वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ४४
पुस्तकाचे नाव - शब्दांचे सामर्थ्य
लेखकाचे नाव - संपादक राम प्रधान
प्रकाशन व आवृत्ती- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई प्रथम आवृत्ती २०००
पृष्ठे संख्या– ४५६
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ३७५
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
४४ ||पुस्तक परिचय
शब्दांचे सामर्थ्य
संपादक राम प्रधान
हिमालयावर येता घाला
सह्यागिरी धावून आला
सह्याद्री सारखे उंच व्यक्तिमत्व असलेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी हे उद्गार नेहमीच बोलले जातात .आणि ते खरेच आहेत . नावाप्रमाणेच यशवंत असे व्यक्तिमत्व .
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि स्वतंत्र भारताचे एक अत्यंत प्रभावशाली राजकारणी होते. त्यांना ‘सह्याद्रीचा सिंह’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या विचारांत राष्ट्रवाद, समाजवाद आणि लोकशाही मूल्यांचा मजबूत पाया होता.
आदरणीय यशवंतराव जेवढे मोठे राजकारणी होते तेवढे मोठे ते साहित्यिक ,लेखक ,वक्ते होते.
त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य आदरणीय राम प्रधान यांनी शब्दांचे सामर्थ्य या पुस्तकात त्यांच्या काही निवडक प्रसंगातून भाषणातून आपल्यासमोर मांडले आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये एक शिक्षण परिषद आयोजित केली होती त्या परिषदेला मी ज्यावेळेस उपस्थित झाले त्यावेळेस या पुस्तकाची खरेदी मी त्या ठिकाणाहून केली होती.
राम प्रधान संपादित "शब्दांचे सामर्थ्य" हे पुस्तक मराठी भाषेतील एक महत्त्वपूर्ण साहित्यकृती आहे. या पुस्तकात प्रधान यांनी शब्दांच्या प्रभावी वापराचे महत्त्व, त्यांची ताकद आणि समाजावर होणारा परिणाम यांचा सखोल अभ्यास केला आहे. विशेषतः, हे पुस्तक यशवंतराव चव्हाण यांच्या लेखन, साहित्य आणि भाषणांचे संकलन आहे, ज्यातून त्यांच्या विचारसरणीची आणि भाषा शैलीची झलक मिळते .
"शब्दांचे सामर्थ्य" हे पुस्तक यशवंतराव चव्हाण सेंटरच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे .
राम प्रधान हे एक प्रख्यात प्रशासक, लेखक आणि विचारवंत होते. त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून कार्य केले. १९९०-१९९२ या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांना १९८७ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
"शब्दांचे सामर्थ्य" हे पुस्तक वाचकांना भाषेच्या ताकदीची जाणीव करून देतं आणि प्रभावी संवादासाठी मार्गदर्शन करतं. हे पुस्तक साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि वक्तृत्वकलेत रुची असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
आदरणीय राम प्रधान या पुस्तकात मनोगतात आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी बोलताना म्हणतात,
राजकारण व साहित्य यांच्यामध्ये समन्वय साधणारे यशवंतराव चव्हाण एक दुर्मीळ पुढारी होते. 'राजकारण व साहित्य दोघांचेही माध्यम शब्द आहे. राजकारणी हे साहित्यिकांचे शब्दबंधू असतात,' असे प्रतिपादन करताना त्यांनी म्हटले, 'शब्दाच्या सामर्थ्यावर व सौंदर्यावर माझा नितांत विश्वास आहे. नवनिर्मितीचे सर्जनशील कार्य शब्द करतात, तसेच, साम्राज्यशक्ती धुळीला मिळविण्याचे संहारक सामर्थ्यही शब्दांत आहे. कल्पना, विचार आणि शब्द ही मानवी इतिहासातील एक जबरदस्त शक्ती आहे.'
आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी थोडच आहे त्यांच्या शब्दांच्या सामर्थ्यापुढे आपल्या शब्दांचे सामर्थ्य पिके पडते. शब्दांची सामर्थ्य या ग्रंथातील प्रत्येक वाक्य विचार व भाषाशैली यशवंतराव चव्हाणांचे आहे त्याची रचना करताना यशवंतरावांची ओळख महाराष्ट्राच्या नवीन व पुढील पिढीला उपयुक्त स्वरूपात व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राम प्रधान यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे त्या अनुषंगाने यशवंतरावांच्या लिखाणाचे चार भाग केले आहेत .
एक संस्कार
दुसरा व्यक्ती
तिसरा विचार आणि
चौथा चिंतन
पहिल्या भागात यशवंतराव चव्हाणांवर झालेले संस्कार दिसून येतील तसेच त्यांची जडणघडण कशाप्रकारे झाली याचीही माहिती आपल्याला मिळेल.
दुसरा भाग हा व्यक्तींविषयी आहे यशवंतरावांची वृत्ती ही लोकसंग्रहाची होती .त्यामुळे अनेक व्यक्तींशी त्यांचे मैत्रीचे आणि घनिष्ठ संबंध होते . त्यामध्ये जसे राजकारणी होते तसेच समाजसेवक पत्रकार उद्योगपती ,नट नट्या, निरनिराळ्या क्षेत्रातील लेखक साहित्यिक कलाकार होते . त्याचबरोबर ज्या मातीतून यशवंतराव निर्माण झाले त्या कृष्णा कोयना परिसरात स्वातंत्र्य युद्धात ज्यांनी झेप घेतली, त्या भागात प्रत्येक गावात अनेक व्यक्तींशी त्यांचे प्रेमाचे घनिष्ठ संबंध होते आणि याच व्यक्तींपैकी काही निवडक व्यक्ती विषयी त्यांनी जे लिहिले आहे त्याचे संकलन या भागात आहे.
तेव्हा त्यांनी ज्या व्यक्ती विषयी लिहिले तेही पुस्तक वाचून तुम्हाला कळेल.
तिसरा भाग हा विचारांचा यशवंतरावांनी मांडलेले विचार या भागात दिलेले आहेत त्यांच्या विचारांचा वारसा अनेक क्षेत्रातील सामान्य व्यक्तींसाठी तसेच विद्वानांसाठी एक अमाप खजिना आहे .आणि हाच खजिना या भागात दिलेला आहे .
शेवटी चौथ्या चिंतन या भागात यशवंतरावने आपल्या जीवनाचे केलेले सिन्हा व लोकल तसेच दृष्टिक्षेप समाविष्ट आहे .यात विविध लेखांची मालिका आहे .ही तर नक्कीच वाचायला हवी .
आदरणीय राम प्रधान म्हणतात या पुस्तकाचे खरे मालक आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब कारण हे सगळे शब्द फक्त त्यांचे आहेत आणि याचे संकलन रामप्रधानांनी केलेल आहे .
खरोखर थोर व्यक्तींची अशी माहिती आणि जीवन चरित्र वाचलं की आपल्यालाही प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही .
शब्दांचे सामर्थ्य खरोखर खूप मोठे आहे .शब्द एखाद्याशी नाते जोडतात ही आणि एखाद्याशी नातं तोडतात .ही शब्दांची तलवार ही एक प्रभावी शस्त्र आहे हे कसं चालवायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे .
शेवटी एवढच एका कवितेतून मला म्हणावसं वाटतं
शब्द हे मंत्र, शब्द हे शस्त्र,
शब्द हे उगम, शब्दच अस्त्र।
त्यांचं सामर्थ्य अनंत असतं,
म्हणून शब्द नेहमी जपून वापरावं लागतं।
तेव्हा नक्की वाचा हे पुस्तक !
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment