शिकवण शिवरायांची
कृती छोट्या मावळ्यांची
दिवाळी हा सण सणांचा राजा सर्वत्र आनंदात हर्षोल्हासात साजरा केला जातो . पण खरी मजा असते ती लहान मुलांची नवीन कपडे ,शाळेला सुट्टी, दिवाळीचा फराळ, अभ्यंग स्नान आणि सगळ्यात आवडतं म्हणजे दिवाळीतले किल्ल्यांची निर्मिती! हा किल्ला बनवण्यासाठी ही बालचमू तहानभूक सारं काही विसरून किल्ला बनवण्याच्या मागे लागलेली असतात .माती गोळा करणे, दगडी गोळा करणे, विटा गोळा करणे त्या किल्ल्याची सजावट करणे अशी एक ना हजार कामे त्यांच्या भोवती असतात. किती छान वाटतं त्यांना त्या मातीत रडबडलेलं आणि एकाग्र होऊन किल्ला बनवत असलेलं पाहून!
असंच आमचं लेकरू ही शिवराय प्रेमी !आपल्या सवंगड्यांसह किल्ले करण्यात मग्न. जशी सुट्टी लागली आहे तशी त्या किल्ल्याच्या मागे! कधी एकदा किल्ला होतोय असं झाले त्यांना . कोण दगडी गोळा करते. कोण विटा गोळा करते. कोण माती आणते .शाळेचं दप्तर ठेवलं नाही की ते किल्ल्याच्या मागे गेलीच समजा. काय करणार शिवाजीमहाराज विषयीचे प्रेम, आपुलकी त्यांच्या नसानसात भिनली आहे.
हेच शिवराय प्रेम त्यांना व्यवहारज्ञान, माणुसकी, प्रामाणिकपणा ,बांधिलकी, एकजूटपणा अशा अनेक गुणांची शिकवण देते. आणि त्याची प्रचिती प्रत्यक्षात येते. आज सकाळी पहाटे लवकर उठून ही मुलं अंघोळ न करताच दगडी आणि विटा शोधायला गेली .यामध्ये माझा अंश आणि त्याचा मित्र पारस दोघेही होते .शेजारीच किराणामालाचे दुकान आहे आणि त्या दुकानाच्या पायरीवर त्यांना एक पैशांच पाकीट सापडलं. त्यांनी ते खोलून पाहिलं. त्यात पैसे होते .मी खालीच गेटचे कुलूप काढण्यासाठी आले असताना त्या दोघांनी परत येऊन ते पाकीट माझ्या हातात दिले. मी विचारलं कुठे सापडलं? कोणाचे? चोरून आणलं का? तर त्यांनी मला घडलेला सारा वृत्तांत सांगितला. मलाच म्हणालेत की आपण ज्याचं आहे त्याला ते पॉकेट परत देऊ .नंतर ओके ठीक आहे असं मी बोलले .मी ते पाकीट उघडून पाहिले . ओळखीदाखल कोणतही कार्ड त्यात नव्हतं. पाचशे पाचशेच्या नोटा असून त्यांची किंमत सहा हजार रुपये होती .पण मुलांसाठी ती किंमत लाख मोलाची होती .त्यांच्या मनात आलं असतं तर त्यांनी ते पैसे लपवून ठेवून त्या पैशाचं काहीही केलं असतं पण त्यांनी ते पैसे माझ्याकडे आणून दिले .आणि मला सांगितलं की ज्याच आहे त्याला ते पॉकेट परत देऊ .यावरून एवढेच समजतं हीच आमच्या शिवरायांची खरी शिकवण ! मुलांना त्यांनी वस्तू ज्याचे आहे त्याला ती परत करावी याची प्रामाणिक शिकवण दिली. खरंच हे त्यांच शिवराय प्रेम किल्ल्यांवरील अपारभक्ती त्यांना प्रामाणिकपणा शिकवून गेली . आपली संस्कृती आपल्याला हेच तर शिकवते. पुढे पाकिटाची ओळख पटली आणि त्या मुलाने या मुलांना खाऊ पण दिला.. मुलं ही गोष्ट विसरून गेली पण माझ्या मनात मात्र ही गोष्ट घर करून राहिली. मी मनापासून शिवचरणी लीन झाले .
जय शिवराय ! जय महाराष्ट्र !
सौ अंजली शशिकांत गोडसे
मर्ढे ,सातारा.

नेक प्रामाणिकपणा अभिनंदन
ReplyDeleteThank u
ReplyDeleteभारीच 👌👌🚩🚩
ReplyDeleteप्रामाणिक लेकरं... अंश व पारस 😘😘
ReplyDeleteछान अंश व पारस
ReplyDeleteWell done....ansh and godase ma'am
ReplyDelete