वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- १५ ४
पुस्तकाचे नाव - तात्या
लेखकाचे नाव - डॉ संदीप डाकवे
प्रकाशन व आवृत्ती- स्पंदन प्रकाशन पाटण
पृष्ठे संख्या– ७२
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १५०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१ ५४ |पुस्तक परिचय
“तात्या”
लेखक : डॉ. संदीप डाकवे
प्रस्तावना : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणजे कराड .याच कराड नगरीत वेणूताई चव्हाण सभागृहात स्वर्गीय राजाराम डाकवे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार या पुरस्काराने ओंजळीतला चंद्र या माझ्या कविता संग्रहाला गौरविण्यात आले . त्यावेळेस बक्षीस रूपात तात्या हे पुस्तक माझ्या ओंजळीत पडले .
माणसाचे जीवन हे कोणत्याही अलंकाराने सजवले, आभूषणे घातली, कीर्ती-वाखाणणीने गौरविले, तरी त्या जीवनात सर्वात मोठा तेजोभास असतो तो – त्याच्या संस्कारांचा. भूमी, काळ, परिस्थिती आणि कुटुंब या चौकटीत जो व्यक्ती घडतो… त्याच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पावलावर जे अदृश्य शिकवणांचे, अनुभवांचे आणि वडिलकीच्या आलिंगनाचे सावली वृक्ष उभे असतात… ते वृक्ष म्हणजे तीर्थरूप असतात.
डॉ. संदीप डाकवे यांनी आपल्या स्वर्गीय वडिलांचे – तात्या यांचे जीवन शब्दबद्ध करताना जे केवळ पुस्तक निर्माण केले नाही, तर जणू पालखीच उचलली. ती पालखी अक्षरांची… आदराची… स्मृतींची… आणि मानवी मूल्यांची. “तात्या” हा चरित्रग्रंथ म्हणजे वास्तवातील ऋणानुबंधांचे, संस्कारांचे आणि माणुसकीचे अढळ स्मारक आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) या साध्या ग्रामीण मातीमधून तात्यांचा उगम झाला. दारिद्र्य, मर्यादा आणि जीवनातील संघर्ष यांमधून त्यांनी उभे राहायला शिकले. चार पैशांच्या कमाईसाठी मुंबई गाठली… कठोर श्रम केले… पण जीवनाला कटू बनू दिले नाही. मेहनत, सचोटी आणि माणुसकी या तीन अंगभूत मूल्यांना त्यांनी आपले धर्मव्रत मानले. हीच त्यांची परंपरा. हीच त्यांची गुरुकिल्ली. हीच त्यांची जीवन-उंची.
लेखक संदीप यांच्यातील कलाकार, संवेदनशील पत्रकार आणि चित्तवेधक समाजजिवन निरीक्षक ही त्रिस्थिती पुस्तकात लख्ख भासते. ते म्हणतात चित्रकारी हा माझा छंद, पण पत्रकारिता माझे व्रत. दोन्हींची नजर हे पुस्तक वाचताना अनुभवाला येते. रंगरेषांची निर्मिती करण्याचे कौशल्य जे त्यांच्या जादुई बोटांत आहे, तसंच शब्दातील रंग रचून व्यक्तिचित्र रंगवण्याची त्यांची कला प्रत्येक पानावर भासते.
तात्या यांचे जीवन केवळ घरापुरते सीमित नव्हते. देवपूजा, ग्रामीण समाजातील धर्मभावना, गावपरंपरा, जनावरांवरील माया, शेतावरचा श्रम, गावातील धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग, लोकांशी प्रेमळ संबंध, मदत… हे सारे त्यांच्या दैनंदिनीत होते. ते मानवतेचे मानदंड होते.
तसेच त्यांचे नाजूक नावाचे बैलाशी असलेले नाते… हे अध्याय पुस्तकातील सर्वाधिक भावणारे चित्र आहे. शब्द वाचताना वाचकाला नाजूकची चुणूक, त्याचे कान टवकारणे, सावध होणे… आणि तात्यांना कोण भेटायला आले तर त्या माणसाकडे संशयाने पाहणे हे सारे जणू समोर पाहिल्यासारखे दिसते. माणसाचे, प्राण्याचे भाव, भाषाहीन वेदना यांचे अर्थ लावण्याचे तात्यांचे सामर्थ्य हे पुस्तकातील मोठे अध्यात्मिक स्वरूपाचे सौंदर्य आहे.
तात्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटकाचे, प्रत्येक घटना-ठिपक्याचे महत्व लेखकाने शोधून काढले आहे. मुंबईच्या वास, तिथल्या साध्या जेवणाची चव, कोणतीही गोष्ट वाया न घालवणे, जुन्या साहित्याची किंमत समजून घेणे, कोणतेही काम ते मनापासून करणे… हा त्यांचा जीवनमंत्र संदीप यांच्या शब्दातून वाचकाला जिवंतपणे भिडतो.
“मातापित्यांची भक्ती हीच आंतरशक्ती” – हा विचार या पुस्तकाचा मूलाधार आहे. आजच्या काळात आई-वडिलांचे स्मरण करणे म्हणजे जणू जुनाट आणि कालबाह्य गोष्ट मानणाऱ्या पिढीत… हा पुस्तक आदर्श उपहार आहे. स्मरणग्रंथांच्या पद्धतीत लिहिलेले असले तरी ‘तात्या’ हे स्वतःचे अस्तित्व नसून जनश्रुती बनण्याची ताकद असलेले ग्रंथ आहे.
पत्र व्यवहार हे माणसाच्या मनाचे जिवंत पान. “आमी ठणठणीत हाय” अशा एका वाक्यात तात्यांनी कुटुंबाची खुशाली सांगितली आहे आणि त्याच एका वाक्यात “हातपाय सांभाळून काम करा” अशी लाखमोलाची काळजीही ठेवली आहे. हीच मराठी पत्रलेखनाची अगदी गावगाठ्याची, पण चिरंतन संस्कृती या पुस्तकात जपली गेली आहे.
संदीप सरांनी पत्रकारिता क्षेत्रात मिळवलेल्या मानांच्या प्रसंगी तात्यांचे उपस्थित राहणे… आणि त्यांचे स्टेजवर नाव पुकारल्यानंतर उमटलेले रोमांच हे क्षण वाचकाच्या हृदयात निखारे पेटवतात. मुलाने मिळवलेला गौरव म्हणजे पित्याची समाधी – हे तात्यांनी शेवटच्या क्षणी अनुभवले.
प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी दिलेली या ग्रंथाला प्रस्तावना या पुस्तकाची शोभा वाढवते कारण अशा अनुभवी अभ्यासकाच्या लेखणीतून या पुस्तकाचे तात्त्विक स्थान अधिक सुदृढ होते.
पुस्तक ‘तात्या’ हे फक्त संदीप डाकवे यांच्या वडिलांचे चरित्र नसून –
हे “मानवी मूल्यांचा अभ्यासग्रंथ” आहे.
ही भारतातील ग्रामीण कुटुंबव्यवस्था, संस्कार, परंपरा, रक्तदत्त ऋण आणि माणसे कमावण्याची पिढीजात पद्धत याचे दस्तऐवजन आहे.
स्पंदन प्रकाशन तर्फे प्रकाशित हा ग्रंथ, पुढील पिढ्यांसाठी “स्मृतींचे विद्यापीठ” ठरू शकतो. स्वभाव, संस्कृती, इतिहास, अध्यात्म आणि ग्रामीण आयुष्य एकत्र विणणारे हे पुस्तक – तात्या या साध्या, पण थोर माणसाचे गौरवगीत आहे.
नाती, माणुसकी आणि संस्कार ज्या समाजात हरवत आहेत…
त्या समाजाला हा ग्रंथ डोळ्यात बघून सांगतो –
“सर्वात मोठा वारसा म्हणजे संस्कार.”
आणि त्याची हीच जिवंत खूण “तात्या”.
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment