वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ५२
पुस्तकाचे नाव - शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा
लेखकाचे नाव - डॉ.गणपती कमळकर
प्रकाशन व आवृत्ती- अक्षरदालन प्रकाशन कोल्हापूर द्वितीया आवृत्ती २०२१
पृष्ठे संख्या– १७७
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २५०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
५२ ||पुस्तक परिचय
शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा
डॉ.गणपती कमळकर
ज्ञानगंगेच्या लाटांनी, उजळल्या नव्या दिशा,
शिकण्याच्या वाटेवरती, लागल्या तेजाच्या निशा।
शाळेची घंटा झाली सूर, स्वप्नांची नवी कहाणी,
पालटते काळाची चाल, शिक्षणात नवी वाणी।
विद्यार्थ्यांचे जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणणारे सर्व गुरुजन वर्ग यांना प्रथमतः वंदन .कोणतेही महान कार्य करायचे असेल तर सुरुवातीला लहान लहान पाऊलवाटांनी एक मोठा परिवर्तनाचा रस्ता तयार करावा लागतो .पाऊलवाटांनी चालत वेगवेगळे प्रयोग करत शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात एक नवीन दृष्टी आणणारे आदरणीय डॉक्टर गणपती कमळकर यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या एक चढता आलेख या पुस्तकात देण्यात आलेला आहे .प्रत्येक शिक्षकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे .शिक्षण आणि ज्ञानदान ही खरी तर सेवा आहे .सेवा भावनेने जे काम करतात त्यांना त्याचं फळ निश्चित प्राप्त होतं .आपल्या सेवेचे फळ आदरणीय कमळकर साहेबांना मिळाल आहे .आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी त्यांची चाललेली धडपड या पुस्तकातून आपल्याला जाणवते .एक अधिकारी एक शिक्षक काय काय करू शकतो याची प्रचिती या पुस्तकातून आपल्याला नक्कीच मिळते .हे पुस्तक वाचन साखळी कडून मला भेट मिळालेला आहे .हे पुस्तक मला भेट मिळाले तेव्हाच मी हे वाचून पूर्ण केलं .पुस्तकाची मांडणी मलपृष्ठ मुखपृष्ठ अतिशय सुबक आहे .पुस्तकाचे देखणेपणापेक्षा पुस्तकातील उपक्रमांचा देखणेपण शब्दांच मूल्य हे अधिक मौल्यवान आहे .
आदरणीय कमळकर साहेबांनी हे पुस्तक सर्व शिक्षक वर्गाला समर्पित केले आहे .आपल्या समर्पणात ते म्हणतात, सेवाभाव, निष्ठा व तळमळीने गुणवत्ता पूर्ण ज्ञानदान करून आदर्श पिढी घडवण्यासाठी समर्पित वृत्तीने कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना सविनय अर्पण !
प्रसिद्ध साहित्यिक डॉ .सुनील कुमार लवटे यांनी सुरुवातीलाच या पुस्तकातील सार आपल्या शब्दात अतिशय सुंदर दिलेलं आहे .ते वाचूनच या पुस्तकात नक्की आपल्याला काय काय मिळणार आहे याची प्रचिती येते .
आदरणीय कमळकर साहेबांविषयी सर्व माहिती सुरुवातीला दिलेली आहे .
प्राथमिक शिक्षकांच्या नोकरी पासून सुरुवात केलेले कमळकर साहेब शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचले त्यांचा एकूण प्रवास सुरुवातीला दिलेला आहे .कोल्हापूर सारख्या भागात त्यांची सर्व सेवा झालेली आहे .आदरणीय साहेबांनी घेतलेले सर्व उपक्रम हे सर्वांनाच प्रेरणादायी आणि नवीन दृष्टी देणारे आहेत .नकुशी नावाच्या मुलींचा शोध घेऊन त्यांचं नामकरण करणारे आदरणीय साहेब हे सर्वांना आदर्शवतच आहेत .वाचन संस्काराचे महत्त्व जाणून त्यांनी शिक्षकांसाठी झोळी ग्रंथालय ते तालुका ग्रंथालय असे विविध उपक्रम राबवले .
रावाने केले तर हिमालय होतो पण गावाने केले तर आज पर्वतही ओलांडता येतो कोणत्याही समस्येचे मूळ शोधून उपाय करायचा डॉक्टर कमळकरांचा आजवरचा शिरस्ता !आणि तोच शिरस्ता या पुस्तकात आपल्याला ठाई ठाई दिसून येतो .
हे पुस्तक तयार होताना आदरणीय कमळकर साहेबांना अनेक जणांचे सहकार्य भेटले .त्यांचे ऋण व्यक्त करायला या पुस्तकात ते विसरले नाहीत .या पुस्तकात कमळकर साहेबांनी एकूण बारा भागात आपल्या सर्व शैक्षणिक कार्याचा उपक्रमांचा लेखाजोखा मांडलेला आहे .प्रत्येक उपक्रम हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे .
ग्रंथालयाचे उपक्रम तर अतिशय सुंदर आहे ते या उपक्रमाविषयी म्हणतात,
ग्रंथ वाचनाने माणूस मोठा झाला नाही तरी शहाणा मात्र जरूर होतो. व्यायामाने जशी शरीराची मशागत होते, तशी वाचनाने मनाची मशागत होते. वाचन म्हणजे घरबसल्या जगप्रवास करणे होय. वाचनाने आपल्याला जग कळते. जगाचा इतिहास, भूगोल कळतो. संस्कृती कळते. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कळतो. वाचन ही एक नशा आहे. निरंजन घाटे यांच्यासारखे ज्येष्ठ साहित्यिक या वाचन प्रवासाला आपल्या आयुष्याचा प्रवास मानतात. ही वाचन चळवळ शिक्षकांमध्ये रुजली, बहरली तर समाजामध्ये त्याचा वेगाने प्रसार होईल, याच अपेक्षेने गटशिक्षणाधिकारी झाल्यानंतर माझ्याकडून 'शिक्षक ग्रंथालय'सारखा एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
आपल्या या पुस्तकात डॉ .गणपती कमळकर साहेब वेगवेगळ्या भागातून आपल्या केलेल्या कार्याची माहिती सांगताना दिसतात .पहिल्या भागात मी ज्ञानसमृद्ध होण्यासाठी ग्रंथालय आणि वाचन किती गरजेचे आहे याची महत्त्व त्यांना तर पटलेच पण आपल्या शिक्षकांनाही आणि विद्यार्थ्यांनाही त्यांनी विविध उपक्रमातून पटवून दिले .मुलींना योग्य सन्मान मिळावा यासाठी त्यांनी नकोशी झाली हवीशी या उपक्रमातून नकोशी नाव असणाऱ्या तालुक्यातील ३८ नकुशींची नावे बदलून त्यांचे आयुष्यच उजळवून टाकले .शाहूवाडी तालुक्यातून गडहिंग्लज या तालुक्यात बदली होऊन गेल्यानंतर विविध उपक्रमांची यशोगाथा त्यांनी या भागात दिलेली आहे .प्रत्येक शिक्षकाचे वेगळेपण ओळखून त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देऊन त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती याबाबत दिलेली आहे .
कोल्हापूर आणि कर्नाटकच्या सीमा भागातील 96 कन्नड भाषेच्या कचाट्यातून मराठीला सोडवताना आलेल्या विविध अडचण आणि घेतलेले विविध उपक्रम यांची विस्तृत माहिती या भागात दिलेली आहे .ज्ञानरचनावाद काय किमया घडून आणतो याचे उत्तम उदाहरण त्यांनी रचनावादाचे आदर्श मॉडेल या भागात दिलेल्या आहेत .मुले स्वतः शकतात स्वतःच ज्ञानाचे रचयिता असतात याची प्रचिती या ज्ञान रचनावादातून येते .अशा अनेक विविध उपक्रमांची रेलचेल या पुस्तकात आहे .त्यांची शिक्षणाविषयी शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांविषयी असलेली धडपड आपल्याला नक्कीच या पुस्तकांमधून दिसून येते .हे पुस्तक वाचल्याने आपणही वेगळं काहीतरी करावं अशी प्रेरणा आपल्यात निर्माण होते .डॉक्टर गणपती कळमकर यांच्या या शैक्षणिक कार्यास माझे कोटी कोटी सलाम .यातील प्रत्येक पानावर काहीतरी नवीन प्रेरणा आणि नवीन माहिती मिळत जाते . त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवं .
त्यांच्याच पुस्तकातील केशवसुतांच्या कवितेतील काही ओळी त्यांच्या कार्यासाठी अगदी समर्पक आहेत .
'जोर मनगटातला
पुरा घाल, घाल खर्ची,
हाण टोमणा, चळ न जरा
अचूक मार बर्ची!
ढळू कधीही देऊ नको
हृदयाचा निर्धार,
मग भय तुजला मुळी नको, सिद्धी खास येणार !
झटणे हे या जगण्याचे
तत्त्व मनी तू जान,
म्हणून उद्यम सोडू नको
जोवरी देही प्राण!'
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा



No comments:
Post a Comment