वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ८६
पुस्तकाचे नाव - गुरुमंत्र
लेखकाचे नाव - संतोष सोनवणे
प्रकाशन व आवृत्ती- अनादी प्रकाशन कल्याण
पृष्ठे संख्या– १५२
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ३७५
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
८६||पुस्तक परिचय
गुरुमंत्र
संतोष सोनवणे
शब्दशः पाहता, "गुरुमंत्र" म्हणजे गुरुने दिलेला मंत्र किंवा मार्गदर्शन — असा विचार करता, गुरुमंत्राचा शैक्षणिक अर्थ असा होतो की, गुरु (शिक्षक) आपल्या विद्यार्थ्याला दिलेले मौल्यवान शिक्षण, मूल्यमंत्र, विचारधारा वा जीवनाचे मार्गदर्शन.
शाळेतील गुरुमंत्र म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेले शिकवणुकीचे मोलाचे वचन, प्रेरणादायक विचार, मूल्याधारित मार्गदर्शन — जे त्यांच्या शिक्षणात, आचरणात व भविष्यात उपयोगी पडते. हे गुरुमंत्र विद्यार्थ्यांच्या शिस्त, अभ्यास, आचारविचार, आत्मविश्वास, आणि सामाजिक जबाबदारी यावर सकारात्मक परिणाम करतात.
शिक्षक म्हणजे ज्ञानाचे झरे, आणि नवनवीन उपक्रम म्हणजे त्यांच्या ज्ञानाच्या ओंजळीतील अमृत! हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा काठोकाठ भरलेला दिवा उजळवतात. ते वेळोवेळी नवे प्रयोग, नवे उपक्रम राबवून शिक्षणात रंग भरतात, जणू ज्ञानाच्या बागेत विविध फुलांची लागवडच करतात.
कधी विज्ञानाचा प्रयोग, कधी गोष्टीच्या माध्यमातून शिकवलेले जीवनमूल्य, तर कधी खेळांमधून दिलेली शिस्त—प्रत्येक उपक्रम त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा असतो. विद्यार्थ्यांचे मन म्हणजे मृदू माती, आणि शिक्षक आपल्या नव्या कल्पनांच्या ओलाव्याने त्या मातीतून ज्ञानाचं पान फुलवतात.
अशा या नवनवीन उपक्रमांनी समृद्ध शिक्षकांची शाळा म्हणजे ज्ञानमंदिर, जिथे विद्यार्थ्यांची बुध्दी उजळते आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळते.
अशाच वेगवेगळ्या शिक्षकांनी केलेल्या नवनवीन उपक्रमांची एकत्रित मांडणी या गुरुमंत्र पुस्तकात झालेली आहे .
या सर्वांना एकत्रित करण्याचे काम संतोष सोनवणे सरांनी अतिशय सुंदर रित्या केलेला आहे .सरकारी शाळेमध्ये होत असलेले नवनवीन उपक्रम मुलांसाठी शिक्षक घेत असलेले कष्ट या पुस्तकाच्या पानोपानी तुम्हाला पाहायला मिळतील .
पुस्तकाचे संपादक स्वतः शिक्षक असल्यामुळे त्यांना प्रत्येक शिक्षकातील काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम हा दिसून आला .हे पुस्तक वाचत असताना जाणवले की या पुस्तकातील बरेचसे माझ्या ओळखीचेच आहेत .खंडू मोरे, वैशाली काकडे यांच्याशी चांगली ओळख आहे .
विविध उपक्रमांसह त्यांची चित्ररूप मांडणी यामधून त्या उपक्रमाचे नाविन्य आणि महत्त्व समजून येतं .या पुस्तकाला शिक्षण शास्त्राचे अभ्यासक अलंकार वारघडे यांची सुंदर प्रस्तावना मिळालेली आहे .आपल्या प्रस्तावने ते म्हणतात,
गुरुमंत्र' हे केवळ सरकारी शाळांमधील प्रयोगांचे डॉक्युमेंटेशन नाही तर आपल्या परिसरातील मुलांच्या शिकण्याच्या गरजा लक्षात घेऊन राबवलेले यशस्वी व नावीन्यपूर्ण उपक्रम आहेत. ते इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील व त्यातून एक चळवळ उभी राहील यासाठीचा हा प्रयत्न आहे. शिक्षक व पालक यांच्या नजरेतून हे पुस्तक लिहिल्याने शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तिंना उपयुक्त ठरणार आहे.
ग्रामीण, दर्गम आदिवासी भागातल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ही शिक्षकांची धडपड माध्यमांत पाहिजे तशी येत नाही. ती धडपड अनेकदा दर्लक्षित राहते. माध्यमांतील नकारात्मक बातम्यांतून तिकडच्या शाळा आणि शिक्षक यांची विशिष्ट प्रतिमा जाणीवपूर्वक तयार केली गेलीय. त्यातूनच सरकारी शाळा आणि शिक्षकांवर सतत होणाऱ्या विखारी शाब्दिक हल्ल्यांनाही सोनवणे यांनी शिक्षकांच्या क्रिएटिव्ह कामांची थेट उदाहरणेच समोर ठेवून दिलेले हे लेखी उत्तर आहे. यातून सरकारी शाळांची आणि तिकडे शिकवणाऱ्या शिक्षकांची विश्वासार्हता वाढायला मदत होईल, असा विश्वास वाटतो .
प्रत्येक शिक्षकाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील असे वैविध्यपूर्ण उपक्रम या पुस्तकात आहेत .
संगीताचा जादूगार शिक्षक फुलपाखरांची शाळा शोध गांधींचा साहित्यातून विज्ञान अनुभूती वाचन कट्टा निसर्ग शाळा चला मुलाखत घेऊयाप्रगत शाळेची कथा नाट्यीकरण मराठी भाषा संस्कार अंकशिडी खेळूया अशा अनेक 100 च्या वर विविध उपक्रमांची रेलचेल या पुस्तकात आहे .
संतोष सोनवणे सरांचा हा उपक्रम नक्कीच सर्व शिक्षकांना मार्गदर्शक ठरेल . पुस्तकरुपी या शब्दसंग्रहातून हे उपक्रम प्रत्यक्ष सर्व शिक्षक आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतील .
संतोष सोनवणे आपल्या मनोगत आहेत या पुस्तकाविषयी बोलताना म्हणतात,
आज जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकलीय. जीव ओतून धडपडणारे शिक्षक व त्यांचे कार्य हे समाजासमोर व इतर शिक्षकवर्गासमोर यावे ज्याद्वारे आपल्या कामाला एक दिशा व प्रेरणा मिळेल, हीच या लेखन प्रपंचामागील माझी प्रामाणिक भूमिका आहे.
त्यांची ही प्रामाणिक भूमिका खरोखरच सत्यात उतरली आणि आज हे पुस्तक माझ्या हाती लागले खरं तर ते मला एका पुरस्कार सोहळ्यात बक्षीस म्हणून मिळालेले आहे .
आणि हा बक्षीसरुपी गुरुमंत्र माझ्या हाती पडला आणि या नवनवीन उपक्रमांचा खजिनाच मला भेटला . प्रत्येक शिक्षकाने वाचावं असे हे सुंदर पुस्तक .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment