वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ७२
पुस्तकाचे नाव - आई समजून घेताना
लेखकाचे नाव - उत्तम कांबळे
प्रकाशन व आवृत्ती- लोक वाङमय गृह
पृष्ठे संख्या– १६०
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २००
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
७२||पुस्तक परिचय
आई समजून घेताना
उत्तम कांबळे
कालचा दिवस मातृदिन म्हणून सर्वत्र साजरा केला गेला .
तुझ्या पदराखाली ममतेची गार सावली,
दुःखातही हसणं शिकवणारी तूच दिव्य माऊली।
जगाच्या रस्त्यांवर जेव्हा अंधार वाटतो,
आई, तुझा हात धरला की उजेडच वाटतो .
पण मी मात्र कालचा दिवस आई समजून घेताना हे उत्तम कांबळे लिखित पुस्तक वाचून साजरा केला .काल हे पुस्तक वाचले आणि आज त्याचा परिचय आपणा सर्वांसाठी सादर करीत आहे याचा मला विशेष आनंद वाटतो .आपल्या वाचन साखळीचा उद्देशच आहे वाचत रहा ,वाचत रहा आणि फक्त वाचत रहा .पण हे वाचन विधायक आणि समाज उपयोगी आणि आपल्यात काहीतरी चांगलं बदल घडवून आणणार पाहिजे . आपल्या पुस्तक परिचयातून इतरांनाही प्रेरणा मिळाली पाहिजे असं आपलं वाचन असलं पाहिजे .
उत्तम कांबळे यांचा जन्म ३१ मे १९५६ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी या गावात एका शेतमजूर कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव बेळगाव जिल्ह्यातील शिरगुप्पी आहे. घरातील प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी कंपाउंडर, बाइंडर, वर्तमानपत्र विक्रेता, हमाल, बांधकाम मजूर अशी विविध कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी राज्यशास्त्रात पदवी मिळवली.
उत्तम कांबळे यांनी विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे, ज्यात आत्मकथन, कथा, कादंबरी, कविता, चरित्र, सामाजिक विश्लेषण आणि वैचारिक लेखन यांचा समावेश आहे. त्यांनी सुमारे ६३ पुस्तके प्रकाशित केली आहेत.
उत्तम कांबळे यांनी ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध व्यासपीठांवरून आपले विचार मांडले आहेत.
त्यांचे लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारसरणीवर आधारित आहे. त्यांनी समाजातील विषमता, जातिव्यवस्था आणि अन्यायाविरुद्ध आपल्या लेखनातून आवाज उठवला आहे.
आई समजून घेताना" हे पुस्तक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे यांनी लिहिलेले एक संवेदनशील आणि अनुभवाधिष्ठित आत्मकथन आहे. या पुस्तकात लेखकाने आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासात आईचे स्थान, तिची भूमिका आणि तिच्या योगदानाची जाणीव अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने मांडलेली आहे. हे केवळ एक आत्मकथन नसून, एका आईच्या रूपात समस्त मातृत्वाचा गौरव करणारे लेखन आहे.
लेखकाने आपल्या लहानपणापासून ते मोठेपणीपर्यंत आईने केलेल्या त्यागाची, समजुतीची आणि निस्सीम प्रेमाची गोष्ट सांगितली आहे. शिक्षण, गरिबी, जातिव्यवस्थेचा सामना करताना एक आई कशी खंबीरपणे पाठीशी उभी राहते, हे पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे.
लेखकांची भाषाशैली अतिशय साधी, प्रवाही आणि भावनांनी ओतप्रोत भरलेली.
उत्तम कांबळे यांची आई म्हणजे आक्का .त्यांच्याविषयी त्यांचे फॉर्मुला म्हणजेच पाण्याचा फार्मूला सांगताना खरंच सांगावं शहारे येतात .गरिबी आणि परिस्थिती काय असते या संघर्षातून जाणवतं .पाणी हे मुबलक आणि मोफत मिळते . पण या पाण्याचा फॉर्मुला वापरून अन्नाची काटकसर कशी करायची आक्काचा फॉर्मुला नंबर एक आहे .
लेखक उत्तम कांबळे या फॉर्मुल्या विषयी आपल्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिताना म्हणतात,
पोटातील भूक शमवण्यासाठी आक्कार्न जणू एक फॉर्म्युलाच तयार केला होता. माझ्या शब्दांत पाणी फॉर्म्युला ! भूक जास्त लागली असेल आणि खाण्यासाठी अन्न कमी मिळत असेल तर जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यावं... जेवता जेवताही प्यावं आणि जेवणानंतरही प्यावं... सबब अन्नाऐवजी पाण्यानेच पोट भरतं... कमी अन्नात भागतं. उपासमारीच्या काळात आणि विशेषतः डायबेटीस पचवण्याच्या काळात मला हा फॉर्म्युला खूप उपयोगी पडला. डायबेटीसवाल्याला खूप कडाडून भूक लागते. भरपूर खावंसं वाटतं अशा वेळी पाण्याचा मारा करून भुकेची धग संपवता येते. काही काळासाठी तरी शांत होते. आक्कानं स्वतः हा फॉर्म्युला आयुष्यभर वापरला. जेव्हा खाण्याचे दिवस आले तेव्हा तिच्या रोगाचेही दिवस आले हातात हात घालून... शस्त्रक्रिया न करता हायड्रोथेरपीचा वापर करून आणि तिला भरपूर पाणी प्यायला सांगून मुतखडा बाहेर पडतो का याचा प्रयोग सुरू झाला... खूप खूप पाणी पिताना ती कंटाळायची... एकसारखं पाणी पिऊन आतडी सुजतील असं म्हणायची... पण आम्ही तिला प्रोत्साहन द्यायचो... बायको प्रोत्साहन द्यायची... नातवंडं प्रोत्साहन द्यायची... आक्का पी पाणी... आत्या पाणी प्या... आजी पी पाणी... भरपूर पी... आणखी पी... पाणी फॉर्म्युला म्हातारपणी आपल्यावर उलटेल असं तिला कधी वाटलं नसावं...
काळजाला हात घालणारा असा हा प्रसंग .
ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक वाचकांना आक्का आपलीशी वाटते.या पुस्तकातील काही लक्षणीय किस्से सांगताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो . एक आई आपल्या लेकरासाठी काय काय करू शकते याचं उदाहरण आई समजून घेताना या पुस्तकातून येतं .आपण सर्वजण मातृ दिवस साजरा करतो पण प्रत्यक्ष आई नक्की काय काय करते हे प्रत्यक्ष आपण पाहतोच . . उत्तम कांबळे यांनी आपल्या आईचे भाव विश्व हे पुस्तकात खूपच छान रीत्या अधोरेखित केलेल आहे .
लेखक परीक्षा देत असताना त्याच्या आईने उपाशीपोटी काम केले, पण त्याला भरपेट जेवायला दिलं. तिने स्वतःच्या गरजा मागे टाकून मुलाच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं.
लेखक छोटा असताना भोंग्यांवर "जयभीम" ऐकायला मिळालं तेव्हा त्याच्या आईने त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगितलं. त्या क्षणी आई केवळ जन्मदात्री नव्हे, तर वैचारिक बीज पेरणारी बनते.
लेखकाच्या पहिल्या वाढदिवशी आईने दुसऱ्यांकडून थोडी उसनवारी घेऊनही साधा खाऊ करून दिला होता. तिच्यासाठी मुलाचा आनंद, स्वतःच्या कष्टांपेक्षा महत्त्वाचा होता.
लेखक शिक्षणात मागे पडतो की काय, याची चिंता घेऊन आई त्याच्या शिक्षकांना भेटायला जाते. शिक्षणाबद्दल तिचं स्वप्न आणि काळजी, हे सर्वसामान्य आईचं प्रतीक बनून उभं राहतं.
"आई समजून घेताना" हे पुस्तक केवळ एका आईची गोष्ट सांगत नाही, तर सामाजिक स्थिती, संघर्ष, शिक्षणाचे महत्त्व आणि मातृत्वाचा गौरव यांचं एक विलक्षण समायोजन सादर करतं. हे वाचताना आपणही आपल्या आईच्या आठवणीत हरवून जातो.सर्वांनी वाचावं असं सुंदर पुस्तक .आईसाठी सर्व काही .आईशिवाय या जगात काहीच नाही . धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment