वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ५१
पुस्तकाचे नाव - कर्मवीरायण
लेखकाचे नाव - अजित पाटील
प्रकाशन व आवृत्ती- संस्कृती प्रकाशन पुणे तृतीय आवृत्ती
पृष्ठे संख्या– १८०
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २००
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
५१ ||पुस्तक परिचय
कर्मवीरायण
अजित पाटील
इवल्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आपण पाहिला आहे .
पण पाहणं आणि करणं यात खूप फरक आहे .रामाची सीता रावणाने पळून नेली त्यामुळे रामायण घडले . तसेच रयतेच्या गोरगरीब लेकरांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली त्यामुळे कर्मवीरायण घडलं .हे कर्मवीरायण घडवून आणणारे दुसरे तिसरे कोणी नसून ते होते आपले लाडके अण्णा कर्मवीर भाऊराव पाटील .
"कर्मवीर" म्हणजे असा योद्धा जो शब्दांनी नव्हे तर आपल्या कर्मांनी समाजात परिवर्तन घडवतो. कोणत्याही अडचणींना न घाबरता, संकटांवर मात करत, तो आपल्या ध्येयाच्या दिशेने न थकता चालत राहतो. त्याचं आयुष्य म्हणजे परिश्रम, संघर्ष आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी असते.आणि अशीच प्रेरणादायी कहाणी आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांची आहे .भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवीत केले .आज आजोबांसाठी त्यांच्याच नातवाने म्हणजे अजित पाटील यांनी आपल्या वडिलांकडून कर्मवीरांची माहिती हळूहळू घेऊन त्यांचा वारसा चालवत हे छान पुस्तक शब्दबद्ध केलं .
आपल्या या पुस्तकाच्या प्रवासाबद्दल लिहिताना ते म्हणतात,
मी लिहिलेल्या आणि मॅकमिलन प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या 'माणसातील देव' या पुस्तकाला अभूतपूर्व यश मिळालं. या पुस्तकात मी कर्मवीरांचं कौटुंबिक जीवन रेखाटलं आहे. यानंतर कर्मवीरांच्या जीवनावर दुसरं काही लिहावसं वाटत नव्हतं. पण 'माणसातील देव'चा लेखक हा लेखनकलेत जसा प्रवीण आहे तसा वक्तृत्व कलेतही प्रवीण असावा असं समजून मला भाषणाची निमंत्रणं यायला सुरवात झाली. परंतु मी निश्चितच श्रवणीय नाही हे मला माहित असल्याने कर्मवीरांविषयीच्या लेखनातच आपण परत रमावे असे वाटू लागले. यातूनच कर्मवीरांच्या कौटुंबिक जीवनाबरोबर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कर्मवीरांसंबंधी लिहावं अशी उर्मी मनी दाटली. मग कर्मवीरांविषयी पुस्तके वाचू लागलो. त्या बरोबरच कर्मवीरांना पाहिलेल्या ज्या काही थोड्या व्यक्ती आहेत, त्यात माझे वडील आप्पासाहेब व आई सुशिलाबाई यांच्याकडून कर्मवीर जाणून घ्यायचा प्रयत्न सुरू केला. मी जसं जसं कर्मवीर आण्णांना समजावून घेऊ लागलो तस तसं त्यांच्यात गुंतून पडलो आणि समजून आलं की, आपले आजोबा प्रचंड महान आहेत ! त्यांच्या कुटुंबात जन्माला आलो म्हणून मला स्वतःचाच अभिमान वाटू लागला आणि आपण किती भाग्यवान आहोत हे समजलं. पण त्याचबरोबर त्यांच्या घराण्यात जन्माला येऊनही आपण सामान्य आहोत ही भावना त्रास देवू लागली.
कर्मवीरांच्या संदर्भातली पुस्तकं वाचल्यानंतर जाणवलं की ही सर्व पुस्तके आपआपल्या परीनं चांगली आहेतच, परंतु या पुस्तकांनी सर्वसामान्यांना कर्मवीर पुरेसे उमजत नाहीत, समजत नाहीत. मग वाटलं जर आपल्याला सोप्या भाषेत लिहिण्याची कला अवगत आहे तर मग सर्वसामान्यांना समजतील असे कर्मवीर त्यांच्यापुढं का उभं करू नयेत?
आणि याच हेतूने त्यांनी त्यांच्या भाषेत सर्वसामान्यांना समजतील असे कर्मवीर या पुस्तकातून आपल्यासमोर साकारले आहेत.
सर्वात गौरवाची बाब म्हणजे संपूर्ण आशिया खंडात सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली ही रयत शिक्षण संस्था माझ्या साताऱ्यात आहे याचा मला अभिमान आहे. माझे शिक्षण याच संस्थेच्या विद्यालयात झालेल आहे. त्यामुळे कर्मवीर जयंती म्हणजे आमच्यासाठी आनंदाची पर्वणीच .या संस्थेत शिक्षण घेतल्यामुळे कर्मवीर आमच्या नसानसात भिनलेले आहेत .
ज्यांना अजूनही कर्मवीर समजले नाहीत त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं .फक्त भाषण निबंध लिहिण्यासाठी पुस्तक वाचायचे नाही तर त्यातून आपल्यालाही काहीतरी बोध घेता यावा आणि या आदर्श व्यक्तिमत्व आणि किती कष्ट घेतले याचीही प्रचिती आपल्याला येते .
शितल लेखक डॉ . आनंद यादव या पुस्तकाबद्दल म्हणतात,
प्रा. अजित पाटील यांनी 'कर्मवीरायण' हे आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विस्तृत चरित्र लिहून एक मोठे समाज कार्य केले आहे. आजवर खरे तर कर्मवीर अण्णांची वीस पंचवीस तरी चरित्रे त्यांच्या भक्तांनी, हितचिंतकांनी लिहिलेली आहेत. ही चरित्रे लिहिण्यामागे त्यांचे हेतू समाजसेवेचेच होते. अण्णांच्या समाज कार्याचे अनेक पैलू मराठी समाजाला उलगडून, उकलून दाखवावेत, हाच त्यांचा उदात्त हेतू होता. प्रा. अजित पाटील यांनीही त्याच हेतूने हे चरित्र लिहिले असले तरी 'कर्मवीरायण'ला एक वेगळी सुवर्ण कला कांती प्राप्त झालेली आहे. त्यांच्या या चरित्रातील विविध पैलूचे अनेक उपपैलू उलगडत गेल्यामुळे अण्णांच्या कार्याच्या वटवृक्षाला भरघोस, डेरेदार आकृतिबंध प्राप्त झालेला आहे.
खरोखर आपल्याच घरातल्यांनी आपल्यावर एखादं पुस्तक लिहिलं तर त्यात सगळे बारकावे येतात असेच सर्व बारकावे अण्णांच्या जीवनातील या पुस्तकात आलेले आहेत.
या पुस्तकात अजित पाटील सरांनी कर्मवीरांच्या जीवनातील पूर्वकाल त्यांचा जन्म बालपण आणि त्यांचे एवढे मोठे शैक्षणिक कार्य आपले शब्दात अतिशय सुंदररीत्या मांडलेले आहे. ऋण फिटता फिटेना या भागात त्यांनी कर्मवीर आण्णांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे .खरोखरच अण्णांचे ऋण कधीच भेटणार नाहीत .त्यांच्या माहीत नसलेला एक छानसा किस्सा कौटुंबिक आहे या पुस्तकातील तो मी सांगते . भाऊरावांना तीन अपत्य थोरले आप्पासाहेब मधल्या शकुंतलाबाई आणि धाकटी बेबी यापैकी बेबी चार पाच वर्षाचे असतानाच गेली. भाऊरावांचं आपल्या आपत्यांकडं बिलकुल लक्ष नव्हतं .लक्ष्मीबाई या सर्वांची काळजी घ्यायच्या. पण लक्ष्मीबाई गेल्यानंतर आप्पासाहेबांना इतर मुलांबरोबर शाहू बोर्डिंग मध्ये ठेवण्यात आले. तर मुलांसारखीच त्यांनाही तशीच वागणूक दिली जायची. शकुंतला बाई यांना मात्र कधी महिला आश्रमात तर कधी श्राविका आश्रमात त्यांची रवानगी करण्यात आली. काही दिवसानंतर त्यांचे लग्न करण्यात आले.
शकुंतलाबाईंचं लग्न झाल्यावर व त्यांना मुलंबाळं झाल्यावरही भाऊरावांनी कधीच लक्ष दिलं नाही, याची त्यांना आजही खंत वाटते. त्या अधून मधून वडिलांना भेटण्यासाठी सातारला येत. अशाच एकदा त्या सातारला आल्या होत्या. त्यांच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या त्यांच्या पतीनं मोठ्या हौशेनं केल्या होत्या. त्यांच्या हातातल्या त्या सोन्याच्या बांगड्या बघताच भाऊरावांचे डोळे लकाकले. त्या वेळी ते आणि त्यांची संस्था आर्थिक अडचणीत होती. त्यांनी शकुंतलाबाईंना विचारलं,
'काय गं बांगड्या सोन्याच्या का?'
'होय.'
'जरा वाकड्या झालेल्या दिसतात.'
'हो वापरुन वापरुन तशा झाल्या असाव्यात.'
'दे काढून मी त्या नीट करून आणतो.'
तसं शकुंतलाबाईंनी त्या आनंदानं काढून भाऊरावांच्याकडं सुपूर्त केल्या. त्या वेळची त्यांच्या चेहऱ्यावरची खुषी शकुंतलाबाईंना समजली नसावी. भाऊरावांनी त्या बांगड्या विकल्या आणि त्यातून तुकाराम माने या विद्यार्थ्यांची इंजिनिअरींगची फी भागवली. शकुंतलाबाईंच्या हातातून निघालेल्या सोन्याच्या बांगड्या परत कधीच त्यांच्या हातात पडल्या नाहीत.
म्हणजेच आपले लेकीच्याही सोन्याचं त्यांनी इतर मुलांच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने सोनं केलं. असे आमचे सोन्यासारखे भाऊराव. यांच्या विषयी किती सांगायचे किती बोलायचं. कर्मवीर अण्णा याच शब्दात सारा विश्व सामावल आहे. कर्मवीर अण्णांच्या मृत्यूनंतर रयत शिक्षण संस्थेचा प्रवास कसा झाला याचीही माहिती या पुस्तकात अजित पाटील सरांनी दिलेली आहे. शेवटी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट या पुस्तकात दिलेला आहे. असे हे बहुमोल पुस्तक माझ्या संग्रहालयात आहे याचा मला खूप अभिमान आहे. याहीपेक्षा कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्थेची मी विद्यार्थिनी आहे याचा मला सर्वांना अभिमान आहे. अण्णांविषयी मी एक कविता लिहिली आहे .त्यांच्याविषयी त्यातून एवढेच वाटतं ,
कष्ट अपार तुमचे
विसरणार नाही आम्ही
आमच्या मन मंदिरातील
कर्मवीर देव तुम्ही
आमच्यासाठी माणसातील खरा खुरा देव तुम्हीच आहात. तुम्हाला माझे आणि माझ्या लेखणीचे कोटी कोटी वंदन. आदरणीय अजित पाटील सरांचे हे पुस्तक वाचायला मात्र विसरू नका.
धन्यवाद.
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment