वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ५ ८
पुस्तकाचे नाव - माझा उपक्रम बालकथा संग्रह
लेखकाचे नाव - संकलन बाळकृष्ण जगताप
प्रकाशन व आवृत्ती-साई मुद्रणालय सातारा प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या– २४७
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २२०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
५ ८ ||पुस्तक परिचय
माझा उपक्रम बालकथा संग्रह
बाळकृष्ण जगताप
बालकथा म्हणजेच मुले आणि लहान वयाच्या वाचकांसाठी लिहिलेल्या कथा. या कथा मुलांच्या मनोरंजनासोबतच त्यांचं नैतिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास घडवण्याचे काम करतात.आदरणीय बाळकृष्ण जगताप सरांनी अतिशय मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणाऱ्या बालकथांचा संग्रह केलेला आहे .
बालकथा ही अशी लघुकथा असते जी विशेषतः लहान वयाच्या मुलांना लक्षात घेऊन लिहिली जाते. यात साधी भाषा, मनोरंजक गोष्टी, कल्पनारम्य घटना आणि प्रबोधनपर संदेश असतो.
मला सांगा ना कथा कुणाला आवडत नाहीत .गोष्ट तर सर्वांनाच आवडते .आजोबांनी आईने सांगितलेली गोष्ट ऐकून संध्याकाळची किती छान झोप लागते आणि आपण त्या गोष्टी हरवून जातो .गोष्टींचे खूप प्रकार आहेत .मुलांना तर गोष्टी खूपच आवडतात .पुढील काही गोष्टींचे प्रकार आहेत .
रूपक कथा (Fables): प्राण्यांच्या माध्यमातून सांगितलेल्या नैतिक शिक्षण देणाऱ्या कथा (उदा. पंचतंत्र).
परीकथा (Fairy Tales): जादुई गोष्टी, परी, राक्षस, राजे-राणींच्या कथा (उदा. सिंड्रेला, झोपलेली राणी).
लोककथा (Folktales): लोकपरंपरेतून आलेल्या, पिढ्यानपिढ्या सांगितल्या जाणाऱ्या कथा.
सामान्य जीवनावर आधारित कथा: शाळा, कुटुंब, मैत्री, सहकार्य यासंबंधी वास्तववादी कथा.
प्रेरणादायी कथा: महान व्यक्तींच्या जीवनावर आधारित बालकथा.
अशा या वेगवेगळ्या कथा असल्या तरी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विविध माध्यमातून आपण कथा वाचू , पाहू आणि ऐकूही शकतो. या कथा आपल्याला अॅनिमेशन आणि कार्टूनच्या स्वरूपात
पॉडकास्ट/ऑडिओबुक्स
अॅप्स व ई-पुस्तकांच्या स्वरूपात आता मिळून जातात.
कृष्ण जगताप सरांनी अगदी छोट्या छोट्या कथांमधून अतिशय सुंदर अशी तात्पर्य लहान मुलांना सांगितलेली आहेत. लहान मुलांबरोबरच थोरामोठ्यांनाही या गोष्टींचा नक्की उपयोग पडेल. यातील बोधातून आपलं व्यक्तिमत्व घडवण्यास खूपच फायदा होणार आहे. अनेक मान्यवरांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत. या बालकथा संग्रहात कथन बरोबरच त्या त्या दिवसाची छान दिनविशेषही दिलेले आहेत. एक जानेवारीपासून सुरू झालेल्या कथांचा संग्रह 31 डिसेंबर पर्यंत चालू राहतो. प्रत्येक दिवसाची कथा या पुस्तकात दिलेली आहे. प्रत्येक कथा अतिशय सुंदर आहे. थोडक्यात शब्दात मोठा बोध देणाऱ्या कथा या पुस्तकात आहेत. मुलांच्या भाव विश्वाचा विचार करून त्यांनी प्रत्येक कथेचं संकलन केलं आहे. आपल्या कथेत त्यांनी जास्तीत जास्त निसर्ग आणि निसर्गातील प्राण्यांचा समावेश केलेला दिसून येतो. आता हीच कथा पहा ना माकड आणि मधमाशी. एकदम छोटीशी कथा आहे पण बोध खूप मोठा देऊन जाते.
मधमाशीचे पोळे पाहून एका माकडास मध खाण्याची इच्छा झाली. परंतु मधमाशीच्या नांगीचे दुःख केवढे असते याचा त्याला चांगलाच अनुभव असल्याने त्या पोळ्यास हात लावण्याचे धैर्य त्यास होईना. तेव्हा ते विचार करीत बोलू लागले, 'ज्या मधमाशीपासून इतका गोड आणि रुचकर मध उत्पन्न होतो त्याच मधमाशीच्या नांगीत भयंकर विष भरलेले असावे, हे खरोखरच मोठे आश्वर्य आहे !' ते ऐकून एक मधमाशी त्याला म्हणाली, 'अरे, अगदी खरं बोललास. माझा मध जितका मधुर असतो, तितकाच माझ्या नांगीचा दंश भयंकर असतो.'
तात्पर्य - देवाने एकाच ठिकाणी जसे काही गुण ठेवलेले असतात तसेच दोषही ठेवलेले असतात. हे लक्षात घेऊन त्या त्या वस्तूच्या गुणाचा उपयोग करून घ्यावा व दोष प्रकट न होतील अशी खबरदार घ्यावी हे चांगले.
सुविचार : प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किंमत शुन्य असते.
आवडली ना ही कथा! अशा खूप सुंदर सुंदर कथा या पुस्तकात आहेत. शिक्षण किती महत्त्वाचा आहे हे सांगणारी एक सुंदर कथा या पुस्तकात परीक्षा या नावाने आहे. ही कथा मलाही फार आवडली. जर आपल्या शिक्षणाचा समाजासाठी काहीच फायदा झाला नाही तर ते शिक्षण सार काही आहे व्यर्थ. असा मोलाची संदेश देणारी ही कथा आहे.
एकदा एका गुरुच्या आश्रमात तीन शिष्य अध्यात्माचे शिक्षण घेत होते. गुरुनी त्यांना अनेक उत्तमोत्तम विद्या शिकविल्या, अनेक प्रकारचे शिक्षण दिले. जेव्हा त्यांचे शिक्षण पूर्ण झाले तेंव्हा ते तीनही शिष्य गुरूंची आज्ञा घेवून घरी परत निघाले. थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांच्या असे लक्षात आले कि, आपण चालत असलेल्या रस्त्यावर भरपूर प्रमाणात काटे पसरले आहेत. पहिला शिष्य मनात म्हणाला, आपल्याला या काट्यांपासून बचाव करून मग घरी परतावे लागेल. तो हळूहळू काट्यांपासून वाचत घरी परतला. दुसरा शिष्य खिलाडू वृत्तीचा होता. त्याने उद्या मारत ते काटे पार केले व घरी जावून पोहोचला. तिसऱ्या शिष्याने मात्र असे न करता ते काटे उचलले व रस्त्याच्या एका बाजूने जमवून त्यांचा ढीग केला. असे करताना त्याचा हाताला पायाला खूप काटे टोचले, ओरखडले, रक्त आले पण त्याने आपले काम सोडले नाही. त्याने तो रस्ता स्वच्छ केला. तेवढ्यात त्या रस्त्याने त्यांचे गुरुजी आले. त्यांनी शिष्याचे हे काम पाहिले व पहिल्या दोन शिष्यांना बोलावणे पाठविले. काही वेळातच ते दोघेही तेथे परत आले. तेंव्हा गुरुंजी म्हणाले, पहिल्या दोघांचे अजून शिक्षण पूर्ण करावयास हवे कारण ज्यांना दुसऱ्याच्या उपयोगी आपले शिक्षण लावता येत नाही त्यांना शिक्षणाचा खरा अर्थ कळत नाही. तुम्ही लोकांसाठी काय करू शकता हे पाहण्यासाठी मीच या रस्त्यात काटे पसरून ठेवले होते. जो इतरांचे जीवन सुसह्य करतो तोच आयुष्यात मोठा होतो. एवढे बोलून त्यांनी तिसऱ्या शिष्याला आशीर्वाद दिले व घरी परतण्याची आज्ञा दिली.
तात्पर्य - शिक्षणातून समाजोपयोगी कामे झाल्यासच शिक्षणाचा फायदा आहे.
तेव्हा बाळकृष्ण जगताप सरांचे हे पुस्तक नक्की वाचा. आपल्याला लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हे पुस्तक त्यातील कथा खूप छान आहेत. बाळकृष्ण जगताप सर एक उपक्रमशील आदर्श शिक्षक असून त्यांनी आपल्या शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत .मुलांचे विषयीचे प्रेम आवड या आपुलकीच्या भावनेतूनच त्यांनी या कथांचे छान प्रकारे संकलन करून त्याला पुस्तक रुपी छान आकार दिला .बाळकृष्ण जगताप सरांच्या पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा .धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment