वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-१९
पुस्तकाचे नांव- वास्तव
लेखकाचे नांव- श्री . किरण हिंदुराव भिलारे
प्रकाशन व आवृत्ती- अनघा प्रकाशन ,ठाणे,प्रथमावृत्ती २०२१
पृष्ठे संख्या– ९६
किंमत /स्वागत मूल्य-- १३०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१९||पुस्तक परिचय
वास्तव
लेखक / संकलक - कवी श्री . किरण हिंदुराव भिलारे
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
वास्तव हा माझ्या बालमित्राने लिहिलेला पहिला कविता संग्रह. या कविता संग्रहाचे परीक्षण करण्याचे भाग्य मला लाभलं हे माझ नशीबच.कवितासंग्रहाचे कवी श्री. किरण हिंदुराव भिलारे पहिलीपासूनच आम्ही एकत्र शिकलेलो. एकाच गावात एकाच आळीत राहिलो आहोत .आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो, लहानपणापासून मी पाहत आलेली आहे त्याच्या अभ्यासासाठी आई आणि आप्पांची धडपड अजूनही माझ्या डोळ्यासमोर दिसते. मुळातच किरण लहानपणापासून खूप हुशार. अगदी एकपाठी. कंदीलाच्या प्रकाशात त्याने केलेला अभ्यास त्याला यशदायी प्रवासाकडे नक्कीच घेऊन गेलेला आहे. आपल्या नावाप्रमाणे आपल्या यशाचे किरण त्याने चौफेर पसरले. खरे वास्तविक जीवन काय आहे ते सगळ्या जगासमोर आणलेल आहे .किरणचा मला खूप अभिमान वाटतो .अभिमान वाटावं असेच ते व्यक्तिमत्त्व आहे.
सध्या किरण वित्त व लेखा अधिकारी वर्ग एकच्या पदावर कार्यरत आहे .त्याचे सिद्धहस्त लेखणीतून हा वास्तव कविता संग्रह साकारला गेला आहे . कुटुंब नातेवाईक काय असतात हे सगळं त्याच्या या कवितेतून त्याने अतिशय सुंदर मांडलेल आहे .किरण प्रशासकीय व्याप सांभाळत कविता करणे काही साधी सोपी गोष्ट नाही .पण किरण कसलीही लढाई खंबीरपणे आणि प्रयत्न करून लढणारा .असा हा किरण नक्कीच त्यांन संसारगाडा ओढत असताना शितल वहिनींची त्याला लाभलेली साथ त्याला अनेक यशाची दार खुली करून गेली.
या कवितासंग्रहात एकूण 77 कविता आहेत .
कवितेतील शब्दांची गुंफण ज्याप्रमाणे माळेतील मणी एक एक गुंफून जशी सुंदर माळ तयार होते त्याचप्रमाणे शब्दातून मनाला उभारी देणारी कविता तयार झाली आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कवितासंग्रहाला गीतकार प्रवीण दवणे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. आपल्या प्रस्तावनेत ते अतिशय सुंदर असं कवितासंग्रहाचे कौतुक करताना आपल्याला दिसत आहेत ते म्हणतात,
संवेदनशील मनाने जगताना भोवतीच्या वास्तवाची अनेक पदरी धग 'वास्तव' या कविता ग्रहाच्या माध्यमातून कवी किरण भिलारे यांना जाणवलेली आहे. माणसांच्या बेगडीपणाचे, बदलत्या मुखवट्यांचे मनाला दंश करणारे दर्शन कवितेतून प्रकट होते. ग्रामीण भागातील कृषिवलांचे उमाळे व उसासे, श्रद्धेचा लाजिरवाणा बाजार या कवीने टिपला आहे. अशा भेदक वास्तवाच्या, होरपळीच्या या कविता म्हणजे आजच्या माणसाच्या अंतर्मनातील अव्यक्त स्पंदनांचा आक्रोशच आहे. मात्र याचबरोबर या वास्तवाला शरण न जाणारी आत्मप्रबळता 'युद्ध' या कवितेपासूनच जाणवते.
स्वप्न ,इच्छा , कर्मवीर,सत्य , खंत, बाप, वर्तमान, संसार ,आई ,झुंडबळी , कोरोना ,तुझ्यासाठी बळीराजा, घोषणा, कायदा, देवा तुझं वागणं ,डाग मनातले, कुरुक्षेत्र, अंधश्रद्धा , आणि प्रेमात तुझ्या अशा वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या कविता किरण यांनी आपल्या कवितासंग्रहात अतिशय सुंदर अशा भावनेने ओतप्रोत लिहिलेल्या आहेत.
आपल्या वर्दी या कवितेत ते म्हणतात ,
वर्दीला सण नसतो
वर्दीला शीण नसतो
वर्दीला रजा नसते
वर्दीला मजा नसते
खरचं वर्दी घालणारांनांच वर्दी काय आहे ते कळते.
जीवन या कवितेत ते म्हणतात ,
मदतीला दुसऱ्याच्या धावणे जरा अवघडच असते
नाहीतर साऱ्याच पायांना धावता आले असते
दान दुसऱ्यांना देणे जरा अवघडच असते
नाहीतर साऱ्याच हातांना देता आले असते
वास्तवतेचे भान आणि खरी वास्तविकता काय आहे हे या कवितेतून आपल्याला दिसून येतं.
असं वास्तव त्यांच्या प्रत्येक कवितेतून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच किरण भिलारे यांचा हेवा वाटतो .कविता संग्रह अतिशय उच्च दर्जाचा झाला आहे .या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठच खूप सुंदर असं दाखवलेल आहे .अवकाशात उभारलेली एक कुऱ्हाड आणि कष्टकरी सारी जनता पण त्या कुऱ्हाडीत चंद्राची कोरही दिसून येते म्हणजे जशी धारदार ती कुऱ्हाड आहे तशीच ती शीतल आहे फक्त आपल्याला त्या मागची वास्तविकता कळली पाहिजे अनघा प्रकाशन ठाणे यांच्याकडून हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे .पुस्तक खरोखरच अतिशय सुंदर अशी निर्मिती झालेली आहे. सर्वांनी वाचावं असे पुस्तक .
मनातील वास्तववादी विचार कवितेच्या ओळी ओळीतून प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणार असं हे काव्यसंग्रहाचे पुस्तक...
समाजातील जाणिवा व वास्तववादी जीवन यांची सांगड घालणारा हा काव्यसंग्रह निश्चितच समाजाला एक दिशादर्शक ठरेल....
! किरणच्या लेखणीला माझा नम्र पूर्वक सलाम 🙏🏻अशीच तुझी लेखणी या जगाच्या प्रवाहात अधिकाधिक धारदार होत जावी आणि त्यातून अनेक अक्षरमोती बाहेर पडावेत याच नाथ चरणी प्रार्थना🙏🏻✒️📚🌹 धन्यवाद.


No comments:
Post a Comment