Wednesday, May 7, 2025

पुस्तक क्र . ६८ संघर्ष हेच सामर्थ्य


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ६८

पुस्तकाचे नाव - संघर्ष हेच सामर्थ्य

लेखकाचे नाव -  श्री . रवींद्र सिद्धेश्वर खंदारे

प्रकाशन  व आवृत्ती-   चपराक प्रकाशन पाचवी आवृत्ती

पृष्ठे संख्या–  ३०४

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ४००

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

६ ८||पुस्तक परिचय

संघर्ष हेच सामर्थ्य

श्री . रवींद्र सिद्धेश्वर खंदारे


एकदा वाचले, मनात घर केले,

शब्दांत जणू जीव ओतले गेले,

प्रत्येक ओळीत भाव नवे फुलते,

पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते…

प्रेरणा प्रत्येक पानोपानी मिळते

संघर्षातूनच सामर्थ्य जन्म घेते

तळहाताची रेघ नव्हे, तर तळपत्या घामातून भविष्य लिहिण्याची जिद्द.”

संघर्ष हेच सामर्थ्य या पुस्तकाविषयी लिहिताना मला असे मनोमन वाटते. खरं तर संघर्षातच सामर्थ्य लपलेलं आहे . या पुस्तकातून आपल्याला एका झिरो टू हीरो अशा व्यक्तिमत्त्वाचा उलगडलेला इतिहास पाहता येतो.

"संघर्ष हेच सामर्थ्य" या आत्मकथनाच्या प्रत्येक पानावर एक झळाळती जिद्द, आक्रंदणाऱ्या वाऱ्यातही उभ्या असलेल्या वृक्षासारखी न घाबरणारी धैर्यगाथा लपलेली आहे. श्री.रवींद्र खंदारे यांचा जीवनप्रवास म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातून प्रकाशाची वाट शोधणाऱ्या पतंगाची कथा आहे, ज्याने अनेक वेळा स्वतःची राख करूनही आभाळ गाठण्याचा प्रयत्न सोडला नाही.

संघर्ष हेच सामर्थ्य" हे आदरणीय रवींद्र सिद्धेश्वर खंदारे यांचे आत्मकथन, त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग आणि यशाची प्रेरणादायी कहाणी आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या बालपणापासून ते गटशिक्षणाधिकारी पदापर्यंतच्या प्रवासातील अडचणी, संघर्ष आणि यशाचे क्षण अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत.

संघर्ष हेच सामर्थ्य" हे आत्मकथन केवळ एक व्यक्तीच्या जीवनकथेपुरते मर्यादित नाही, तर ते समाजातील अनेकांना प्रेरणा देणारे आहे. पुस्तकात खंदारे साहेबांनी  आपल्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, आणि यशाच्या दिशेने केलेली वाटचाल यांचे सखोल वर्णन केले आहे. त्यांच्या लेखनशैलीत सुसूत्रता आणि स्मरणशक्तीची कमाल आहे, ज्यामुळे वाचकाला त्यांच्या जीवनप्रवासाचा चलचित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो.

सोलापूर जिल्ह्यातील जामगाव या लहानशा गावात एका मजूर कुटुंबात जन्मलेल्या खंदारे साहेबांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांचे वडील हमालीचे काम करत, तर आई इमारत बांधकामावर मजूरीचे करत होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या खंदारे साहेबांनी शिक्षणाची कास सोडली नाही. कचऱ्यातून भंगार गोळा करणे, मजुरी करणे, आणि इतर अनेक कामे करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

लहानपण म्हणजे जेव्हा बोट धरून चालायला शिकवणारे हात असावेत असे क्षण, पण खंदारे साहेबांच्या वाट्याला आले ते फक्त घामाचे थेंब.

एका छोट्याशा गावात, धूपाच्या झळांत निपचीत पडलेल्या माळरानासारखं त्यांचं बालपण होतं. शाळेच्या दारात उभं राहण्यासाठी त्यांना आधी हमाली करावी लागे. पुस्तकं नव्हती, पण त्यांची श्रद्धा शिळेपाकातही ज्ञान शोधायची. अंगात कपडे नव्हते, तरी आत्मविश्वासाने ते गर्दीत उठून दिसत.


एका प्रसंगी, शाळेत विद्यार्थ्यांना सर्वांना वह्या पुस्तके होती पण त्यांच्याकडे साधी वह्या पुस्तके घ्यायला पैसेही नव्हते.खूपच कठोर प्रसंग . डोळ्यांतून वाहणारे अश्रू स्वाभिमानाच्या जखमेचे होते. त्या दिवशी त्यांनी ठरवलं – गरिबी ही ओळख न राहता, इतिहास बनेल.

गावातील वाळवंटासारखी परिस्थिती त्यांच्या शिक्षणाची तहान भागवत नव्हती.

सकाळी मजुरी, दुपारी शाळा, संध्याकाळी भंगार गोळा करणे अशी अनेक कामे त्यांना करावी लागत होती .

शिक्षणासाठी त्यांनी दगड धोंडे चिखल यांची पायवाट आनंदाने तुडवली– ती होती जीवनाकडे, यशाकडे झेप घेणारी पावले.

श्रीराम कथा पुस्तकातून वाचनाची सुरुवात करणाऱ्या खंदारे साहेबांनी पुढे अनेक वर्तमानपत्रातून लेखन केले .  या आत्मकथनातून आपले लेखन समृद्ध केले .

पप्पा आणि काकू हे आई वडील असले तरी त्यांची मामा मामी हे दुसरे आई-वडीलच होते . त्यांचे विचार आणि संस्कार त्यांच्या मनावर चांगले बिंबले होते .शाळेतील शिक्षकांनी केलेले वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्यातून घडलेले यांचे व्यक्तिमत्व खरोखर प्रेरणादायी आहे .

विज्ञानात त्यांना कमी मार्क मिळाले त्यावेळी देसाई सरांनी त्यांना सुनावलेले शब्द कायम त्यांच्या मनात घर करून राहिले .

चड्डीची ठिगळ काढायची असतील तर शिकावं लागतं चांगला अभ्यास करावा लागेल . जरा विचार कर मामांनी तरी किती लक्ष द्यायचं ?तुझं तुलाच कळालं पाहिजे आत्ताच वेळ आहे अभ्यास करायला .

खरोखर वेळेवर केलेल्या अभ्यासाचे पुढे यशात रूपांतर होतं .गरीबी जर हटवायचे असेल तर शिक्षणाशिवाय गरिबांच्या हातात दुसरं कोणतं शस्त्र नाही .

रोहिणी ,अनु ,रवींद्र ,आणि नामदेव ही चार भावंड . संतोष म्हणजेच रवींद्र चे शिक्षणासाठी अनुला आपली शाळा सोडावी लागली. आपला भाऊ शिकावा म्हणून त्याला रोज डबा घेऊन जाणारी अनुच्या त्यागाला खरोखर मनापासून सलाम.अनुला मात्र आपल्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही याची खंत कायम साहेबांच्या मनात राहिली . बहिण भावाचे हे अनोखं प्रेम सर्वांच्यातअसावं .शिक्षणासाठी शाळा बदलाव्या लागल्या याची खंत कायम साहेबांच्या मनात राहते .साताऱ्यात मात्र त्यांना शिक्षणात घेता आलं नाही त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही .याच साताऱ्यात शिक्षण क्षेत्रातील अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली याहून मोठा अभिमान तो काय !

त्यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवासाविषयी किती बोलावं आणि किती लिहावं हे कोडच आहे .एकूण २२ प्रकरणात त्यांचं आत्मचरित्र त्यांनी विस्तृत रूपात लिहिले आहे .त्यांच्या स्मरणशक्तीचे मोठं कौतुक करावं वाटतं .कारण प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाव्याने टिपली आहे .डीएड प्रवेशाचे दिव्य काय असतं हे मी स्वतः अनुभवलेले आहे त्यांचेही अनुभव वाचताना माझ्याच अंगावर शहारे उभे राहत होते .कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही .रवींद्र साहेबांना प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागला आणि या संघर्षाचीच गाथा या पुस्तक रूपाने आपल्या सर्वांच्या समोर उभी राहिली .प्रशासकीय जबाबदारी असो की कौटुंबिक जबाबदारी असो या प्रत्येक ठिकाणी त्यांना संघर्ष करावा लागला . ही संघर्ष गाथा कुणी लिहून कोणाकडून ऐकून समजून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष हे पुस्तक वाचून काळजाच्या कप्प्यात थरथरल्याशिवाय राहणार नाही आणि समजणारही नाही .

फक्त दोन रुपये हरवले म्हणून मिळालेला मार आत्ताच्या मिळणाऱ्या मोठ्या पगारापेक्षा बरंच काही सांगून जातो .या दोन रुपयांमुळे त्यांना त्यावेळेस पुस्तकही विकत घेता आले नाही .जिल्हा परिषद शिक्षक ते उपशिक्षणाधिकारी पर्यंतचा त्यांचा प्रवास साराच संघर्षमय आहे .

विजेचा दिवा नसताना, चुलीवरील कोळशाच्या प्रकाशात अभ्यास करणं म्हणजे ज्वालामुखीतून ज्ञानाचे मोती शोधणं. आणि या मोत्यांनीच त्यांच्या आयुष्याचा हार बनवला.

त्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले नाही, ते स्वप्न बनले.

शिक्षकपदावर नियुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, ती भविष्य घडवणारी कार्यशाळा आहे, हे सिद्ध केलं.

त्यांच्या प्रत्येक कृतीत "मी नाही, माझे विद्यार्थी" हा मंत्र होता.


शिक्षकपदावर नियुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, ती भविष्य घडवणारी कार्यशाळा आहे, हे सिद्ध केलं.

गटशिक्षणाधिकारी या पदावर पोहोचणे म्हणजे झाडाच्या मुळांपासून आकाश गाठण्याची कहाणी आहे.

त्यांनी कार्यालयीन नोकरीला केवळ टेबलखुर्चीवरचं काम मानलं नाही, तर ती ठरवली – शिक्षणक्रांतीची रणभूमी.

त्यांनी  विद्यार्थ्यांसाठी विशेष यंत्रणा उभारली.


कचरा वेचताना त्यांना एखादं जुनं, फाटलेलं पुस्तक सापडलं की तेच त्यांना खजिना वाटायचं. दुसऱ्यांच्या फेकलेल्या पुस्तकांतून त्यांनी आपलं विद्येचं गगन उभं केलं.

ज्याला इतरांनी “कचरा” समजलं, त्यातून खंदारे साहेबांनी "कृतीची कमाई" केली.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून त्यांना मिळालेले शब्द म्हणजे स्वप्नांचे बीज होते.

शिकवणीसाठी पैसे नव्हते, त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी केलेल्या संघर्ष या आत्मचरित्रातून आपल्याला दिसून येतो . त्यांच्या शिक्षणावर प्रत्येक वेळेस काहींना काहीतरी संकटे येतच गेली पण त्यातून ते मार्ग काढत गेले .

नशिबाच्या सूईने आणि श्रमाच्या धाग्यांनी त्यांनी आपली यशस्वी जीवनशैली विणली.कचऱ्यात सापडलेल्या एका खाकी चड्डीने त्यांनी आपलं एक शैक्षणिक वर्ष पूर्ण केल .काळीज पिळवटून टाकणारी ही घटना .

संघर्ष हेच सामर्थ्य" हे पुस्तक लिहिणं हेही एक लढवय्याचं काम होतं. लेखन करताना पुन्हा जुन्या जखमा उघडाव्या लागल्या, पण त्यांनी त्या जखमांतूनच प्रेरणा घेतली.

या आत्मकथनाच्या प्रत्येक अक्षरातून घाम गळतो, प्रत्येक वाक्यात रक्ताची ओल आहे.

ही केवळ गोष्ट नाही – हे आरशात स्वतःला पाहण्याचं माध्यम आहे.

संघर्ष हेच सामर्थ्य" हे पुस्तक म्हणजे आत्मकथेच्या चौकटीत बांधलेली आत्मा उलगडणारी दीपज्योत आहे.

ते केवळ वाचायला नाही, तर अंतर्मनात फुंकर घालायला आहे.

 रवींद्र खंदारे साहेबांची कहाणी म्हणजे "राखेतून उगवलेला फिनिक्स", ज्याने अशक्य ते शक्य केलं.

रवींद्र यांचे दुसर नाव संतोष आहे .सूर्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात  तळपणारा तारा आपल्या कर्तुत्वावर आणि प्रयत्नांवर संतोष मानतो आणि प्रत्येक संघर्षमय प्रसंगातून यशस्वी होतो हीच खरी यशोगाथा .

त्यांचा जीवनप्रवास सांगतो –

"तू पडलास, हरलास, झुकलास… पण पुन्हा उठलास – कारण तू संघर्षातून जन्मलेला आहेस."

संघर्ष हेच सामर्थ्य या आत्मचरित्रास मानाचा मुजरा !

 प्रत्येकाने वाचावे आणि अनुभवावे असे हे प्रेरक प्रेरणादायी आत्मचरित्र .

धन्यवाद .🙏🖋️📖💐

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment