Wednesday, January 24, 2024

मांढरदेव दुर्घटना 25 जानेवारी

 एकोणवीस वर्षांपूर्वीचा तो आजचा दिवस 25 जानेवारी 2005


आठवलं का काही ?कसं आठवणार ? एकोणवीस वर्षे झाली त्या घटनेला 25 जानेवारी 2005 

पौष पौर्णिमा मांढरदेव यात्रेचा मुख्य दिवस . 

आठवले ना !


म्हणजेच मांढरदेव दुर्घटना .ज्यात शेकडो लोक मारले गेले . श्रद्धेपोटी की अंधश्रद्धेपोटी हा ज्याचा त्याने विचार करावा . अनेक लोकांचा नाहक बळी त्या यात्रेत गेला . त्या यात्रेची मी एक साक्षीदार .नुकतच मला नोकरीला लागून एक महिना झाला होता मी मांढरदेवी येथील कोचळेवाडी शाळेत शिक्षक म्हणून हजर झाले होते पण मांढरदेव शाळेत काम करत होते . प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची ती माझी शिक्षक म्हणून पहिलीच वेळ आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच घडलेली ही दुर्घटना . माझ्याच नव्हे तर साऱ्या जनतेच्या अंगावर रोमांच उभा करणारी . चेंगराचेंगरी, , पळवा पळवी ,सिलेंडरचे स्फोट अजूनही डोळ्यासमोर सर्व काही तसेच उभ राहतं .ॲम्बुलन्स आवाज पोलीस गाड्यांची , मंत्र्यांचे दौरे किती आणि काय किती आठवायचं किती साठवायचं . मन सुन्न करून टाकणारी ती घटना आजही भयावह वाटते .

दुपारपर्यंतची शाळा करून मुलांना घेऊन मीही मांढरदेवची यात्रा पाहण्यासाठी गडावर जाणार होते . पण माझी शाळा सुटण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली आणि शाळेच्या परिसरातूनच लांबूनच मी हे सगळे पाहत होते .अफवांना तर उत आला होता . सगळीकडे नुसती धावा धाव गाड्यांची आणि माणसांची !तोपर्यंत ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती आमच्या घरच्यांना तर माहीत होतं की मी यात्रेत जाणार आहे त्यामुळे नक्की काय प्रकार झाला हे त्यांना समजायला तयार नव्हतं .कोल्हापूर झेडपीतून बदली होऊन जावली पंचायत समितीत हजर झाले होते . त्यांनाही तिथे बातमी समजली आणि त्यांच्या  पायाखालची जमीन सरकली .नशीब त्यावेळेस माझ्याकडे एकोणवीस वर्षापूर्वी मोबाईल होता .त्यामुळे मी सर्वांशी संपर्क करू शकले आणि सुखरूप असल्याचे सांगू शकले .माझी ती सुखरूप ची बातमी आमच्या घरच्यांना पोचली पण या यात्रेत ज्यांचे बळी गेलेत त्यांच्या घरच्यांचं काय त्यांच्यावर तर आभाळ कोसळल होतं .

मांढर गडावर येणाऱ्या सर्व खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली होती .फक्त पोलीस आणि आरोग्य खात्यांच्या गाड्यांना मुभा देण्यात आली होती .त्यावेळेस कोचळेवाडी शाळेतील माझ्या सहकारी मांढरे मॅडम या मांढरदेवीच्या असल्यामुळे त्या यात्रेच्या रजेवर होत्या . शाळेत मी एकटीच होते . नवीन हजर झालेली .अशी दुर्घटना घडलेली माझ्यावर काय प्रसंग बेतला असेल ते माझं मलाच माहीत .शाळेच्या वर्ग खोल्याही यात्रेकरूंसाठी देण्याच्या सूचना आल्या त्याप्रमाणे आम्ही शाळेच्या वर्ग खोल्याही यात्रेकरूना दिल्या .अतिशय भयानक असे चित्र डोळ्यासमोर होतं . मांढरदेवीकडे जाण्याला पाऊलही उचलत नव्हतं . माणसांनी त्यांचे नातेवाईकांची प्रेतही गाडीत घालून गुपचूप घेऊन गेली म्हणजे काय परिस्थिती आली असेल याचा विचार करा .एवढ्या आनंदाने सुख समाधानाने आलेली माणसं यात्रा न करताच निघून गेली .काहींनी तर आपल्या डोळ्या देखत आपल्या माणसांचा जीव जाताना पाहिला .गर्दीत त्यांना चेंगरताना पाहिलं .डोळ्यासमोर दिसणारी माणसं अचानक पायदळी तुडवली गेली आणि हाहाकार झाला .आई काळुबाईच्या पायऱ्यांवर अनेक जणांचे बळी गेले .या दुर्घटनेनंतर कित्येक दिवस सर्वत्र शांतता पसरली होती . दुसऱ्या दिवशीचे प्रजासत्ताक दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले .मी त्या रात्री कोचळेवाडीतच अंगणवाडी सेविकांच्या घरी मुक्काम केला .पण झोप कुठे लागत होती रात्रभर सायरनचे आवाज कानात, मनात , हृदयात धडाडत होते .साधेपणाने प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी वाईला जायला निघाले पण वाईला जाणारी कोणतीच गाडी मिळत नव्हती .शेवटी वाई वरून येणाऱ्या एका गाडीत मी बसून वरती मांढरदेवला गेले .आणि पाहिलं तर सगळीकडे स्मशान शांतता पसरलेली होती आणि देवीच्या हिरव्या साड्या प्रेतांवर झाकलेल्या होत्या .सगळीकडे आगीची लोट ,धुरांचे लोट दिसत होते .प्रसाद ,हळदी कुंकू सगळीकडे अस्ताव्यस्त पडलेली होते . चपल्यांचे ढीग लागलेले होते .डोळ्यांनाही न पाहवणार विदारक दृश्य माझ्या दृष्टीस पडलं .मी मात्र त्या गाडीतून एकही पाऊल खाली ठेवला नाही खिडकीतून सारे पाहून तशीच गाडीत बसून राहिले . गाडी निघाल्यानंतर सारं काही मनात साठवून ठेवलं होतं ओठातून शब्द फुटत नव्हते आणि डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते .कधी घरी पोहोचेल असं झालं होतं . घराच्या दारात मला सुखरूप पाहून सगळ्यांनी एक मोठा उसासा सोडला .तुम्हीच आता विचार करा हे सगळं कशामुळे झाले असेल ? श्रद्धाअसल्यामुळे का अंधश्रद्धा असल्यामुळे ! अजूनही लोक आपल्या वेडा पायी नको त्या भूलथापांना बळी पडतात आणि अशा प्रसंगांना आपल्याला समोर जावं लागतं .कदाचित नारळ फोडणे, तेल घालणे त्यामुळे तर हा प्रसंग ओढावला नसेल !

ते काहीही असो या प्रसंगातून आपणही बोध घेतला पाहिजे असे प्रसंग पुन्हा कधीच घडू नयेत एवढेच वाटतं .या प्रसंगातून मात्र मला बरच काही अनुभवायला मिळालं .अजूनही म्हणाव्या अशा सोयी सुविधा मांढरदेवला झालेले नाहीत एवढी वर्षे झाली तरी अजूनही त्याच प्रथा परंपरा पाळल्या जातात .तेव्हा सर्व यात्रेकरूंना नम्र आवाहन कोणत्याही ठिकाणी यात्रेला जाताना सावधानता बाळगा .

✒️©️

सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक क्र.२३ एकच मुलगी



 

