वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ११७
पुस्तकाचे नाव - दिवेलागणीची वेळ
लेखकाचे नाव - ना . धों . महानोर
प्रकाशन व आवृत्ती-साकेत प्रकाशन पुणे
पृष्ठे संख्या– ११२
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ८०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१ १७||पुस्तक परिचय
"दिवेलागणीची वेळ" हा ना.धों. महानोर यांचा एक हृदयस्पर्शी, अनुभवाधिष्ठित आणि विचारांना झणझणीत स्पर्श करणारा शेती व पाणी विषयक लेखसंग्रह आहे.
या संग्रहातील प्रत्येक लेख म्हणजे शेतकऱ्याच्या जगण्याची एक जिवंत हाक. मातीशी नाते जपणाऱ्या माणसाच्या व्यथा, आशा, संघर्ष आणि शाश्वततेच्या शोधाचा हा प्रवास आहे.
ना.धों. यांची शैली ही कवीहृदयाची, तरी वास्तववादी. त्यांनी शब्दांनी केवळ परिस्थितीचे वर्णन केले नाही, तर पाण्याच्या टंचाईच्या वेदना, शेतीच्या नजाकती, धोरणांतील विसंगती आणि ग्रामीण जीवनाचे धूसर भविष्य यांची वेगळीच जाणीव करून दिली आहे.
दिवेलागणी म्हणजे दिवा लागायची वेळ नाही, तर शेतीच्या भविष्याचे अंधुक होत चाललेले दृष्य, अशीच ही वेळ त्यांनी लेखनातून दाखवली आहे.
या पुस्तकातील काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आपल्याला दिसून येतील.
शेतीचे अर्थकारण आणि राजकारण यांची सडेतोड चर्चा
पाणीप्रश्न, सिंचनधोरणे, जलव्यवस्थापन यावर प्रभावी भाष्य
मराठी ग्रामीण जीवनाचे मनोवेधक चित्रण
समर्पक उपमांची शैली आणि संवेदनशील दृष्टिकोन
ना.धों. महानोर यांचे "दिवेलागणीची वेळ" हे पुस्तक हे केवळ लेखांचे संकलन नाही, तर शेतकऱ्याच्या अंतःकरणाची वाणी आहे. हे लेखसंग्रह शेती, पाणी, पर्यावरण, ग्रामीण संस्कृती आणि राजकीय धोरणांमधील विसंगती यांचा अत्यंत हृदयस्पर्शी आणि सडेतोड आढावा घेतो.
दिवेलागणीची वेळ" हे पुस्तक म्हणजे पाणी, शेती आणि शेतकऱ्याच्या दुःखाची दिवेलागण आहे.
ना.धों. महानोर यांनी स्वतः शेती अनुभवलेली आहे, म्हणून त्यांच्या लेखनात मातीचा गंध आणि अनुभवाची प्रामाणिकता आहे.
या पुस्तकातील त्यांचा पहिलाच लेख आहे पाणी पाणी आणि पाणी पाण्याविषयी बरेचसे लेख त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहेत. पहिले अखिल भारतीय जल साहित्य संमेलन नागपूर येथे झाले होते त्यामधील हे अध्यक्षीय भाषण आहे. यात पाण्याविषयी त्यांनी विस्तृत माहिती देऊन शेवटच्या परिच्छेदात आपल्या मनातली खंत व्यक्त केली आहे. ते म्हणतात,पाण्याचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या नुसत्या पाण्याचा प्रश्न नूसन महाराष्ट्राच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या सौभाग्याचा प्रश्न आहे. पाण्यासंबंधी, पाण्याच्या प्रश्नासंबंधी कितीही लिहिलं, बोललं तरी अपूर्ण वाटावं इतकं ते जगन्द्व्याळ विस्तारलेलं आहे. मी एक साधा कोरड्या जमिनीतला शेतकरी. एक साधारण कवी. मला जेवढं समजलं, सुचलं तेवढं अनेकांचं ऐकून वाचून मी माझ्यापरीनं इथे लिहिलं. बोललो. हे चुकीचं असेल, नीट नसेलही, त्यात माझ्या मर्यादा हेच कारण आहे. एवढ्या मोठ्या जाणत्या पाणीतज्ज्ञांसमोर, साहित्यिकांसमोर, रसिकांसमोर मला हे अध्यक्षपद देऊन गौरविलं, त्यासाठी पुन्हा एकदा नम्रतापूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
त्यांच्या लिहिण्या वागण्यात किती नम्रता आहे हे आपल्याला यावरून समजते.
त्यांना ज्या ज्या विषयावर लिहावसं वाटलं जे त्यांच्या काळजाला भिडलं ते त्यांनी या पुस्तकात लिहिलेला आहे.
संपूर्ण सत्य कथेवर हे लेखसंग्रह आहेत .शेती आणि पाणी विषयक लेखसंग्रह वाचले की शेतकरी किती हाल अपेष्टा सोसत आपलं शेतकऱ्याचे जीवन जगतो हे आपल्या लक्षात येईल .
तो पुन्हा ऋतुबंध देऊया भुईला या लेखात दिवे लागण कशी झाली याविषयी सुंदर माहिती देतात .कष्टाची भाकर या घराची निर्मिती कशी झाली ते शेवटी सांगताना ते म्हणतात,
तेलंगवाडीच्या त्यांच्या 'कष्टाची भाकर' या ठिकाणी नवं घर बांधलं. प्रशस्त. अतिशय सुंदर. स्वतःसाठी, मित्रांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी. चार फुलं ठेवून या घराचा दरवाजा उघडायचा यासाठी श्री. शरदराव पवार पाहिजेतच. काहीही कार्यक्रम नाही. उत्सव नाही. भाषणं नाही. मला गळ घातली. मी श्री. शरदराव पवारांना विनंती केली. त्यांनी मान्य केलं. सकाळी दहा ते दुपारी तीन 'कष्टाची भाकर' या ठिकाणी आले. थांबले. उंबऱ्यावर चार फुलांच्या पाकळ्या टाकून दिवा लावला. दिव्याच्या मंद प्रकाशानं घर उजळलं. न बोलवताही दुपारपर्यंत हजार प्रगतिशील शेतकरी जमा झाले होते. त्यांच्याशी शेतीच्या गप्पा झाल्या. प्रत्येकाच्या मनात नवी दिवेलागण.
"दिवेलागणीची वेळ" हे पुस्तक मातीशी नातं असणाऱ्याच्या काळजात वीज चमकवतो.
ना. धों. महानोर हे शब्दांचे शेतकरी आहेत – त्यांच्या लेखनातून पाणी सांडत नाही, तर डोळे भरून वाहतात.
असे हे सुंदर पुस्तक प्रत्येकानेच वाचायला हवं .
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment