Monday, October 24, 2022

शिकवण शिवरायांची कृती छोट्या मावळ्यांची

शिकवण शिवरायांची

कृती छोट्या मावळ्यांची



         दिवाळी हा सण सणांचा राजा सर्वत्र आनंदात हर्षोल्हासात साजरा केला जातो . पण खरी मजा असते ती लहान मुलांची नवीन कपडे ,शाळेला सुट्टी, दिवाळीचा फराळ, अभ्यंग स्नान आणि सगळ्यात आवडतं म्हणजे दिवाळीतले किल्ल्यांची निर्मिती! हा किल्ला बनवण्यासाठी ही बालचमू तहानभूक सारं काही विसरून किल्ला बनवण्याच्या मागे लागलेली असतात .माती गोळा करणे, दगडी गोळा करणे, विटा गोळा करणे त्या किल्ल्याची सजावट करणे अशी एक ना हजार कामे त्यांच्या भोवती असतात. किती छान वाटतं त्यांना त्या मातीत रडबडलेलं आणि एकाग्र होऊन किल्ला बनवत असलेलं पाहून!

            असंच आमचं लेकरू ही शिवराय प्रेमी !आपल्या सवंगड्यांसह किल्ले करण्यात मग्न. जशी सुट्टी लागली आहे तशी त्या किल्ल्याच्या मागे! कधी एकदा किल्ला होतोय असं झाले त्यांना . कोण दगडी गोळा करते. कोण विटा गोळा करते. कोण माती आणते .शाळेचं दप्तर ठेवलं नाही की ते किल्ल्याच्या मागे गेलीच समजा. काय करणार शिवाजीमहाराज विषयीचे प्रेम, आपुलकी त्यांच्या नसानसात भिनली आहे.

                हेच शिवराय प्रेम त्यांना व्यवहारज्ञान, माणुसकी, प्रामाणिकपणा ,बांधिलकी, एकजूटपणा अशा अनेक गुणांची शिकवण देते. आणि त्याची प्रचिती प्रत्यक्षात येते. आज सकाळी पहाटे लवकर उठून ही मुलं अंघोळ न करताच दगडी आणि विटा शोधायला गेली .यामध्ये माझा अंश आणि त्याचा मित्र पारस दोघेही होते .शेजारीच किराणामालाचे दुकान आहे आणि त्या दुकानाच्या पायरीवर त्यांना एक पैशांच पाकीट सापडलं. त्यांनी ते खोलून पाहिलं. त्यात पैसे होते .मी खालीच गेटचे कुलूप काढण्यासाठी आले असताना त्या दोघांनी परत येऊन ते पाकीट माझ्या हातात दिले. मी विचारलं कुठे सापडलं? कोणाचे? चोरून आणलं का? तर त्यांनी मला घडलेला सारा वृत्तांत सांगितला.  मलाच म्हणालेत की आपण ज्याचं आहे त्याला ते पॉकेट परत देऊ .नंतर ओके ठीक आहे असं मी बोलले .मी ते पाकीट उघडून पाहिले . ओळखीदाखल कोणतही कार्ड त्यात नव्हतं. पाचशे पाचशेच्या नोटा असून त्यांची किंमत सहा हजार रुपये होती .पण मुलांसाठी ती किंमत लाख मोलाची होती .त्यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी ते पैसे लपवून ठेवून त्या पैशाचं काहीही केलं असतं पण त्यांनी ते पैसे माझ्याकडे आणून दिले .आणि मला सांगितलं की ज्याच आहे त्याला ते पॉकेट परत देऊ .यावरून एवढेच समजतं हीच आमच्या शिवरायांची खरी शिकवण ! मुलांना त्यांनी वस्तू ज्याचे आहे त्याला ती परत करावी याची प्रामाणिक शिकवण दिली. खरंच हे त्यांच शिवराय प्रेम किल्ल्यांवरील अपारभक्ती त्यांना प्रामाणिकपणा शिकवून गेली . आपली संस्कृती आपल्याला हेच तर शिकवते. पुढे पाकिटाची ओळख पटली आणि त्या मुलाने या मुलांना खाऊ पण दिला.. मुलं ही गोष्ट विसरून गेली पण माझ्या मनात मात्र ही गोष्ट घर करून राहिली. मी मनापासून शिवचरणी लीन झाले .

जय शिवराय ! जय महाराष्ट्र !

सौ अंजली शशिकांत गोडसे 

मर्ढे ,सातारा.

Friday, October 21, 2022

हाती ज्यांच्या शून्य होते १०

 


१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक   :-१०

४} पुस्तकाचे नाव      :-  हाती ज्यांच्या शून्य होते

५)एकूण पृष्ठ संख्या :-  २३२

मूल्य        २००    :- ₹  फक्त


पुस्तक परीक्षण 

हाती ज्यांच्या शून्य होते


     प्रत्येक मानवाला एक सुंदर आयुष्य मिळालेलं असतं आणि ते आयुष्य आपण आपल्या परीने जगत असतो कधी कधी आपण खूप आनंदात असतो आणि कधी कधी आपण खूप नैराश्यात जातो आणि हे जीवन नकोसं होतं. नैराश्यात गेलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे कारण या पुस्तकाचे नावच अगदी समर्पक आहे हाती ज्यांच्या शून्य होते. अरुण शेवते यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. एकूण २१ पाठांमध्ये हे पुस्तक विभागलेले आहे. त्या पाठांनाही समर्पक शीर्षके देण्यात आलेली आहेत.

अनेक मोठ मोठ्या लेखकांनी या पुस्तकात आपल्या आवडीच्या कर्तृत्ववान अशा व्यक्तींचा परिचय करून दिलेला आहे.

    पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक भागामध्ये एका दैदिप्यमान मानवाचे दर्शन आपल्याला होतं. हाती ज्यांच्या शून्य होते या पुस्तकाचे लेखन करण्यासाठी वि.ग .कानेटकर ,के .जे .पुरोहित, लता मंगेशकर, ग .दि. माडगूळकर, गुलजार, सुधीर फडके ,निळू फुले, शामला शिरोळकर, दारासिंह, मनमोहन सरल, एन. डी. पाटील, कुमार केतकर, चार्ली चापलीन, सुशील कुमार शिंदे, दिनकर पंड्या, स्टीव्ह जॉब्स, मुकेश माचकर या लेखकांनी या पुस्तकात जीवनात घडलेल्या प्रसंगांचे लेख लिहिलेले आहेत . या पुस्तकातील सर्वच लेख वाचनीय आणि प्रेरणादायी आहेत प्रत्येक लेखासाठी समर्पक शीर्षक दिलेल दिसून येतं.

       पोस्टमास्तर ते  राष्ट्राध्यक्ष, नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होतो, खाटीक खाण्यात ते नाट्यगृह, मुक्काम कोल्हापूर ,मंतरलेले दिवस, मोटार, गॅरेज आणि गाणे, चहाभाजीचा व्यापार ,अकरा वर्ष माळी होतो ,विष्णुपंत :छत्रे ग्रँड इंडियन सर्कस, आखाडा आणि कुस्ती ,हुसेन चा शंभर कोटीचा प्रवास ,नांगर, कंदील आणि रयत, ग्रेटा कार्बो नावाचे वादळ, मी, कोर्टाच्या आवारात, नांगर कारखान्याचा जन्म ,साखर कारखान्याची उभारणी, रिलायन्स ची निर्मिती, चुका कराल तरच घडाल, सकाळी केव्हातरी उजाडेल, शून्यातून प्रगती अशी प्रेरणादायी नावे प्रत्येक लेखाला दिलेली आहेत. काही लेखकांनी दुसऱ्याच्या जीवनातील प्रसंग लिहिलेले आहेत .तर काही लेखकांनी स्वतःच्या जीवनातील आत्मकथनपर प्रसंग या पुस्तकात वर्णन केलेले आहेत. खूप सुंदर आणि प्रेरणादायी असे पुस्तक आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच अरुण शेवते यांनी आपल्या आईला समर्पित केली आहे .ते म्हणतात "माझी आई अनुसयाबाई दिगंबर शेवते लग्नानंतर दहा वर्षांनी सातवीची परीक्षा दिली शून्यातून स्वतःचे घरटे उभारलं." आपल्या आईच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग त्यांनी दिला आणि इतरांना त्यातून प्रेरणा घेण्याची एक नवीन ऊर्जा त्यांनी दिली.

       आपल्या मनोगतात ते म्हणतात ,"कर्तृत्ववान माणसाचे वैभव दिसते. त्या ऐश्वर्याच्या मागे दडलेला अंधार कुणाला दिसत नाही. अंधाराला छेद देऊनच माणसे मोठी होतात." जीवनात मोठ्या मोठ्या झालेल्या कर्तृत्ववान माणसांच्या आयुष्यातील प्रसंग या पुस्तकात दिलेले आहेत हे पुस्तक वाचून नैराश्यात गेलेल्या प्रत्येक माणसाला आयुष्यात येऊन काहीतरी करण्याची उर्मी उत्पन्न होईल.

     पहिल्या प्रसंगात अब्राहम लिंकन यांची माहिती दिली आहे. पोस्टमास्तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास त्यांचा मांडलेला आहे .त्यांनी गुलामांना स्वातंत्र्य मिळवून दिले याचे वर्णन केले आहे.

ए.पी.जे. अब्दुल कलाम

वडील नावाडी होते.

विद्यार्थिदशेत असताना ते रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्र विकत होते.

ते शास्त्रज्ञ झाले.

भारताचे राष्ट्रपती झाले.


शेक्सपिअर

खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभाळता सांभाळता एका नाटककाराचा जन्म झाला.


लता मंगेशकर

वडील वारल्यावर त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी केली. कष्टात दिवस काढले. घर सांभाळले. विविध भाषेत पन्नास हजार गाणी म्हटली. भारतरत्न हा त्यांना सर्वोच्च किताब मिळाला.


ग. दि. माडगूळकर

मॅट्रिक नापास झाल्यांवर उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. त्यांनी गीतरामायण लिहिले.


गुलजार

फाळणीनंतर दिल्लीला आले. दिल्लीहून मुंबईला आले. मोटार गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल रॉय भेटले. मोटार गॅरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रीत आले.


सुधीर फडके

चहा भाजीचा व्यापार करत होते. प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी बाद्यं विकावी लागली. भटकंतीतून त्यांनी सूर शोधला. ते गायक झाले, संगीतकार झाले.


निळू फुले

पुण्याला कॉलेजमध्ये अकरा वर्षं माळी होते. झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले. नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले.

विष्णूपंत छत्रे

घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वतःच स्वतःचा मार्ग शोधला. भारतातील पहिली ग्रेड सर्कस निर्माण केली.


दारा सिंह

पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते. रानात गुरं चरायला घेऊन जात होते. गुरांना सांभाळता सांभाळता त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली. जगभर कुस्त्या जिंकल्या. चित्रपटात कामे केली. राज्यसभेत खासदार म्हणून जाताना त्यांच्या मनात एकच भावना असते- एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला.


एम. एफ. हुसेन

मुंबईच्या फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली. पुढच्या आयुष्यात त्यांची शंभर चित्रे शंभर कोटींना विकली गेली. भारतात चित्रकलेच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला.


कर्मवीर भाऊराव पाटील

कंदील आणि नांगराचे विक्रेते होते. कंदील नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली.


ग्रेटा गार्बो

गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला. तेराव्या वर्षी गरिबीमुळे शाळा सांडावी लागली. दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असतांना अचानक • हॉलीवूडचे दरवाजे उघडले.


चार्ली चॅपलिन

प्रचंड गरिबी अनुभवली. विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासून अनेक कामे केली. आपल्या विनोदाने जगभरच्या लोकांना हसवले.


सुशीलकुमार शिंदे सोलापूरला कोर्टात शिपाई होते. कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

लक्ष्मणराव किर्लोस्कर दहा वर्ष ड्रॉईंग टिचर होते. त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला.


यशवंतराव गडाख

अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते. मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले. वयाच्या पंचविशीत सोनईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली.


धीरुभाई अंबानी

वडील प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग ऑफिसात नोकरीला होता. स्वतः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते. अशा वातावरणात त्यांनी स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले.


स्टीव्ह जॉब्स

कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले. जगातल्या मोठ्या कॉम्प्युटर कंपन्यांपैकी एक ' अॅपल'ची स्थापना केली.


सुनील दत्त

रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले.


जॉनी वॉक

बस कंडक्टर होता. प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकीटे लोकांनी घ्यायला सुरुवात केली. एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थिरावला.


महेमूद

ड्रायव्हर होता. चलती का नाम गाडी, सबसे बडा रुपय्या त्याने म्हणायला सुरुवात केली. आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वतःलाही समजले नाही.

या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शून्य होते. त्यांनी अथक परिश्रमाने शून्यातून विश्व निर्माण केले. अनवाणी आयुष्याला आकार दिला. परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसांपुढे आदर्श ठेवला.


प्रत्येक लेखकाची आपली स्वतःची अशी लेखन शैली दिसून येते. आपल्या भावभावना जीवनातील प्रसंग अगदी हुबेहूब रेखाटलेले आहेत. हे पुस्तक वाचून एवढ्या मोठ्या माणसांच्या किती बिकट प्रसंग आलेले असतील हे समजून येते. वयाच्या प्रत्येक पायरीवर असणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे. प्रत्येक घटना, प्रसंग आपल्या आयुष्याशी निगडित आहे असे वाचताना वाटते. या पुस्तकात आलेल्या सर्व माणसांच्या हातात शून्यच होता. शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती या पुस्तक वाचनातून मिळते.

        पुस्तकाची बांधणी छान आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप सुंदर आहे .त्यावर पुस्तकात असलेल्या महान व्यक्तींची छायाचित्र दिलेली आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर प्रत्येकाच्या आयुष्यात एवढी मोठी व्यक्ती असून ते नक्की कोणतं काम करत होते याची एका ओळीत माहिती दिली आहे. त्यामुळे पुस्तक पाहता क्षणी ते वाचण्याचा मोह होतो. मुखपृष्ठाची मांडणी सतीश भावसार यांनी केलेली आहे पुस्तकाचे प्रकाशन स्वतःच अरुण शेवते यांनी केलेलं आहे .ऋतुरंग प्रकाशन गोरेगाव मुंबई या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. या पुस्तकाची २५ वी आवृत्ती जानेवारी २०१३ ला आलेली आहे. पुस्तकाची एकूण पृष्ठ संख्या २३२ आहे. सर्वांनी वाचाव असं हे पुस्तक आहे. प्रत्येकाच्या संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे.


संपादन :-अरुण शेवते

प्रकाशन :-ऋतुरंग प्रकाशन गोरेगाव मुंबई

मुखपृष्ठ व मांडणी :-सतीश भावसार

किंमत:- दोनशे रुपये

Saturday, October 15, 2022

शुभेच्छापत्र

जि.प.प्राथमिक शाळा बिरामणेवाडी येथील मुलांनी लिहिलेल्या पत्राला खासदार साहेबांनी स्वतः च्या हस्ताक्षरात पत्र लिहून आणि स्वतः फोन करून दिल्या शुभेच्छा✒️✒️
काय लिहिलं असेल ते वाचाच.🌿🌿 

 


 

Tuesday, October 11, 2022

अनाथ

अनाथ

अनाथ शब्दाचा अर्थ
 आज मला कळला
 माझं कोणीच नाही
 नियतीने डाव साधला

लढायचं आता एकट्याने
ध्यास मनी धरला
खाच खळग्यांच्या वाटेने
यशाचा मार्ग चोखाळला

समजून घेणार कोणी
नसेल आता मला
हक्क माझ्यावर मात्र
सर्वांनीच का दाखवला

चुकतं असेल माझंही
मानव धर्म मी पाळला
खरा देव  मात्र  माझा
सर्वांनी सरणात जाळला 

चंद्र ताऱ्यातच मी
शोधते आहे तुम्हाला
रात्रीच्या या एकांती
बांध हृदयाचा फुटला


✒️📚
सौ.अंजली शशिकांत गोडसे 
मर्ढे सातारा.©️



जागतिक टपाल दिन





 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी ता.जावली जि.सातारा

जागतिक टपाल दिन ✒️📚 मुलांनी आज पत्र लिहून पाठविल्या शुभेच्छा🌹🌹🌿🌿

#पत्र 

#प्राथमिक शाळा

#शिक्षण 

#जिल्हा  सातारा


मुलांची पत्र टपालपेटीत💌✒️पोहचल्यावर उत्तर पाठवा हं!वाट बघतोय😊📩

Sunday, October 9, 2022

Pink Revolution Run



























 





 


 










 
















 *कोजागिरी पौर्णिमा

   आजच्या दिवसाला जसं ऐतिहासिक महत्त्व आहे तसेच काही वर्तमानकालीन घटनांचे ही महत्त्व त्या ऐतिहासिक दिवसाशी योगायोगाने जुळल गेलं.  आजचा दिवस हिरकणी फाउंडेशन सातारा यांच्या वतीने आयोजित आजच्या पिंक रेवोल्युशन  मॅरेथॉन यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस या शीर्षकाखाली प्रबोधन म्हणून मॅरेथॉनचे आयोजन सातारा नगरीत करण्यात आलं होतं .तूम्हाला तर माहिती आहेच की कोजागिरी पौर्णिमा ज्या दिवशी आपल्या तान्हुल्यासाठी एक माय माऊली रायगडासारखा अभेद्य गड खाली उतरून आली तोच आजचा दिवस मातृत्वाने भारलेला दिवस आणि त्याच दिवशी ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस साठी मॅरेथॉनचे आयोजन केलेले होते . या मॅरेथॉनचे आयोजन करणाऱ्या फाउंडेशनचे नावही हिरकणीच किती योगायोग .

   जिथे काहीतरी समाजासाठी प्रबोधन पर करण्यासाठी आम्ही नेहमीच सतत तत्पर असतो .यामध्ये प्रबोधनासाठी आम्ही साऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकांनी भाग घेण्याचे ठरवलं.   मॅरेथॉन मध्ये एक वेगळी थीम घेऊन आम्ही आलो सर्वांना प्रबोधन करण्यासाठी!  आमच्या थीमला प्रथम पारितोषिक मिळाले. शिक्षकाचे कर्तव्यच असतं आपल्या लेकरांना ज्ञानदानाबरोबरच मातृत्वाने जवळ घ्यायचं आणि त्यांना प्रगतीपथावर घेऊन जायचं . असाच आजचा मंतरलेला दिवस.

माझ्या सर्व मैत्रिणी आणि हिरकणी फाउंडेशन यांचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार🙏🏻🌝🌹💗💞🟣🌸

  सौ.अंजली शशिकांत गोडसे 

         मर्ढे   सातारा