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा


पुस्तक परिचय क्रमांक-२३

पुस्तकाचे नांव- एकच मुलगी

लेखकाचे नांव- अरुण शेवते

प्रकाशन  व आवृत्ती-   ऋतूरंग प्रकाशन , मुंबई, २०१३ प्रथम आवृत्ती

पृष्ठे संख्या– २०७ 

किंमत /स्वागत मूल्य-- २५०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

२३||पुस्तक परिचय

        एकच मुलगी

लेखक / संकलक -  अरुण शेवते

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


आपल्या धार्मिक ग्रंथात लिहिले आहे “यत्र नार्यस्तु पुजयन्ते रमन्ते तंत्रज्ञ देवता” याचा अर्थ होतो की जेथे नारीचा अर्थात स्त्रीचा आदर सन्मान केला जातो तेथेच परमेश्वराचा वास असतो. परंतु वैदिक काळातील आपली ती संस्कृती आता मात्र पुस्तकांपुरती मर्यादित झाली आहे. बदललेल्या परिस्थितीची भयंकर परिणाम आपण आता सध्या पाहतच आहोत.आधुनिक भारत एवढा आधुनिक झालाय की आता याने मुलींकडून जगण्याचा अधिकार देखील हिसकावून घेतला आहे. जन्म मृत्यू परमेश्वराच्या हातात असते. परंतु आपल्यामधील काही लोक स्वतःला परमेश्वर समजत गर्भात असणाऱ्या बाळाला फक्त एवढ्यासाठी मारून टाकतात कारण ती एक मुलगी असतें .

आपले समाजात वंशाला दिवा लागतो पण वंश चालवण्यासाठी पण तिला मात्र तो विसरत जातो.

मात्र याला काही असामान्य व्यक्तिमत्व अपवाद आहेत ज्यांनी आपल्या कर्तुत्व नेतृत्वाबरोबरच सामाजिक सलोखा राखून  सर्व समाजापुढे एक मोठा आदर्श दिला आहे. आणि तू आदर्श म्हणजेच स्वतःला एकच मुलगी असल्याचा तुम्हाला मी बरीच उदाहरण देईन तुमच्या या उदाहरणावरून लक्षात येईल की या माणसाकडे पैसा अडका धन दौलत गाडी यांची कशाचीच कमतरता नाही तरीही त्यांनी आपल्या पोटी एकाच मुलीला जन्म दिला हे विशेष कौतुकाच आणि प्रेरणादायी!

असंच प्रेरणादान देणार पुस्तक माझ्या हाती लागलं आणि मी ते झपाटल्यासारखं वाचून काढलं. त्या पुस्तकाचे नाव आहे एकच मुलगी या पुस्तकाचे संपादन केल आहे अरुण शेवते यांनी. मुखपृष्ठ तितकच देखणं आहे!  मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर एकच मुलगी असणाऱ्या दिग्गज लोकांचे छायाचित्र देण्यात आलेली आहेत.

लेखक अरुण शेवते या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना म्हणतात,

मुलगा असो की मुलगी असो, ते आपल्या आयुष्याचे नंदनवन असते. आपल्या आयुष्याची वाटचाल त्या इवल्या इवल्या चेहेऱ्यांची वाढ पाहूनच आपण करत असतो. चांगले विचार, चांगल्या जाणिवा एकाकडून दुसऱ्यांकडे जाणे हा खरा दिव्यांचा प्रवास असतो. बुद्ध काय म्हणाले? महावीर काय म्हणाले? येशू काय म्हणाले? पैगंबर काय म्हणाले? गांधी काय म्हणाले? त्यांच्या विचारांचा प्रवास जगाला विनाशाकडून वाचवणारा असतो. ते महामानव खऱ्या अर्थाने मानवजातीचे वंशज आहेत. त्यांचे विचार अंधारातून प्रकाशाकडे नेणारे दिवे आहेत. आपला मुलगा हा वंशाचा दिवा आहे या भ्रामक कल्पनेपायी आपण राक्षसी मनोवृत्ती मनात बाळगतो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

खरोखर अतिशय सुंदर असं पुस्तक आपल्या ह्या संग्रही असावं असा आहे वाचताना अभिमानाने उर भरून येतो. मी स्वतः एक मुलगी असल्याचा नक्कीच अभिमान वाटत राहतो.


पंडित जवाहरलाल नेहरू, हिलरी क्लिटन, गुलजार, शरद पवार, निळू फुले, सुलोचना, मृणाल गोरे, रिमा, ना. सं. इनामदार, बेगम परवीन सुलताना, आरती अंकलीकर-टिकेकर, नीलम गोऱ्हे, रझिया पटेल, सदा कऱ्हाडे, अरुण शेवते या सर्वांना एकच मुलगी आहे. वंशाला दिवा पाहिजे. म्हणजे मुलगा हवा, ही सनातन परंपरा त्यांनी नाकारली आहे. ह्या साऱ्यांनी आपल्या एकाच मुलीच्या सुंदर आठवणी मनोमोकळेपणाने सांगितल्या आहेत.

आपल्या 'मेघना' या कवितेत गुलजार म्हणतात-


समंदर देख रहा था

समंदर से, मेरी अमृत की कुंभी आने वाली थी समंदर कर्वटें लेता था, रह रह कर, तो बल पडते थे पानी में मेरी बच्ची की नाजुक कोख से टीसें गुजरती थीं मुझे उस वक्त डर लगता था, 'अमृत' माँगने से। उसे जब कपकपी आती थी तो मैं काँप जाता था।


वो प्यासी थी - मगर पानी मना थी बर्फ की डलिया फिरायी जा रही थीं खुश्क होंटो पर समंदर अपने पानी में ही गोते खाने लगता था समंदर काट के 'कुंभी' निकालो ना काटोगे तो मर जायेगी बच्ची । मेरे 'अमृत की कुंभी' को वो जब गोदी में लेकर अब खिलाती है मेरे अंदर से कोई मर्द कहता है, "तुम्हें तोफीक ही ना थी,


कि तुम ये दर्द सहते और इक इन्सान की तखलीक करते! प्रत्येक घरात गुलजारांची ही कविता हवी म्हणजे स्त्रीचे दुःख काय असते, हे समजेल.

या पुस्तकाचं पान अन पान प्रेरणा, अभिमानाने भरलेल आहे . नक्की वाचा हे पुस्तक आणि प्रतिक्रिया द्या.


✒️©️

सौ.अंजली शशिकांत गोडसे शिर्के

मर्ढे सातारा .

Saturday, January 13, 2024

पुस्तक क्र.२२ जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी

 












वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२२
पुस्तकाचे नांव- जिजाऊ -  सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी
लेखकाचे नांव- अँड. शैलजा मोळक
प्रकाशन  व आवृत्ती-  शिवस्पर्श प्रकाशन , पुणे, २०२३ प्रथम आवृत्ती
पृष्ठे संख्या– १२४
किंमत /स्वागत मूल्य-- १५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१||पुस्तक परिचय
         जिजाऊ - सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी
लेखक / संकलक -  अँड. शैलजा मोळक
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

तीन जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. महिला शिक्षण दिन, बालिका दिन म्हणून दिवस साऱ्या भारतभर साजरा केला जातो. त्याच बरोबर जानेवारी महिन्यात आणखी येणारा एक महत्त्वाचा दिन म्हणजे 12 जानेवारी . राजमाता जिजाऊ यांचा हा जन्मदिवस हा दिवसही आपण जिजाऊ जयंती म्हणून मोठा आनंदात साजरा करतो. या दोन कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्यामुळेच आज आपली भारतातील प्रत्येक स्त्री ही शिकू शकली आणि घडू शकली यांचे या दोघींचे मानावे एवढे आभार कमीच आहेत. आभाराला शब्द अपुरे पडतील, लिहायला शाई अपुरी पडेल एवढ यांचं कर्तृत्व महान आहे आणि या महान कर्तृत्ववान दोघींच्या कर्तुत्वाच्या आणि नेतृत्वाच्या शुभ नावाने मिळणारा हा जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्ववान  लेकी या पुस्तकातील लेख म्हणजे एक मानाचा मुजराच या सर्व लेखिकांना मिळत आहे .साक्षात प्रभू शिवाजी महाराजांच्या दरबारी असं म्हणायला काही हरकत नाही .
आदरणीय शैलजाताईंनी या पुस्तकाची अर्पण पत्रिका आपल्या आजी ,आई आणि सासुबाई या कर्तृत्ववान महिलांना समर्पित केली आहे .शैलजाताई म्हणतात जिजाऊ सावित्री व इतर सर्वच महानायिकांचा आदर्श घेत त्यांच्या आचार , विचार व कृतिशील वाटेवर चालणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनींना हे पुस्तक समर्पित
सदरहू पुस्तकात महाराष्ट्र राज्यातील एकूण 31 कर्तृत्ववान लेकींचा त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा असा अभिप्राय लिहून ,त्यांच्यावर लेख लिहून त्यांचा शब्द सरस्वतीने साक्षात गौरव केलेला .
या पुस्तकातील सर्वच कर्तुत्ववान महिला या वेगवेगळ्या जाती-धर्माच्या आहेत म्हणजे भारत देशात जशी विविधतेत एकता आहे तशीच या पुस्तकात विविध कर्तृत्ववान लेकिन च्या रूपाने कर्तृत्ववान अशी एकी या पुस्तकात आपल्याला प्रामुख्याने दिसून येते प्रत्येकीची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळ्या असली तरी तिचा ध्येय मात्र एकच आहे आपले समाजासाठी काहीतरी करणे काही महिलांनी शून्यातून विश्व निर्माण केल आहे .
या पुस्तकात समाविष्ट केलेल्या दिग्गज आणि कर्तृत्ववान महिला पुढील प्रमाणे आहेत
१) डॉ. गीताली वि. म.

२) डॉ. लता प्र.म.

३) डॉ. स्नेहल तावरे

४) डॉ. किरण मोघे

५) मयुराताई देशमुख

६) डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर

७) डॉ. लता पाडेकर

८) डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ

९) डॉ. जयश्री चव्हाण

१०) डॉ. अलका नाईक

११) डॉ. आरजू तांबोळी

१२) डॉ. मनीषा वारे

१३) सुनिताराजे पवार

१४) प्रा. विजया मारोतकर

१५) नंदिनी जाधव

१६) सुवर्णा पवार

१७) अर्चना झेंडे

१८) दिपा देशमुख

१९) विनया निंबाळकर

२०) प्रतिभा लोखंडे

२१) मेघना झुझम

२२) शीतल शेखे

२३) वंदना अवघडे

२४) सविता सातव

२५) भारती बलकवडे

२६) सारिका भोसले

२७) शर्वरी सुरेखा अरूण

२८) तमन्ना इनामदार

२९) स्वाती पाटील

३०) सुरेखा शिंदे-देशमुख

३१) ज्योती भुरट
त्यांच्या जीवनाचा वाढता आलेखच या पुस्तकात आदरणीय मोळक ताईंनी मांडलेला आहे.
या पुस्तकाला प्रस्तावना डॉ. मनोहर जाधव प्रमुख भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची लाभलेली आहे. आदरणीय मोळक ताईंचा  जीवनप्रवास  स्वतः जवळून त्यांनी पाहिलेला असल्यामुळे आपल्या प्रस्तावनेत त्यांनी केलेल्या विधायक कार्याचा  आवर्जून उल्लेख  केलेला आहे . ही पुस्तक निर्मिती कशी झाली याची ही माहिती अतिशय ओघवत्या भाषेत दिलेली आहे.
आपल्या शब्दांविषयी लिहिताना मोळक ताई म्हणतात,
सामाजिक व साहित्यिक काम हीच माझी कायम उर्जा आहे व ती सामाजिक हित, ऐक्य, सलोखा, शांतता यासाठी गरजेचेही आहे. तेव्हा आपल्याला जमेल तसे करत राहू... भेटत राहू.. बोलत राहू.. लिहित राहू.. या भावनेतून मी सतत ते करत आहे..!!
खरंच प्रत्येक स्त्रीने वाचावं असे पुस्तक आहे प्रत्येक पानातून एक आदर्श व्यक्ती आपल्याला भेटत जाते आणि आपण नैराश्यातून पुन्हा उभारी घेत राहतो.
विशेष म्हणजे याकर्तृत्ववान स्त्रियांच्या यादीत माझ्याही आईचे नाव जोडले गेलेले आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो .अशा आईच्या पोटी जन्म नाही घेतला तरी तिचे पदरात राहून यशोदेप्रमाणे ती माझा श्रीकृष्ण सारखा सांभाळ करील हे नक्कीच !
तेव्हा नक्की वाचा हे पुस्तक !  अभिप्राय कळवा .आदरणीय शैलजा ताई यांच्या पुढील प्रवासास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि असेच छान छान सामाजिक विधायक उपक्रम तुमच्या हातून घडोत याच ईश्वरचरणी प्रार्थना🙏✒️📖💐🎉 धन्यवाद
सौ .अंजली शशिकांत गोडसे शिर्के 
मर्ढे सातारा


Monday, January 8, 2024

पुस्तक क्र.२१सावित्रीबाईं फुले

 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-२१

पुस्तकाचे नांव- सावित्रीबाई फुले

लेखकाचे नांव- जी. ए.उगले

प्रकाशन  व आवृत्ती-  साकेत प्रकाशन , औरंगाबाद,पाचवी आवृत्ती २०१८

पृष्ठे संख्या– ११२

किंमत /स्वागत मूल्य-- १२०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

२१||पुस्तक परिचय

         सावित्रीबाई फुले

लेखक / संकलक -  जी. ए.उगले

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


3 जानेवारी  सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण महिला शिक्षण दिन आणि बालिका दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो . समस्त स्त्री वर्गासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे ज्या ठिकाणी या ज्योतीचा जन्म झाला त्याच ठिकाणी आम्ही या शिक्षण क्षेत्रात येऊन कर्तव्य बजावत आहोत याहून सुवर्णक्षण तो काय .

नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे या ज्योतीचा जन्म झाला आणि ही अखंड ज्योत समस्त स्रीवर्गाच्या आयुष्यात ज्ञान ज्योत बनून आली . आमच्या आयुष्यातला अंधकार नष्ट झाला . 

परीक्षण करावा असा माझा खूप दिवसांचा मानस होता तो आज पूर्ण झाला साकेत प्रकाशन यांच्याकडून प्रकाशित झालेले सावित्रीबाई फुले यांची उगले यांनी लिहिलेले असे सुंदर पुस्तक माझ्या हाती पडलं .यामध्ये उगले यांनी सावित्रीबाई फुले जीवनदर्शन सामाजिक कार्य सावित्रीबाईंची भाषण संपदा सावित्रीबाईंचा पत्र व्यवहार सावित्रीबाईंची काव्य संपदा सावित्रीबाई आणि सत्यशोधक समाज लहान पोरांचे शब्दात सावित्री दर्शन सावित्रीबाई फुले एक मुक्त चिंतन आणि सगळ्यात शेवटी या पुस्तकाला जी काही मदत लागेल त्या पुस्तकांची संदर्भसूची दिलेली आहे.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी खंडोजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी आपल्या सावित्रीबाईंचा जन्म झाला . त्यांना चार अपत्ये होती आणि सगळ्यात थोरला अपत्य सावित्रीबाई होते . घरातूनच त्यांना आचार विचाराची सुंदर अशी संस्कार मिळालेले होते, अशा संस्कारातच मोठ्या होत होत त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला आणि एका नवीन पर्वाला सुरुवात झाली त्यावेळेस कोणाला माहीत होतं या दोघांकडून एक असं काहीतरी कार्य घडेल साऱ्या महिला जातीला प्रेरक ठरेल. सावित्रीबाईंचं खरं  कार्य जर जवळून पाहायचं असेल तर नक्कीच या पुस्तकाचे वाचन करणे खूप गरजेचे आहे आणि सूक्ष्म अशी माहिती या पुस्तकात दिलेली आहे.

प्ले रोगाच्या साथीत तर त्यांनी आपल्या जीवाची ही परवा न करता समाजाची सेवा करून एक आदर्श सर्वांसमोर घालून दिला . म्हणूनच समस्त स्त्री वर्गाच्या त्या एक आदर्श आहेत.  बालहत्या प्रतिबंध असू द्या विधवा पुनर्विवाह असू द्या दत्तक पालक असू द्या प्रत्येक क्षेत्रात सावित्रीबाईंनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे . मुलींचे शिक्षणासाठी तर त्यांनी अक्षरशः रक्ताचे पाणी केले .खरोखरच सावित्रीबाई तुम्ही होता म्हणून आज आम्ही लिहू शकतो बोलू शकतो.

सावित्रीबाई फुले यांची भाषण कला ही अतिशय समृद्ध होती. आपल्या भाषणातून त्यांनी नव विचारांची ज्योत जागविली.

याशिवाय सावित्रीबाई फुले या उत्तम कवयित्री होत्या. त्यांचा काव्य फुले हा कवितासंग्रह यातून त्या आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात.

सावित्रीबाई फुले यांचे जीवन चिकाटी आणि समर्पण शक्तीचे उदाहरण देते. तिची कथा आपल्याला अडथळे असतानाही न्यायासाठी झटण्यास प्रवृत्त करते. आपल्या स्वतःच्या जीवनात तिची ताकद आणि लवचिकता अनुकरण करून आपण तिची आठवण ठेवूया.


अखेरीस, सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण, सामाजिक बदल आणि स्त्रीवादातील योगदान, तसेच त्यांच्या धैर्य आणि दृढतेचे व्यक्तिमत्त्व, त्यांना भारतीय इतिहासातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व बनवले. चला तिच्या वारशाचे स्मरण करूया आणि अधिक न्याय आणि न्याय समाजाची तिची दृष्टी जिवंत ठेवण्यासाठी कार्य करूया.

माझ्या साऊ विषयी लिहील  तेवढे कमीच आहे .माझी लेखणी देखील अपुरी पडेल एवढ मोठं कार्य समस्त स्त्री वर्गासाठी या दोघांनी करून ठेवल आहे. लेखकाने या पुस्तकात सावित्रीबाई फुले विषयी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे .नक्कीच हे पुस्तक वाचल्याने पुन्हा सर्व इतिहास डोळ्यासमोर जागा होतो. आदरणीय उगले सरांच्या लेखणीला सलाम आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.


सो अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा .


Monday, January 1, 2024

पुस्तक क्र.२० शब्दक्रांतीचे शाहिरी पर्व

 .




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२०
पुस्तकाचे नांव- शब्दक्रांतीचे शाहिरीपर्व
लेखकाचे नांव- श्री . प्रदीप कांबळे 
प्रकाशन  व आवृत्ती- पहिली प्रणित प्रकाशन ,सातारा,प्रथमावृत्ती २०२३
पृष्ठे संख्या– १४२
किंमत /स्वागत मूल्य-- १३०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८||पुस्तक परिचय
         शब्दक्रांतीचे शाहिरीपर्व 
लेखक / संकलक - श्री . प्रदीप कांबळे 
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
आदरणीय प्रदीप कांबळे सर्वांचे मार्गदर्शक सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कवी लेखक आणि व्याख्याते म्हणून त्यांचे नाव सर्वत्र घेतले जाते .त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या शब्दक्रांतीचे शाहिरी पर्व हे पुस्तक माझ्या वाचनात आले .त्यांचे स्वतःचेच प्रणित प्रकाशन कडून हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे .या पुस्तकाची अर्पण पत्रिका त्यांनी आपल्या आजोबांच्या नावे लिहिलेली आहे. ते लिहितात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या समवेत मुलुख भर प्रबोधन यात्रा करणारे माझे आजोबा कै. भाऊसाहेब संतू कांबळे यांना हे शाहिरी पर्व समर्पित.
महाराष्ट्राची शाहिरी परंपरा दाखवणार देखणं मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभलेल आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी या निमित्ताने आपल्याला चित्रातून दिसून येते.
या पुस्तकाच्या अंतरंगामध्ये पुढील शाहिरांची सविस्तर माहिती दिलेली आहे.
१) शाहीर राम जोशी (राम जगन्नाथ जोशी, सोलापूर)

(१७६२ ते १८१३)

२) शाहीर अनंत फंदी (अनंत भवानीबाबा घोलप, संगमनेर)

(१७४४ ते १८१९)

३) शाहीर होनाजी बाळ (होनाजी सयाजी शिलारखाने, पुणे)

(१७५४ ते १८४४)

४) शाहीर परशराम मु. वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक

(१७५४ ते १८४४)

५) शाहीर प्रभाकर जनार्दन दातार, रत्नागिरी

(१७५५ ते १८४३)

६) शाहीर सगनभाऊ सगन शिकलगार, जेजूरी

(१७७८ ते १८५०)
आपल्याला या शाहिरांच्या बद्दल शोधूनही काही माहिती सापडणार नाही. अशी त्यांची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे .या पुस्तकाला साक्षात सातारा भूषण पुरस्कार प्राप्त आमच्या सातारा जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती संभाजी मालिकेचे लेखन करून आपल्या लेखनाने वेड लावणारे आदरणीय प्रताप गंगावणे सर यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
आदरणीय प्रतापजी गंगावणे आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,
" प्रदीप यांचा शब्दक्रांतीचा उठाव डोळ्यांत भरतो. वाचताना शाहिरी शब्दांची रंग आणि रंग वाचकाच्या काळजाला भिडवण्यास ते यशस्वी झालेत, हे या ग्रंथाचं वेगळेपण आहे आणि म्हणूनच शेवटी प्रदीप यांच्या या कामाबद्दल म्हणावसं वाटतं, की तुम्ही धाडसाने प्रतिभासंपन्न शाहिरांच्या डफावर थाप मारलीत ; पण जाणता रसिक प्रेक्षक मात्र तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार हे निश्चित."
खरोखरच अतिशय देखण असे हे पुस्तक निर्माण झालेल आहे.
नावातच तेजाचा दीप असणारे आदरणीय प्रदीप जी त्यांच्या लेखणीतून अनेक साहित्याच्या दरबारी अक्षर दिवे लावत असतात.
शाहीर राम जोशींचे शृंगार रसातील ही रचना  सर्वांना सुपरिचित आहे.
सुंदरा मनामध्ये भरली जरा नाहीं ठरली हवेलित शिरली मोत्याचा भांग ।
अरे गड्या हौस नाहीं पुरली म्हणोनि विरली पुन्हा नाहीं फिरलि कुणाची सांग ।। धृ.।।
अशाच अनेक अपरिचित आणि परिचित शाहीर राम जोशींच्या रचना या पाठ्यपुस्तकात दिलेल्या आहेत .खूपच अभ्यासू  व्यक्तिमत्व असलेले कांबळे सर प्रत्येक शाहिरांच्या घरापर्यंत ,नातेवाईक यांच्याजवळ  जाऊन पोहोचले आणि त्यांनी माहिती संकलित केली.
एवढ मोठ कार्य असंताना ही आपल्यातला वेचकपणा त्यांनी काय आबादीत ठेवला.
त्यांच्यातला हाच गुण सर्वांना आवडतो. इतरही शाहिरांच्या इतिहास आणि त्यांच्या लुप्त होत चाललेल्या रचना या पुस्तकात दिलेल्या आहेत.
पुस्तकाचे शेवटी आदरणीय कांबळे सरांनी हे पुस्तक लिहिण्यापूर्वी कोण कोणत्या ग्रंथांचा संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यास केला याची सविस्तर यादी दिलेली आहे .म्हणजे एखादं पुस्तक लिहिताना किती अभ्यास करावा लागतो याची प्रचिती येते. नुसत आलं मनात आणि लिहिलं असं करून चालत नाही त्याची पार्श्वभूमी हे सर्व माहीत असल्याशिवाय आपण काहीच लिहू शकत नाही. आदरणीय कांबळे सरांनी लोकसाहित्याचा गाढा अभ्यास केलेला आहे त्यामुळेच एवढं सुंदर पुस्तक त्यांच्या लेखणीतून उतरले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलागुणांची माहिती देणारा जणू काही लघुपट या पुस्तकातून अवतरलाय असे मला वाटते. आदरणीय कांबळे सरांच्या लेखणीला माझा मानाचा मुजरा .अशीच तुमच्या लेखणीतून सरस्वतीची प्रसादरुपी पुस्तके उतरत राहावीत. याच साहित्य देवतेचरणी प्रार्थना🙏🏻😊