*झाडांवर जीवापाड प्रेम करणारा निसर्गप्रेमी* 🌴🌳🌲🎄
संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात झाडांविषयी प्रेम व्यक्त करताना खूप छान म्हणतात ,
*वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती* 🍃🌿
या अभंगात झाडांचे महत्त्व खूप सुंदररीत्या तुकाराम महाराजांनी अधोरेखित केलेलं आहे. वृक्षवल्ली सोयरी वाटली ती या कारणाने. या वृक्षवल्लींच्या ठायी माणसाचे दुर्गुण नसतात. ती ईश्वराची रूपे होत. त्यांच्या सहवासातच ईश्वरभक्ती फुलते. वृक्षवल्ली, सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्या वाटेवर आणून सोडतात. तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवल्लींच्या सान्निध्यात गेले. वृक्षवल्लींना सोयरी' मानले.
आपण सर्वांनी पाहिलं आहेच.
काही झाडं... रोपटी तुटली की वाढतच नाहीच...
काही झाडं पानगळ झाली की परत बहरतच नाहीत.
तर काही रोपटी पहा, इमारतीच्या भेगेत, कौलांच्या
फटीत, अंधाऱ्या विहिरीतल्या दगडी खबदाडीत
आपले हिरवे हिरवे हात हलवत वाढतच राहतात...
माणसांच्या आयुष्यासारखी.
काही कळय़ा फुलण्याआधीच खुडल्या जातात, तर काही झाडांना फळं-फुलं नसण्याचा शाप घेऊनच ती तगून राहतात. पिंपळ, वड, आंबा यांचं भाग्य मोठंच. एखाद्या मोठय़ा संपन्न घरात भाऊबंद, नातवंडं, येणारे- जाणारे यांचा राबता असावा, तशी ही झाडं... सळसळतं हिरवंगार हसू. हसत हसत येणाऱ्या- जाणाऱ्यांना सावली देणारी, त्यांच्या अंगाखांद्यावर घरटी चिवचिवतात. वडाच्या लांबलचक केसांना-पारंब्यांना धरून पोरंपोरी झोके घेतात. बायाबापडय़ा दोरे बांधून पूजाबिजा पण करतात. संध्याकाळी त्याच्या पारावर बसून म्हातऱ्या गप्पा रंगतात... गजाली होतात. गावातली वर्तमानपत्रंच त्या पारावर छापली न् वाचली जातात! खूप प्रसंगांची साक्षीदार ही झाडे. फळं-फुलं, सावली देताना वढून गेल्यावरपण चुलीसाठी स्वतःची लाकडं सरपण म्हणून देताना त्यांना धन्यच वाटत असावं... घराच्या वाशापासून चुलीतल्या सरपणापर्यंत, पाळण्याच्या लाकडापासून चितेच्या लाकडापर्यंतची त्यांची सोबत...! ही झाडे आपल्याला सर्वस्व देऊन टाकतात आणि स्वतः मात्र मुकी बिचारी आपल्या देण्याची वाट बघत बसतात.
किती अबोल आणि निस्वार्थ प्रेम.
असंच झाडांवर अबोल आणि निस्वार्थ प्रेम करणार कोण आहे का ? हो असाच अवलिया आम्हाला सीसीआरटी गुवाहाटीच्या कार्यशाळेमध्ये भेटला. त्यांचे नाव आहे सुखमोय साहा. ते पश्चिम बंगालचे आहेत.
एखादी व्यक्ती झाडांवर किती निस्वार्थ प्रेम करू शकते ? याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हे सर.
वृक्षप्रेमी झाडांवर जीवापाड प्रेम करणारे. आपल्या कामावर नितांत निष्ठा असणारे, असे हे व्यक्तिमत्व आम्हाला गुवाहाटीच्या कार्यशाळेमध्ये दिसलं. त्यांचं झाडांवरचं प्रेम पाहून आम्ही ही आवाक झालो आणि तुम्हीही अवाक व्हाल. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, ते जिथे जातील तिथे ते आपल्या सोबत चार पाच झाडे घेऊन जातात आणि त्या झाडांची तिथे लागवड करतात. किती आगळ वेगळं प्रेम हे झाडांवरचं ! मला तर त्यांचं खूपच कौतुक वाटलं. पश्चिम बंगालवरून आसामला येताना त्यांनी आपल्या सोबत चार पाच झाडे आणली होती आणि झाडे ज्या दिवशी लावली त्यावेळेस आम्हाला कळलं की, साहा सरांनी ही झाडे सीसीआरटीमध्ये लावण्यासाठी आणलेली आहेत. आमचे सी सी आर टी चे सर्व मेंबर्स तेथील सर्व पाहुणे यांच्या साक्षीने त्या झाडांचे वृक्षारोपण गुवाहाटीच्या सीसीआरटीच्या प्रांगणात झालं. सर्वांना खूपच आनंद झाला. साहा सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर ओसंडून वाहत होता. खरच किती आगळीवेगळी माणसं आपल्यालाही भेटत असतात. प्रत्येकाकडून निश्चितच काहीतरी घेण्यासारख आहे. आणखी एक त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पश्चिम बंगालला जाताना आसाम मधून काही झाडे नेली बरं का.
आपण आपल्या घरच्यांसाठी भरपूर खरेदी करतो, पण निसर्गासाठी आपल्या धरणीमायसाठी झाडांची लागवड करणारा हा अवलिया काही निराळाच. आदरणीय साहा सरांच्या या वृक्ष संवर्धन उपक्रमास आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा🌹🌿यातून एक बोध घेऊया एक तरी झाड एका वर्षाला आपणही लावूया आणि त्याचं रक्षण करूया धन्यवाद🙏🏻😊
सौ.अंजली शशिकांत गोडसे
सातारा महाराष्ट्र







अप्रतिम लेखन...
ReplyDeletemast
ReplyDeleteछान उपक्रम
ReplyDeleteTya
ReplyDeleteत्या हिरव्या क्षणांची मी साक्षीदार..
ReplyDeleteThank you
ReplyDeleteअशा काही मोजक्या लोकांमुळेच निसर्ग,प्राणी टिकुन आहेत.सलाम त्यांच्यया कार्याला🙏🙏🙏
ReplyDeleteनिसर्गाचा नितांत आदर
ReplyDeleteअसेही निसर्गप्रेमी आहेत ... म्हणूनच वसुंधरा आजही हिरवळीने नाटलीये ...
ReplyDeleteVery nice
ReplyDelete