वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ३ ३
पुस्तकाचे नाव - वारी
प्रकाशन व आवृत्ती- कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे .
पृष्ठे संख्या– २६०
किंमत /स्वागत मूल्य-- ३५० ₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
३ ३ ||पुस्तक परिचय
वारी
लेखक/ कवयित्री डॉ वसुधा वैद्य
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥
संत तुकाराम महाराजांच्या या ओव्या मुखी आल्या की आपल्या सर्वांना पंढरीची वारी आठवते . राम कृष्ण हरी ,राम कृष्ण हरी म्हणत सारे आबाल वृद्ध पंढरपूरचा ध्यास धरून त्या विठुरायाच्या दर्शनासाठी ऊन, वारा , पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता अखंड चालत राहतात .
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो.
या पंढरपूरच्या वारीवर अनेकांनी लिहिले आणि पुस्तके आली अगदी पिक्चरही निघाले तरीही ही वारी सरतही नाही आणि उरतही नाही .
पंढरपूरच्या वारी विषयी विठ्ठलाचे भक्ती विषयी डॉक्टर वसुधा वैद्य यांनी आपल्या अलौकिक शब्दातून कादंबरी रूपी ही वारीचा साकारून आपल्या भक्तीचा महिमा सांगितला आहे .
स्वतः एका वारकरी कुटुंबातल्या त्या असल्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासून तसेच संस्कार झालेले आहेत .त्यामुळे पंढरपूर विठ्ठल वारी आणि रामनाम याचे महत्त्व त्यांना चांगलंच माहिती आहे . आपल्या वारी या कादंबरीत त्यांनी हभप गोविंद पंत काळे यांच्या घरातील विठ्ठलाच्या असीम भक्तीची माहिती आपल्या सर्वांना दिली आहे .याच कुटुंबात जन्मलेला कादंबरीचा नायक मधु या विठ्ठलाच्या भक्तीबद्दल अतिशय अपशब्द बोलून वारकरी संप्रदायालाच नाकारतो आणि गैर मार्गाला लागतो .त्याची आई माई या अखेरच्या घटका मोजत असतात आणि त्यांना भेटण्यासाठी येताना त्याला आपल्या सर्व भूतकाळातील आठवणींचा उजाळा होतो .सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या आयुष्यात काय काय घडत गेलं याचे सुंदर वर्णन डॉक्टर वसुधा मॅडम यांनी आपल्या शब्दात अतिशय सुंदर केलेल आहे .नास्तिक माणूस ते आस्तिक माणूस बनण्यापर्यंतचा हा प्रवास त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून रेखाटला आहे .हे कादंबरी लिहिताना अतिशय बारकावे त्यांनी टिपलेले आहेत .वारीची परिपूर्ण माहिती घेऊनच वारीविषयी त्या शब्द बद्ध झालेल्या आहेत .
डॉक्टर वसुधा वैद्य यांची ही पहिली वहिली कादंबरी .पण हे पुस्तक वाचत असताना हे कुठेही जाणवत नाही की या लेखिकेने पहिल्यांदाच कादंबरी लिहिलेली आहे .अतिशय सुंदर एका मागून एक प्रसंग उलगडत जातात . आणि सारा जीवनपट आपल्यासमोर राहतो .
तेव्हा सर्वांनी नक्कीच ही वारी वाचली पाहिजे आणि अनुभवली पाहिजे .
डॉक्टर वसुधा वैद्य यांच्या पुढील लेखन प्रवासात खूप खूप शुभेच्छा . विठुराया कायम तुमच्यावर वरदहस्त ठेवून उभा आहे .पुस्तकाची बांधणी धाटणी अतिशय सुंदर झालेले आहे कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे यांच्याकडून अतिशय सुंदर अशी ही पुस्तक निर्मिती झालेली आहे तेव्हा सगळ्यांनी ही कादंबरी नक्की वाचावी .
डॉक्टर वसुधा वैद्य यांची ही कादंबरी माहे जानेवारी 2024 उत्कृष्ट पुस्तक परिचय लिहिल्याबद्दल मला भेट मिळाली होती .साक्षात या कादंबरीच्या रूपाने विठुरायाच मला सातारला भेटायला आला आणि या विठुरायारूपी माझ्या माऊलीनं ही कादंबरी प्रत्यक्ष मला भेट म्हणून दिली आणि माझ्या जीवनाच सोनं केलं .धन्यवाद .
सौ .अंजली शशिकांत गोडसे शिर्के
मर्ढे सातारा .

No comments:
Post a Comment