१)वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.
२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे(शिर्के)
३} पुस्तक क्रमांक :-१२
४} पुस्तकाचे नाव :- चंद्र,चंद्र आणि चंद्रचं
५)एकूण पृष्ठ संख्या :- १११
मूल्य :- २४० ₹ फक्त
**पुस्तक परीक्षण*
*चंद्र चंद्र आणि चंद्रचं*🌛🌜🌚🌖🌝🌙
चंद्र आयुष्यातला एक अविभाज्य घटक. लहानपणापासूनच आई चांदोमामा चांदोमामा पाहून किंवा त्या चांदोमामाचे गीत म्हणूनच आपण लहानाचे मोठे होतो. चतुर्थीचा चंद्र इथे चंद्र असे अनेक धार्मिक अर्थाने आपण चंद्राकडे पाहत असतो पण सर्व धर्म सर्व रितीरिवाज वेगवेगळे असले तरीही अवकाशात दिसणारा चंद्र मात्र एकच आहे. अशा या चंद्राला समर्पक असं एक पुस्तक चंद्र चंद्र आणि चंद्रच दिलीप बर्वे यांनी लिहिलेले पुस्तक. माझ्या आईने प्रतिभा ताई लोखंडे यांनी मला भेट म्हणून पाठवलेलं होतं .आज 24 मार्च माझ्या *आईचा वाढदिवस* त्यानिमित्त तिला वाढदिवसाची भेट म्हणून मी हे पुस्तक परीक्षण करत आहे.
पुस्तकाचे नाव खूपच सुंदर आहे .चंद्र ,चंद्र आणि चंद्रच. म्हणजे चंद्राची सर्व माहिती या पुस्तकात दिलेली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 21 जुलै 2022 रोजी झाले. कारण 21 जुलै हा दिवस निवडण्याचं कारणही त्यांनी त्या पुस्तकात दिलेले आहे. कारण की 21 जुलै 1969 रोजी मानवाने चंद्रावर आपलं पहिलं पाऊल ठेवलं म्हणजे किती विचारपूर्वक हे पुस्तकाचे लेखन आणि प्रकाशन झाल असेल. यावरूनच हे पुस्तक अतिशय सुंदर आणि वाचनीय असं आहे. या पुस्तकाचे प्रकाशन केलेल आहे दिलीपराज प्रकाशन ,शनिवार पेठ, पुणे यांनी.
पुस्तकाचे मुखपृष्ठच अतिशय सुंदर आहे. एक भला मोठा गोल गरगरीत चंद्र आकाशात विराजमान झालेला आहे. आणि तो चंद्र जणू काही सजीव होऊनच आपल्याकडे पाहत आहे अशी आभासी प्रतिमा होत आहे. मलपृष्ठावर चंद्र जन्मापासून ते आज पर्यंत पहिल्या रशियन स्फुटनिक पासून अपोलो 17 पर्यंत भारताच्या आणि इतर देशांच्या भविष्यातील चांद्रमोहिमा अशी एकंदरच चंद्राबद्दल सर्वांकष माहिती देणारं पुस्तक छापलेल आहे. एक चंद्रावर जाणारे यान या मलपृष्ठावर दाखवलेल आहे. या पुस्तकाची किंमत 240 रुपये आहे पण त्या किमतीपेक्षाही मौल्यवान खजिना या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतो.
या पुस्तकाचे लेखक दिलीप बर्वे यांनी हे पुस्तकाचा अर्पण ही अतिशय सुंदर शब्दात केलेल आहे .ते म्हणतात नवरात्रीच्या प्रतिपदेला आमच्या घरात सुरेख चंद्रकोर उगवली त्या पूर्वाला हे पुस्तक अर्पण. म्हणजे याही वाक्यात ते चंद्राला ओवताना दिसलेले आहेत.
या पुस्तकाची प्रस्तावना लिहून देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्त्रोचे माझे ग्रुप डायरेक्टर आणि शास्त्रीय विषयावर पुस्तके व विपुल लेखन करणारे डॉक्टर सुरेश नाईक या थोर मंडळींनी लिहिलेली आहे.
या पुस्तकात मध्ये दिलीप बर्वे यांनी एकूण पंधरा विभाग केलेले आहेत. त्या विभागाच्या नावावरूनच आपल्याला चंद्राविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.
१. 'ना चंद्राशी'
२. कहाणी चंद जन्माची'
३. चंद्र- एक नैसर्गिक उपग्रह'
४. चंद्रच नसता तर काय झाले असते?'
५. चंद्राचे पृथ्वीवर व मानवावर होणारे परिणाम'
६. चंद्रप्रवासाचा प्रवास
७. मानवविरहित चांद्र मोहिमा
८. अपोलो मोहिमा
९. अपोलो-११-१२
१०. अपोलो-१३-१७
११. नासा- संशोधनाचे व्यावहारिक उपयोग
१२. इस्त्रो
१३. भविष्यकाळातील चांद्र मोहिमा
१४. चंद्रावरच्या मानवखुणा
१५. काही विशिष्ट नोंदी
या प्रत्येक विभागात चंद्राविषयी एक विलक्षण माहिती दिलेला आहे पहिल्याच पाठांमध्ये नातं चंद्राशी हा पाठ तर त्यांनी त्यांच्या शब्दात अप्रतिम रेखाटलेला आहे म्हणूनच मी माझ्या शब्दात न सांगता त्यांच्या शब्दात नातं चंद्राशी काय असतं हे सांगते.
'चांदोमामा चांदोमामा भागलास का..?" असं म्हणत आपण लहानपणी चंद्राशी नातं जोडतो. बालपणी चंद्राशी खेळायला आवडतं. श्रीरामानही बालपणी कौशल्येकडे चंद्रासाठी हट्ट केला. सुमंतांनी आरशामध्ये चंद्राचे प्रतिबिंब दाखवले अन् छोट्या रामाला चंद्र मिळाल्याचा आनंद झाला.
तारुण्यातला चंद्र म्हणजे प्रेमाचं प्रतीक. सजणीच्या सौंदर्यात भर पडते तो 'चंद्रमुखी' म्हटल्याने..
चंद्राचं चांदणं म्हणजे प्रेमिकांना पर्वणीच. या प्रकाशात जीवनातल्या आणाभाका घेतल्या जातात.
तारुण्याच्या या उंबरठ्यावरच चांदण्यात अनेक स्वप्नं पाहिली जातात. चंद्रावरील डाग म्हणजे सजणीच्या
गालावरचा तीळ.
प्रौढांना चंद्र म्हणजे आयुष्याच्या आठवणींना उजाळा.
चंद्राच्या चांदण्यात आयुष्यातील सुखाचे क्षण आठवून मनातील दुःख नक्कीच हलकं होते। तर कधी आनंद दुणावतो. वृद्धापकाळात ऐंशी वर्षानंतर सोहळा साजरा केला जातो तो सहस्त्रचंद्रदर्शनाचा! या सोहळ्याचा संबंधही पौर्णिमेच्या चंद्राशीच
चंद्राकडे पाहण्याची राजाची दृष्टी विशाल असते. छत्रपती शिवरायांनी जेव्हा राजगडावरून आभाळ न्याहाळले, तेव्हा त्यांना वाटले की हे तारे, या चांदण्या स्वराज्याच्या मदतीसाठी आल्या आहेत. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वृद्धिंगत होणारी राजमुद्रा शिवरायांनी काढली होती.
जसा मेघाशी मयुर तसा चंद्राशी चकोर पक्ष्यांना प्राण्यांनाही चंद्र हवाहवासा वाटतो. भित्र्या सशाला चंद्राने जवळ घेतले, अशी आख्यायिका आहेच ना! सृष्टीकथेत चंद्राला नायकाचे स्थान दिले जाते.
समुद्रही पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रेमात पडतो अन् त्याला भरती येते.
अनेक कवींनी चंद्रावर भरपूर काव्ये लिहिली आहेत. यात बालगीतांपासून प्रेमगीत ,नाट्यगीतांपासून चित्रपट गीतांपर्यंत साऱ्यात 'चंद्र' डोकावताना दिसतो. असा हा चंद्र कवीचा अत्यंत लाडका!
चित्रकाराला चंद्र म्हणजे चित्राचा जणू आत्माच कोणतंही निसर्गचित्र चंद्राशिवाय अपुरं वाटतं डोंगराआडचा चंद्र किंवा झाडाच्या फांदीमागे दिसणारा चंद्र, पाण्यातील चंद्राचं प्रतिबिंब यामुळेच चित्राची शोभा वाढते, हे नक्कीच!
महिलांसाठी चंद्र म्हणजे उत्साहाला उधाण संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाशिवाय महिला उपवास सोडत नाहीत. गरोदर स्त्रीला डोहाळेजेवण सोहळ्यात चंद्रावर बसून फोटो काढण्याची कोण होस! अहो! महिलांच्या कपाळावरची चंद्रकोर म्हणजे सौंदर्यात भरच! बाळाला झोपवताना चांदोमामाच लागतो अन् बाळ झोपलं नाही तर 'चंद्रानंच झोप नेली वाटतं!' असा आरोपही करायला ही महिला मागेपुढे पाहत नाही.
पती दूरदेशी असेल तर चंद्रांची सोबत सुखावतेच! अशा विरहात झुरणाऱ्या महिलांचा संदेशही साजणाला पोहोचवतो तो चंद्रमा अनेक विरहगीतातला गुंफलेले असते. चोरांना मात्र चंद्राचं भय! टिपूर चांदण्यात चोरी करायची पंचाईत! 'चोराच्या मनात चांदणं' ही म्हण आहेच ना! चंद्राच्या मोहात देवही पडतात. शीतलता देणारा हा चंद्र श्रीशंकरानं डोक्यावर धारण केला आहे.
डोळ्यांना सुखावणारा, मनाला फुलवणारा, आनंदानं झुलवणारा, आयुष्याच्या रणरणत्या उन्हात शीतलता देऊन दुःखाचा दाह कमी करणारा हा चंद्रमा आपल्या साऱ्यांचाच सोबती. अमावस्या आहे
म्हणून पौर्णिमेच्या चंद्राला महत्त्व आहे. आयुष्यातही अमावस्येनंतर पौर्णिमा येते, हा संदेश चंद्रच
आपल्याला देतो!
एवढे सुंदर वर्णन चंद्राचे केलेला असताना मी पामराने काय लिहावं ते चंद्रावर पण मी मात्र माझा चंद्र ओंजळीत ठेवलेला आहे.
चंद्र याविषयी उत्कट प्रेम आणि शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच आवर्जून वाचावं असे हे पुस्तक!
सौ अंजली शशिकांत गोडसे (शिर्के) मर्ढे, सातारा.

No comments:
Post a Comment