Sunday, November 5, 2023

दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला अवलिया


 








 *अंतरीचा दिवा पेटवून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर उभा राहिलेला अवलिया* 🤘🏻🥇


'असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,

नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर....

 नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्याची, आयुष्यालाभिडतानाही चैन करावी स्वप्नांची....

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर......

 पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, 

हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर, 

नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर......

विंदा करंदीकर यांची ही कविता मला नेहमीच आठवत राहते. 

अशीच प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या आणि मला गुवाहाटीच्या कार्यशाळेत भेटलेल्या एका लढवय्या माणसाची हकीकत आहे. तुम्हीही काळजीत पडला असाल, की ही व्यक्ती कोण आहे ? असा माणूस की जो प्रचंड इच्छाशक्ती घेऊन जन्माला आलेला आहे.अनपेक्षितपणे एखादा अपघात व्हावा आणि सगळे नियोजन कोलमडून जावे, परिस्थिती बिकट बनावी, अगदी युद्धाचा प्रसंग निर्माण व्हावा, असा एखादा तरी प्रसंग आपल्या आयुष्यात हा येतच असतो. पण त्या प्रसंगांना सामोरे जाऊन इच्छाशक्तीच्या बळावर उभा राहतो, तोच या जगात आपला अस्तित्व निर्माण करू शकतो.      

ऐका तर मग  

दिनांक 6 मार्च 2023 रोजी पहाटे 1 वाजता अपघात होऊन ते मोठ्या कालावधीसाठी बेडवर जायबंदी झाले. त्यांच्या अपघाताची वेळ, स्थळ आणि कारण तेच सांगू शकतात, कारण त्यावेळी ते एकटेच होते, ही बाब यात अत्यंत महत्वाची आहे.  त्यांनीच सांगितलेल्या हकीकतीनुसार, ते काम आटोपून घरी निघत असतांना कार्यालयाच्या जिन्यावरून पाय घसरून पडले आणि पायऱ्यांच्या कोपऱ्यांनी त्यांना कमरेला, पाठिला आणि मानेला गंभीर दुखापत झाली.  यात कमरेचे माकड हाड, छातीच्या तीन बरगड्या आणि मानेचे दोन मणके मोडले. तब्बल सात तास ते तिथेच पडून होते . मोबाईल समोर पडलेला असूनही कॉल करता येत नव्हता. किती बिकट प्रसंग होता तो! सकाळी त्यांना सुरुवातीला जवळच्या accident हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र मानेची दुखापत गंभीर असल्यामुळे व त्यावर उपचार करणारे डॉक्टर तिथे उपलब्ध नसल्याने लगेच दुपारी सुरत येथे असूतोष हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. येथे चक्क गळा कापून मानेच्या मणक्यांमध्ये क्लिप टाकली. छातीला आणि कमरेला पट्टा लावला .

 डॉक्टरांनी जास्त वेळ बसणे तसेच चालणे यावर बंदी घातली, तसेच 24 तास मानेला फिलाडेल्फिया कॉलर  लाऊन बेडवर पडून राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तसेच दर 10 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी बोलावल गेल. 

एवढ्या मोठ्या आजारपणातून बाहेर पडणं, म्हणजे एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. त्यांच्या पाठीशी असलेले त्यांचे पुण्य, त्यांनी केलेले कर्म, हेच दैव म्हणून उभे राहिले असेल; यात काही शंका नाही. अजूनही मी तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव सांगितलेले नाही. एवढा मोठा अपघात झालेली व्यक्ती अवघ्या सहा महिन्यात महाराष्ट्रातून आसाम येथील गुवाहाटी मध्ये पंधरा दिवसाची कार्यशाळा करण्यासाठी येते. संपूर्ण कार्यशाळेत आनंदाने सहभागी होते. कोणाला जरा सुद्धा थांगपत्ता नसेल; की या माणसाचं यापूर्वी एवढं मोठ ऑपरेशन झालेलं असेल. एवढा मोठा अपघात या माणसाच्या आयुष्यात आलेला असेल. तरीही हा माणूस हसतमुखाने सगळीकडे वावरत असतो. तुम्ही आमच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम बघितला असेल. किती आनंदाने त्यात ते सहभागी झाले. वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य केले. आपले सीसीआरटीचे सर्व स्टेजच त्यांनी सांभाळले. खरंच मानलं बाबा तुम्हाला. ओळखलं ना कोण होते ते? आपल्या सर्वांचे लाडके *नंदुरबार डाएट मध्ये विषय सहायक* म्हणून कार्यरत असलेले *आदरणीय श्री देवेंद्र बोरसे म्हणजेच आपले बापू.* 

सर्वांनाच अचंबित करणारा असा त्यांचा प्रवास. आश्चर्य वाटलं ना ऐकून तुम्हा सर्वांना. आमच्या महाराष्ट्र टीमचे तर ते लीडर होते. सर्वांची आपुलकीने काळजी घेतली. फक्त महाराष्ट्र टीमवरच नव्हे तर सीसीआरटी कार्यशाळेमध्ये आलेल्या प्रत्येक भारतीयाबरोबर त्यांनी प्रेमाचे संबंध ठेवले. प्रत्येक खोलीमध्ये विज, पंखा, पाणी येते का? याबरोबरच डासांपासून बचावासाठी प्रे आणि कॉईल देखील उपलब्ध करून देत सर्वांची काळजी घेतली आणि सर्वांच्या कागदपत्रांची पूर्ततादेखील केली. बापासारखी विचारपूस करणारे आमचे बापू.असा ग्रेट माणूस भेटणे, खरंच या जीवनात अशक्य आहे.वास्तविक जीवन क्षणभंगूर असले तरी ते सुंदर आहे. स्वार्थाच्या कुंपणातून बाहेर येऊन जेव्हा आपण आपले जीवन दुसऱ्यांच्या सेवेत समर्पित करतो, दुःखीतांचे अश्रू पुसतो, आपल्या धनाचा वाटा इतरांनाही देतो, निसर्गाचे संवर्धन करतो, तेव्हा आपल्या जीवनाला व जगण्याला अर्थ प्राप्त होतो. इतकेच नाही तर आपण आपल्याबरोबर इतरांचंही जीवन सुंदर करतो. जीवनाला सौंदर्याचे तोरण लागते. म्हणूनच आपण *सुंदरतेचे प्रवासी होऊ या, आनंदाचे यात्रिक बनूया* आणि सत्य, सुंदर व मंगलाची आराधना करूया; मानवी संस्कृतीची मंदिरे उभारू या. बापूंचे भावी आयुष्य आरोग्यदायी, सुखसंपन्न, निरामय, आनंदाचे , प्रेमाचे जाऊ दे याच माता कामाख्या देवीचरणी प्रार्थना. त्यांच्यावर कोणतेच दुःखाचे संकट यापुढे येऊ नये, हीच मनोमन इच्छा.

आयुष्य खरोखरच खूप सुंदर आहे. फक्त आपण त्याकडं कसं बघतो हे महत्त्वाचं. सारं काही आपण ठरवू तसंच होईल, असंही नाही. पण मनासारखं झालं तरी किंवा नाही झालं तरी आपण आपले प्रामाणिक प्रयत्न सोडायचे नाहीत. संधी मिळाली की तिचं सोनं करणं, हे खरं कसब आहे. हेच कसब बापूंनी आम्हा सर्वांना दाखवून दिलं. खरंच तुमची ही प्रेरणा आमच्या जीवनात सदैव अशीच तेवत राहील.

💐💐💐💐💐💐

सौ. अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)

 मर्ढे सातारा




16 comments:

  1. धन्यवाद
    अंजली मॅडम
    मी स्वतःला धन्य मानतो की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं मला गुवाहाटीच्या कार्यशाळेमुळे भेटली.
    आपण या पंधरा दिवसाच्या काळात माझा इतका बारकाव्याने अभ्यास केला, यावर खरंच माझा विश्वास बसत नाही. पुन्हा एकदा धन्यवाद !
    आपल्या लेखणीची धार अशीच तळपत राहो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद बापू🙏✍️🌿🌷

      Delete
    2. बापुंच्या इच्छाशक्तीला आणि तुझ्या लेखणीला सलाम🙏

      Delete
  2. देवा बापू.... खूपच छान मॅडम

    ReplyDelete
  3. नमस्कार
    बापूंबद्दल केलेले लिखाण अत्यंत भावनाविवश करणारे आहे. अंजली मॅडम आपण खरंच बापूंचा खूप बारकाव्याने अभ्यास केलाय. आमचे बापू ग्रेटच आहेत !

    ReplyDelete
  4. खुपच छान लेखन आणि बापू क्या बात है 👌👍👍💐💐💐

    ReplyDelete
  5. Best work madam 💐💐

    ReplyDelete
  6. Sunder.khup chan .lay bhari

    ReplyDelete
  7. यथार्थ लेखन अंजली मॅम
    या माणसाची उंची खूप आहे.
    आपलं भाग्य की अशा माणसाचा सहवास मला व आपल्या सर्वांना लाभला.
    खूप छान लेखन.शब्द अपुरे पडणारं व्यक्तिमत्त्व,,,
    बापू,,,,,,,👌🏻🙏🏻😊

    ReplyDelete
  8. Khupchh bhari....ashya lokanmulech changlaya goshti tikun ahet

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. छान ओळी

    ReplyDelete
  11. बापू एक अवलिया माणूस माणुसकीचा झरा यथार्थ लेखण👌👌👍👍

    ReplyDelete