Wednesday, April 23, 2025

पुस्तक क्र ५५ परिमळ

 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ५५

पुस्तकाचे नाव - परिमळ काव्यसंग्रह

लेखकाचे नाव - संपादक दीपक चिकणे

प्रकाशन व आवृत्ती- प्रमोद प्रकाशन नेर्ले

पृष्ठे संख्या– ९४

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ८०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

५५||पुस्तक परिचय

परिमळ

संपादक

दीपक चिकणे

आपला भारत देश विविधतेत एकता टिकून राहणारा आहे .भारत हा सर्वात मोठा लोकशाही राज्य असलेला देश .आपल्या भारताला मातेचा दर्जा देतो .आणि प्रेमाने भारत माता असं म्हणतो .भारत मातेचे स्वातंत्र्यासाठी अनेक शूर जवानांनी अनेक क्रांतिकारक समाजसुधारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली . आणि भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिले .पण अजूनही आपला भारत देश दहशतवादाच्या काळ्या सावटाखाली भयभीत झालेला दिसतो .कालच जम्मू कश्मीर मध्ये पहेलगाम येथे पर्यटकांवर अमानुष गोळीबार करण्यात आला .धर्माच्या नावावर केलेला हा अत्याचार मुळीच खपवून घेणार नाही .भारतात असंतोष निर्माण करण्यासाठी चाललेले हे षडयंत्र भारत त्याला नक्कीच प्रत्युत्तर देईल .पण अशा काही कारवायांनी आमच्यात असलेली एकता मात्र कधीच भंग पावणार नाही .आमच्या एकतेचा सामाजिक तेचा परिमळ सर्वत्र असाच कायम पसरत राहील .माणसाच्या माणुसकीचा गंध असाच सर्वत्र पसरत राहणार हे . आपण आपल्यातली माणुसकी फक्त विसरता कामा नये .जम्मू कश्मीर मध्ये बळी पडलेल्या सर्व निष्पाप जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली .आज जागतिक पुस्तक दिन पुस्तके आपल्याला माणुसकीने राहिला शिकवतात . खरे मित्र आपले कोण असतील तर ही पुस्तकेच असतात.पुस्तकांच्या मध्ये कधीच कुठली इर्षा मतभेद किंवा भांडण तंटा नसतो .ती कायम आपल्याला मार्गदर्शनाचे काम करतात .असेच विविधतेतून एक झालेल्या या काव्यसंग्रहाचा परिमळ सर्वत्र पसरलेला आहे हे नक्की .महाबळेश्वर तालुक्यातील काही शिक्षक एकत्र येतात आणि आपल्या लेखणीतून विविध कविता शब्दबद्ध करतात आणि त्यातून त्यांचे मार्गदर्शक आदरणीय दीपक चिकणी सर एक सुंदर असा प्रतिनिधी काव्यसंग्रह निर्माण करतात तोच हा परिमळ काव्यसंग्रह .

हा काव्यसंग्रह पाचगणी महाबळेश्वरच्या घाटमाथ्यावर आणि शिवसागराच्या दर्या खोऱ्यात पवित्र ज्ञानदान करणाऱ्या जिवाभावाच्या शिक्षक मित्रांना त्यांनी समर्पित केला आहे .

महाबळेश्वर आणि पाचगणी म्हणजे आमच्या महाराष्ट्रातील जम्मू आणि काश्मीर .थंड हवेचे ठिकाण .सर्वच पर्यटकांना हवेहवेसे वाटणारे आणि थंड हवेचा भर उन्हात गारवा देणारे असे हे ठिकाण .येथे आलेले हे सर्व गुरुजन वर्ग इथे रमल्याशिवाय राहत नाहीत .अशाच कवी मनाच्या गुरूकडून त्यांच्या लेखणीतून साकारलेला असा हा सुंदर काव्यसंग्रह .

काव्यसंग्रहात ज्यांच्या लेखणीचा दरवळ पसरलेला आहे असे गुरुजन आहेत .


योगिता राजकर


नजमा कुरेशी


आश्विनी जाधव


रुपाली कारंडे


अंकुश लोखंडे


दीपक चिकणे


राजेंद्र पिसाळ


लक्ष्मण नरुटे


विनोद कुमठेकर


विलास मासाळ


विष्णू ढेबे


श्रीगणेश शेंडे


संजय गंगावणे


संजय संकपाळ


संतोष ढेबे


संतोष बनकर


हनुमंत जगताप


.या सर्वांनी आपल्या मनाला भावलेल्या विविध घटना, प्रसंग, निसर्ग यांचे रेखाटन आपल्या काव्यातून करून हा काव्यसंग्रह साकारला आहे.

 यातील बरेचसे गुरुजन वर्ग माझ्या परिचयाचे आहेत. मलाही शब्दांची आणि काव्यांची आवड असल्यामुळे या आवडीमुळेच हे गुरुजन वर्ग माझ्या ओळखीचे आहेत. आदरणीय योगिता राजकर मॅडम यांची पहिलीच सांज ही कविता मनाला वेडावल्याशिवाय राहत नाही. सांज अबोली या कवितेतून त्या म्हणतात, 

सांज अबोल अबोली 

हसू आसू खेळवत 

एक पान दिवसाचे 

मिट्टी अलबत

ही सांज अबोली असली तरी बरंच काही आपल्या शब्दातून बोलून जाते. कुरेशी मॅडम आपल्या काव्यातून सखी विषयी सांगताना म्हणतात, 

ती आहे मानिनी ती आहे तेजस्विनी 

घर संसार सांभाळून निष्ठेने कर्तव्य बजावणारी

खरंच स्त्री मनाचा मागवा घेणारी ही कविता खूप सुंदर आहे .

अश्विनी जाधव आपले स्वप्न कवितेत खूप छान म्हणतात काही झालं तरी स्वप्न बघायची सोडायची नसतात मनातल्या कोपऱ्यात मात्र त्यांनाही जपायचं असतं .

रूपाली कारंडे मॅडम आपल्या सर सुखाची या कवितेतून सर्वांना सांगतात व्यक्त हो अभिव्यक्त हो तू

मनातलं मळभं वाहून दे तू

मग बघ 

सर सुखाची येते ना

अंकुश लोखंडे प्रेमाविषयी आपल्या कवितेतून छान व्यक्त होतात खर खोटं प्रेयसी या त्यांच्या कविता खूप छान आहेत .दीपक चिकणे सर आपल्या पानिपत कवितेतून व्यक्त होताना म्हणतात ,

अस एक वारूळ शोधायचे मला

 तुटून पडणाऱ्या मुंगळ्यांसारखं

 असं एक मुंगूस शोधायचे मला

 तोडून जोडणाऱ्या

 सर्पाला 

दो हातानी

 गोळा करायचीय मला

 कीड भ्रष्टाचाराची 

मतलबाची

या कवितेतून किती सुंदर त्यांनी संदेश दिलेला आहे .शब्दांचा अर्थ आणि भावना बरंच काही सांगून जाते .

राजेंद्र पिसाळ यांनीही समाज प्रबोधन पर छान कवितांचे लेखन घेतले आहे मोबाईल या कवितेतून मोबाईलचे दुष्परिणाम ते अतिशय बालभाषेत सांगत आहेत .लक्ष्मण नरुटे सर आपल्या कवितेतून कविता म्हणजे नक्की काय याविषयी खूप छान विवेचन करतात .

ती कवितेला म्हणतात

भावनेला आवर घालून

संयमाचा बांध घातलास

डोळ्यातील अश्रू लपवून

शब्दांना आकार दिलास

विनोद कुमठेकरांनीही आपल्या भावना आपल्या कवितेतून खूप छान रित्या मांडल्या आहेत .

विलास मासाळ यांनी आपल्या कवितेतून कमवा आणि शिका योजनेची अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे .राजगड महाबळेश्वर यांचे वर्णन करणाऱ्या सुंदर कविता त्यांनी लिहिले आहेत .विष्णू ढेबे सरांनी राष्ट्रपिता गांधी बापू यांचे विषयी सुंदर कविता लिहिली आहे .आज जागतिक पुस्तक दिन या निमित्ताने ग्रंथांचे नाते कसे असते याची सुंदर माहिती दिलेली आहे .

