वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ५३
पुस्तकाचे नाव - हिरकणी कवितासंग्रह
लेखकाचे नाव - शुभांगी विलास पवार (कंदी पेढा )
प्रकाशन व आवृत्ती- अजिंक्य प्रकाशन वाशिम प्रथम आवृत्ती २०२०
पृष्ठे संख्या– १००
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १५०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
५३ ||पुस्तक परिचय
हिरकणी
शुभांगी विलास पवार
लेकरासाठी जीव टाकी, काळोखाची भीती ना
खडकाळ वाटांवर चालली, मायेची तिची ना सिमा।
हिरकणी मातृत्वाचं असे प्रतीक असलेले एक रूप .आपल्या लेकरासाठी रायगडाचा कडा उतरून अंधार रात्री खाली आली .तिचा हा पराक्रम शब्दात वर्णन न करता येणारा .भावनाप्रधान आणि मातृ प्रधान असा तो प्रसंग .अशीच शुभांगी पवार ही आपल्या शाळेतल्या लेकरांसाठी झटणारी आपल्या लेखणीने शब्दबद्ध करणारी अशी ही आधुनिक हिरकणी . सातारचा कंदी पेढा खूप प्रसिद्ध आहे याच नावाने शुभांगी मॅडम आपल्या कवितेचे लेखन करतात हे त्यांचे वैशिष्टच म्हणावे लागेल .आदरणीय शुभांगी पवार मॅडम आणि माझी मैत्रीण जिवाभावाची आणि सुलोख्याची. त्यांच्याकडून मिळालेले त्यांचा हा कवितासंग्रह माझ्यासाठी अमूल्य नजराणा आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच त्यांच सुंदर असे छायाचित्र दिसून येते .हिरकणी शब्दाला साजेस असं मुखपृष्ठ त्यांनी या पुस्तकाला दिलेल आहे .सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे शुभेच्छा संदेश या त्यांच्या कवितासंग्रहाला मिळालेले आहेत .आपलं हे पुस्तक त्यांनी आपल्या कुटुंबाला समर्पित केलेला आहे .यावरून त्यांचा कौटुंबिक जिव्हाळा हा आपल्याला दिसून येतो .
हिरकणी या कवितासंग्रहात एकूण त्यांनी 51 कविता लिहिलेल्या आहेत .वेगवेगळ्या विषयावर त्यांना आलेल्या अनुभवातून त्यांनी या कविता शब्दबद्ध केले आहेत प्रत्येक कवितेचा विशेष अस शीर्षक त्यांनी दिलेला आहे .
या पुस्तकाला ज्येष्ठ कवयित्री अंजली श्रीवास्तव यांची प्रस्तावना लाभलेली आहे .त्यांना असं वाटतं की शुभांगी पवार यांचा हा कवितासंग्रह बाईच्या अनुषंगाने येणार आहे हा विषय प्रत्येकीला आपला वाटणारा विषय आहे .स्त्री भून हत्या या विषयावर त्यांची पहिलीच कविता माझं अस्तित्व खोडताना यामध्ये त्या म्हणतात,
खरं सांगा ना मला आई बाबा तुम्ही
तुम्हाला कसं काहीच आपले पण वाटलं नाही ?
माझं गर्भातील अस्तित्व मुलगी म्हणून खोडताना
तुमच्या डोळ्यातील टिपूस भर सुद्धा पाणी का हो दाटलं नाही?
या शब्दात ज्या मुलीचा बळी गर्भातच असताना गेला ती मुलगी आपल्या आई-बाबांना असे प्रश्न विचारताना या कवितेत दिसते. अतिशय सुंदर आणि उगवत्या शब्दात त्यांनी ही कविता लिहिलेली दिसून येते.
शुभांगी पवार मॅडम यांनी या कवितासंग्रहाला हिरकणी हे नाव दिलेले आहे. आपल्या हिरकणी कवितेत ते म्हणतात,
रोजचा संघर्ष उशाला
घेऊन ती निजते
हसत राहून सर्वांसाठी
खोटीच ती असते!
स्त्रीच्या जीवनाचं खरं वास्तव या ओळीतून आपल्याला दिसून येतं. तिच्या आयुष्यात कायम संघर्ष असतो मात्र ती चेहऱ्यावर कायम आपल्या हास्य ठेवत असते आणि सतत इतरांसाठी झटत राहते. अतिशय सुंदर आणि स्त्रीची समर्पणाची वृत्ती या कवितेतून त्यांनी शब्दबद्ध केली आहे.
स्त्री म्हणली की तिच्या जोडीला कायम स्वयंपाक आलेलाच असतो. आपल्या महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध असलेला एक पदार्थ म्हणजे कांदापोहे अगदी मुलीला लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी ही आपण कांदेपोहेच बनवतो यावर एक सुंदर कांदा पोहे हे गाणं पिक्चरही आलेला आहे याच विषयाला धरून शुभांगी पवार यांनी कांदेपोहे ही एक सुंदर आणि आगळीवेगळी कविता लिहिलेली आहे .मला ही कविता विशेष आवडली. या त्या म्हणतात,
कांदे पोहे कधी दाखवतात
घराचं घरपण
आदरातिथ्य आणि स्नेहाचं
निखळ दर्पण
किती छान अर्थ लावला आहे ते कांद्या पोह्यांचा . ही सर्व कविता खूप छान आहे .तेव्हा हे पुस्तक घेऊन नक्की ही कविता वाचा .फक्त स्त्री मनाचा त्यांनी या कवितासंग्रहात विचार न करता इतर अनेक सामाजिक विषयांवर त्यांनी या संग्रहात कविता लिहिलेले आहेत .सर्व विषयांना साथ देणारी त्यांची लेखणी या कवितासंग्रहात दिसून येते .
अपयशाने खचून न जाता आपलं हे अनमोल जीवन आपण आनंदाने कसं जगावं हे आपल्या जीवन जगण्याची कला या कवितेतून त्या सुंदर रित्या सांगतात.
जीवन जगण्याची कला
शिकायला हवी माणसानं
क्षुल्लक त्या अपयशाने
खचू नये उगीच माणसानं
असा सुंदर उपदेश त्या अपयशाने खचून जाणाऱ्यांसाठी करतात .इतरांनाही प्रेरणा आणि मार्गदर्शन ठरणाऱ्या अशा या सुंदर कविता या कवितासंग्रहात समाविष्ट आहेत .
कुठवर सहन करायचं यामधून मात्र त्यांचे स्त्री मन आपल्याला दिसून येत .
कुठवर सहन करायचं
असं दास्यत्वातलं जगणं
हास्याचे मुखवटे चढून
कृत्रिमपणे वागणं
स्वतः स्वतःला प्रश्न विचारतात की कुठवर असं जगायचं सहन करत करत .छान विचार या कवितेत त्यांनी मांडलेले आहेत .आईवर सर्वजण कविता लिहितात पण बापावर कविता लिहिणारे काही थोडक्यात असतात आदरणीय शुभांगी मॅडम यांनी आपली .या कवितासंग्रहातील शेवटची कविता बाप ही अतिशय सुंदर शब्दबद्ध केली आहे .बाप आपल्या जवळ असताना त्याची आपल्याला किंमत कळत नाही मात्र बाप निघून गेल्यावर आपल्याला खरी किंमत त्याची कळते .कवितेत त्या म्हणतात,
बापाची किंमत कळते
त्याचं अस्तित्व नसताना
त्याच्याविना आयुष्याचे
शिव धनुष्य पेलताना
किती समर्पक शब्दात बापाचा आधार त्यांनी सांगितला आहे. असा हा सर्वांग सुंदर कवितासंग्रह सर्व वाचकांना नक्की आवडेल. आदरणीय शुभांगी पवार मॅडम यांनी अतिशय सुंदर सर्व कविता या पुस्तकात लिहिलेले आहेत. एकाहून एक सरस अशा सर्व कविता आहेत. सर्वच कविता इथे मला देता येत नाहीत म्हणून तर म्हणते हा कवितासंग्रह नक्की वाचा. शुभांगी मॅडमच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा. तुमची लेखणी अशीच कायम लिहीती राहो!
धन्यवाद.
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा


No comments:
Post a Comment