वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ४८
पुस्तकाचे नाव - पत्रास कारण की
लेखकाचे नाव - अरविंद जगताप
प्रकाशन व आवृत्ती- ग्रंथाली प्रकाशन बारावी आवृत्ती 2019
पृष्ठे संख्या– १६६
किंमत /स्वागत मूल्य-- १५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
४ ८ ||पुस्तक परिचय
पत्रास कारण की
अरविंद जगताप
✒️📚
पत्र हा जिव्हाळ्याचा विषय .
त्यात फक्त शब्द रेषा टिंब नसून ते असतं भावनांच प्रतिबिंब .
पूर्वी पत्र हे संवादाचं प्रमुख साधन होतं. कुणी प्रिय व्यक्ती लांब गेली असेल, तर पत्र हेच एकमात्र माध्यम असे जे तिच्याशी मनातलं बोलायला मदत करत असे. त्या पत्रांमध्ये प्रेम, आशा, काळजी, ओढ, आणि कधी कधी विरहाची झळसुद्धा असायची. हळूहळू लिहिलेलं एक-एक वाक्य म्हणजे काळजाचा ठाव असायचा.
पत्राचा प्रवास म्हणजे एक सुंदर सांस्कृतिक परिवर्तनाचं दर्शन. शाई, कागद, पोस्टाची घंटा, पोस्टमन, आणि वाट पाहणारी नजर – हे सगळं त्या प्रवासाचा भाग होतं. पोस्टाच्या मध्यमातून एक पत्र कधी एका गावातून दुसऱ्या देशात पोचायचं. आज ई-मेल्स, चॅट्स, आणि तात्काळ उत्तरं असताना, ते जुने पत्रांचे दिवस शांत, संथ आणि जास्त अर्थपूर्ण होते.
पत्रं वाचताना शब्दांपेक्षा भावना जास्त वाचल्या जायच्या. आणि ती ठेवून दिली गेली तर वर्षांनुवर्षं त्या आठवणींचं जतन व्हायचं.
पत्रांमध्ये प्रेम, आठवणी, काळजी, राग – अशा असंख्य भावना असायच्या. आईचं पोरासाठी लिहिलेलं पत्र असो किंवा एखाद्या प्रेयसीचं तिच्या प्रियकराला लिहिलेलं – त्या शब्दांमधून नात्यांची उब आणि अंतरावरही जवळीक निर्माण करणारी ताकद असायची.
कालांतराने पत्राचा प्रवास टपालातून मोबाईलमधल्या मेसेजकडे, मग ईमेल आणि आता तात्काळ संवादमाध्यमांकडे सरकला. पण त्या जुन्या हस्तलिखित पत्रांचं स्थान कुठलीही टेक्नॉलॉजी घेऊ शकली नाही.
आजही, एखादं जुनं पत्र हाती लागलं की त्या काळात पुन्हा एकदा जगायला मिळतं – शब्दांमधून ओसंडून वाहणारी माणुसकी, जिव्हाळा, आणि खरंखुरं नातं अनुभवता येतं.
असंच हे हरवलेलं पत्र झी मराठी चैनल वरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रत्येकाच्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून गेलं .आदरणीय अरविंद जगताप यांनी लिहिलेली आणि थोर अभिनेते सागर कारंडे यांनी या कार्यक्रमात वाचलेली पत्रे यांचा सर्वांग सुंदर असा संग्रह म्हणजेच पत्रास कारण की.
आपण सर्वांनीच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सागर कारंडे यांच्या आवाजात पत्र ऐकली आणि ते पत्र ऐकण्याचा अनुभव म्हणजे आपल्या सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम त्यांनी केलं होतं. कधीकधी डोळ्यातून नकळत अश्रू ही तरळले आणि कधी ओघळले ते कळलेही नाही .अतिशय सुंदर असे हे पुस्तक अरविंद जगताप यांनी शब्दबद्ध केलेल आहे .आपण पाहिले जगभर खूप पत्र लेखन झाले .इतिहास संशोधकांनी असे कितीतरी पत्रांचा संग्रह करून ठेवलेला आहे आणि त्याच्या अभ्यासातून आपल्या इतिहासाचाही उलगडा झालेला आहे .पत्रावर आधारित अशी कितीतरी पुस्तके आहेत आणि पत्र ही आहेत जी लोकप्रिय झालेली आहेत .अरविंद जगताप सरांनी आपल्या मनोगतात या पुस्तकाचा प्रवास कसा झाला याचा सुंदर विवेचन केलेला आहे हे विवेचन वाचूनच आपल्याला हा पत्र प्रवास कसा झाला आणि आपल्या आयुष्यात पत्राचे महत्व किती आहे हे समजून येतं .
आपल्या नातेवाईकांना पत्र लिहिताना सारे घर एकत्र यायचं . प्रत्येक जण आपली मत सांगायचं अरे असे लिही अरे तसं .स्वतःची काळजी घे . रात्री झोपताना थंड दूध पी असं पत्रात लिहिलेले भावना मेलमध्ये आपल्याला नाही पाठवता येत .
अरविंद जगताप म्हणतात पत्रही जोडणारी गोष्ट होती ई-मेल वैयक्तिक गोष्ट आहे की मेल वाईट आहे असं नाही पण आंतरदेशीय पत्रात आपले टिकली पाठवणारी बायको आपल्या लिपस्टिकचा ठसा पाठवणारे प्रियसी आणि आपल्या गावातली माती पाठवणारा मित्र मी पाहिला आहे.ती जवळीकता तो आपलेपणा ई-मेल मध्ये येऊच शकत नाही .म्हणून पत्र खास आहेत . कधीकधी काही गोष्टी आपण समोरासमोर बोलू शकत नाही पण आपल्या शब्दातील आपण आपल्या भावना अगदी उत्कट पणे मांडू शकतो .इथे व्यक्त होणे खूप महत्त्वाच आहे .
अरविंद जगताप सरांनी अशीच विविध विषयावर सामाजिक भान जपणारी पत्र लिहिणे आणि सागर कारंडे यांनी आपल्या आवाजातून त्याला जिवंतपणा आणला .
पत्रास कारण की या पुस्तकात एकूण 50 पत्रांचा समावेश केलेला आहे .यामध्ये आदरणीय महाराज ,प्रिय हुतात्म्यांनो ,प्रिय आई ,प्रियबाबा ,प्रिय रणरागिनी, प्रिय किशोर कुमार ,प्रिय सोशल मीडिया, प्रिय नागराज, दाभोळकरांच्या मारेकऱ्यांनो, प्रिय गोविंदा ,ती सध्या काय करते ,झेंडा न पडो खाली, जागे व्हा बापहो,आम्हा घरी धन ,नाव ठेवणारी माणसं ,गावच्या मुली, काळजी घे सोताची अशा कितीतरी विषयांवर त्यांची पत्रे आहेत. एक एक पत्र वाचताना अंगावर शहारे उभे राहतात. कधीकधी स्वतःचीच कीव येते की आपण कधीच समाजाचा विचार करत नाही. पण हे पुस्तक वाचले की आपली मानसिकता आणि विचारही बदलून जातात. आदरणीय अरविंद जगताप सरांनी मलपृष्ठावरही ताजा कलम या मध्ये अतिशय सुंदर शब्दात पत्राविषयी माहिती दिली आहे. त्यात ते म्हणतात, पत्रं खरं तर खाजगी गोष्ट असते. एकट्यानं वाचण्याची. एकट्यानं लिहिण्याची. पण तुमच्या प्रतिसादामुळे पत्रं जाहीरपणे वाचली गेली. ऐकली गेली. टीव्हीवर सहसा पुस्तकातल्या गोष्टी असतात. टीव्हीवरच्या गोष्टीचं पुस्तक होणं आपल्याकडे दुर्मिळ आहे. हा योग तुमच्या पत्रांवरील प्रेमामुळे जुळून आलाय. वाचता वाचता अचानक पेन घेऊन तुमच्यातला कुणी आपल्या आवडीच्या माणसाला पत्र लिहायला बसेल. आपलं लिखाण नेमक्या पत्त्यावर पोचलंय याचं मला समाधान होईल.
इथे मी त्यांच्या पत्रांचा कोणताच मायना देणार नाही कारण त्यांनी या पत्रातील या पुस्तकातील मजकूर कोणत्याही स्वरूपात कोणत्याही माध्यमातून पुन्हा वापरायचे झाल्यास लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे अशी अट दाखवलेली आहे आणि अशी थोर माणसे आपल्याला भेटणे अशक्यच आणि त्यापुढे त्यांची परवानगी म्हणजे अति अशक्यच. तेव्हा हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि आवडलं तर मला एक पत्र लिहायला विसरू नका.
त्यांनी त्यांच्या मला मला पृष्ठावरील शब्दातून आपल्या सर्वांनाच सुंदर संदेश दिलेला आहे .चला मग वाट कसली पाहताय उचला तील एक मी आणि लिहा एक सुंदर पत्र मला .
आदरणीय अरविंद जगताप सर यांच्या शब्दांना माझा शिर साष्टांग नमस्कार .कृपया मे . जा. व्हावे🙏🏻✒️📚
ताजा कलम-पुस्तक परिचय वाचल्यानंतर कृपया सर्वांनी एक पत्र लिहावे.
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा


उत्कृष्ट परिचय
ReplyDelete