संस्काराचे सूत जुळवू 

सुविचारांचे कण मिळवू

 पुस्तकांकडे मन वळवू

 विचार वृक्ष मनी लावू


वाड्.मयाची कास धरू 

विद्वतेचे अमृत पिऊ

 उच्चतेने स्थितप्रज्ञ होऊ

 पुस्तकांच्या गावी जाऊ

श्रीगणेश शेंडे आपल्या कवितेतून सामाजिक प्रबोधन छान केले आहे .

आपला भारत देश हा देशी खेळांची खान आहे .असेच वेगवेगळे आनंदाचे खेळ आपण खेळूया असे ते आपल्या कवितेतून उत्तमरीत्या सर्वांना सांगतात .आपल्या गुरुमाऊली कवितेतून गुरूंचे वर्णन करतात आणि शेवटी म्हणतात ,

अशी आहे आमची गुरुमाऊली 

हवी मला त्यांची नित सावली

संजय गंगावणे सर जीवनाचा सारीपाठ

या आपल्या कवितेतून जीवन कसे जगावे याची छान रेखाटन करतात

जीवन हे ऊन सावलीचा खेळ

त्याचा नसतो कधीच ताळमेळ

कधी कधी उन्हाचे चटके

कधी शितल छाया पूर्णवेळ

जीवनाचा अर्थ त्यांनी काव्यपंक्तीतून शब्दबद्ध केला आहे .

संजय संकपाळ यांनी कोजागिरी मधून त्या सणाचे छान वर्णन केले आहे .काल आज आणि उद्या यामधून ते सर्वांचं प्रबोधन करताना दिसतात .कालच आपण बघितलं जम्मू कश्मीर वर झालेला दहशतवादी हल्ला .माणुसकी किती गरजेची आहे ते आपल्या कवितेतून सांगतात .

आज मी भीक मागतो आहे 

दहा पैशाच्या नाण्यांची नव्हे

माझ्या गरजा पूर्ण करण्याची नव्हे

तर समाजात हरवलेल्या माणुसकीची

दिवसेंदिवस ही माणुसकी हरवत चालली आहे .आपल्याला आपल्यातली माणुसकी टिकवून ठेवलीच पाहिजे .

संतोष ढेबे सर आपल्या याला जीवन ऐसे नाव या कवितेतून जीवन म्हणजे नक्की काय याची विवेचन करताना दिसतात .

भातुकलीचा खेळ मोडला

लावला संसाराचा डाव

कधी उपाशी कधी तुपाशी

याला जीवन ऐसे नाव

किती मार्मिक विवेचन त्यांनी येथे केलेल आहे .या काव्यसंग्रहातील सर्वच कविता खूपच छान आहेत .

संतोष बनकर सर अग्नी दिव्य या कवितेतून आपल्या नोकरीचा प्रवास लिहितात .आपले प्रेम गीतातून प्रेमासाठी नक्की काय काय करता येईल हेही उत्तम प्रकारे लिहितात .

हनुमंत जगताप सर यांनीही खूप छान कविता लिहिलेल्या आहेत .एक चंद्र या कवितेतून चंद्राच्या विविध कला आणि त्यामागच्या विविध भावना ते मांडताना दिसतात .

नाही अबोल माझे

शब्द हे अर्थावीणा

असतो प्रवास माझा

फक्त केविलवाणा

चंद्र स्वतः बोलत असलेचा भास या कवितेतून होतो .या कवितेतून तर म्हणतो सगळ्यांनी दुर्लटलं तरी मी गणेशाच्या आरतीत कायम मात्र आहे .

या पुस्तकातील सर्वांनी खूप छान कविता लिहिलेल्या आहेत .सर्वांच्या लेखणीला माझा सलाम .तुमच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा .

तेव्हा नक्की वाचा सर्वांनी हा काव्यसंग्रह .

धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment