वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ६७
पुस्तकाचे नाव - आभाळ पेलताना
लेखकाचे नाव - सौ. सुमनताई व्यंकट पवार
प्रकाशन व आवृत्ती- काव्यमित्र प्रकाशन पुणे प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या– १००
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १००
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
६ ७||पुस्तक परिचय
आभाळ पेलताना
सौ. सुमनताई व्यंकट पवार
आभाळ पेलताना हा काव्यसंग्रह मला भेट स्वरूपात प्राप्त झाला .
"आभाळ पेलताना" हा सुमनताई व्यंकट पवार यांचा एक सशक्त, सर्वसमावेशक आणि सामाजिक जाणीवांनी परिपूर्ण काव्यसंग्रह आहे. या संग्रहात ग्रामीण जीवन, स्त्रीच्या व्यथा, श्रमिकांचे संघर्ष, निसर्गाचे सौंदर्य, सामाजिक विषमता यांचा प्रभावी आणि थेट प्रत्यय येतो. त्यांचे काव्य साध्या भाषेत असले तरी आशयघन, तळमळीचे आणि अंतर्मुख करणारे आहे.
"आभाळ पेलताना" हे शीर्षकच स्त्रीच्या जीवनातील जडणघडण, तिच्या जबाबदाऱ्यांचे ओझे आणि त्या ओझ्याला समर्थपणे पेलण्याची तिची जिद्द आणि क्षमता अधोरेखित करते. आभाळ हे इथे एक प्रतीक आहे – जबाबदाऱ्या, अपेक्षा, समाजाचे नियम, दु:ख, संघर्ष यांचं. स्त्री हे आभाळ पेलतेय... ही कल्पना संपूर्ण संग्रहात सतत उमटते.
सुमनताईंची भाषा ही अत्यंत सहज, ओघवती, ग्रामीण भाषाशैलीची रंगत असलेली आहे. तरीही ती अत्यंत प्रभावी आहे. तिने वापरलेली रूपके, प्रतिमा आणि लयबद्धता ही वाचकाच्या अंतर्मनाला भिडते. त्यांच्या कवितांमध्ये अनुभवाची प्रखरता आणि भावना यांची प्रगल्भता दिसते.
"आभाळ पेलताना" या संग्रहातील कविता केवळ स्त्रीजीवनापुरत्याच मर्यादित नाहीत, तर त्या समाजातील अन्याय, विषमता, वर्गभेद, जातिभेद, शेतीचा ऱ्हास, शेतकरी आत्महत्या, शिक्षणाचा अभाव अशा अनेक सामाजिक प्रश्नांनाही स्पर्श करतात. म्हणूनच हा काव्यसंग्रह सर्वसमावेशक ठरतो.
आपल्या खचलेला बळीराजा या कवितेत त्या सुंदर व्यक्त होतात.
खचू नको बाबा, जरा धीर सोडू नको । सोसणे हा धर्म आपुला, गळा दोरी तू करू नको ॥धृ.॥
नांगराने दिल वाट कोळप्याची मिळे साथ। आकाशाशी धरणीचे अतूट हे आहे नातं। कडाडली वीज आता, धीर तू करू नको ।।१।।
काळी आई रूसली का दूर गेले ढग आता। खेळ उन-सावलीचा जमा-खर्च वजा जाता । पिकत्यात बोरी-बाभळी, काट्यातून तू जाऊ नको ॥२॥
एवढे सुंदर वर्णन एक कवितेतून केलेला आपल्या दिसून येते.
त्यांच्या सर्व कविता सर्व विषय समावेशक आहेत निसर्गाचे ही त्या सुंदर वर्णन आपल्या कवितेतून करताना दिसतात. जे जे त्यांना भावले तेथे त्यांनी कवितेतून व्यक्त केलं .आपल्या महिना श्रावणाचा या कवितेतून व्यक्त होताना त्या म्हणतात,
काळ्या निळ्या आभाळातून टप् टप् थेंब पडती तुटून हिरव्यागार वनराईतून निर्झर झरे येती धावून ॥धृ.।।
खेळ उन-पावसाचा श्रावणात त्या मोसमाचा हाऊसफूल महिनाय सणांचा फुलांची बाग आली बहरून ।।१।।
तेव्हा आभाळ पेलताना हा कवितासंग्रह नक्की वाचा .प्रत्येक कवीचे आपापले स्वतःचे भावविश्व वेगवेगळे आणि हेच भाव विश्व अनुभव त्यांच्या कवितेत उतरलेले असतात .याचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येक कवीचा आहे कवितासंग्रह वाचलाच पाहिजे .
सुमनताईंच्या पुढच्या लेखन प्रवासाची खूप खूप शुभेच्छा .
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment