्रत्येक कविता आगरी बोलीतील भक्तिभावाने ओथंबलेली आहे.
विविध आगरी कवींनी आपापल्या हृदयातून उमटलेली प्रार्थना येथे गुंफली आहे.
या संग्रहात देव, धर्म, श्रद्धा, आई, मातृभूमी, निसर्ग आणि बोली यांना वंदन करणारे अनेक भावस्पर्शी शब्द आहेत.
काही कविता पारंपरिक स्तोत्रांच्या छायेत, तर काही आधुनिक शैलीत – पण सर्वांचा उद्देश एकच: बोलीची भक्ती आणि बोलीची सेवा.
या पुस्तकाचे प्रस्तावना देणारे
पाटील सर या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना म्हणतात,
आम्ही आगरी बोलीचे पुजारी या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहीताना मला आनंद होत आहे. सदर काव्य संग्रहात सत्तावन्न आगरी कवींनी सहभाग घेतला असून एकशे दहा कवितांचा समावेश आहे. आगरी संस्कृती, जुन्या चालीरीती, नष्ट होत चाललेली शेती-भाती, औद्योगिकीकरण, बदलणारी पिढी, बदलणारी नातीगोती, सण उत्सव, वाढत जाणारे प्रदुषण इ. विषयांवर केलेले लेखन आपल्या लेखनीतून सर्वच कवींनी आपल्या भाषेवर प्रेम करत जिवंतपणे उभे केले आहे. त्या सर्वच सहभागी कवींचे मी कौतुक करतो. सर्वांना धन्यवाद देतो.
२८ ऑगस्ट २०२२ रोजी सार्वजनिक विद्यामंदिर पेण येथे पेण तालुक्यातील ४२ कवींनी 'काव्यमोती' काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले. पेण तालुक्यातील सर्वच आगरी कींना एकत्र करुन लिखाणासाठी प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न होता. त्या यशानंतर श्री एन. जे. पाटील आणि मी जिल्ह्यातील कवींना प्रोत्साहन देऊन आगरी कविता संग्रह प्रकाशित व्हावा ही इच्छा होती.
या बाबत प्रा. एल.बी. पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली आणि जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर कोकण विभागातून सत्तावन्न आगरी कवींनी सहभाग घेऊन 'आमी आगरी बोलीचं पुजारी' हा काव्यसंग्रह आपल्या हातात देताना आम्हां सर्वच आगरी भाषेच्या पुजाऱ्यांना अभिमान वाटत आहे.
या पुस्तकात एकूण 110 कवी आणि त्यांच्या सुंदर कविता यांचा समावेश आहे .
आईची मैत्रीण हे आपल्या बोली भाषेत सांगताना कवी म्हात्रे खूप छान वर्णन करतात,
आयची मइतरीन
माजे आयची मयतरिन
दोन ववलांची चूल
सकालूच उठताना
आठवते तिला मातीची चूल
सकालीच उठून तिलाआय सारवित बसते शेनान
जसं काही बालाचे गाल
गोंजरी कोमल हातानं
किती सुंदर वर्णन केले आईची मैत्रीण आणि चुलीचे .
अशीच सुंदर आणखी एक कविता ज्यामध्ये आगरी बोलीच महत्व सविता पाटील मॅडम यांनी सांगितला आहे .
आगरी बोलीचं वारू
सुसाट सुटलन गो
आगरी बोलीचं वारू
बगवाला निंघलन गो
समिंदरान तारू
आगरी लोखाई
तारू भरलन गो
तारू परदेशी तिराला
लागलान गो
आनंदी मनाना आला उदानू
आगरी बोली ही साथ समुद्रा पार चालली . याविषयी आपल्या कवितेतून मॅडम खूप छान संकल्पना मांडतात .
या संग्रहात स्थानिक, नवोदित व ज्येष्ठ आगरी कवींनी आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. हे एक वैशिष्ट्य म्हणजे या संग्रहामागे कुठलाही एकट्याचा दृष्टिकोन नाही, तर संपूर्ण आगरी समाजाच्या श्रद्धेचा आवाज आहे.
आपल्याला या आगरीबोलीचा गोडवा आणि साधेपणा पाहायचा असेल तर हा कवितासंग्रह नक्की वाचावा या कवितासंग्रहाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment