वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ६४
पुस्तकाचे नाव - मी मातीचे फूल
लेखकाचे नाव - मीनल येवले
प्रकाशन व आवृत्ती- शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर
पृष्ठे संख्या– १२४
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २००
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
६ ४||पुस्तक परिचय
मी मातीचे फूल
मीनल येवले
मायमाती म्हणजे केवळ धरणी नव्हे, ती म्हणजे आपल्या भावनांची, संस्कृतीची, आणि परंपरेची उगमभूमी. जिच्या कुशीत आपण लहानाचे मोठे झालो, जिच्या मृदू स्पर्शाने आपल्याला जीवनाची खरी ओळख मिळाली – तीच आपली मायमाती.
तीचा सुगंध वाऱ्यात दरवळतो, तिच्या मातीचा रंग आपल्या ओळखीचा असतो. तिच्या कणाकणात आठवणींचे दवबिंदू दाटलेले असतात. ती आपल्याला फक्त अन्न देते असं नाही, ती आपल्याला ओळख देते, माणूस बनवते.
जसं आईचं अस्तित्व शब्दांत पकडता येत नाही, तसं मायमातीचं प्रेम अनुभवावं लागतं – पावलांखाली स्पर्शून, मनात साठवून.
अशीच माय मातीशी नाव सांगणारा मीनल येवले मॅडम यांचा हा मी मातीचे फूल कवितासंग्रह .मीनल मॅडम यांचं वास्तव्य खेडेगावात गेल्यामुळे खेडेगावाशी त्यांची नाळ छान पैकी जुळलेली आहे .ग्राम संस्कृतीचे जीवन कसे असते हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल आहे .
आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कवितेत ग्राम संस्कृती माय माती यांची विचारधारा ही पेरलेली आहे आणि त्यातून काव्यरूपी अनेक फुले उमलेली आहेत. त्यांची ही काव्य फुले उमलण्यासाठी काळ्या आईची किमया झालेली आहे .
त्यांनी या कवितासंग्रहाला त्यालाच अनुसरून छान मुखपृष्ठ घेतलेले आहे मी मातीचे फुल यामधील त्यांच्या नावात हे बरेच अक्षरे आलेली आहेत .
माय मातीच्या कुशीतून या आपल्या मनोगतरुपी भाषेतून त्या मायमातीचे ऋण व्यक्त करतात .यामध्ये त्या म्हणतात,
गाव संस्कृतीत लहानाची मोठी झाल्याने सभोवतीचं जीवनवास्तव समरसून अनुभवलं. खोलवर माझ्या आत रुतून बसलेल्या जीवनजाणिवा कवितेतून उतरताना उचंबळून आले तसे उसवतही गेले कधी कधी.
शेतीवाडीत जीव ओतणारी बायामाणसे, शेतकऱ्यांच्या घरातली दिवसभर कामात गुंतलेली बाई, वेळीअवेळी न कुरकुरता काम करणारी गडीमाणसं, गुरावासरांना जीव लावणारी, मातीशी एकनिष्ठ राहूनही पाऊस पाण्याअभावी तिच्याकडून मिळणारे दगेफटके बिनतक्रार सोसणारी, भाऊबंदकीतले हेवेदावे, शत्रुत्व, रगेलपणा, अरेरावी या साऱ्याना जबाबदार असणारी किंवा या साऱ्यांशी नाहक सामना करणारी अश्राप माणसं, आटत गेलेल्या रक्ताच्या नात्याने होरपळून निघणारी निरागस मनाची माणसं असे ग्रामजीवनातील मानवी स्वभावाचे संमिश्र नमुने अगदी जवळून पाहता आले.
म्हणूनच त्यांच्या काव्यात मातीचा सुगंध हा पदोपदी येत राहतो .या काव्यसंग्रहात एकूण 85 मातीची काव्य फुले समाविष्ट आहेत .त्यांची पहिलीच कविता काळी आई मनाला भूल पाडते .
दिशा गवसल्या चालत जाता धरून मातीचे बोट
व्याकूळ ओठी तिने पाजला नवसृजनाचा घोट
पदरामध्ये बांधून माझ्या सुखदुःखाच्या ठेवी
भरल्या कंठामधुनी गाते
मी मातीची ओवी
जोजवितांना अजुनी गाते
नित्य नवी अंगाई
मी मातीची लेक सावळी
मातीच माझी आई
या काळ्या आईची मी लेक आहे ही भावनाच किती सुंदर आहे .
काळ्या आईला नेहमीच पावसाची वाट पाहावी लागते .आपल्या कष्टाचे गीत या कवितेतून त्या या मेघराज्याची खूप सुंदर आळवणी करतात .
तनमन माती, जगणे माती श्वासही असतो माती
घामामधुनी, ध्यासामधुनी उमलून येती मोती
धनधान्याच्या, समृद्धीच्या
येऊ दे फुलून बागा
करुणाकर अन् दयावंत तू
बरस बरस रे मेघा
त्यांच्या प्रत्येक कवितेत अशी आर्त विनवणी दिसते .कविता वाचताना समजून घेताना कधी आपण त्याच्याशी एकरूप होतो हे समजतही नाही .अनेक कविता त्यांच्या या काव्यसंग्रहात आहेत .प्रत्येक कविता स्वतःचा एक नवीन साज लिहून या पुस्तकात विराजमान झाली आहे .प्रत्येकीला स्वतःचं सौंदर्य हे वेगवेगळ्या आहे .आपले शब्द अपुरे पडतील अशा प्रत्येक कविता या काव्यसंग्रहात आहेत .मीनल ताई आणि माझी नागपूरला गेल्यानंतर भेट झाली होती . त्यांचा काव्यसंग्रह मी माझ्या संशोधनासाठी घेतलेला आहे .अतिशय सालस बोलका आणि शांत असा त्यांचा स्वभाव मनाला कधी भेदून जाईल कळणारही नाही .किती लिहावं आणि किती न लिहावं हा मोठा प्रश्नच आहे .प्रत्येक कवितेचा सारांश इथे देता येत नाही म्हणून तर सांगते हे पुस्तक नक्की वाचा .आदरणीय मीनल मॅडम यांच्या लेखणीला माझे त्रिवार सलाम .त्यांच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा .धन्यवाद .तुमच्याच मातीतील एक मी छोटेसे फुल .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment