Tuesday, February 8, 2022

वासोटा दुर्गभ्रमंती








*वासोट्याची दुर्गभ्रमंती हॉटेल सुयश संगे* ⛳⛳


 *निसर्ग खुणावतो* 
 *निसर्ग बोलावतो* 
 *निसर्गातच जीव आपला* 
 *मनोमन सुखावतो*
🦚🌿🍁☘️🍀🍃
निसर्गाचे विलोभनीय दर्शन घ्यायचं असेल तर निसर्गाकडे चला हे ब्रीद वाक्य योग्य आहे . जन्माला आल्यावर निसर्गाची विविध रूपे आपण पाहत असतो .काही ठिकाणी मात्र निसर्ग आपल्या सौंदर्याची भरभरून उधळण करतो . अशी ठिकाणं आपल्या नजरेपासून दूर एकांतात वसलेली असतात. आपल्याला जणू ती खुणावत असतात . आपल्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून याची देही याची डोळा निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायलाच हवा. असचं सातारा जिल्ह्यातील अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेले एक ठिकाण .सह्याद्रीच्या कुशीत आणि कोयना आईच्या मुशीत वसलेलं . कास बामणोलीचा नयनरम्य परिसर . इथेच आपल्या इतिहासाची साक्ष देत उभा असलेला *वासोटा किल्ला.*
 सर्व इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांना भुरळ घालणारा .वासोटा किल्ला एक अदभूत निसर्गरम्य ठिकाण.
वासोट्याला जाण्यासाठी आपल्याला सातारा येथून कास बामणोली मार्गे पुष्पपठार मार्गे जावं लागतं तर महाबळेश्वर होऊन आपल्याला तापोळा मार्गे बामणोलीला यावं लागतं दोन्ही काढून प्रवास म्हणजे स्वर्ग सुख देणारा प्रवास शहरी धकाधकीपासून दूर आपल्या स्मार्टफोन ला या ठिकाणी कोणतीही रेंज नाही यावेळेस आगुंडे परिवाराची झालेली ओळख आम्हाला वासोट्याच्या गिरी शिखरापर्यंत घेऊन गेली म्हावशी गावातच शिव सागराच्या काठावर आगुंडे परिवारांचे सुयश हॉटेल आहे . या ठिकाणी आपल्या राहण्याची व जेवणाची उत्तम सोय होते . आम्ही एक दिवस आधीच मुक्कामी गेलो होतो कारण तिथली रात्र ,पहाट सारं काही
मुक्तहस्ते अनुभवायचं होतं . 
शिव सागराच्या जलाशयाच्या काठावर
टेंटमध्ये ही अप्रतिम राहण्याची सोय होते रात्रीच्या चांदण्यात आणि निसर्गाच्या सानिध्यात एकरूप होताना मन आणि शरीर अगदी मोहरून जातं तो शिव सागराचा काठ शांत शीतल मनाला गारवा देणारा वारा पौर्णिमेच टिपूर चांदणं सोबतीला शेकोटी आणि आपले प्रियजन आणि काय हवं ! 
स्वर्गसुख कशाला म्हणतात हे या ठिकाणी आल्याशिवाय करणार नाही .गुलाबी थंडीत गरमागरम जेवणाचा बेत आहाहा !किती सांगू आणि किती वर्णू शब्दच अपुरे पडतात आणि आगुंडे परिवाराची अगदी घरासारखी उठबस .
रात्र कधी संपते कळतच नाही पहाटेच्या मंद वाऱ्यात जाग येऊन पहाट वारा अंगावर घेत त्या वाऱ्याने न्हाऊन निघते मन ! ती रम्य सकाळ तिथे जाऊनच अनुभवयास हवी . सर्वांचे पहाटेचे सर्व सोपस्कार आवरून स्वारी निघते वासोट्याच्या  दिशेने ! कोण बूट घालण्यात कोण कपडे घालण्यात कोण मोबाईल शोधण्यात कोण टोपी शोधण्यात कोणी सेल्फी घेण्यात सगळे व्यस्त मी मात्र प्रत्येक क्षण माझ्या हृदयात साठवून पुन्हा पुन्हा वेळ मिळाल्यावर सवडीने एकेक आठवण बाहेर काढण्यास आतुरलेली !


शिवसागराच्या लाटांवर तरंगत लॉन्च तयार असतात आपल्या माणसांना घेऊन जाण्यासाठी ! शिडीवरून पटापट उड्या मारून आम्ही त्यात चढतो आणि आपापल्या जागा घेतो वासोट्या पर्यंतचा प्रवास दीड ते दोन तासाचा असतो जलाशयाचे जसे तरंग उठतात तसेच मनाचे तरंगही उठत जातात काहीतरी वेगळा अनुभव ! नाश्ता लाँचमधेच केला जातो आणि पाणी त्या शिवसागरातील प्यायचं गोड आणि मधुर कारण ते पाणी पिण्यासाठी वापरले जाते .डोंगर-दऱ्या झाडे पक्षी हा निसर्ग नजारा पहात पहात कधी वासोट्याच्या पायथ्याशी पोहोचतो हे कळतच नाही .
लॉन्च मधून खाली उतरलो की जुना इतिहास आठवतो आपले *छत्रपती शिवाजी महाराज* कैद्यांना याच वासोट्यावर ठेवत होते त्याचं कारण येथुन पळायला काही मार्ग नाही आणि पळालोच तर जंगली श्वापदे आहेत तुमचं काम तमाम करायला .
वासोट्याच्या पायथ्याशी एक चेक पोस्ट आहे मला आवडलेली सगळ्यात छान गोष्ट म्हणजे किल्ल्यावर *प्लास्टिक बंदी* आहे सर्व वस्तू याच ठिकाणी चेक केल्या जातात आपल्याकडे असणाऱ्या सर्व प्लास्टिक वस्तू जाताना मोजल्या जातात पुन्हा उतरल्यावर तेवढ्याच प्लास्टिकच्या वस्तू नाही दाखवल्या तर पाचशे रुपये दंड आकारणी केली जाते असे प्रत्येक किल्ल्यावर केलं जावं अशी माझी इच्छा आहे . जेणेकरून आपले गड सुरक्षित आणि सुंदर राहतील प्रत्यक्ष गड चढायला सुरुवात होते गर्द दाट झाडी त्यामधून जाणारी पायवाट मोठमोठे आहे ज्यांना पार केल्याशिवाय तुम्हाला जाता येत नाही एवढी गर्द झाडी असते की उन्हाचा मागमूसही खाली येत नाही गड चढताना अनेक टप्पे एक वेगळाच अनुभव देत होते काही ताकदीच्या जोरावर सगळ्यात पुढे काही मध्ये तर काही मागे अशा तीन टोळ्या झाल्या मी मात्र मध्येच होते पुढच्या आणि मागच्या ना का मारत मारत पुढे जात होतो.
 निसर्गाचे *अप्रतिम सौंदर्य* नयनचक्षू अलगद टिपत होते .सगळीकडे  झाडे वाळून पडलेल्या फांद्या अजस्त्र प्राण्यांसारख्या पडलेल्या होत्या . कधीकधी त्या खाली वाकलेल्या फांद्यांवर झोके घेतले जात होते . जस जसे वर चढत होतो आणि तितकाच उत्साह अंगात संचार  होता .आता पुढे काय असेल आता पुढे काय असेल अशी उत्सुकता लागली होती सगळ्यात वरच्या टप्प्यावर उन्हाचा दर्शन झालं आणि डोक्यावर घातलेल्या टोपीचा त्या ठिकाणी उपयोग झाला . मागे वळून पाहिले तर गर्द झाडी आणि त्या झाडीमध्ये दिसणारा शिवसागर तलाव
अगदी विलोभनीय दृश्य मनात साठवून पुढेच निघालो एका दगडी कमानीचे प्रवेशद्वार पायऱ्या आणि स्वर्गात परत जावं असं आम्ही वासोटा किल्ल्यावर पोहोचलो आमच्या समूहातील सर्व छोटे मावळे आधीच किल्ल्यावर पोहोचवून आम्हालाच गाईड करण्याच्या तयारीत होते त्यांनीच सारा किल्ला आम्हाला फिरवला. बाबुकडा ,मारुती मंदिर ,महाल, शिवमंदिर, नागेश्वर सुळका किती नयनरम्य परिसर.
• दीडशे फुट खोल असणारा बाबू कडा किल्ल्याच्या पश्चिम दिशेस पाहायला मिळतो.
• पडक्या अवस्थेतील एक वाडा देखील पाहायला मिळतो.
• किल्ल्याला एक उंच भिंतीसारखा कडा आहे त्याला ताई तेलीनीचा कडा म्हणतात.
• वासोटा किल्ल्यावर आपल्याला महादेव मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात.
• या किल्ल्यावर नागेश्वर शिवलिंग आहे आणि त्यावर गुहेच्या छतातून पाणी झिरपते आणि चंदकाईचे मंदिर देखील पाहायला मिळते.
• गडावर प्रवेश केल्यानंतर आपल्यला छप्पर नसलेले मारुतीचे मंदिर पाहायला मिळते.
• या गडावरील माची हि लोहगडावरील विंचूकड्याची आठवण करून देते.
   आता मात्र सर्व किल्ला पाहून मन मात्र परतीच्या प्रवासाला निघाले .वासोट्यावर राहण्यास बंदी आहे. पण आपण शिव सागराच्या काठावर टेन्टमध्येही राहू शकतो .अगदी निसर्गाशी एकरूप होऊन. किल्ला उतरू लागल्या वर कधी माकड उड्या ,कधी घसरगुंडी, कधी झोके घेत तर कधी काठीचा आधार .खरंच लय भारी!
 पोटात कावळे ओरडत असतातच मग लाँचमधे बसल्यावर त्‍या कावळ्यांना खाद्य पुरवायचं काम आपली काळजी घेणारे हॉटेलवाले घेत असतात .असं वाटतं त्या पाण्याच्या लहरी संगे एकरूप होऊन अनादी अनंत मनमुराद तरंगत
राहावं. *धन्यवाद* 🙏🌹


✍🏻✍🏻⛳⛳

©️®️ *सौ . अंजली शशिकांत गोडसे* 
 *मर्ढे सातारा*
 
 
 

 

10 comments:

  1. खूप छान... निसर्गरम्य वातावरण... तितकेच उत्कट लेखन .. अभिनंदन... भावी भटकंतीस शुभेच्छा...

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लेखन केले आहे
    Very very nice

    ReplyDelete
  3. खूप छान शब्दांकन

    ReplyDelete
  4. खूप छान

    ReplyDelete
  5. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वनदुर्ग वासोटा किल्ला, शिवसागर जलाशयात बोटिंग आणि वनराईच्या अनवटवाटेने केलेली रफेट म्हणजे सह्यगिरीच्या सानिध्यात मनमुराद आस्वाद घेत अंतर्मनात संचित केलेली निसर्ग नवलाई आहे.अप्रतिम पर्यटनाचे ठिकाण आहे.. सदैव निसर्गाच्या सान्निध्यात सुशेगाद जीवन पूर्णतृप्त करायला स्मरण देणारी भटकंती आपण सुंदर शब्दात गुंफली आहे.

    ReplyDelete
  6. धन्यवाद सर्वांचे☘️🌷

    ReplyDelete