वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- १० ३
पुस्तकाचे नाव - जडे जीव ज्याचा
लेखकाचे नाव - प्रवीण दवणे
प्रकाशन व आवृत्ती-नाविन्य प्रकाशन पुणे
पृष्ठे संख्या– ६८
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १००
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१० ३||पुस्तक परिचय
जडे जीव ज्याचा
प्रवीण दवणे
प्रवीण दवणे यांच्या जडे जीव ज्याचा तरलीका म्हणजेच चारोळी संग्रह खूप छान आहेत. एका कार्यक्रमात त्यांच्या सहीने हे पुस्तक माझ्यापर्यंत पोहोच झाले. मला हे पुस्तक हवच होते. या पुस्तकातील तरलीका अनेक भावभावनांचा अलगद वेध घेतात .कधी कधी वाचताना या आपल्या आयुष्याशी निगडित होतात .प्रवीण दवणे सर यांचीही खास शैली आहे .वाचकाच्या मनाला अलगद भुरळ घालते .वाजता वाजता आपण या पुस्तकाशी कधी एकरूप होतो हे समजतही नाही आणि उमजतही नाही .
प्रवीण दवणे यांची लेखनशैली ही अत्यंत हृदयस्पर्शी, भावनिक आणि अलंकारिक अशी आहे. त्यांची शैली वाचकाच्या मनावर गारुड घालणारी असून, ती अनुभवांवर आधारलेली आणि जीवनातील सूक्ष्म भावनांना स्पर्श करणारी असते.
कविता, ललित लेख, आत्मकथन, भाषण लेखन, निबंध अशा विविध साहित्यप्रकारांत ते लेखन करतात.
प्रत्येक प्रकारात त्यांची शैली सुसंगत राहते, पण भावनिक प्रभाव कायम राहतो.
त्यांच्या लिखाणातून जीवनाबद्दल आशावाद, सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते.
त्यांची भाषा ही सौंदर्यपूर्ण आणि काव्यमय असते. ते शब्दांना जणू आत्मा देतात.
उदाहरणार्थ, ते "आई" या विषयावर लिहिताना शब्दांतूनच आईची माया, वात्सल्य, त्याग दाखवतात.
त्यांच्या लेखनात सामान्य माणसाच्या संघर्षांची, भावना, मूल्ये, संस्कार यांची झलक दिसते.
उदाहरणार्थ, शिक्षक, विद्यार्थी, आई-वडील, ग्रामीण जीवन हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय आहेत.
क्लिष्ट शब्दांपेक्षा ते सहज समजणारी, प्रवाही भाषा वापरतात.
त्यांच्या शैलीत एक प्रकारचं “बोलकं लेखन” असतं, जणू ते वाचकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत.
प्रवीण दवणे यांची लेखनशैली ही भावनाशील हृदयातून आलेली शैली आहे. ती वाचकाच्या मनाचा ठाव घेते, विचार करायला लावते आणि नकळत डोळ्यात पाणी आणते. म्हणूनच त्यांचे लेखन काळजाला भिडणारे आणि मनात घर करणारे असते.
प्रसिद्ध मराठी कवी, लेखक व व्याख्याते प्रवीण दवणे सर यांच्या तरल, हृदयस्पर्शी शैलीतील एक अत्यंत भावविवश करणारे पुस्तक म्हणजे "जडे जीव ज्याचा". या पुस्तकात त्यांच्या ‘तरलीका’ या सदरातील निवडक लेखांचा आणि चारोळ्यांचा संग्रह आहे.
जडे जीव ज्याचा" हे पुस्तक भावनिक तरलतेने ओतप्रोत भरलेले आहे. यात त्यांनी आपल्या अनुभवातून, भेटलेल्या माणसांमधून, समाजातील घटनांमधून घेतलेल्या क्षणांना शब्दरूप दिले आहे. त्यांच्या शैलीला विशेष स्थान लाभले आहे—ती एकाच वेळी कविता, गद्य, चारोळी, व्याख्यान आणि आत्मकथनाचे मिश्रण आहे.
या पुस्तकातील काही निवडक चारोळ्यांसह आपण या पुस्तकाला अधिक समजून घेऊ शकतो .
मुक्या हुंदक्यांचे गाणे कुणाला कळावे ? छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे ! जडे जीव ज्याचा त्याच्याच का रे नशिबी असे घाव यावे !
पुस्तकाच्या सुरुवातीलाच या पुस्तकाचे नावावरून त्यांनी अतिशय समर्पक अशी ही चारोळी दिली आहे .
इतक्या गडद झोपेतून
मला कोणी जागवलं
कवितेनेच येण्यासाठी
कागद पेन मागवलं
कविता निर्मितीची किती सुंदर कल्पना या ठिकाणी प्रवीण सरांनी केली आहे .अशाच अनेक सुंदर सुंदर चारोळी या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतील .
वाट पाहतात पाऊलवाटा
जीव जडल्या मनांची
त्यांनाही तर ओढ असते उन्हामधल्या पावसाची
खरंच प्रेमात पडल्यावर जी ओढ असते ती या काव्यातून आपल्याला नक्कीच समजते .
शब्दांमधल्या आकाशात
चंद्र माझा भिजेल का ?
आकाशाचा शब्द होऊन
चांदण्यात रुजेल का ?
आपले शब्दांवर प्रेम करताना त्यांनी ही चारोळी खूप छान दिली आहे .
प्रेम किती उत्कट निरपेक्ष निष्पाप आणि अमाप असतं हे या पुढील चारोळी वरून आपल्याला समजून येईल
मी नाही राधा नाहीच मीरा
झुरणारी पण भोळी गवळण
श्वासामध्ये एक नाम जप
घट्ट जुळावा देवकीनंदन !
किती छान प्रेम यातून व्यक्त झाले .मला आवडलेली खूप सुंदर चारोळी आहे .
प्रवीण दवणे सरांच्या या पुस्तकातील सर्व चारोळी खूपच छान आहेत .प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे एवढे सुंदर हे पुस्तक .नक्की वाचा . धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment