वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ५७
पुस्तकाचे नाव - आई एक साठवण
लेखकाचे नाव - श्यामसुंदर मिरजकर
प्रकाशन व आवृत्ती- नाग नालंदा प्रकाशन
पृष्ठे संख्या– ४८
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ३०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
५ ७ ||पुस्तक परिचय
आई एक साठवण
श्यामसुंदर मिरजकर
आई" — ह्या शब्दातच एक जग सामावलेलं असतं.
आई म्हणजे मायेचा सागर, निःस्वार्थ प्रेमाची मूर्ती. लहानपणी रात्री ताप येतो तेव्हा पाण्याच्या पट्ट्या ठेवणारी, अभ्यासात मागे पडलो की धीर देणारी, आणि यश मिळालं की सगळ्यांत आधी डोळे पाणावणारी.
श्यामसुंदर मिरजकर यांचे "आई : एक साठवण" हे पुस्तक मातृत्वाच्या भावनांना समर्पित आहे. या पुस्तकात लेखकाने आईच्या आठवणी, अनुभव आणि तिच्या मायेच्या छायेत घडलेल्या क्षणांचे संवेदनशील वर्णन केले आहे. लेखकाच्या शब्दांतून आईच्या प्रेमाची, त्यागाची आणि मायेच्या उबदारतेची झलक वाचकांना अनुभवायला मिळते.
आई : एक साठवण" हे पुस्तक केवळ आईच्या आठवणींचे संकलन नसून, ते मातृत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. लेखकाने आपल्या अनुभवांतून आणि निरीक्षणांतून आईच्या भूमिकेचे विविध पैलू उलगडले आहेत. या पुस्तकातील लेख वाचकांच्या मनाला स्पर्श करणारे आहेत आणि आईच्या प्रेमाची, त्यागाची आणि मायेच्या उबदारतेची आठवण करून देतात.
हे पुस्तक मातृत्वाच्या भावनांना समर्पित असून, आईच्या आठवणींना उजाळा देणारे आहे. आईच्या प्रेमाची, त्यागाची आणि मायेच्या उबदारतेची अनुभूती घेण्यासाठी हे पुस्तक वाचकांनी नक्कीच वाचावे.
आपल्या मनोगत लेखक असे म्हणतात,
'आई : एक साठवण!' हे मुक्तचिंतन आपणासमोर सादर करताना एक विलक्षण आनंद होत आहे. यातील काही चिंतन जुन्या लोककथा, काही सुप्रसिद्ध कविता व लेखनावर बेतलेले आहे. 'आई' हा सर्वांगसुंदर अनुभव माझ्या शब्दात वाचकांपर्यंत पोहोचवणे हा या लेखनाचा हेतू.
आई आई आई आई, अनावर होती भाव। पायामध्ये काटा रुतता, तुझेच ओठी नाव ॥
दुःखाच्या प्रत्येक क्षणात जी आठवते ती आई ! आणि त्या दुःखावरची हळुवार फुंकर म्हणजेही आईच !
आईला शब्दात मांडणे सोपे नाही.
आईची माहिती सांगणारे या पुस्तकात एकूण 33 लेख त्यांनी दिलेले आहेत .ज्या अनेक थोर माऊली होऊन गेल्या त्यांच्याविषयी या पुस्तकात आपल्याला माहिती मिळते .यामध्ये मग राष्ट्रमाता जिजाऊ असतील, ,हिरकणी असेल ,विठाई असेल ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील ,छान छान पुस्तके लिहिलेल्या आपल्या मुलांविषयीच्या आई असतील .
आई माझा गुरु या पहिल्याच लेखात आईचं वर्णन सुंदर केले आहे .
आई माझा गुरू आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी !
अशा सुंदर आणि नेमक्या शब्दात साने गुरूजींनी आईचा महिमा वर्णिला आहे. साने गुरूजी हे स्वतःच मातृहृदयी होते. म्हणूनच त्यांचे शब्द सार्थ आहेत.
आई आपल्याला काय काय शिकवते?
नऊ महिने नऊ दिवस उदरात ठेऊन ती जगण्याची लय शिकवते. जगात पाऊल ठेवताच रडणाऱ्या बाळाला हसायला शिकवते. पडणाऱ्या बाळाला चालायला शिकवते. बोलायला शिकवते. रुसायला आणि रागवायलाही शिकवते.
हे जग सुंदर आहे, प्रेमळ आहे, याचं लहान बाळाला मिळणारं पहिलं आश्वासन म्हणजे आई ! तीच गाते अंगाई! पऱ्यांना, पाखरांना हळूच या म्हणणारी ! झोपलेल्या राजकुमाराच्या स्वप्नात जा म्हणणारी !
आई असते आकाशाची माया। आई असते धरणीची काया। बाळाच्या हट्टासाठी काहीही करते आई।
बाळाच्या सुखासाठी दुःख सोसते आई।
जननी जन्मभूमी आणि धरित्री या विषयी माहिती अतिशय सुंदर शब्दात ते सांगतात .
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी', असे एक संस्कृत वचन आहे. आई आणि मातृभूमी या स्वर्गापेक्षा गौरवशाली व म्हणूनच प्रिय असतात. या मातृभूमीबद्दलच्या भावना व्यक्त करताना सुरेश भट लिहितात.
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणिन आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा
मातृभूमीसमोर प्रत्येक माणूस हा तान्हाच असतो. या आईच्या प्रेरणेतूनच इतिहास घडत असतो. म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जेव्हा देशभक्त फासावर जाऊ लागतात. तेव्हा त्यांच्या ओठी शब्द असतात,
कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाळ
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल असा असतो जन्मभूमीसाठी प्राणत्याग करण्याचा दैदीप्यमान इतिहास !
प्रत्येकाला एक तिसरीही आई असते. ती असते काळी आई - शेतजमीन !
या विश्वातील साऱ्या प्राणिमात्रांना जगवण्याचे महान काम ती करते. म्हणूनच गीतकार लिहून जातो,
काळ्या आईची माया, कशी जाईल वाया। लई दिवसानं, लई नवसानं, लागलं आभाळ गाया ।। धरणीच्या आणि आभाळाच्या मीलनातून नवी हिरवाई जन्मास येते. आणि तेच असते अवघ्या विश्वाचे जीवन.
नॉट विदाऊट माय डॉटर या पुस्तकाचेही अतिशय खूप छान विवेचन केलेल आहे .आपल्या मुलीसाठी लिहिलेल्या सुंदर पुस्तक त्यांनी या पुस्तकाचा आपलाही पुस्तकात छानसा उल्लेख केलेला आहे .
बेटी मेहमूद नावाच्या अमेरिकन लेखिकेचे 'नॉट विदाऊट माय डॉटर' नावाचे पुस्तक गाजलेले आहे. ही मुळची अमेरिकन असणारी स्त्री अफगाणिस्तानातील एका मुस्लिम डॉक्टरच्या प्रेमात पडली. हा डॉक्टर अमेरिकेतच नोकरी करत होता. या दोघांनी लग्न केले. त्यांना एक मुलगीही झाली. अमेरिका आणि इराक युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याला अमेरिकेत राहणे त्रासदायक झाले. आणि तो अफगाणिस्तानात आपल्या पत्नी व मुलीला घेऊन गेला.
तिकडे गेल्यावर त्या डॉक्टरचे मूळ स्वरूप पुढे आले. तो कट्टर धार्मिक माणसासारखा वागू लागला. त्याने बायकोला बुरखा घालणे बंधनकारक केले. अनेक प्रकारची कठोर बंधने घातली. एका मुक्त वातावरणात राहिलेल्या या स्त्रीला असे बंधनात राहणे शक्य नव्हते. तिने अमेरिकेला परत जाण्याचा निर्णय घेतला. नवऱ्याने तिला परत जायला संमती दिली, पण मुलगी ठेऊन घेणार, असे सांगितले. पण मुलगी म्हणजे तिचा जीव की प्राण ! ती मुलीला अशा कठोर बंधनात, गुलामीत ठेऊन एकटीच स्वतंत्र, बंधनमुक्त जीवन जगणे शक्यच नव्हते. तेव्हा तिने मुलीला स्वतःबरोबर घेऊन जाण्याचा निर्धार केला. आणि जीवावर उदार होऊन अनेक संकटातून मार्ग काढत स्वतःची आणि मुलीची सुटका करून घेतली.
तिची ही जीवनकहाणी अत्यंत संघर्षमय व अंगावर काटे आणणारी आहे. एक आई स्वतः संकटाला सामोरी जाते. प्रसंगी प्राण पणाला लावते, पण आपल्या मुला-मुलीला संकटात लोटून देऊ शकत नाही, हेच खरे. मुले संकटात असताना तिच्या समोर येणारा गोड घास हा तिला विषासमान वाटतो. इतर प्रसंगात अबला वाटणारी स्त्री मुलांवर संकट कोसळते तेव्हा रणरागिणी बनून संकटासमोर उभी राहते. संघर्ष करते. इतके धैर्य, इतके साहस तिच्याजवळ कुठून येते ?
आई ही आईच असते .आजचा हा माझा पुस्तक परिचय आईपणाला समर्पित.
सर्वांनी नक्की वाचावं असे हे सुंदर पुस्तक .धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment