Sunday, April 27, 2025

पुस्तक क्र. ५९ चिंतन एक जीवनवेध


 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ५ ९

पुस्तकाचे नाव - चिंतन एक जीवन वेध

लेखकाचे नाव - राजेंद्र बोबडे

प्रकाशन व आवृत्ती- ग्राममित्र प्रकाशन सातारा प्रथम आवृत्ती

पृष्ठे संख्या– २४८

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

५ ९ ||पुस्तक परिचय

चिंतन 

एक जीवन वेध

राजेंद्र बोबडे


चिता आणि चिंता यामध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे .पण हीच चिंता आपल्याला कधी चितेपर्यंत घेऊन जाते हे समजतच नाही .त्यामुळे माणसाने चिंता सोडून आपले जीवनाचं चिंतन केलं पाहिजे आणि त्यातून काय चांगलं काय वाईट याचा बोध घेऊन आपलं जीवन सुखकर केल पाहिजे .राजेंद्र बोबडे लिखित या पुस्तकात त्यांनी खूप सुंदर जीवनाचं असं चिंतन लिहिलेलं आहे . बोबडे सरांना एक छान सवय आहे. एखाद्या शब्द घेऊन त्याच्यावर अतिशय सुंदर असं चिंतन घ्यायचं आणि शेवटी त्यातून नक्की काय बोध झाला हेही थोडक्यात लिहायचं . किती छान ! याच त्यांच्या सवयच पुस्तकात रूपांतर कधी झालं ते कळालच नाही .आभासी पटलावर रोज त्यांनी लिहिलेल्या या शब्दाचा जीवनाचं मर्म मी वाचत होते .रोज काहीतरी छानसं वाचायला त्यांच्यामुळे मिळत होतं आणि माझी सकाळ वैचारिक शब्दात रम्य होत होती .सर्वांनीच वाचावं असं हे खूप सुंदर पुस्तक आहे .

आपल्या माता-पिता चरणी त्यांनी हे पुस्तक समर्पित केलेल आहे . एका खास प्रसंगी त्यांच्याकडून हे पुस्तक मला भेट म्हणून मिळाले .या पुस्तकात त्यांनी एकूण शंभर शब्दात मागचा जीवनवेध एकत्र गुंफून एक सुंदर विचार पुष्प माला तयार केली .असे काही शब्द येत आहेत ज्यावर लिहिता येतं याचा आपण विचारही करू शकत नाही .पण एक साहित्यिक, एक कवी कोणत्याही शब्दावर पुस्तक बनवू शकतो याची प्रचिती हे पुस्तक वाचून येते . या पुस्तकातील दिवा या शब्दापासून झालेली सुरुवात वळीव शब्दापर्यंत येऊन थांबते .इथे फक्त शब्दच थांबतात पण विचार मात्र निरंतर डोक्यात सुरू राहतात .हीच खरी लेखकाची शैली म्हणावी लागेल .प्रत्येक चिंतनातून एक चांगला विचार आपल्या मनाला आणि हृदयाला हेलावून टाकतो .मैदान, हिंसा, एकांत , जबाबदारी, माफी, देवघर ,बदल, श्रद्धा ,मॅरेथॉन, व्यवहार, मुखवटे, अधिकार, वळण ,अजिंक्यतारा, वनवा, नकार ही कला, देवदूत, बालपण, व्यथा, कलाकृती, लेक अशा कितीतरी शब्दांवर राजेंद्र बोबडे यांनी आपल्या संस्कारांची पखरण घालून शब्दबद्ध केले .

खरंतर मला वाटतं राजेंद्र बोबडे यांच्या संस्काराचा जन्मच या पुस्तकातून झालेला दिसतो . 

आपल्या चिंतनात स्त्रियांविषयी आदर दाखवताना 'ती' या जीवनवेधात अतिशय सुंदर लिहितात.

खरेतर स्त्री मुळेच मानवाला आकार आणि मूर्त रूप मिळते. स्त्री नऊ महिने आपल्या गर्भाशयात जीवाला जपते आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, जीवाची बाजी लावून, मरणाची पर्वा न करता, असह्य मरणकळा बशकते. त्यागाला पुढे अन् मान-सन्मानाला मागे फक्त एक स्त्रीच राह शकते..! सोसून नवीन जीव जन्माला घालते. हे निसर्गात फक्त स्त्री, एक आईच करू

स्त्री वेगवेगळ्या भूमिका तेही अत्यंत सोशिकपणे, कुठेही दिखाऊपणा न करता करते. त्याचा कुठेही बडेजाव न करता तो आपल्या कर्तव्याचा भाग समजते. आपल्या कामातून सकस समाज निर्मितीसाठी अव्याहतपणे आपले योगदान देत राहते हे एक स्त्रीच करू शकते.. !

ताईमाईचा सन्मान फक्त ८ मार्च आला तरच करावा असे काही नाही. जाता-येता तिच्यासाठी चार शब्द आभाराचे आणि कृतज्ञतेचे आपल्या मुखातून आले तरी खूप झाले. मूळातच कुठलीही स्त्री अगोदर कर्तव्य आणि नंतर मानपानाकडे पाहत असते..!

आजच्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी तरी तिला आपण कर्तव्य मागे ठेवून मानपान घ्यायला प्रवृत्त करूयात. समस्त स्त्री वर्गाविषयी सदिच्छा व्यक्त करणारी ही शब्दसुमने स्त्री वर्गाला समर्पित..!

ती राबते घरासाठी..

ती रांधते सर्वांसाठी..

ती ठेचाळते सर्वांसाठी..

ती परत-परत उभी राहते सर्वांसाठी..

ती चंदनासारखी नसेना का

पण उदबत्ती सारखी अखंडितपणे जळते कोणासाठी ?

सर्वांसाठी..

किती उदात्त विचार आहेत राजेंद्र बोबडे सरांचे .

जग बदललं जीवन बदललो असा आपण म्हणतो पण माणसे मुखवटे घालून सर्वत्र फिरताना दिसतात या मुखवट्यांबद्दल खूप छान ते लिहितात .

आजची परिस्थितीच अशी आहे, की तुमच्यासमोर रोज एक मुखवटा खऱ्याच सोंग घेऊन मीच खरा आहे म्हणून येतो आहे. या परिस्थितीत खरे चेहरे ओळख दाखवत नाहीत. तर खोटे अन् चेहराच नसलेले ओळख लपवत नाहीत..!

हल्ली वागण्या-बोलण्याची आणि जगण्याची समाजमनाची परिभाषाच बदलली आहे. कोण कोणता मुखवटा घालून समोर येईल सांगताच येणार नाही. भुल-भुलय्या आणि तोंडदेखलेपणाची वृत्ती चांगले घडवत नाही वाईटच घडवते आणि होत्या नव्हत्याचा शेवट नक्कीच करते..!

सोंग काढणे, सोंग बनून राहणे काही काळ बहुरूपी लोकांचा व्यवसाय होता स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठीचा. सहज घडणाऱ्या मनोरंजनातून सामाजिक संदेश देण्याचा. आज नाटकी मुखवटे घालून स्वतःच्या भल्यासाठी मिरवणारी मंडळी सामाजिक स्वास्थ बिघडवणारे वर्तन तर करत नाहीत ना? असो..!

ज्याचे वर्तन त्यालाच लखलाभ !

 किती अर्थपूर्ण विचार आहेत .प्रत्येकाचं वागणं ज्याचं त्यालाच दुसऱ्यांनी तसं वागलं म्हणून आपण आपला स्वभाव का बदलावा हेही तितकच खरं .हे फक्त मी दोन शब्दांविषयी तुम्हाला सांगितलं पण अशा 100 शब्दांविषयी राजेंद्र बोबडे सरांनी या पुस्तकात लिहिलेला आहे .वरून त्यांनी किती छान विवेचन केला असेल याची प्रचिती आपल्याला येते .

 "चिंतन" हा संस्कृत शब्द आहे. "चिंत" धातूपासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ विचार करणे, मनन करणे असा होतो.एखाद्या विषयावर खोल विचार करणे, चिंतन म्हणजे विश्लेषणात्मक आणि शांत मनाने विचार करण्याची प्रक्रिया.

          भगवद्गीतेत: "चिंतन हे साधनेचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे."

स्वामी विवेकानंद म्हणतात: "उत्तम विचार हा उत्तम कृतीचा पाया आहे. म्हणून चिंतनाची गरज आहे."

म्हणजे ज्याला उत्तम विचारांची गरज आहे त्याला हे पुस्तक वाचलं पाहिजे .उत्तम विचार असले तर आपण उत्तमच कृती करतो .राजेंद्र सरांच्या या लेखनासाठी त्यांना मी शुभेच्छा दिल्या होत्या त्यांनी त्या पुस्तकात छापूनही दिले आहेत .त्यांच्या लेखणीला माझी कोटी कोटी सलाम आणि त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासास खूप खूप शुभेच्छा .

पहाटेची रम्य सुरूवातच चांगल्या आचार विचारांनी परिपूर्ण असलेल्या चिंतनाने व्हायची. चिंतन लेखमालेमूळे सतत मनन, चिंतन, आणि त्यातून निघणारा निष्कर्ष जगण्याला दिशादर्शक ठरला....!


चुकीच्या घटनांचा बोध झाला. आमच्या विचारांची वाटचाल योग्य दिशेने होऊ लागली. एखादा शब्द निवडणे आणि त्यावर प्रेरणादायी विचारांचे मुद्देसूद विश्लेषण करण हे खरोखर खूप मोठे काम आहे..!

चांगले लिहिण्यासाठी मनात चांगले विचार असावे लागतात. चांगले तेच लिहू शकतात जे चांगल्या विचारांनी भारलेले असतात..!

श्री. बोबडे सर आपल्या लेखणीस आणि त्यामागच्या प्रत्येक प्रेरणादायी अंशरूपी व्यक्तिमत्वास खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद..!

शेवटी एवढेच वाटते की.. 

भरूनी भरास येते 

आज आसवांचे थवे..

 परतुनी यावे पुन्हा

 तुमच्या लेखणीचे सूर नवे..

  

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

1 comment:

  1. सौ.अंजली मॅडम अतिशय सोप्या आणि सहज सुंदर ओघवत्या भाषेतून पुस्तक परिचय तर दिलातच ,परंतु लेखकाची वैचारिक उंची ही शब्दाशब्दातून मांडली आहे.सौ.अंजली मॅडम व श्री. बोबडे सर आपल्या दोघांच्याही लेखनीस शुभेच्छा...

    ReplyDelete