Sunday, April 13, 2025

पुस्तक क्र . ४५ माणसं जोडावी कशी ?

 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ४५

पुस्तकाचे नाव -  माणसं जोडावी कशी ?

लेखकाचे नाव - शिवराज गोर्ले

प्रकाशन  व आवृत्ती-  राजहंस प्रकाशन पुणे अकरावी आवृत्ती

पृष्ठे संख्या–  १८५

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २४०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

४५ ||पुस्तक परिचय

माणसं जोडावी कशी ?

शिवराज गोर्ले

माणूस हा समाजशील प्राणी आहे .समाजाशिवाय माणूस हा माणसासारखा राहू शकत नाही .म्हणून माणसाला माणूस जोडून राहणं खूपच गरजेचे आहे .माणसं जोडणं घरातील असो नाहीतर बाहेरची असो कायम आपण जोडत राहिलं पाहिजे .माणसं जोडावी कशी ? या पुस्तकात शिवराज गोर्ले यांनी माणसं जोडण्याचे अतिशय सुंदर असं मर्म दिलेले आहे.

माणसे जोडणे म्हणजे काय ?

सुरुवातीला याचे विवेचन करताना त्यांनी सर्व पुस्तकाचा सार त्यातच दिला आहे. एवढं वाचलं कीच मनाच समाधान होतं आणि ते शब्द आहेत,

माणसं जोडणं म्हणजे माणसांना प्रभावित करणं, माणसांवर प्रभुत्व गाजवणं नव्हे. माणसं जोडणं म्हणजे मनमोकळं, मतमोकळं असणं. मनाचं मनाशी नातं जोडणं. माणसं जोडणं म्हणजे अंतरीच्या जिव्हाळ्यासाठी 'जिवंत' निमित्तं शोधणं.


माणसं जोडणं म्हणजे प्रत्येक माणूस वेगळा असतो, याचं भान ठेवणं. 'वेगळंपण' जपता जपता 'जुळलंपण' ही जोपासणं. माणसं जोडणं म्हणजे स्वतःला 'हरवणं' नव्हे, तर नात्यांच्या माध्यमातून स्वतःचाच शोध घेणं.


माणसं जोडणं म्हणजे कुणीच परिपूर्ण नसतं हे सत्य स्वीकारणं. आपण स्वतःच्या चुकांकडे पाहतो, तसंच इतरांच्या चुकांकडे पाहणं.


माणसं जोडणं म्हणजे स्वतःला 'मोठं' करण्यासाठी कुणाला कमी न लेखणं; नाउमेद न करणं. माणसं जोडणं म्हणजे सौजन्याची साथ धरणं.

आपल्या व्यक्तित्वातील काटे इतरांना बोचणार नाहीत, याची दक्षता घेणं. सहज, स्वाभाविक, वागणं, पण स्वभाव बदलताही येतो, याची जाण ठेवणं.


माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला 'तो आहे' तसा स्वीकारणं. आपल्या अपेक्षा, आपली मतं इतरांवर न लादणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं. फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं.


माणसं जोडणं म्हणजे माणसांवर 'शिक्के' न मारणं. समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं.


माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे, तर प्रतिसाद देणं. रागाचंही रूपांतर लोभात करता येणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं.


माणसं जोडणं म्हणजे अपमानाचा बदला मानानं घेणं, टीकाकारांचीही दाद मिळवणं. मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे, हे ओळखणं. माणसं बदलली, तरी इतिहास न बदलणं. जिव्हाळा जपता आला नाही, तरी कटुता टाळणं.

माणसं जोडणं म्हणजे मदतीची संधी घेणं. इतरांचं शक्य तितकं भलं करणं. भलं करता आलं नाही, तरी नुकसान न करणं... कुणाची संधी हिरावून न घेणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांना वापरणं नव्हे, तर त्यांना आपल्या स्वप्नात सहभागी करून घेणं.


माणसं जोडणं म्हणजे कृतज्ञ राहणं, श्रेयाच्या मोहात न पडणं. माणसं जोडणं म्हणजे समाजाचं ऋण चुकतं करणं, स्वहित साधता साधता, 'स्व' विस्तारत नेणं.


माणसं जोडणं म्हणजे 'कामाचे संबंध' सुरळीत ठेवणं. संबंधांइतकंच कामाला महत्त्व देणं. कामाशी प्रामाणिक राहणं, आवश्यक तिथं ठाम राहणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांना प्रेरित करणं, दिशा देणं.


माणसं जोडणं म्हणजे नाती बदलू शकतात, याचं भान ठेवणं. 'इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन' हे टाळणं. नात्यांमध्येही एकमेकांसाठी पुरेसा अवकाश ठेवणं.


माणसं जोडणं म्हणजे 'तुझ्या गळा, माझ्या गळा' हे गाणं आळवणं. माणसं जोडणं म्हणजे माणसाचा धर्म पाळणं, माणसं जोडण्यातल्या 'यशा'चा आनंद अनुभवणं.

या त्यांच्या सुरुवातीच्या शब्दातूनच आपल्याला अनेक गोष्टींचा बोध होतो माणसे जोडणे किती महत्त्वाचा आहे आयुष्यात खरंच हे मी पदोपदी अनुभवत आहे. 

मजेत जगावं कसं या पुस्तकाच्या यशानंतर शिवराज सरांनी माणसं जोडावी कशी या पुस्तकाची निर्मिती केली. त्यांची दोन्हीही पुस्तकं खूप सुंदर आहेत. वाचन साखळी कडूनच मला हे पुस्तक बक्षीस रूपात भेट म्हणून मिळालेल आहे.

माणसं जोडावी कशी या पुस्तकात एकूण आठ विभाग केलेले आहेत. यामध्ये स्वतःपासून इतरांकडे ,माणसांची किंमत ,हे नाते जुळले मनाशी मनाचे, मानवी मनाचे रहस्य ,तुम्ही कसे आहात? तुम्ही कसे बोलता? तुम्ही कसं वागता! आणि तुम्ही कसं जगता ?याची उदाहरणांसह शिवराज सरांनी अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे.  

शिवराजजी आपल्या प्रस्तावनेत असं म्हणतात की, माणूस माणसाशिवाय जगू शकत नाही! 

असं म्हणतात, आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसाला दुरावत चाललाय. माणसा-माणसातला संवाद तुटत चाललाय. पण खरंच असं म्हणता येईल का? ज्या वेगानं आज (निदान भारतात तरी) मोबाइल फोन्सची संख्या वाढते आहे-ज्या प्रचंड प्रमाणात लोक मोबाइलवरून एकमेकांशी बोलताहेत त्यावरून काय दिसतं ? ही केवळ आजची एक फॅशन म्हणायची, की माणसाची एक 'पॅशन' मानायची? एक फॅड म्हणायचं, की गरज समजायची?

माणसाला आजही संवादाची भूक आहेच. संबंधांची आणि सहवासाचीही भूक आहे. माणसाला 'माणसां'ची ओढ आहे आणि ती राहणारच.

ज्याला माणसांची ओढ नसेल, असा कुणी महाभाग... असा कुणी माणूस... या जगात असू शकतो का?

किती सुंदर विवेचन त्यांनी केलेल आहे . खरं पाहायला गेलं तर मी त्यांच्या पुस्तकात काय वाचलं यापेक्षा ती पुस्तक जसं आहे तसंच इथे तुम्हाला सांगावसं वाटतं. प्रत्येक शब्दात विलक्षण अर्थ दडलेला आहे. पुस्तक वाचलं ना तर तुम्हीही माणसं तोडण्यापेक्षा माणसं कशी जोडता येतील याचाच विचार जास्त कराल .

माणसं जोडण्याची मंत्राक्षरी त्यांनी फार छान दिलेली आहे . यात काही मंत्र त्यांनी दिले आहेत .

सहा शब्दांचा मंत्र 

माझी चूक झाली, हे मान्य आहे.


पाच शब्दांचा मंत्र 

हे तू फारच छान केलंस !


चार शब्दांचा मंत्र 

तुझं मत काय आहे?


तीन शब्दांचा मंत्र 

एवढं प्लीज करशील?


दोन शब्दांचा मंत्र 

आभारी आहे.


एका शब्दाचा मंत्र 

आपण


किती छान मंत्र आहेत ना हे. कधी कधी हे सार आपल्याला माहित असूनही आपण मात्र आपल्या स्वभाव धर्मानुसार तसेच वागत असतो .

माणसं  कशी जोडावीत यासाठी शिवराज जी पु ल देशपांडे यांचं उत्तम उदाहरण देतात .कारण पु लं इतकं कोणतं बोलकं उदाहरण द्यावं याचं त्यांना प्रश्न पडतो .

महाराष्ट्राचं हे लाडकं व्यक्तिमत्त्व मुळात बोलकं होतं. केवळ 'गप्पांसाठी अमाप जागरणं करण्याची ताकद' या जोरावर अनेकांशी आपली मैत्री टिकून होती, असं 'पु.लं. 'नीच म्हटलेलं आहे. 'हसवण्याचा धंदा' हा नंतर तेजीत आला, पण मुळात त्यांना 'हसवण्या'ची दांडगी हौस होती.


'पु.लं. 'ना बोलण्याचा सोस होता, हे तर खरंच; पण बोलण्यासारखं त्यांच्याकडे सतत काही ना काही असायचं, हे महत्त्वाचं आहे. मुख्य म्हणजे जीवनातल्या सर्व अंगांमध्ये त्यांना मनापासून स्वारस्य होतं, कुतूहल होतं. एकदा योगायोगानं पुणे ते मुंबई डेक्कन क्वीनच्या प्रवासात मला 'पु.लं. 'च्या शेजारची सीट मिळाली होती. (त्यावेळी अर्थातच सुनीताबाई सोबत नव्हत्या!) मी 'एम.बी.ए.' केलंय, हे कळल्यावर 'पु.लं. 'चा चेहरा खुलला. 'अरे वा' म्हणत नंतर त्यांनी तास-दीड तास माझ्याशी 'मॅनेजमेंटमधील बदलते ट्रेण्ड्स' या विषयावर चर्चा केली, सॉरी, गप्पा मारल्या.

तुम्ही काहीही बोललात तर कोण ऐकून घेईल? बोलणं वेगळं आणि बडबड, बकबक वेगळी. ती सगळ्यांनाच चालते, असं नाही. मुळात तुमच्याकडे सांगण्यासारखं काहीतरी हवं. अनुभव तर असतातच, पण नवं वाचलेलं, ऐकलेलं इतरांना सांगण्याची हौस हवी आणि सांगण्याची थोडीबहुत 'नॅक' हवी, शैली हवी.आणि माणसाकडे ही शैली नसली तर त्याने आवर्जून ही शैली आपल्याकडे घ्यावी असं मला मनोमन वाटतं . तुम्ही हे पुस्तक आवर्जून वाचलंच पाहिजे.  शेवटी या पुस्तकातील चार ओळी मला सर्वांसाठी सांगाव्याश्या वाटतात .

माणसं गुंतागुंतीची असतात नातीही गुंतागुंतीची असतात... तरीही आपल्याला ती हवी असतात.

म्हणूनच आपण माणसांची किंमत आणि नात्यांतली गंमत या पुस्तकातून  समजून घेतली.

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment