वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ७४
पुस्तकाचे नाव - उपक्रमशील शिक्षक
लेखकाचे नाव - सुनील शेडगे
प्रकाशन व आवृत्ती- सकाळ प्रकाशन सातारा
पृष्ठे संख्या– १३६
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २००
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
७४||पुस्तक परिचय
उपक्रमशील शिक्षक
सुनील शेडगे (आप्पा )
उपक्रमशील शिक्षक म्हणजे ज्ञानाच्या विश्वातला एक प्रकाशस्तंभ असतो. तो केवळ पुस्तकातील अक्षरांमध्ये अडकून राहत नाही, तर त्या अक्षरांना प्राण फुंकतो, विचारांना पंख देतो, आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवे गगन गाठण्याचे धाडस देतो.
तो शिक्षक म्हणजे सृजनशीलतेचा शिल्पकार, जो कोर्या मनांचे मूर्तिमंत घडवतो. वर्गखोली ही त्याची प्रयोगशाळा असते, chalk आणि duster हे त्याचे शस्त्र असते, आणि स्वप्नांची दुनियाच त्याची प्रेरणा असते.
उपक्रमशील शिक्षक मुक्त आकाशातील पक्ष्याप्रमाणे विचारांची भरारी घेतो, आणि आपल्या विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी नव्हे तर जीवनासाठी शिकवतो. तो कधी गोष्टीरूपी दीपगृह उघडतो, तर कधी नाट्यछटा सादर करून भावनांना अर्थ देतो.
तो पाण्यात जरी राहिला तरीही तोंडात पाणी न ठेवणारा दीपस्तंभ आहे, जो अंधाराच्या साम्राज्यातही ज्ञानाचा प्रकाश पसरवतो. नवीन कल्पनांचा तो पाऊस पाडतो, जिथे विचारांची माती ओली होते, आणि त्या मातीतून ज्ञानाची नवपल्लवी फुटते.
अशाच सातारा जिल्ह्यातील शिक्षणाच्या प्रवासात नवक्रांती घडवणाऱ्या दीपस्तंभांना अलगदपणे निवडून एक ज्ञानाच्या क्षितिजा पर्यंत पोहोचण्याचा हमरस्ता तयार करणारे आदरणीय सुनील शेडगे आप्पा यांचे हे उपक्रमशील शिक्षक पुस्तक .सातारा जिल्ह्यातील विविध शाळेत कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना या पुस्तक रुपी पानापानातून तुम्हा सर्वांचे भेटीला आदरणीय आप्पांनी आणलेल आहे .साताऱ्यातील एकूण शंभर शिक्षकांचे लेख दैनिक सकाळमध्ये उपक्रमशील शिक्षक या सदराखाली सर्वांच्या माहितीसाठी छापून येत होते आणि याच लेखांचा सुंदर असा नजराणा म्हणजेच सकाळ उपक्रमशील शिक्षक पुस्तक हे होय .सर्वांनीच या पुस्तकात सहभाग घेतला नसला तरी एकूण 64 शिक्षकांचे लेख या पुस्तकात प्रकाशित झालेले आहेत . शिक्षणक्षेत्रात नवक्रांती घडवणारे हे सर्व गुरुवर्य तुम्हाला या पुस्तकातून भेटीस येतील .प्रत्येकाचे कार्य हे वेगवेगळे आणि आपल्या विद्यार्थी हिताचे आहे .विद्यार्थी हितासाठी काहीही करणारे हे शिक्षक खरंच वंदनीय आहेत .योगायोगाने याच पुस्तकात माझाही उपक्रमशील शिक्षक म्हणून दैनिक सकाळने गौरव करत सुंदर असा लेख छापून आणलेला आहे .सुनील शेडगे सरांनी लिहिलेली ही लेखमाला फक्त शिक्षकांतच नव्हे तर सर्व समाजात सर्व स्तरात वाचक प्रिय ठरली.शिक्षकांच्या दृष्टीने तर या पुस्तकाचे मोल अमूल्य आहे .तसं तर सलग 100 दिवस लिहिणे ही काही चेष्टा नाही पण सुनील शेडगे सरांनी प्रत्येक शिक्षकातील गुण हेरले आणि आपल्या परिस्पर्शाने त्यांचं सोनं केलं .दैनिक सकाळचे सहयोगी संपादक राजेश्वरकर यांनीही अत्यंत विश्वासाने या लेखमालेची जबाबदारी सुनील शेडगे सरांवर सोपवली आणि ती जबाबदारी आदरणीय आप्पांनी अतिशय चोखपणे बजावली .दुसऱ्याविषयी लिहिता लिहिता आपणही कधी समृद्ध होत जातो हे कळत नाही . अशीच शेडगे सरांची लेखणीही समृद्ध होत गेली .खरंतर या पुस्तकातील प्रत्येक गुरु माझ्यासाठी वंदनीय आहे इथे पुन्हा एकाच नाव घेणे प्रत्येक जण सोन्यातील मानकाप्रमाणे आहे .
साताऱ्यातील उपक्रमशील शिक्षकांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण व प्रेरणादायी उपक्रम राबवले आहेत. त्यांचे कार्य केवळ शिक्षणपुरते मर्यादित न राहता सामाजिक जागरूकता, विद्यार्थी विकास, आणि समुदाय सहभाग यांचाही समावेश करते.
अनेक शिक्षकांनी डिजिटल शिक्षण, प्रोजेक्ट-बेस्ड लर्निंग, तसेच स्थानिक विषयांवर आधारित शिक्षणपद्धतींचा अवलंब केला आहे.
काहींनी ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, मोबाईल अॅप्स व व्हर्च्युअल क्लासरूम्सचा वापर करून ग्रामीण भागात शिक्षण पोहचवले आहे.
शाळांचे सर्वांगीण परिवर्तन — भिंतींवर चित्रकला, संगणक कक्षांची उभारणी, शाळेतील ग्रंथालयांचा विकास इ. — हे या शिक्षकांच्या पुढाकारामुळे शक्य झाले.
हे पुस्तक विविध शिक्षकांच्या नवोन्मेषी उपक्रमांची कहाणी सांगते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील शिक्षकांनी आपल्या शाळांमध्ये केलेल्या प्रयोगशील कार्याचा आढावा यात घेतला आहे.या पुस्तकात महिला शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याची ओळख करून दिली आहे.
सुनील शेडगे सर यांची लेखनशैली ही अत्यंत ओघवती, सजीव आणि अनुभवात्मक आहे. त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामीण शिक्षण क्षेत्रातले वास्तव अत्यंत समर्पक शब्दांत मांडले आहे.
शेडगे सरांचे लेखन हे त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असते. त्यांनी शिक्षक म्हणून ज्या गोष्टी अनुभवल्या, पाहिल्या, त्याचा प्रत्यय लेखनातून वाचकाला येतो. त्यामुळे लेख वाचताना तो केवळ माहितीपर न राहता, भावनिक देखील ठरतो.सुनील शेडगे सरांची लेखनशैली ही समर्पणशील शिक्षक, संवेदनशील समाजभान असलेला नागरिक आणि प्रेरणादायक विचारवंत या तिन्ही भूमिका एकत्रितपणे मांडणारी आहे. ती शैली वाचकाला फक्त माहिती देत नाही, तर अंतर्मुख करते आणि काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा देते.
सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी वाचावे असे इतके सुंदर पुस्तक यातून आपल्याला ही निश्चित योग्य असे मार्गदर्शन होईल यात काही वाद नाही .
सुनील शेडगे सरांच्या लेखणीला त्रिवार सलाम आणि त्यांच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा .धन्यवाद🙏🏻
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment