Wednesday, March 16, 2022

आनंद गोशाळा राधाकृष्णनगर


 

*आमची परिसर भेट* 
 *डोंगर कपारीत थेट*🌹⛳


*ओसाड जमिनीला साऱ्या*

*फुटले चैतन्याचे धुमारे*

*दगड धोंड्यातूनही वाहू*     

  *लागले आनंदाचे चौफेर वारे*

          या काव्यपंक्तीची खरोखर प्रचिती घ्यायची असेल तर तुम्हाला भेट द्यावी लागेल राधाकृष्ण नगर ( बामणेवाडी) तालुका जावली येथील आनंद गोशाळा फार्मला .

     काही गोष्टी पाहण्यासाठी योग यावा लागतो आणि तोच योग दिनांक 14 मार्च 2022 रोजी आला .आमचे सर जि . प . प्राथमिक शाळा वालुथ येथे कार्यरत असल्यामुळे नेहमीच शाळेत माझं जाणं-येणं होत असतं . त्यामुळेच शाळेच्या गेट शेजारी असणारी दगडी कमान आणि ती साकारणाऱ्या वास्तुविशारदाचं मनी खूपच अप्रूप होतं .गेली चार वर्षे झाली त्या रस्त्यावरून प्रवास सुरू होता पण त्या कमानीतून त्यादिवशी जाताना ही कमान साकारणार्‍या दिव्यत्वाचा अचंबित करणारा प्रवास प्रत्येक पावलागणिक माझ्या दृष्टीसमोर सत्यात उभा राहत होता .जि प प्राथमिक शाळा वालुथची छोटी परिसर भेट सहल आनंद गो शाळेला भेट द्यायला निघणार होती आणि मी म्हटले मी माझ्या मुलांना घेऊन आले तर चालेल का ? आणि लगेच होकार मिळाला . आणि वालुथ शाळा आणि आमची बिरामणेवाडी शाळा यांचा तिमिरातून तेजाकडे प्रवास सुरू झाला . ऊन पण फार झालं होतं पण काहीतरी वेगळं पाहायचं होतं बरंच काही ऊर्जा देणारं टीप कागदासारखं टिपायचं होतं . मुलांच्या मनात आणि चालण्यात चैतन्य आलं होतं हळुहळु आमची सहल बामणेवाडी गावात पोहोचली . एवढीशी वाडी असूनही वाडीची श्रीमंती डोळ्यात मावत नव्हती. मोठमोठ्या गावांना जमणार नव्हतं ते या छोट्या वाडीने करून दाखवलं होतं . सुरुवातीला बामणेवाडी च्या भक्ती मंदिरात आम्ही प्रवेश केला राधा कृष्णाची प्रसन्न करणारी भावमुद्रा आमच्या नयन चक्षुंनी टिपून हृदय पटलावर विराजमान झाली . तोंडातून राधा कृष्ण गोपाल कृष्णचा जयघोष भक्तिभावाने होऊन गेला . सर्वांनी शिस्तीने दर्शन घेतले . मंदिराचे सौंदर्य पाहत असतानाच सहजच देणगीदारांच्या नावाकडे लक्ष गेले . मी वाचले *21 लाख रुपये देणगी* . बापरे ! म्हटलं, जो माणूस आपल्या गावच्या मंदिराला 21 लाखाची देणगी देत आहे त्या माणसाचे दातृत्व, कर्तुत्व केवढे मोठे असेल ! हे पाहून आमची उत्सुकता अधिकच वाढली.

   कर्तुत्व कितीतरी जण दाखवत असतात पण दातृत्वाचा दागिना काहीजणांच्या गळ्यातच शोभून दिसतो आणि ती व्यक्ती म्हणजे  आदरणीय    *गुलाबराव आनंदराव* *भिलारे साहेब* हे होय याची प्रचिती आली. संस्कृतमध्ये एक श्लोक प्रचलित आहे. 


*सडः ग्रहेकपर : प्राप समुद्रोडपि रसातलम । दाना तू जलद : पश्य भूवनोपरि गर्जति ।* 


    याचा अर्थ असा की संग्रह करुन राहणारा समुद्रही रसातळाला गेला पण दुसऱ्याला देणारे ढग आजही पृथ्वीवर बसत आहेत याप्रमाणेच आदरणीय भिलारे साहेबांचं दातृत्व नेहमीच बरसत राहणार आहे . हळूहळू गाव आम्ही मागे सोडत गेलो कच्च्या रस्त्याने आमची पावले डोंगराच्या दिशेने निघाली . पुढे काय असेल याची मनी उत्सुकता लागली होती आणि थोड्याच वेळात वाळवंटात जसा ओऍसिस दिसावा तसं आम्हाला नारळाची हिरवीगार दुतर्फा झाडे दिसली . जणूकाही कोकणच तिथे अवतरला आहे. तुषार सिंचनाच्या तालावर डोलणारे सोयाबीनचे पीक दिसले. आणि मग फोटो काढण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. ठिबक सिंचन, तुषार सिंचन या विषयी विद्यार्थ्यांनी माहिती घेतली . जिरेनियम ची आधुनिक शेती पाहिली . नारळाच्या थंड सावलीतून पुढे जाताना उन्हाचा तडाखा कसलाच जाणवत नव्हता . एवढ्यात वालुथ शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर भिलारे ज्यांच्या माध्यमातून आम्ही आनंद शाळेला भेट देण्यासाठी निघालो होतो ते साक्षात संत ज्ञानेश्वर प्रमाणे आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी त्याठिकाणी वेळात वेळ काढून पोहचले. त्याच बरोबर संपूर्ण प्रोजेक्ट मॅनेजर आदरणीय आमिर गलगले आणि रामू सर ही आमच्या स्वागतासाठी सर्व कामे सोडून त्याठिकाणी हजर होते. मुख्य प्रोजेक्ट कडे पोहोचत पोहोचत मोठ्या मोठ्या दगडीच्या बांधलेल्या ताला, डोंगर पोखरून शेतीची चाललेली मशागत, मोहरांनी लगडलेली आंब्याची झाडे हे सारं काही डोळ्यात साठवून आम्ही पुढे चालत होतो . एका शेती सम्राटाचे ऐश्वर्य पाहत होतो. बांधकाम क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहेच पण आम्ही त्यापेक्षाही या काळ्याआईच्या शेतातील त्यांचं कार्य उदात्त  मातृप्रेम पाहत होतो. आम्ही सर्वजण आनंद गोशाळा पाहण्यासाठी पोहोचलो मुलांना सर्व सूचना व्यवस्थित दिल्या . आम्हा सर्वाना आनंद गोशाळेचा संपूर्ण प्रोजेक्ट विस्तृतपणे  दाखवला आणि माहितीही सांगितली . ज्याप्रमाणे आम्ही शाळेतल्या मुलांचे रेकॉर्ड ठेवतो त्याचप्रमाणे आनंद गो शाळेतील गाईंचे रेकॉर्ड पाहून आम्ही थक्क झालो . कोणतंही यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी अपार कष्ट आवश्यक असते. तिथल्या *मातीत त्यांनी केलेल्या कष्टाचा सुगंध दरवळत होता* . गीर आणि सेहवालाल जातीच्या गाई पाहून बालचमूसह आम्हालाही खूप आनंद झाला . डोंगर कपारीतील हे *गोधनाचे सौंदर्य साक्षात स्वर्ग* सुख देत होते . गाईला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे  आणि याच गाईंच्या पायगुणांनी ते स्थान अक्षरशः स्वर्ग बनले आहे . सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथे एवढी स्वच्छता होती की गायीच्या गोमूत्र आणि शेणाचा आम्हाला जराही वास आला नाही . सगळ्यात परमसुख म्हणजे मला माहेर सोडल्यानंतर आज पहिल्यांदाच गाईला प्रेमाने कुरवाळता आले .मला माझ्या माहेरच्या गोठ्यात आल्यासारखं वाटलं . कडबा कुट्टी मशीन ,गाईंना पाणी पिण्यासाठी केलेली आधुनिक व्यवस्था आणि त्याच बरोबर प्रत्येक गाईची माहिती देणारी एक स्वतंत्र फाईल ज्यामध्ये त्या गाईची संपूर्ण इतिहास तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारची केलेली व्यवस्था हे सर्व काही आमच्यासाठी खूपच कुतूहलाचं होतं .  पन्नास एकर क्षेत्राच्या सिंचनासाठी साहेबांनी केलेली व्यवस्था खूपच थक्क करणारी आहे . त्यासाठी त्यांनी एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे त्याठिकाणी तयार केले आहे . या शेततळ्यातून वीज नसताना सायफन पद्धतीचा वापर करून शेतीला पाणी दिले जाते . पाण्याचा वापर काटकसरीने कसा करावा त्याचे व्यवस्थापन आपल्याला या प्रोजेक्टवर निश्चितच पाहायला मिळते . आधुनिक यंत्राचा वापर करून पिकाला गरजेपुरते पाणी कशा पद्धतीने द्यावी याची माहिती आम्हाला याठिकाणी देण्यात आली . त्याच बरोबर पाणी देत असतानाच पिकासाठी आवश्यक असणारी औषधे आणि खते पाण्याबरोबरच कशी दिली जातात त्याचे हे प्रात्यक्षिक आम्हाला याठिकाणी दाखवण्यात आले . 


*आकांक्षा पुढे गगन ठेंगणे म्हणतात तसेच या प्रोजेक्ट पुढे गगन ठेंगणे* 

झालेले आम्हाला पहावयास मिळाले . यानंतर मुलांच्या पोटात कावळे काव काव करू लागले याची जाणीव आम्हाला झाली म्हणून आम्ही मुलांना दुपारच्या जेवणासाठी साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर बसवले . त्याच वेळी साहेबांच्या सूचनेप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी मुलांसाठी खाऊ ची व्यवस्था केलेली होती . खाऊ मिळाल्यामुळे मुलांची मने तृप्त झालेली होती . खाऊ बरोबरच आम्हा सर्वांना अमृताचा ही आनंद मिळाला . होय होय अमृतच ! कारण आयुर्वेदात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे असं *अमृततुल्य ताक* भरपेट प्यायला मिळाले आणि तेही देशी गाईचं म्हणजे सोने पे सुहागाच . यानंतर ताजे दूध गाळून घेऊन त्याचे पॅकिंग कसे करतात याचे प्रात्यक्षिकही त्या ठिकाणी पहावयास मुलांना मिळाले . त्या ठिकाणी हजर असणारे सर्वच कर्मचारी आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य करत होते .  यानंतर सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारी स्लरी कशी तयार केली जाते त्याची माहिती आम्हाला सांगण्यात आली . त्याच बरोबर त्यापासून तयार होणाऱ्या गॅसचाही कशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो याची माहिती आम्हाला दिली . शेणापासून पणती कशी तयार करतात त्याची माहिती दिली आणि प्रत्यक्षात त्या पणत्या आम्हाला पहावयास मिळाल्या . या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा पूरेपुर वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो याची माहिती खूपच छान पद्धतीने आम्हाला मिळाली . अगदी गोठा धुतल्या नंतर त्या पाण्याचाही वापर केला जातो . यानंतर सहजच कुतुहल म्हणून अमिरला आणि रामू सरांना प्रश्न विचारला की या सगळ्या प्रोजेक्ट मधून खरोखर नफा होतो का किंवा हा प्रोजेक्ट परवडतो का ? यावर आमिरने आणि रामूने फक्त स्मित हास्य केलं. यावरून काय समजायचे ते आम्ही समजून गेलो आणि एवढं मात्र नक्की . समजलं की *सगळ्याच गोष्टी फायद्यासाठी करायच्या नसतात तर काही गोष्टी आनंदासाठीही करायच्या असतात* हे नक्की शिकायला मिळालं . यानंतर वालुथ शाळेचे शिक्षक श्री . रामदास भिलारे, श्री . शशिकांत गोडसे , श्रीमती उर्मिला शिर्के व बिरामणेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अंजली गोडसे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि आमची सहल पुन्हा शाळेच्या दिशेने निघाली .

     खरोखरच आजचा दिवस माझ्या आठवणीच्या कुपीत कायमचा विराजमान झाला . खरंच नेहमी काट्यातच गुलाब फुलत असतात आणि अशा डोलणाऱ्या टवटवीत गुलाब फुलांना पाहूनच परमानंद होतो . वालुथ शाळेतील सर्व शिक्षक बालचमू , बिरामणेवाडीतील शिक्षक व बालचमू यांच्याकडून आदरणीय भिलारे साहेबांच्या कर्तुत्वाला आणि दातृत्वाला हृदय पुर्वक सलाम आणि पुढील यशदायी वाटचालीसाठी त्यांना आम्हा सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा !👍🙏🏻🌹⛳


  *शब्दांकन :*✒️
*सौ .अंजली  शशिकांत गोडसे*
*शाळाः बिरामणेवाडी*
 *ता.जावली सातारा*



































Wednesday, March 9, 2022

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


 

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतिदिनानिमित्त*


*सावित्रीबाईंची थोरवी*

🙏🏻📚✒️🌹


नायगावच्या कुशीत जन्मली

 स्त्री शिक्षणाची जननी

 सावित्रीबाईंची थोरवी गाते

 सदैव माझी ग वाणी  ॥ धृ॥


स्त्रियांच्या उद्धारासाठी 

पती राजाच्या मागे गेलीस झणी

सत्यवानाच्या सावित्रीपेक्षाहि 

 सत्य सावित्री झालीस ग राणी ॥१॥


कर्मठ निष्ठूर समाजकंटकांनी

 किती केली ग मनमानी

 सभ्य संयमी वर्तणुकीतून 

भल्याभल्यांना पाजलेस तू पाणी ॥२॥


स्त्रीशिक्षणाची आणलीस गंगा 

खेडोपाडीच्या लेकींच्या अंगणी 

दिन दुबळयांची सेवा करून झालीस

 विद्येची देवता तू ज्ञानदायीनी ॥ 3॥


अक्षरलेखणीशी जोडून नाते 

काव्यफुलांतून गायिलीस गाणी

 स्मरण तुझे अखंड राहते 

प्रत्येक  स्त्रीच्या  ह्रदयातुनी ॥४॥


 सावित्रीबाईची थोरवी गाते

 सदैव माझी ग वाणी


✒️ 🙏🏻📚🌹

 *सौ.  अंजली शशिकांत गोडसे मर्ढे सातारा*

Thursday, March 3, 2022

सूरज


 


अपना सूरज खुद बनना हैं
 जिसे हरदम जलते रहना हैं
चाहे दिन हो या रात
हमे अपने लक्ष्य से नही ढ़लना हैं ।
            -- अंश--