Wednesday, June 25, 2025

पुस्तक क्र १११ यशाचा पासवर्ड


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १ १ १

पुस्तकाचे नाव - यशाचा पासवर्ड

लेखकाचे नाव - प्रा.नितीन बानुगडे पाटील

प्रकाशन व आवृत्ती-मुद्रा प्रकाशन रहिमतपूर सातारा

पृष्ठे संख्या– २२८

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१ ११||पुस्तक परिचय

यशाचा पासवर्ड

प्रा.नितीन बानुगडे पाटील



जगण्याचं गूढ उलगडणारे, आत्मविश्वासाचा दिवा मनात पेटवणारे आणि स्वप्नांची उंच भरारी घेणाऱ्यांसाठी दिशा दाखवणारे, असे हे अद्वितीय पुस्तक — "यशाचा पासवर्ड".


हे पुस्तक म्हणजे केवळ अक्षरांचे संकलन नव्हे, तर आयुष्याच्या अंधाऱ्या वळणांवर मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे. यशाच्या महासागराकडे नेणारी एक शिडी आहे, जिथे प्रत्येक पायरी अनुभवाने, चिकाटीने, स्वप्नांच्या ध्यासाने कोरलेली आहे.

यशाचा पासवर्ड हे पुस्तकं म्हणजे जणू आत्म्याच्या तळातून वाहणारा प्रेरणेचा झरा आहे. हताश झालेल्यांना नवी उमेद देणारा, आत्मविश्वास गमावलेल्यांना नवी उभारी देणारा, आणि खचलेल्या विचारांना नवा उभारी देणारा सच्चा सखा!

यशाचा पासवर्ड” हे पुस्तक प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे आत्मप्रेरक स्फूर्तीचे ग्रंथ आहे ज्यात ते यशाकडे जाऊन पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करतात.

“यशाचा पासवर्ड” म्हणजे आत्मविश्वासाचा चावी – साध्या, स्वाभाविक आणि स्वावलंबी विचारांनी भरलेलं पुस्तक, जे प्रत्येक वाचकाला स्वतःत बदल घडवून यशाच्या दालनात प्रवेश करण्याचा विश्वास देतं.

या पुस्तकातील महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे, 

यशासाठी योग्य मानसिकता –

पुस्तकात यश मिळवण्यासाठी सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती यांचा कसा उपयोग करावा हे सुस्पष्ट केले आहे.


सोप्या व थेट भाषेतील लेखन –

लेखकाची शैली संवादात्मक आहे. उदाहरणांनी समृद्ध लेखन विद्यार्थ्यांच्या मनाशी सहज जुळते.


खास विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त –

अभ्यासाची तंत्रे, वेळेचे व्यवस्थापन, एकाग्रता टिकवण्यासाठी उपाय यांबाबत मार्गदर्शन देणारे हे पुस्तक स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः उपयुक्त ठरते.


यशस्वी लोकांच्या गोष्टींमधून प्रेरणा –

अनेक यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकथा आणि त्यातील शिकवण वाचकाला पुढे जाण्याची उमेद देतात.


यश म्हणजे केवळ पैशाचे नव्हे तर व्यक्तिमत्त्वाचे यश –

या पुस्तकात ‘यश’ या संकल्पनेचा समतोल अर्थ उलगडून दाखवण्यात आला आहे. आत्मविकास, मूल्ये, नैतिकता आणि संयम हेही यशाचे घटक आहेत, असे ठामपणे सांगितले जाते.

प्रत्येक वाचकाला स्वतःमध्ये यशाचे बीज शोधायला शिकवते.

हे केवळ वाचायचे पुस्तक नाही, जगायचे पुस्तक आहे.

निराशा, अपयश व गोंधळातून मार्ग काढून देणारा उजेडाचा किरण आहे.

"यशाचा पासवर्ड" हे पुस्तक म्हणजे यशाच्या दाराला उघडणारी गुरुकिल्लीच आहे. ते वाचताना वाचक आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायला प्रेरित होतो. या पुस्तकाचे प्रत्येक पान वाचकाला आत्मविश्वास, प्रेरणा व दिशा देणारे ठरते.


🔖 विद्यार्थ्यांपासून ते पालक, शिक्षक आणि स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांपर्यंत – साऱ्यांसाठीच हे पुस्तक जीवनदिशा देणारे आहे.या पुस्तकात एकूण 110 प्रसंग दिलेले आहेत . प्रत्येक प्रसंग हा नवी दिशा आणि नवीन ऊर्जा देणार आहे .

महाकवी कालिदास यांचे या पुस्तकातील कथा विशेष आवडणारी आहे .त्याचे शीर्षकही खूपच छान आहे . अढळ निश्चयच यशाच्या अढळ पदावर नेतो .ही संपूर्ण कथा वाचकांसाठी मी मुद्दाम देत आहे .

एक तरुण गुराखी रिकामपणाचा उद्योग म्हणून झाडाची फांदी तोडत होता. पण ज्या फांदीवर तो बसला होता तीच फांदी तोडण्यांचा त्याचा अजब उद्योग त्या राज्याच्या प्रधानाने बघितला. दिसायला देखणा असलेला पण बुध्दी अन् ज्ञानाचा लवलेश नसलेला हा गुराखी पाहून त्याच्या मनात एक कल्पना आली. त्या राज्याच्या राज्यकन्येने त्याचा अपमान केला होता. राज्यकन्या मोठी विद्वान आणि प्रकांड पंडीत होती. प्रधानाने या गुराख्याचं तिच्याशी लग्न लावून देऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याचे ठरवलं. मोठ्या हुशारीने त्याने गुराख्याला विद्वान पंडिताचे रुप दिलं. साऱ्यांना चतुराईने तयार करुन त्याचं राज्यकन्येशी लग्न लावलं व आपलं ईप्सित साध्य केलं.


मात्र या साऱ्याबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या राज्यकन्येने लग्न झाल्यावर एकांतात आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित् वाग्विशेषः ? म्हणजे वाड्:मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का..? अजिबातच न शिकलेल्या आणि कमी बुध्दी असलेल्या या गुराखी पतीला काहीच कळत नव्हतं. परिणामी, त्याचं बिंग फुटलं. त्याच्या या अडाणीपणाबद्दल त्याची पत्नी झालेली राजकन्या त्याला प्रचंड टाकून बोलू लागली, चेष्टा करु लागली... आपल्या पत्नीने केलेला हा अपमान त्याला सहन झाला नाही. त्याने तिथेच विद्वान नि प्रकांड पंडीत व्हायचा निश्चय केला आणि सरळ जंगलाची वाट धरली. कालिमातेच्या मंदिरात तो ज्ञानसाधना करु लागला. त्याने प्रयत्नपूर्वक आपला निश्चय तडीस नेला. अत्यंत विद्यासंपन्न होऊन तो परतला. आपल्या प्रतिभा गुणांवर तो संस्कृत भाषेतील कविकुलभूषण ठरला. कालीमातेच्या समोर ज्ञान संपादन केले म्हणून कालिदास झालेला हा सर्वसामान्य गुराखी आपल्या निश्चयाच्या जोरावर 'महाकवी कालिदास' म्हणून विश्वप्रसिध्द झाला.


तुम्ही कोण आहात याने काही फरक पडत नाही. तुमचा निश्चयच तुम्ही कोण होणार, हे ठरवत असतो. तुमच्यातील उणिवा तुमच्या अडचणी ठरतातच, पण त्याच अडचणीचं पंखात रुपांतर करुन यशाच्या आभाळात भरारी मारता येते. फक्त झेप घेण्यााचा ठाम निश्चय हवा. तुमच्यात गुण असोत वा नसोत तुम्ही सबल असो वा दर्बल. तुमच्याकडे फक्त दृढ निश्चय हवा. तोच तुम्हाला साऱ्या संकटातून यशाच्या सर्वोच्च स्थानी पोहचवत असतो. न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र प्रचंड अवघड जात होते. चार्ल्स डार्विनच्या उनाडपणमुळे त्याचे वडील वैतागले होते. जेम्स वॅटला त्याच्या शाळेने मुर्ख ठरवलं होतं. पण निव्वळ निश्चयाच्या बळावर या साऱ्यांनी स्वतः च्या दुर्बलता, अक्षमतांना गाडून त्यांच्या उरावर यशाचा ध्वज फडकावला. ते सांगतात, एकदा तुम्ही निश्चय केलात की, त्याच्या परिपूर्णतेसाठी तुमच्या साऱ्या शारिरीक, मानसिक शक्ति एकवटल्या जातात. त्या तुमच्या निश्चयाभोवती केंद्रिभूत होतात. निश्चयात अद्भुत शक्ति असते. ती पूर्ण दृढतेने आणि झोकून देऊन काम करायला भाग पाडते. तुमचा निश्चयच माघारी जाण्याचे सारे दोर कापून टाकतो. पुढे येणाऱ्या संकटांना उध्वस्त करण्यासाठी सामर्थ्यशील बनवतो. निश्चय मन, मेंदू, मस्तिष्क पूर्ण एकाग्र बनवतो. मनाची द्विधा अवस्था संपवतो.


नेपोलियन यशस्वी ठरायचा याचं कारण तो द्विधा अवस्थेत कधी अडकला नाही... तो लक्ष निश्चित करायचा अन् सरळ निशाण्यावर वार साधायचा !


परिस्थितीपेक्षा आपण प्रबळ बनणे, हाच परिस्थितीवर विजय मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग! ही प्रबळ बनण्याची शक्ति निश्चय बहाल करतो. जी संकटं तुमच्या शक्तीपुढे झुकत नाहीत, ती तुमच्या दृढनिश्चयापुढेच झुकत असतात. तुमचा निश्चयच तुम्हाला हरु देत नाही. अब्राहम लिंकनने स्वातंत्र संघर्षावेळी आपल्या डायरीत लिहिलं होतं, हे काम मी अवश्य पूर्ण करीन..! परिस्थिती भयानक होती पण त्यांच्या या निश्चयानेच त्यांना बळ दिलं अन् देशाचं नेतृत्व त्यांच्याकडे आले. आपले ठरवलेले कार्य त्यांनी पूर्ण केले.


एखादी गोष्ट करायचीच हे ठरलं की मग तो निश्चय होतो. तो दृढनिश्चय झाला की मग झपाटलेपण येते. मग टीका, निंदा, अपयश काही येवो निश्चयी व्यक्ती ढळत नाही. अढळपद मिळवण्याचा निश्चय करणाऱ्या ध्रुवासारखाच तो अढळ असतो तोच निश्चय तुम्हाला यशाच्या अढळ उंचीवर नेतो..!

बघितली नाही छोटीशी गोष्ट किती सुंदर मनाला भावणारी आहे .नक्कीच हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्यात नक्कीच बदल जाणवेल .प्रत्येकाने वाचावं आणि संग्रही ठेवावं .खूप सुंदर पुस्तक . धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment