Monday, February 26, 2024

मराठी देश🚩🚩 कविता

 



*मराठी भाषा गौरव दिन निमित्त माझी एक रचना*

🚩💫✒️📚


*मराठी देश* 🚩🚩


माझ्या मराठी देशाची

 किती वर्णावी किर्ती 

सोन्या रुप्याच्या घागरींनी

 पंचगंगा समृध्दी भरती


लेवूनी मराठमोळा साज

 मोहक सुंदर लावण्यवती

 माझ्या मराठीचा बाज

 चंद्रकोरीतून कपाळी कोरीती


माझ्या मराठी बोलीत

 आहे मायेचा गोडवा

 मराठी नुतनवर्षाचा

 स्वागत करीतो गुढीपाडवा


माझ्या मराठी मातीत

 कर्तृत्वाचे हिरेमोती चमकती 

त्यांचा ठेवून आदर्श

 माय नवी पिढी घडविती


इथल्या कणाकणात 

माय मराठी पाझरते 

लेकरांना सुख द्याया 

कष्ट अपार झेलते


माझ्या सह्याद्रिचा कणखरपणा

 नसानसात भिनतो 

शत्रूलाही शह देण्या

दिल्लीच्या तख्ताला भिडतो


विविध असल्या बोली

 तरी जन्मदात्री मराठी आहे

 महाराष्ट्रातल्या मनामनात

 फक्त मराठीची भूमी आहे


चहू दिशांनी येवोत वादळे

 मागे आम्ही हटणार नाही 

मराठी आहोत मराठीच राहणार 

जाती पंथ, धर्म, भेद मानणार नाही


शाहू, फुले, आंबेडकरांचा

 वारसा पुढे नेणार 

शिवविचारांचा नवा

 महाराष्ट्र घडणार


मराठीचा प्रत्येक शिलेदार

 अन्यायाविरूध्द लढणार 

मराठीसाठीच जगणार

 मराठीसाठीच मरणार


🌝🙏🏻 ओंजळीतला चंद्र✒️📚

सौ . अंजली शशिकांत गोडसे शिर्के

मर्ढे सातारा

Wednesday, February 21, 2024

पुस्तक क्र . २७ विचारवेध



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-२७

पुस्तकाचे नांव- विचारवेध

लेखकाचे नांव-  राजेंद्र बोबडे

प्रकाशन  व आवृत्ती-  ग्राममित्र प्रकाशन , कराड २०२१ प्रथम आवृत्ती

पृष्ठे संख्या– १११ 

किंमत /स्वागत मूल्य-- २१०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

२ ७||पुस्तक परिचय

        विचारवेध

लेखक -  राजेंद्र बोबडे


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


प्रयत्नवादी माणसं यशाकडे आणि अपयशाकडेही दुर्लक्ष करतात . यश आले तर आनंदाने स्वीकारायचे . अपयश आले तर परत जोमाने कामाला लागायचे . हीच त्यांची प्रवृत्ती बनलेली असते .

हा सुंदर विचार राजेंद्र बोबडे लिखित विचारवेध या पुस्तकातील आहे .खरोखर शालेय जीवनात तर हे सुविचार मुलं घडवत असतात , विद्यार्थी घडवत असतात आणि पालक घडवत असतात .

असे सुंदर सुंदर विचार आपल्या पुस्तकात आदरणीय राजेंद्र बोबडे सर यांनी स्वतः लिहिले आहेत. प्रत्येक विचार नवी प्रेरणा, नवी कल्पना ,नवी उर्मी आणि नवीन आशा दाखवणारा आहे. बोबडे सर मोठे लेखक आहेत. त्यांची  समाजाला मार्गदर्शक अशी प्रेरणा देणारी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातीलच हे एक विचारवेध  पुस्तक. त्यांच्याकडूनच हे पुस्तक मला भेट मिळालेले आहे. अनेक विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. विविध विषयांवर, विविध मान्यवर व्यक्तींसाठी त्यांच्या हातून मान्यपत्रही लिहिली गेली आहेत. दररोज काहीतरी लिहिल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. पण ते काहीतरी लिहिणे म्हणजेच समाजातील वैचारिकतेला वाव देणारे आहे.

तुम्हीही विचारवेध पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.

विचारवेध हे पुस्तक ग्राममित्र प्रकाशन कराड जिल्हा सातारा यांनी प्रकाशित केलेले आहे . राजेंद्र बोबडे सरांनी हे पुस्तक त्यांची पुतणी मेघा यांच्यासाठी अर्पण केलेले आहे .

नातं कसं असावं तर पाण्यासारखे निर्मळ . नातं कसं असावं तर आरशासारखं स्वच्छ कसेही पहा कसे ही तपासा तरी एक सारखेच दिसणारे आपले मूळ रूप कधीही न बदलणारे . !

सुंदर, निरपेक्ष , निस्वार्थ आणि निर्मळ असे विचार या पुस्तकात आदरणीय बोबडे सरांनी मांडलेले आहेत . नक्कीच तुम्हा सर्वांना विचारवेध हे पुस्तक आवडेल . यातील विचार  वाचताना आपल्या मनात नक्कीच हे विचार उतरतील . आपल्यातील जी जीवनाकडे पाहण्याची वृत्ती आहे ती नक्कीच बदलल्याशिवाय राहणार नाही .

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय बोबडे सर या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारा संपूर्ण निधी समाजातील अनाथ, दिव्यांग गरजूंसाठी वापरणार आहेत .म्हणजे या पुस्तकाच्या शब्दातून तुम्हाला ते मौलिक विचार देणार आहेतच पण या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या आर्थिक लाभातून ते कुणाच्यातरी घराचा आधार बनणार आहेत . त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा असेच सुंदर सुंदर मौलिक लेखन करत रहा आणि आम्हा वाचक रसिकांना ते वाचावयास देत रहा याच शुभेच्छा .

शेवटी एवढेच म्हणेन मी, बोबडे सर आपल्या पुस्तकात म्हणतात चांगल्या विचारांना निरोप हा कधीही देता येत नाही कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या जीवनात पुन्हा पुन्हा परतत असतात . !

सौ . अंजली शशिकांत गोडसे शिर्के 

मर्ढे सातारा

 

Saturday, February 17, 2024

पुस्तक क्र . २६ पत्रास कारण की

 





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-२६

पुस्तकाचे नांव- पत्रास कारण की

लेखकाचे नांव-  अरविंद जगताप

प्रकाशन  व आवृत्ती-  ग्रंथाली प्रकाशन , मुंबई, २०१९  बारावी आवृत्ती

पृष्ठे संख्या– १६६

किंमत /स्वागत मूल्य-- १५०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

२ ६||पुस्तक परिचय

        पत्रास कारण की 

लेखक -  अरविंद जगताप


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


पत्र म्हणजे सजीव वस्तूच .येथे आपल्या भावनांना रूप देतात शब्द, रेषा आणि टिंब त्यातून व्यक्त होत जातात आपल्या मनीच्या भावना ज्या दुसऱ्या पर्यंत निश्चितच भावनिक रूपात पोहोचतात. अशाच पत्राचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे.

  पत्रलेखनाला खूप छान इतिहास आहे. कागदांचा शोध लागण्याच्या आधी पत्र ही पानांवर, दगडांवर, तांब्याच्या पट्ट्यांवर, कापडावर लिहिली जात. अशा विविध माध्यमांत लिहिलेल्या पत्रांना खूप छान नाव आहेत. पानांवर लिहिलेल्या पत्रांना ‘भूर्जपत्र’ असे म्हणतात. दगडांवर काही ऐतिहासिक घटना कोरून ठेवल्या जात, त्याला ‘शिलालेख’ म्हणतात.


तांब्याच्या पट्टयांवर लिहिलेल्याला ‘ताम्रपट’ म्हणतात. याची भाषाही वेगवेगळी. असे अनेक शिलालेख/ताम्रपट आपल्या देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. प्राचीन इतिहासाच्या धड्यातही यांचा उल्लेख आहे.

आपण पाहिले मोबाईलचे योगापूर्वी पत्राला किती महत्त्व होते. अनेक सुख दुःखाच्या प्रसंगात पत्रानेच आपल्याला साथ दिली आहे. आता मात्र आधुनिक युगाच्या आणि तंत्रज्ञानाच्या कचाट्यात हेच पत्र हरवून गेलं आहे.

पत्रास कारण की या अरविंद जगताप यांच्या लेखणीतून उतरलेल्या अनेक पत्रांमधून हरवलेलं पत्र मला पुन्हा सापडल.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पत्रपेटीचे सुंदर चित्र दिले आहे . मलपृष्ठावर थोडक्यात जगताप सरांचे पत्राविषयीचे मत नोंदविलेले आहे .

अरविंद जगताप सरांनी हे पुस्तक आपल्या आईला समर्पित केले आहे आपल्या आईला ते जिजी असं म्हणत . ते म्हणतात आई मुळे मी कायमच जमिनीवर राहिलो .

चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या कार्यक्रमात अरविंद जगताप यांचं पत्र खूपच गाजलेला आहे .पत्र वाचनाशिवाय तो कार्यक्रम म्हणजे आत्म्याशिवाय शरीर असेल .अरविंद जगताप सर आपल्या मनोगतात खूप छान म्हणतात की ,पत्रही जोडणारी गोष्ट होती .ई-मेल वैयक्तिक गोष्ट आहे . ई-मेल वाईट आहे असं नाही .पणआंतरदेशीय पत्रात आपली टिकली पाठवणारी बायको ,आपल्या लिपस्टिकचा ठसा पाठवणारी प्रेयसी ,आणि आपल्या गावातील माती पाठवणारा मित्र मी पाहिलाय .तो आपलेपणा ई-मेल मध्ये येऊ शकत नाही .म्हणून पत्र खास आहेत .अजूनही जी माणसे भेटू शकत नाही त्यांच्याशी मनातलं बोलणं आपल्याला खूप आवश्यक वाटतं .अशा जवळच्या माणसांसाठी पत्र हेच माध्यम आहे .पत्र इतिहास होतात .पत्र संदर्भ होतात .पत्र लिहिणाऱ्या माणसाच्या आयुष्याचा अभ्यास करतात .आपल्याला माहित आहे की आपला खूप मोठा इतिहास आपल्या पत्रांमुळेच कळलेला आहे .

या पुस्तकात एकूण ५० पत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे . प्रत्येक पत्र खूपच छान आणि वैचारिकतेने प्रगल्भ आहे .

गेले द्यायचे राहून या आपल्या पत्रात ते म्हणतात . जाता जाता एक गोष्ट .बरेच लोक विचारतात .आम्हाला पण मदत करायची आहे कशी करू ? मुळात ही मदत नाही .आपलं अन्न टिकवण्यात आपला सहभाग आहे . आणि प्रत्येकाने पैसे द्यावेत ही अपेक्षा नाही . तरी ती सगळ्या देशासाठी मोठी कामगिरी आहे . गाडी थांबून एखाद्या शेतकरी कुटुंबाशी प्रेमाने गप्पा मारल्या तरी खूप आहे .पैसे पुरत नसतात  कधीच .झाड मात्र पिढ्यान पिढ्या जगतात .छोटी छोटी तळी, तलाव बनवता येऊ शकतात . धान्य शेतकऱ्याकडे जाऊन थोडी जास्त किंमत देऊन खरेदी करता येऊ शकत . कारण जेवढ्या शेतकऱ्यांना भेटलो त्यांचं म्हणणं होतं हा त्याला काम द्या . त्यांना फुकट मदत नकोय .

शेतकरी जीवनाविषयी त्यांच्या आत्महत्या विषयी यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर आणि वास्तव चित्रण आपल्या पत्रांमधून केलेला आहे तुम्हाला काय काय द्यायचं आहे ते त्यांच्या शैलीत खूपच छान सांगितले आहे अशीच प्रत्येक पत्र त्यांची शैलीदार आणि एकाहून एक सरस आहेत .तेव्हा सर्वांनी वाचलं पाहिजे पत्रात कारण की हे पुस्तक . धन्यवाद .


सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के 

मर्ढे सातारा .

पुस्तक क्र २५ डोन्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट

 



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-२५

पुस्तकाचे नांव- डोन्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट

लेखकाचे नांव- ऋजुता दिवेकर

प्रकाशन  व आवृत्ती-  अमेय प्रकाशन , पुणे २००९

नववी आवृत्ती

पृष्ठे संख्या– २०४

किंमत /स्वागत मूल्य-- १६५₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

२ ५||पुस्तक परिचय

        डोन्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट

लेखक - ऋजुता दिवेकर

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


वजन कमी करण्याचे प्रयत्न करण्याच्या दरम्यान मनशांती अत्यंत महत्वपूर्ण असते. अनेकजन त्रासात आहेत कारण त्यांना त्याच्या वजनाची समज नसते किंवा त्याच्या अनुपस्थितीच्या वेळी त्यांच्यावर स्वाभाविक चपलपणा, धाळण व प्रतिक्रिया होते.


वजन कमी करण्याच्या प्रयत्नांच्या दरम्यान, खाण्याच्या अभ्यासांत व आरोग्यपूर्ण जीवनशैलीतील बदल करण्याचा प्रयत्न करा. खाण्याच्या अभ्यासांत बदल करताना, या तत्त्वांच्या मदतीने आराम आणि मनःशांती मिळू शकते.

हल्ली सर्वांच्यात लठ्ठपणाचे प्रमाण जास्त वाढताना दिसला आहे आधुनिक युगात ही एक माणसाला दिलेली देण्याचा असावी . आपल्या जीवनात राहणीमानात झालेले बदल आपल्या शरीरात दिसून येऊ लागले आहेत आणि यातूनच व्यायाम डायट या सर्वांचा जन्म झाला. याचा आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम होतो आपलं मन कसं अस्वस्थ होतं. याविषयी सुंदर माहिती या पुस्तकात दिलेली आहे पुस्तकाचे नावच खूप छान आहे डोन्ट लूज युवर माईंड लूज युवर वेट म्हणजेच वजन कमी करा मनशांती नाही. ऋजुता दिवेकर लिखित हे पुस्तक ज्यांना लठ्ठपणा घालवायचा आहे पण स्वतःचा मानसिक स्वास्थ्य बिघडू द्यायचं नाही अशांसाठी खूपच मौल्यवान आहे.

या पुस्तकाला स्वतः प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर यांनी प्रस्तावना दिलेली आहे. ऋजुता दिवेकरयांनी करीना कपूर यांना परफेक्ट डाएट आणि व्यायाम यांची माहिती देऊन त्यांची फिगर झिरो केलेली आहे .करीना कपूरच्या फिगरची आपण सर्वत्र चर्चा झालेली पाहिली आहे .योग्य आहाराबरोबर योग्य व्यायाम असेल तर आपलं वजन नियंत्रणात राहतं .सर्वांसाठी ऋजुता दिवेकर यांनी अतिशय सुंदर असे सल्ले या पुस्तकात दिलेले आहेत .  वजन कमी करण्यासाठी काय काय उपाय करता येतात याची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे .

ऋजुता मॅडम आपल्या पुस्तकाबद्दल लिहिताना म्हणतात,

डाएटिंगबद्दलचे माझे विचार मी या पुस्तकात मांडले आहेत. डाएटिंग किंवा डाएट या दोन इंग्रजी शब्दांचा किती चुकीचा अर्थ आजकाल लावला जातो हे मी त्यात सांगितलं आहे. डाएटवर 'जाणं', डाएट 'सोडणं' असं काही नसतंच. योग्य आहार हे आयुष्यभराचं व्रत आहे. त्यामुळे डाएटही तसंच असलं पाहिजे. अतिरेकी डाएट्स, कॅश डाएट्स यांना त्यात कुठे थाराच नाही. तुमची शारीरिक हालचाल, जीवनशैली, तंदुरुस्तीची पातळी, आवडी-निवडी, पिढीजात गुणदोष यानुसार तुमचा आहार ठरला पाहिजे. दात घासणं हा जसा रोजच्या कामाचा भाग. असतो तसा आहार हा एक भाग असला पाहिजे. प्रत्येकाचं डाएट वेगळं, त्या त्या व्यक्तीनुसार असणं आवश्यक असतं. सरसकट एकच नियम सगळ्यांना लावून काहीच फायदा नाही. कुणाच्या शरीराच्या कुठल्या भागात चरबी साठावी हे आपण ठरवू शकत नाही, ते अनुवंशिक असतं. ज्या पुस्तकावरचं चित्र तुमच्या शरीराच्या आकाराशी जुळतं असं वाटेल, ते पुस्तक गंमत म्हणून डाएटिंगसाठी उचलाल. (पण तुमचा आकार, लिंग, वजन, वय, राष्ट्रीयत्व कोणतंही असलं तरी चरबी कमी करण्याचे आणि तंदुरुस्त आयुष्याचे नियम तेच असतात).

हे पुस्तक कसं वाचावं याचीही माहिती अगदी सुरुवातीला दिलेली आहे. जर कोणाला पुस्तक वाचायला वेळ नसेल तर प्रत्येक प्रकरणानंतर महत्त्वाची माहिती एका चौकटीत दिलेली आहे. फक्त हे जरी वाचलं तरी आपल्या डायटला आणि वजन कमी करण्याला एक नवी दिशा मिळेल.

या पुस्तकात एकूण सहा प्रकरण आहेत

हे डाएट नव्हे

कसं खावं याची उजळणी

काय खावे याचा पुनर्विचार

योग्य आहाराचे चार तत्व

जाणीव अंगी बानवणं

ज्ञान आणि कृती यांचा मेळ

च्या प्रकरणातून या पुस्तकाची विभागणी केलेली आहे या प्रत्येक प्रकरणात अतिशय सुंदर आणि मुद्देसूद माहिती दिलेली आहे.  कोणाला आपलं वजन नियंत्रणात ठेवून आपलं मानसिक स्वास्थ्य ही बिघडू द्यायचं नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक वरदान आहे .तेव्हा नक्की वाचा हे पुस्तक आणि आपलं वजन आटोक्यात ठेवा. मात्र आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका .धन्यवाद🙏


सौ . अंजली शशिकांत गोडसे शिर्के 

 मर्ढे  सातारा .

पुस्तक क्र २४ भारतरत्न विजेते

 





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक-२४

पुस्तकाचे नांव- भारतरत्न विजेते

लेखकाचे नांव- पल्लवी आपटे

प्रकाशन  व आवृत्ती-  रिया प्रकाशन , कोल्हापूर, २०१६ प्रथम आवृत्ती

पृष्ठे संख्या– १६८

किंमत /स्वागत मूल्य-- २००₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

२ ४||पुस्तक परिचय

        भारतरत्न विजेते

लेखक -  पल्लवी आपटे

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे.


कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, विश्वशांती, मानव-विकास इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि त्यासाठी आपले जीवन पणाला लावणाऱ्या भारतीयाला 'भारतरत्न' हा पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये भारत सरकारतर्फे घेण्यात आला आणि २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून 'भारतरत्न' एक अमूल्य सन्मान आहे. इ. सन २०१३ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. हा पुरस्कार मरणोत्तरही दिला जाऊ शकतो. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत.

भारतरत्न विजेते या पुस्तकात आतापर्यंत ज्यांना ज्यांना भारतरत्न हा किताब मिळाला त्या सर्वांची विस्तृत माहिती पुस्तकात दिली आहे. मुखपृष्ठावर भारतरत्न या पुरस्काराच्या मेडलचे चित्र दिलेले आहे . मलपृष्ठावर  भारतरत्न विजेत्यांची काही छायाचित्र देण्यात आलेले आहेत .हे पुस्तक हे पुस्तक रिया प्रकाशन कोल्हापूर या ठिकाणाहून प्रकाशित झालेल आहे .

सुरुवातीलाच भारतरत्न पुरस्काराची सविस्तर माहिती ,पुरस्काराचे स्वरूप मेडल कसे असते याची सुंदर माहिती दिलेली आहे . पुरस्काराचे स्वरूप ,मेडल कसे असते याची सुंदर माहिती दिलेली आहे .

या पुस्तकात एकूण ४५ भारतरत्न विजेत्यांची माहिती दिलेली आहे .

चक्रवर्ती राजगोपालाचार्य


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण


पंडित जवाहरलाल नेहरू


डॉ. भगवान दास


डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया


पंडित गोविंद वल्लभ पंत


महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे


पुरुषोत्तम दास टंडन


डॉ. विधानचंद्र राय


डॉ. राजेंद्र प्रसाद


डॉ. जाकिर हुसैन


पांडुरंग वामन काणे


लालबहादूर शास्त्री


प्रियदर्शिनी इंदिरा गांधी वराहगिरी वेंकट गिरी


कुमारस्वामी कामराज


मदर टेरेसा


 विनोबा भावे

 खान अब्दुल गफार खान


मरुदूर गोपालन रामचंद्रन


डॉ. भीमराव आंबेडकर


नेल्सन मंडेला


 मोरारजी देसाई


 सरदार वल्लभभाई पटेल


 राजीव गांधी 


सत्यजित राय 


जे. आर. डी. टाटा 


मौलाना अबुकलाम आजाद 


डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम 


अरुणा आसफ अली 


गुलजारीलाल नंदा


 चिदम्बरम् सुब्रह्मण्यम् 


एम. एस.

 सुब्बुलक्ष्मी 


प्रो. अमर्त्य सेन 


जयप्रकाश नारायण 


पंडित रविशंकर


 गोपीनाथ बोरदोलाई 


लता मंगेशकर 


उस्ताद बिस्मिल्ला खान 


पंडित भीमसेन जोशी 


चिंतामणी नागेश रामचंद्र राव 


अटल बिहारी वाजपेयी


सचिन तेंडुलकर


पंडित मदन मोहन मालवीय


वरील सर्व जणांची माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे . अतिशय सुंदर आणि वाचनीय असे हे पुस्तक आहे .आपल्या भारतातील कोणाकोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि त्यांचं कार्य कसं महान होतं याची माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते .सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे हे पुस्तक आहे . आणि या पुस्तकातील एकेक कर्तृत्व भारतातील रत्नच आहेत.

तेव्हा नक्की वाचा हे पुस्तक पल्लवी आपटे यांनी लिहिलेलं. अतिशय सुंदर आणि आपल्या ज्ञानात भर घालण्याबरोबरच आपल्या मनात त्यांच्याविषयी अभिमान आणि स्वाभिमान जागृत करणार.


सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के       मर्ढे  सातारा